सोमवार, ७ एप्रिल, २०२५

दुसरी बाजू


रविवारच्या अन्वयमध्ये प्रश्न ज्येष्ठ नागरिकांचे हा लेख लिहिला आणि अनेकांना तो विषय भावला. त्यामुळे रविवारी सकाळपासून फोन यायला लागले. त्यापैकी एक प्रतिक्रिया फार बोलकी होती. ती म्हणजे घरात एकाकी पडल्यामुळे मी घर सोडून जाण्याचा विचार करत होतो, पण हा लेख वाचल्याने मला जगण्याची नवी उमेद आली आहे. आनंदाने जगण्याचा विचार केला आहे. हेच इथे अपेक्षित होते. शेवटी हा विषय खूप व्यापक आहे. प्रत्येकाला म्हातारे व्हायचे आहे असे म्हणून चडफडत राहण्यात अर्थ नाही, तर हे कशामुळे घडते त्याची दुसरी बाजूही बघायला पाहिजे.


हा प्रश्न गेल्या ५० वर्षांत जास्त वाढला आहे. याला कारण या काळात आलेली नाटके, सिनेमे, मालिका यांचा मनावर मोठा परिणाम झालेला आहे. तो पण नकारात्मक झालेला आहे. पूर्वी सगळे एका कुटुंबात होतेच की. भांडत असावे पण नांदत असावे, या भावनेने जगत होते सगळे. घरातील मोठा माणूस तोच कर्ता करविता म्हणून त्याच्या आज्ञेने, इच्छेने चालत असे. घरातील आजोबांची परवानगी ही अंतिम होती. मग हे नंतर का बदलले?

साधारणपणे १९७० ते१९८०च्या दशकात अनेक चित्रपट या विषयावर निर्माण झाले. अनेक नाटके आली. त्याचा मूळ उद्देश बाजूला राहिला आणि नकारात्मक परिणाम झाला. यातील काहींवर आज टिपण्णी इथे करणार आहे. वि. वा. शिरवाडकर यांचे नटसम्राट हे नाटक, जयवंत दळवी यांचे संध्या छाया आणि वसंत कानेटकरांचे प्रेमाच्या गावा जावे या नाटकांचा उल्लेख करावा लागेल. त्याचप्रमाणे अवतार हा राजेश खन्ना, शबाना आझमीचा चित्रपट याने फार परिणाम केला. त्याचा मूळ उद्देश बाजूला पडला.


नटसम्राट नाटकात एका नटसम्राट अभिनेत्याची शोकांतिका आहे. ज्याने आयुष्यभर शेक्सपिअरची नाटके केली, त्याच्या शोकांतिका केल्या, तो त्या ट्रान्समधून कधी बाहेरच आला नाही. आपल्याही आयुष्याची शोकांतिकाच होणार असे समजणारा तो नायक आहे. रंगभूमीवर काम करणारा कलाकार आपल्या भूमिकेतून बाहेर पडत नसतो. तो त्यातच जगत असतो. भूमिका जगत असतो. लांब कशाला छत्रपतींची भूमिका करणारे डॉ. अमोल कोल्हे यांचे भाषण आपण ऐकले तर ते ऐतिहासिक भाषा बोलत आहेत हे जाणवते, कारण ते अजूनही त्या ट्रान्समध्ये आहेत. कलाकाराचे असेच असते. हे रंगभूमीवरच्या कलाकाराचे सत्य लक्षात न घेता सामान्य प्रेक्षकांनी म्हातारपण वाईट असते, समोरचे ताट द्यावे, पण बसायचा पाट देऊ नये एवढेच लक्षात घेतले. ते कौटुंबिक समस्याप्रधान नाटक नाही, तर शोकांतिकांचा सम्राट असलेल्या नटसम्राटाची ती शोकांतिका आहे, पण चुकीचा संदेश गेला. मग ते नाटक प्रेक्षकांना समजले नाही. अवघड होते की, कलाकार कमी पडले. यावर वेगळी चर्चा होईल, पण म्हातारपणी मुले विचारत नाहीत असा अनावश्यक संदेश यातून गेला. त्याचा समाजमनावर परिणाम झाला आणि जनरेशन गॅप वाढत गेली. साधारपणे विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात येण्याचा हाच काळ आहे. मुलाचे घर स्वतंत्र झाले, वेगळी चूल सुनेने मांडली की ते घर आपल्याला परके झाले असा समज झाला. जिथे आपपरभाव आला तिथे दु:ख आले.

संध्या छायामध्ये जयवंत दळवींनी कातरवेळ घेतली आहे. मुले परदेशात असलेल्या एकाकी नाना-नानींची असुरक्षितता. संध्याकाळची वेळ ही नेहमीच सर्वांना असुरक्षित भीती निर्माण करणारी वाटते. सूर्य मावळतो आहे, आयुष्यात अंधार येणार का? पण चंद्र उगवणार आहे. चांदण्याही आनंद देतील, तो आनंद आम्ही नाही शोधू शकलो. त्यामुळे नाना-नानी हे विक्षिप्त होतात. विचित्र वागतात. त्यामुळे माणसांना प्रश्न पडतो की, खरेच म्हातारपण हे इतके वाईट असते का? पण म्हातारपण वाईट नसते. आपण आनंदात जगायचे असते. हे खºया अर्थाने सांगितले ते वसंत कानेटकरांनी.


कानेटकरांनी प्रेमाच्या गावा जावे या नाटकातून दोन पिढ्यांमधील नाही तर तीन पिढ्यांमधील अंतर अधोरेखित केले. यात म्हातारपणीही कसे आनंदात जगता येते हे शिकवले. अगदी आजोबांनी नातवाबरोबर सिगारेट ओढण्यापर्यंत आणि नातवंडांशी मैत्री करत सल्लागार बनण्याचे कसब त्यांनी दाखवले आहे. नातवंडांना जेव्हा आजी-आजोबा हवेहवेसे वाटतात तेव्हा मुले कधीच तुमचा तिरस्कार करू शकत नाहीत. दुधावरची साय असते ती. ती दुधापासून वेगळी नाही होत ना. प्रेमाने सगळे छान जगता येते. परस्परांना समजून घेणे महत्त्वाचे असते, पण त्यातला मतितार्थ समजला तर सगळे आहे. कानेटकर या नाटकात म्हणतात ते फार महत्त्वाचे आहे. म्हातारपणी खूप काही शिकायचे असते. ते शिकवता येत नाही, पण शिकता मात्र जरूर येते. चिडचीड करण्यासाठी म्हातारपण नसते. म्हातारपणी तोंड उघडायचे ते शाबासकी देण्यासाठी आणि मूठ उघडायची ती बक्षीस देण्यासाठी. अरे जीवन किती सुंदर होईल पाहा. प्रत्येकाला वाटले पाहिजे की मी कधी म्हातारा होणार.

पण अवतारसारखे, बागबानसारखे चित्रपट आले आणि सुपरस्टार असलेल्या राजेश खन्ना, अमिताभ यांनाही म्हातारपणी वाईट जीवन जगावे लागते याचा मानसिक धक्का समाजाला बसतो. सासू-सुनेच्या मालिका येतात. त्यात कुठेतरी तिरस्काराची भावना दाखवली जाते. त्यातून आपल्या कुटुंबातील सदस्याशी सुना-नातवंडांशी मुला-मुलींची तुलना केली जाते आणि मनात अढी निर्माण केली जाते. हे टाळले तर म्हातारपण हे पण सुंदर आहे हे लक्षात येईल.


आयुष्यभर आपण काटकसर करत जगला, घरचे पोळीभाजी, पिठले, भात खाल्ले. पैसाही नव्हता आणि ते खर्च करायचे धाडस नव्हते. आता मुलाबाळांबरोबर हौस करायला काय हरकत आहे? थोडे आधुनिक बनूया. सर्वांचे कौतुक करून आपले कोडकौतुक करून घेऊ या, असा विचार केला तर खूप आनंद भेटेल. नटसम्राट व्हायला जाऊ नका, संध्या छाया पाहू नका, तर प्रेमाच्या गावाला जा. बागबान होऊन नवा अवतार घडण्यामुळे एकटे होण्याचे नशिबात येईल. त्यापेक्षा आपल्या जीवनात आनंदाचे झाड लावा. काय पाहायचे आणि काय घ्यायचे हे नेमके कळले तर खूप आनंद मिळेल यात शंकाच नाही.

प्रफुल्ल फडके/अन्वय


९१५२४४८०५५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: