भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसला काल १३० वर्ष पूर्ण झाली. म्हणजे जे आम्ही ओरीजनला कॉंगी आहोत म्हणत आहेत ते ओरीजनल आहेत की नाही हा वेगळा मुद्दा आहे. पण १३० वर्षांच्या कॉंग्रेसने या देशाचे साठ वर्षांत जेवढे वाटोळे केले असेल तेवढे ब्रिटीशांनी दीडशे वर्षांतही केले नव्हते. गेल्या १३० वर्षात कॉंग्रेसने देशाच्या स्वातंत्र्याचा लढा लढवला असे सांगून त्याचा बाजार केला. स्वातंत्र्य मिळाले म्हणजे ब्रिटीश गेले आणि कॉंग्रेस सत्तेवर आली एवढाच फरक पडला बाकी धोरणात्मक असा काहीच बदल झाला नाही. त्यामुळे देश आजही प्रगत देश म्हणून गणला जात नाही. स्वातंत्र्योत्तर देशाची बांधणी करण्याचे काम कॉंग्रेसच्या नियोजनाच्या धोरणातून झाले आहे. पण कॉंग्रेसचा भ्रष्टाचार गेल्या दशकात इतक्या टोकाला गेला की एकेकाळी संपूर्ण देशावर राज्य करणारी, खेडोपाडी पोहोचलेली कॉंग्रेस आता लोकांना नकोशी झाली आहे. २०१४ मधील मोदी लाटेमुळे भाजप सत्तेवर आला हे म्हणणे तितकेसे खरे नाही. कॉंग्रेस विरोधाची लाट निर्माण झाली हे खरे आहे. त्यामुळे पर्याय म्हणून मोदींकडे पाहिले गेले. कॉंग्रेस पक्ष आज सत्तेत नाही. अजून पुढे किमान चार वर्ष तो सत्तेत असणार नाही. २०१९ला लोकसभेच्या निवडणुका लागतील. त्यानंतरही देशाचे राजकीय चित्र नेमकं काय असेल, हे आज सांगणे तितकं सोपं नाही. ज्या रूबाबात २०१४ची निवडणूक मोदी आणि भारतीय जनता पक्षाने जिंकलेली होती, तो त्यांचा रूबाब आज राहिलेला नाही. पण २०१४ मध्ये कॉंग्रेस विरोधी लाट निर्माण करून त्या लाटेला मोदी लाट नाव देण्याचे काम भाजपने यशस्वीपणे केले आहे. पण भाजपाबद्दल आणि मोदींबद्दलच्या अप्रियतेची सुरुवात आता फार वेगाने झालेली आहे हे नाकारूनही चालणार नाही. तरीसुद्धा कॉंग्रेस हा सर्वात जुना पक्ष असूनही तो २०१९ ला पर्याय होवू शकेल असे वाटत नाही.त्यासाठी कॉंग्रेसला देशपातळीवर पुन्हा एकदा पक्षाबद्दलचं विश्वासाचं वातावरण तयार करावे लागेल. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत २० ते २२ टक्के तरुणांची मते होती. त्यापैकी ८० टक्के मते भाजपाकडे वळली. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत २५ ते ३० टक्के तरुणांची संख्या असणार आहे. त्यामुळे कॉंग्रेस पुढच्या चार वर्षात तरुणांना कोणत्या प्रकारे विश्वास देऊ शकणार आहे, याकडे आज लक्ष द्यायला कॉंग्रेसच्या नेत्यांनाही वेळ नाही. दुर्लक्ष करणे हा अजंडा पराभवानंतरही कॉंग्रेस नेते राबवत आहेत. दिल्लीत तीन वर्षांपूर्वी निर्भया प्रकरणावरून तरूणाई रस्त्यावर उतरली असताना राहुल गांधींसारख्या युवा नेत्याला या तरूणांना भेटावेसे वाटले नव्हते. त्यामुळे केवळ तरूण आहेत म्हणून ते तरूणांच्या मनात राज्य करू शकतील हे कॉंग्रेसचे स्वप्न खोटे ठरले. त्याचप्रमाणे विरोधी पक्षाकडे प्रभावी नेतृत्व आहे हे तरूणांना पटवण्यात भाजप यशस्वी झाला होता. कॉंग्रेस विरोधाची लाट ज्याप्रमाणे मोदींनी २०१४ मध्ये कॅच केली तशी भाजप विरोधाची लाट निर्माण करण्यात कॉंग्रेस नेतृत्व सक्षम आहे काय? आज भाजपाने केलेली निराशा, वाढलेली महागाई, खोटी आश्वासने, फसवणूक आणि भाजपाच्या राजवटीतील भ्रष्टाचार हे सगळे मुद्दे भाजपाच्या विरोधात जाणार असले तरी हे मुद्दे कॉंग्रेसला अनुकूल करून घेण्यास त्या-त्या राज्यातली नेतृत्वाची फळीही प्रभावी असायला हवी. आज अशोक चव्हाण हे राज्यातील कॉंग्रेसचे नेते आहेत. पण ते कोणाला दिसतही नाहीत. आदर्श प्रकरणातून जे ते गायब झाले ते अजूनही उजळ माथ्याने फिरत नाहीत असे दिसते आहे. त्यामुळे १३० वर्षांच्या कॉंग्रेसची प्रादेशिक पातळीवर पुनर्बांधणी केल्याशिवाय आणि सक्षम नेतृत्व दिल्याशिवाय भाजपला रोखणे शक्य होणार नाही. तोपर्यंत भाजपचे कितीही अध:पतन झाले तरी भाजपशिवाय देशाला पर्याय असणार नाही. आज राज्यात राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण असे अनेक चेहरे कॉंग्रेसचे आहेत. पण कोणाचा कोणाला मेळ नाही. परस्परांना ते प्रतिस्पर्धी मानत आहेत अशी अवस्था आहे. विरोधात असताना सत्ताधार्यांची लक्तरे काढता आली पाहिजेत असे नेते असले पाहिजेत. पण आहेत ते सगळे शामळू नेते आहेत. राहुल गांधी स्वत:च इतके शामळू आहेत की ते काय बोलतात, काय करतात हे त्यांनाही समजत नाही. संसदेत न जाता कुठे तरी गायब होतात. यथा राजा तथा प्रजा. त्यामुळे कॉंग्रेस सावरणार कशी? या स्थितीत पुढच्या चार वर्षात कॉंग्रेस पक्ष पुन्हा उभा करण्याची फार मोठी जबाबदारी कॉंग्रेसच्या नेत्यांवर आहे. अर्थात कॉंग्रेस सत्तेपासून काही काळ दूर गेली, हे चांगलेच झाले. कॉंग्रेसच्या शुद्धीसाठी ते आवश्यकही होते. त्यामुळे विरोधी पक्षाच्या बाकावर बसून जनतेचे प्रश्न हिरिरीने मांडण्याची भूमिका आता कॉंग्रेसलाच घ्यावी लागेल. सर्वच राजकीय पक्षांना चढ-उतार असतातच. कॉंग्रेस पक्षाने याच चढ-उतारांमध्ये लोकांच्या बरोबर राहण्याची भूमिका घेतली पाहिजे. १३० वर्षांची कॉंग्रेस आत्ताच सावरली नाही तर ती संपुष्टात येईल हे निश्चित. कारण सत्तेशिवाय कॉंग्रेस जगू शकत नाही. दहा वर्ष कॉंग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यास भाजप यशस्वी झाली तर कॉंग्रेसला पुन: कधीच संधी मिळणार नाही हे सत्य आहे.
गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५
आत्ता नाही तर कधीच नाही
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा