मंगळवार, ८ एप्रिल, २०२५

सर्वात श्रेष्ठ


इस्ट आॅर वेस्ट, ज्येष्ठ इज द श्रेष्ठ, असं आपल्याला वातावरण तयार करता आलं पाहिजे. या वाक्याला विंग्लिश म्हणजे मराठी इंग्लिश भेसळयुक्त स्लोगन तयार करण्याचे कारणच हे आहे की माणूस कोणत्याही भाषेचा, जातीचा, धमार्चा, प्रांताचा असो पण त्याचे ज्येष्ठत्व न नाकारता त्याला श्रेष्ठत्व बहाल झाले पाहिजे. त्यांचा मान राखला गेला पाहिजे, असे वर्तन दोन्ही बाजंूनी झाले पाहिजे. दोन दिवसांतल्या लेखांमधून ठिकठिकाणाहून इतके मंथन झाले की, अनेकांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. त्यातून व्यक्त केलेल्या अपेक्षा फार महत्त्वाच्या आहेत.


पहिली अपेक्षा ही सर्व राजकीय पक्षांकडून आहे. ती म्हणजे प्रत्येक पक्षाचे युवामोर्चे असतात, महिला आघाडी असते, विविध सेल असतात. तशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांसाठी संघटन करण्याचे काम राजकीय पक्षांनी केले पाहिजे. त्यांचे प्रश्न समजावून घेतले पाहिजेत. शिवसेनेने गेल्या काही दिवसांपूर्वी हा प्रस्ताव ठेवलेला आहे, तो अजून मार्गी लागलेला नाही. पण त्यांनी ज्येष्ठ नागरिक सेना निर्माण करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. अशा विविध राजकीय पक्षांच्या संघटना असतील, तर त्या संघटनेच्या माध्यमांतून ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सरकारपुढे मांडले जातील.

काही सेवाभावी संघटना काम करत असतात. सुभाष सावंत यांच्यासारखे उत्साही कार्यकर्ते पार्ले मुंबई भागात प्रबोधन कट्टासारखे प्रयोग करतात. ज्येष्ठ नागरिकांच्या सहलीचे आयोजन करतात. अशा प्रकारे विविध सेवा संस्थांनी आणि समाजसेवकांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सहलीचे आयोजन करणे, त्यांच्यासाठी विविध कट्टे तयार करणे या माध्यमातून ज्येष्ठांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.


सर्व महापालिका, पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी ज्येष्ठांसाठी आपल्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली पाहिजे. ठाणे आणि मुंबई परिसरात महापालिकांची काही ठिकाणी नाना-नानी पार्क आहेत. तसे सगळीककडे असले पाहिजेत. योगा सेंटर सुरू झाले पाहिजेत. त्यांना मॉर्निंग वॉकसाठी चालण्याचे ट्रॅक तयार केलेले असले पाहिजेत, तसेच प्रत्येक नगरसेवकाला मिळणाºया निधीतून त्याने विविध ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी बाकडी टाकलेली असतात. त्याची देखभाल करण्याची सोय असली पाहिजे. अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी नगरसेवकाच्या निधीतून उभ्या असलेल्या बाकड्यांवर विक्रेत्यांनी अतिक्रमण केलेले दिसते. त्यावर घाण झालेली असते. त्यावर प्रतिबंध लावून त्यांना बसण्यासाठी हे ठिकाण मोकळे सोडले पाहिजे. ज्येष्ठांचा सर्व स्तरावर आदर राखला गेला पाहिजे.

विविध पक्षांनी, सामाजिक संघटनांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाºया योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शिबिरे आयोजित केली पाहिजेत. त्यांना शासकीय कार्यालयात हयातीचा दाखला आणा, अमूक दाखला आणा यासाठी किंवा पेन्शनसाठीही हेलपाटे घालावे लागणार नाहीत, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. आज रेल्वेत लोकलमध्ये त्यांच्यासाठी आसने राखीव असतात. एसटी बस, बेस्ट, एनएमएमटी, टीएमटी, या सर्व परिवहनाच्या बसमध्ये ज्येष्ठांसाठी आसने आरक्षित असतात. अनेक ठिकाणी अर्धे तिकीट असते. याचा लाभ त्यांना घेता आला पाहिजे. त्यासाठी आग्रही राहिले पाहिजे.


आज सर्वांनाच पेन्शन नसते. जो काही फंड मिळतो तो बँकेत ठेवायचा आणि उदरनिर्वाह चालवायचा, असे सर्वांचे असते. त्यात काय करायचे, असाही प्रश्न अनेकांपुढे असतो. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीयीकृत बँकांनी जादा व्याजदर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी सर्व पक्षांनी, सर्व संघटनांनी आग्रही राहिले पाहिजे. त्यांना फक्त रोटी, कपडा आणि मकानची गरज तर आहेच, पण त्यांना औषधासाठीही दरमहा खर्च करावा लागत असतो. हा पैसा कुठून उभा करायचा हा प्रश्न अनेकांपुढे असतो. त्यासाठी जेनेरीक किंवा स्वस्त औषधी त्यांच्यापर्यंत घरपोहोच कशा देता येतील, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. यातून रोजगार निर्मितीही होऊ शकते याचा विचार केला पाहिजे. ज्येष्ठांना रुग्णालयातही बिलात सवलत देता यावी, यासाठी हॉस्पिटल्सनी पुढाकार घेतला पाहिजे. सगळ्यांकडेच काही मेडिक्लेम असतो असे नाही. त्यामुळे ज्येष्ठांना औषध बिलात सवलत देणारी योजना रुग्णालयांनी आखल्या पाहिजेत.

थोडक्यात काय, तर त्यांचा सन्मान करता आला पाहिजे. त्यांचे अनुभव त्यांना सांगता आले पाहिजेत. प्रत्येकाचे आयुष्य, जीवन संघर्ष ही एक कथा, कादंबरी असते. ती सर्वांनी ऐकावी असे प्रत्येकाला वाटत असते. आपले आयुष्य कसे गेले, आपण किती कष्ट केले हे कोणी तरी ऐकावे असे त्यांना वाटत असते. ते कोणीतरी ऐकले पाहिजे. त्यासाठी त्यांची संमेलने झाली पाहिजेत. काही संमेलने फक्त ज्येष्ठांची नाही, तर त्या ज्येष्ठांसमवेत त्यांच्या कुटुंबीयांची असावीत. आपल्याकडे पूर्वी आपण कोजागिरी पौर्णिमा, आवळी भोजन, चांदणी भोजन, वनभोजन असे प्रकार करत होतो. त्यात घरातील सगळे एक होत होते. आनंद घेत होते. ते प्रकार सुरू केले पाहिजेत. यातून ज्येष्ठ आणि त्यांचे कुटुंबीय एकत्र येऊन ज्येष्ठांचे श्रेष्ठत्व त्यांना बहाल करू शकतील. तो त्यांचा हक्क आहे हे समजेल आणि हे म्हातारपण वाईट नाही, तर ती आनंद घेण्याची एक प्रक्रिया आहे, असे वाटू लागेल.


जीवन आनंदी जगता आले पाहिजे. जे काही राहिले आहे ते करता आले पाहिजे. हे ज्येष्ठपण आपली राहिलेली हौस पूर्ण करण्यासाठी आहे, हे समजले पाहिजे. त्यासाठी कोण काय म्हणेल, कोणी हसेल का, हा विचार मनातून काढून टाकला पाहिजे. आयुष्यभर साडी नेसली, हल्लीच्या मुलींसारखा ड्रेस कधी घातला नाही. त्याला नावे न ठेवता आता या वयात ड्रेस घालून बाहेर पडायची तयारी करा. मुलींनी, सुनांनी आपल्या आईला सासूला हा ड्रेस छान दिसेल तुला. चालायला सोपा आहे, असे समजावून सांगून या वयातही तुम्ही किती छान दिसाल हा आत्मविश्वास दिला पाहिजे. सगळ्या राहिलेल्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत. कोणाचे तरी पाहिल्यावर मलाही असे करायला मिळाले असते तर बरे झाले असते, हा विचार प्रत्येकाच्या मनात येत असतो. हे विचार आठवून आपल्या अतृप्त इच्छा, राहिलेली हौस काय आहे त्या पूर्ण केल्या, तर म्हातारपण किती आनंदात जाईल. अगदी आजकालची मुले एकमेकांना सहजपणे आय लव्ह यू म्हणतात. प्रेम व्यक्त करतात, पण आम्ही ५० वर्ष संसार केला, पण साधे प्रेम व्यक्त केले नाही. करा आपल्या बायकोचे या वयात कौतुक. त्यांना द्या छानशी लाजण्याची संधी. विनोद करा आणि आनंदात राहिलात, तर कोणत्याही डॉक्टरची भर करावी लागणार नाही हे नक्की.

प्रफुल्ल फडके/ अन्वय


9152448055

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: