दोन आठवड्यांपूर्वीच एक मुलगी शनीच्या कट्ट्यावर घुसली आणि तेल ओतून आली. त्यामुळे सगळीकडे अगदी बोंबाबोंब झाली. महिलांचा इगो, स्वाभिमान जागृत झाला आणि सनातन वाद्यांना विटाळ झाला. पण यामध्ये सर्वात जास्त त्रास कोणाला झाला असेल तर त्या शनीदेवालाच म्हणावे लागेल. म्हणजे इतके वर्ष अनेकांच्या राशीला लागल्यामुळे शनीच्या कुंडलीत या महिलांची साडेसाती आली की काय कोणास ठाउक? म्हणजे सोमवारी शनिशिंगणापूरमध्ये शनिश्वराच्या चौथर्यावर जाण्याचा प्रयत्न करणार्या महिलांना सुरक्षारक्षकांनी अडवलेे. त्यामुळे शनिशिंगणापूरच्या चौथर्यावरुन पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे. भूमाता संघटनेच्या प्राची देसाई आणि त्यांच्या सहकार्यांनी चौथर्यावर जाऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. नाव पण काय संघटनेचे छान आहे. भूमाता संघटना. म्हणजे पृथ्वीवरील असंख्य जिवांना शनीने आजपर्यंंत छळले म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी या माता भगिनी गेल्या होत्या की काय असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. पण या माता भगिनींना एकच विनंती आहे की बायांनो, तुमचा विश्वास नसेल तर तो बिचार शनी तुमच्या मागे लागला आहे का? की कसेही करा आणि माझ्या पाया पडा म्हणून? नसेल विश्वास तर नका ना जाउ? केवळ विरोधासाठी विरोध म्हणून त्या कठड्यावर चढून काय मिळणार आहे? जो देव महिलांना येवू देत नाही त्याचे आपण तोंड बघायचेच कशाला? कालच्या घटनेत महिलांच्या प्रयत्नांनंतर सुरक्षारक्षकांनी या महिलांना अडवून पोलीस स्टेशनला नेलं. हे सगळे काय चालले आहे? क्रांती करण्यासाठी अन्य विषय नाहीत काय? अंधश्रद्धा, जुनाट रूढी, परंपरा बंद व्हायला हव्यात. त्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनीही आपली हयात खर्च केली. पण असला आततायीपणा कधी केला नाही. नाहीतर केव्हाच शनीच्या कठड्यावर अंनिसच्या महिला चढल्या असत्या. पण ज्याचा समाजाला काही त्रास होत नाही त्यात नाक खुपसण्याची गरज नाही हा विवेकवाद इथे मांडला गेला होता. नाही म्हणायला शनी शिंगणापूरात चोर्या होत नाहीत म्हणून घराला दारे, कुलपं नसतात असं सांगितले जाते. कोणीही आपल्या घराला कुलुप लावत नाही म्हणून यातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी शनी शिंगणापूरला चोरी करा असे एक आंदोलन काही कार्यकर्त्यांनी केले होते. पण एखाद्या गावात चोरी होत नसेल तर ती चांगली गोष्ट आहे. विश्वासाला अंधश्रद्धा ठरवून अविश्वास दाखवण्याचा खटाटोप कशासाठी करायचा? पण त्यातूनही फारसे काहीच साध्य झाले नाही. काही दिवसापूर्वी पुण्यातली एक महिला शनिश्वराच्या चौथर्यावर जाऊन शनिदेवाचं दर्शन घेऊन आली होती. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. शिवाय काहीच दिवसांपूर्वी विश्वस्तपदासाठी महिला उमेदवार रिंगणात उतरणार असल्याचं वृत्त होतं. हे सगळं सवंग लोकप्रियतेसाठी केले जात आहे. असल्या सवंग लोकप्रियता मिळवण्याने काहीही साध्य होत नाही. उलट यातून केवळ इगो दुखावले जातात. सूडबुद्धीचे राजकारण सुरू होते. पुरूषी वर्चस्व नाकारण्याच्या नावाखाली या महिला त्या शनी नावाच्या पुरूषाचीच पूजा करीत आहेत. हा चक्क बावळटपणा आहे. काय या राज्यातील महिलांचे अन्य प्रश्न संपले? महिलांचे अन्य कोणतेही पक्ष नव्हते म्हणून शनीच्या कठड्यावर घुसण्याचा प्रकार केला? ही भूमाता अनेक युगे लोकांच्या लाथा सहन करते आहे आणि लोकांना पोटात घेते आहे. माणसाला अन्न, निवारा देते आहे. त्या भूमातेचे नाव आपल्या संघटनेला देवून या महिलांनी भूमातेचाच अपमान केला आहे. सहिष्णूता खरी कशाला म्हणतात तर त्याचे जिवंत उदाहरण ही भूमाता म्हणजे पृथ्वी आहे. त्या भूमातेच्या नावावर असहिष्णूतेचे वर्तन करणे म्हणजे पृथ्वीच्या नावाने शनीला छळण्याचा प्रकार आहे. आज तो ‘अज्ञान बालक’ मोकाट सुटला आहे. निर्भयावर क्रूरपणे बलात्कार करून तिची हत्या करण्याचा प्रकार करणारा बालक इथल्या व्यवस्थेने सोडून दिला आहे. हा फार मोठा व्यवस्थेचा अत्याचार महिलांवर होत आहे. बाल गुन्हेगारीचे समर्थन यातून होणार आहे. राजकीय नेत्यांची, कार्यकर्त्यांची मुले, भावी पिढी ही गुन्हेगारी प्रवृत्तीची असतात. त्यामुळे त्या मुलांना वाचवण्यासाठी गुन्हेगारीच्या सुधारणा कायद्याची मे २०१५ पासून मंजुरीसाठी प्रलंबित आहे. राजकारण्यांच्या या हलकटपणामुळे आज क्रूर अत्याचारी, बलात्कारी उजळ माथ्याने फिरत आहे. आया बहिणींची अब्रू, निष्पाप निरपराध मुलींची अब्रू यामुळे धोक्यात आलेली आहे. असे असताना त्याविरोधात लढा देण्याऐवजी या महिला शनीच्या मागे लागल्या आहेत. या भूमातेच्या कन्या जर तो अज्ञान क्रूरकर्मा मोकाट सुटला म्हणून व्यवस्थेच्या विरोधात दाद मागायला उतरल्या असत्या तर त्यांचा जाहीर सत्कार केला असता. त्या रणचंडी, रणरागिणी ठरल्या असत्या. म्हणजे अत्याचार करणारी जिवंत माणसे मोकाट सुटत असताना त्या दगडाच्या देवाविरोधात आंदोलन करण्याचा प्रकार म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमश्वरी, हाच प्रकार म्हणावा लागेल.
सोमवार, २१ डिसेंबर, २०१५
शनिच्या मागे महिलांची साडेसाती
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा