शेतकरी कामगार पक्षाचे सांगोल्यातील आमदार गणपतराव देशमुख यांचे एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजकीय कारकीर्दीत ११ वेळा आमदारकी भूषवण्याचा मान गणपतराव देशमुखांनी मिळवला आहे. मात्र सामान्य नागरिकांची सेवा करण्याचा वसा वयाच्या ९१ व्या वर्षीही त्यांनी सोडला नाही. बस थांब्याबाबत एका विद्यार्थिनीने पत्र लिहिताच देशमुखांनी पाठपुरावा करुन तिची सोय केली. अत्यंत साधे आणि सामान्यांचे नेते अशीच त्यांची ख्याती आहे. आपल्याकडे आमदारांपर्यंत सामान्य माणूस पोहोचूही शकत नाही. आमदारांभोवती असणारे कोंडाळे सामान्यांचे प्रश्न, पत्र त्यांच्यापर्यंत नेतच नाहीत. साहजिकच आमच्या नेत्यांना वाटतं की सगळीकडं कसं आलबेल आहे. सुजलाम सुफलाम आहे. म्हणजे कोणत्याही लोकनाट्यात राजा प्रधानजीला विचारतात तसा संवाद आमच्याकडे आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू असतो. परधानजी? काय म्हनते राज्याची हालहवाल? की लगेच सगळं काही ठिक आहे. सांगून मोकळे होतात. राजे खूष होतात. हा असला तमाशा सर्वत्र सुरू असताना गणपतराव देशमुख यांच्यासारखे आमदार हा एक चमत्कारच वाटतो.गावात बसचा थांबा करावा, अशी मागणी एका विद्यार्थिनीने आमदार गणपतराव देशमुखांकडे केली होती. त्याचा पाठपुरावा करत देशमुखांनी बस थांबा करुन घेतला आणि संबंधित विद्यार्थिनीला पत्र पाठवले. इतकेच नाही, तर बस थांबवली नाही तर फोन करुन कळव, असेही तिला सांगितले. किती हा साधेपणा आणि प्रामाणिकपणा? हे असले साधेपणाचे किस्से पूर्वी पाठ्यपुस्तकात नाहीतर इसापनीतीतल्या राजा राणीच्या कथांमध्ये ऐकायला मिळायचे. कधी काळी लाल बहादूर शास्त्रींच्या पंतप्रधानपदाच्या काळातील साधेपणाच्या गोष्टी ऐकायला मिळत. पण आता हे सगळं लांब गेलं. म्हणजे गेल्या दोन दशकांत सुबत्ता आली. ७० च्या दशकात जशी टंचाई, रांगा असायच्या तशा रांगा आणि टंचाई जाउन महाग का होईना सगळ्या वस्तू पाहिजे तेवढ्या मिळू लागल्या. पण प्रामाणिक नेत्यांची मात्र टंचाई सुरू झाली. त्यांच्या दारापुढच्या रांगा वाढल्या. त्यामुळेच गणपतराव देशमुख यांचे कौतुक करावेसे वाटते. मोहोळ तालुक्यातील पेनूरमध्ये राहणार्या प्रेरणा विष्णू गवळी या मुलीने मोहोळला कॉलेजला जाण्यासाठी गावात बस थांबत नसल्याबद्दल पत्र लिहिले होते. मोहोळला जाणार्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बसमध्ये जास्त गर्दी होते. तसेच काही विद्यार्थ्यांना जागाही मिळत नाही. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होते, अशा आशयाचे पत्र तिने लिहिले होते. याबाबत पाठपुरावा करुन सकाळी सात ते सव्वाआठच्या दरम्यान दुसर्या बसला थांबा करण्याची विनंती केली होती. असे धाडस विद्यार्थीनीला झाले याचे कारण त्यांना नेते आपलेसे वाटतात. आज आमच्याकडे कितीही दुरावस्था असली, अस्वच्छता असली, गैरसोय असली तरी तक्रार करू शकत नाही अशी परिस्थिती नेत्यांनी निर्माण केलेली आहे. अत्यंत खराब रस्ते आणि खड्डे असतानाही त्याबाबत नागरिकांच्या तक्रारी करूनही आमदारांना त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. त्यांच्यापर्यंत त्या तक्रारीही पोहोचत नाहीत. सामान्य विद्यार्थीनी कशाला काय मागण्या करतील? पण गणपतरावांबाबत लहान मुलांनाही विश्वास वाटतो म्हणून ते सलग ११ वेळा आमदार होवू शकले. विद्यार्थीनीच्या या पत्राची दखल घेत गणपतराव देशमुखांनी पंढरपूर आगारप्रमुखांना फोन केला आणि दुसर्या बसला थांबा देण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे पेनूरला पंढरपूर-सोलापूर बस सकाळी आठ वाजता थांबणार आहे, असे आमदारांनी पत्राद्वारे प्रेरणाला कळवले. विद्यार्थिनीने पत्र पाठवले तेव्हा आपण अधिवेशनासाठी नागपुरात होतो, दुसरे पत्र मिळाल्यानंतर आगारप्रमुखांशी बोलून निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. म्हणजे हा तर प्रामाणिकपणाचा कहरच झाला. मोबाईल व्हॉटसअपच्या जमान्यात आजकाल आमदारांना पत्र लिहीता येतात की नाही असा प्रश्न पडतो. लगेच स्मार्ट फोन करून आपला अधिकार गाजवणार्यांना पत्राचे उत्तर द्यायचे असते हे तरी माहिती आहे की नाही अशी नव्या पिढीकडे पाहिल्यावर जाणवते. त्यामुळेच सोलापूरातल्या या दुर्मिळ आमदारांची दखल सगळ्या मिडीयाने घेतली तर त्याचे आश्चर्य वाटायला नको. पण गणपतराव देशमुख यांचे कार्यच सर्व आमदारांना मार्गदर्शक असे आहे. त्यांच्या मतदारसंघातील गल्ली बोळच नाही तर छोटे रस्ते, ग्रामीण भागातील पायवाटाही त्यांना ठाउक आहेत. कारण फक्त निवडणुकीतच नाही तर एरवीही ते मतदारसंघात फिरतात. असे सगळीकडे झाले तर अच्छे दिन यायला फारसा वेळ लागणार नाही.
रविवार, २१ जानेवारी, २०१८
आमच्याकडे सगळं कसं शांत शांत आहे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा