अभ्यासक्रम कसा पूर्ण करणार?
शिक्षणाच्या आयचा घो
(२)
- हे सरकार नव्या पिढीचे शैक्षणिक नुकसान करायला निघाले आहे. अच्छे दिनचे स्वप्न दाखवले पण अजून अच्छे दिन काही आलेले नाहीत. बेकेटे सॅमवेल नावाचा फार मोठा इंग्रजी नाटककार होवून गेला. डाव्या चळवळीत काम करणार्या या लेखकाने कित्येक दशकांपूर्वी वेटींग फॉर गोदो नावाचे नाटक लिहिले होते. या नाटकाचे अनुवाद जगभरातील सगळ्या भाषांमधून झाले. गोदो कधी तरी येईल म्हणून वाट पाहणारा सामान्य माणूस या नाटकात दाखवला आहे. या नाटकातील सामान्य माणसाला एकच आशा आहे की कधी तरी गोदो येईल. हा गोदो म्हणजे आपला उद्धारकर्ता असेल. आपले वाईट दिवस जातील. तो गोदो येणार आहे या आशेने तो जगतो आणि शेवटपयर्र्त गोदो काही येत नाही. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा असेच वेटींग फॉर गोदोचे दिवस होते. नरेंद्र मोदी हे इथल्या प्रत्येकाला गोदो वाटत होते. त्यामुळे या मोदी रूपी गोदोने सर्वांना अच्छे दिन आनेवाले है असे दाखवले.
- काय हवे असते सामान्य माणसाला? अतिशय माफक अपेक्षा असतात या माणसाच्या. फार काही नको असते. चांगले शिक्षण, नंतर रोजगाराची संधी आणि मग आपले कुटुंब बरे आणि आपण बरे. पण यातील चांगले शिक्षणच जर बुडवले जात असेल तर काय करायचे सामान्य माणसाने? भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात, राज्यात आल्यावर शिक्षणाला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा होती. पण जी वाट आधीच्या सरकारने लावली होती त्याच वाटेने हे सरकारही चालले आहे. शासन बदलले पण प्रशासन बदलले नाही. विनोद तावडे शाळेत जावून मुलांच्या पाठीवरचे वजन करून आले. पण अभ्यासक्रम किती आहे आणि त्यासाठी मिळणारा वेळ हा पुरेसा आहे की नाही हे काही त्यांनी तपासले नाही. कसे येणार अच्छे दिन?
- कालच्या लेखात आपण पाहिले की एकूण किती दिवस शिक्षणासाठी मिळतात. १७१ दिवस म्हणजे सरासरी दोन्ही टर्ममध्ये ८५ दिवस हातात येतात. शासनाने जो मुलांना अभ्यासक्रम नेमून दिला आहे त्याचे काही नियम आहेत. आमच्या शिक्षण मंत्र्यांना ते माहित आहेत काय? एवढ्या कमी दिवसात हा अभ्यासक्रम पुरा करायचा म्हणजे फक्त पाट्या टाकण्याचे काम होणार. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शिक्षक या गोष्टीला विरोध करत नाहीत. यामुळे शिक्षकांबद्दलचा आदर कमी होणार आहे. कारण शाळेत पुरा न होणारा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी खाजगी क्लासेसला प्रोत्साहन देण्याचे हे धोरण आहे.
- असे निर्णय घेण्यासाठी शिक्षण सचिवांना कोणी पैसे चारले आहेत काय याचा शोध घ्यावा लागेल.
- शिक्षणाच्या धोरणानुसार एकूण दोन सत्र असतात. यातील पहिली ते चौथीच्या अभ्यासक्रमात पहिल्या सत्रात सगळ्या विषयांची मिळून १६९८ पाने शिकवावी लागतात. तर दुसर्या सत्रात १३४८ पाने शिकवावी लागतात. क्रमीक पुस्तके आणि वर्कबुक मिळून हा अभ्यासक्रम असतो. म्हणजे दररोज सरासरी वीस ते पंचवीस पाने अभ्यासक्रम शिकवला जातो. सध्या असलेल्या वेळेत इतकी पाने शिकवली जावू शकत नाहीत. आता आणखी कमी वेळ केला आणि पाच दिवसांचा आठवडा केला तर दररोज तीस पाने शिकवावी लागतील. मुलांच्या मेंदुची काही क्षमता असते हे तरी शिक्षण खात्याला कळते काय?
- पाचवी ते दहावीच्या अभ्यासक्रमात पहिल्या सत्रात एकूण क्रमीक पुस्तकांची २७२६ पाने शिकवली जातात. तर दुसर्या सत्रात २६६७ पाने शिकवावी लागतात. म्हणजे सध्याच्या वेळेनुसार दररोज सरासरी ३२ पाने शिकवली जातात. ती दररोज चाळीस ते पंचेचाळीस पाने शिकवावी लागतील. विद्यार्थ्यांना ही व्यवस्था काय यंत्र समजते? हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षक किती घाई करतील याचा वेळ केला आहे काय? मुलांना समजले आहे की नाही याचा विचार न करता फक्त पाने पुढे सरकवली जातील. मुलांना समजले आहे की नाही याचा विचार न करता शाळा भरवल्या जातील. हे सगळे धोरण खाजगी क्लासेस चालकांचे उखळ पांढरे करण्यासाठी केले जाणार आहे. त्यामुळे शाळेत फक्त नावनोंदणी करायची. शिक्षकांनी मुलांना काही शिकवायचे नाही. सहा महिने काम न करता फुकटचा पगार सरकार शिक्षकांना देणार. त्याचा बदल्यात त्या सरकारच्या राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या कार्यक्रमाला, प्रचाराला शिक्षक वेळ देणार. शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादण्याचा हा नवा फंडा आहे. आज शाळेचे तास कमी करा म्हणून काही विद्यार्थी पालक मागणी करत आहेत. सकाळी घरातून बाहेर पडलेली मुले रात्री उशीरपर्यंत घरी परतत नाहीत ही शहरातील अवस्था आहे. बँका आणि सरकारी कार्यालयात पाच दिवसांचा आठवडा केला, किंवा सेकंड फोरची सुविधा केली तरी कामाचे तास वाढवले गेले. तसे शैक्षणिक तास शाळांमधून वाढवायचे तर किती तास मुले शाळेत राहू शकतील? ती कंटाळणार नाहीत काय? मुलांचे शाळेतून पळून जाण्याचे प्रमाण वाढेल. शाळा बुडवण्याचे प्रमाण वाढेल. उगाच घाणेरडे निर्णय घेवून भावी पिढीचे नुकसान करण्याचे काम सरकार करत असेल तर त्याला कडाडून विरोध केला पाहिजे. विरोधक थंड पडले असले तरी नागरिकांनी आता रस्त्यावर उतरून सरकारला धडा शिकवला पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा