हिंदी चित्रपटसृष्टीत विविध प्रकारच्या भूमिका १९५७ ते १९९५पर्यंत करत आपला वेगळा ठसा उमटवणारा नट म्हणजे मनोजकुमार. प्रेमकथा, रहस्यकथांवर असलेल्या चित्रपटांतही काम केले असले, तरी मनोजकुमारची खरी ओळख दिसते, ती भारतकुमार म्हणून. चित्रपट प्रदर्शनाचा मुख्य दिवस शुक्रवार, अशा शुक्रवारच्या सकाळीच त्याच्या निधनाची बातमी आली आणि त्याने पडद्यावरचा आपला विराम केला.
देशभक्तीवर आधारित चित्रपट काढायचे काम मनोजकुमार याने केले आणि त्याचा बाकीच्या चित्रपटांकडे दुर्लक्ष होत असे. तो फक्त भारतकुमार म्हणून ओळखला जाऊ लागला, पण मनोजकुमारचा अभिनय, दिग्दर्शन आणि कल्पकता याची एक शैली होती. अभिनयात तसा ठोकळा असला, तर दिग्दर्शनात अत्यंत मोकळा आणि कल्पकता होती. त्यामुळेच त्याने निर्माण केलेले देशभक्तीपर चित्रपट गाजले. कोणताही २६ जानेवारी आणि १५ आॅगस्ट हे मनोजकुमारच्या ‘मेरे देश की धरती...’ या गाण्याशिवाय अपूर्ण असल्याचे दिसते.
गेल्या साठ, सत्तर वर्षांत देशभक्ती गीतात आणि देशभक्ती सामावण्यात मनोजकुमारच्या चित्रपटातील उपकार या देशावर झाल्याचे दिसून येते. नेहरूंच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री हे देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर त्यांनी ‘जय जवान जय किसान’ ही घोषणा दिली. त्यानंतर शास्त्रीजींच्या इच्छेनुसार मनोजकुमारने उपकार हा देशभक्तीपर चित्रपट निर्माण केला. फिल्मफेअरचे ६ पुरस्कार या चित्रपटाला मिळाले होते. मनोजकुमारला कथा, दिग्दर्शनाचा, प्राणला सहाय्यक अभिनेत्याचा, गुलशन बावरा यांना मेरे देश की धरती या गीतासाठी या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला होता. शेतकरी आणि जवान हे देशासाठी कसा त्याग करत असतात आणि त्यांना आपला देश कसा प्रिय असतो, हे दाखवताना या चित्रपटात भारत-पाक युद्धाची पार्श्वभूमी दाखवली आहे. एकीकडे सीमेवरच्या शत्रूशी जवान लढत असताना सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांना अंतर्गत शत्रूशी कसा सामना करावा लागतो आणि काळे धंदे कसे होत असतात हे या चित्रपटातून अत्यंत मार्मिकपणे दाखवून दिले होते. त्यामुळे देशभक्तीपर चित्रपट बनवणारा निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता ही ख्याती या चित्रपटापासून मनोजकुमारच्या बाबतीत पक्की झाली. ५३ वर्षांपूर्वी पडद्यावर आलेला म्हणजे १९६७ चा हा चित्रपट प्रेक्षक आजही तेवढ्याच आनंदाने पाहतात हे वैशिष्ट्य या सिनेमाचे आहे.
त्यापूर्वी मनोजकुमारने १९६५ मध्ये शहीद हा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या चरित्रावर चित्रपट काढला होता. यात भगतसिंग यांची भूमिका मनोजकुमारने केली होती. १९६५चा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार शहीदला मिळाला होता. यातही देशभक्तीपर गीते होती. त्यामध्ये ‘ऐ वतन ऐ वतन हमको तेरी कसम...’ या मोहम्मद रफीच्या आवाजातील गाण्याने चांगलेच वातावरण निर्माण केले होते. त्याशिवाय ‘मोरा रंग दे बसंती चोला...’ या मुकेश, लता, महेंद्र कपूर यांच्या गीतानेही चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचा संघर्ष आणि फाशी या चित्रपटात दाखवली होती.
मनोजकुमारने १९७० साली काढलेल्या पूरब और पश्चिम या चित्रपटाने सर्वांनाच विचार करायला लावला. स्वातंत्र्यानंतर अनेक भारतीय इंग्लंडमध्ये गेले. आर्थिक कारणाने, पैसा कमावण्यासाठी तिथली संस्कृती त्यांनी स्वीकारली. भारतात वाढलेला मनोजकुमार तिकडे जातो, तेव्हा आपली संस्कृती, संस्कार किती उच्च आहेत, हे त्याला दिसून येते. काय शिकायचे, काय आदर्श घ्यायचा या पाश्चिमात्यांकडून? परंतु तिथले बिघडलेले भारतीय पाहून त्याला वाईट वाटते. कमी कपड्यांतील भारतीय तरुणी, सिगारेट, मद्यपानाची संस्कृती आणि कुठे आपली संस्कृती? यावर अत्यंत परखडपणे भाष्य करणारा, चित्रण दाखवणाराच नाही, तर अंजन घालणारा हा चित्रपट होता. देशभक्ती फक्त सीमेवरच नाही, तर देशात राहूनही करता येते. भ्रष्ट वागणे, भ्रष्टाचार न करणे, शिस्त, स्वच्छतेतूनही आपण आपल्या देशाची भक्ती करू शकतो हा विचार मनोजकुमारनी मांडला. पाश्चिमात्य आणि पौर्वात्य संस्कृतीतील फरक दाखवून दिला. उच्च नीतिमूल्यांच्या आपल्या भारतीय संस्कृतीचा गोडवा या चित्रपटातून त्याने जगभर पसरवला. या चित्रपटातील महेंद्र कपूरचे ‘भारत का रहने वाला हंू...’ हे गीतही तुफान गाजले होते. आजही ते राष्ट्रीय सणांना ऐकायला मिळते. विनोद खन्ना, प्राण, सायराबानू, अशोककुमार अशा दिग्गज नटांबरोबर हा एक मनोजकुमारचा उत्कृष्ट देशभक्तीचा आविष्कार होता. यातील फोटोग्राफी, कलर कॉम्बिनेशन यातून मनोजकुमारची कल्पकता दिसून येते. स्वप्ननगरी पाश्चिमात्य देशातील चित्रीकरणासाठी वापरलेली फिल्म आणि भारतातील दृश्यांसाठी वापरलेल्या फिल्ममधील फरकातून दोन संस्कृतींतील फरक स्पष्ट होतो.
१९७४ साली भारत बनून मनोजकुमार पुन्हा एकदा पडदद्यावर आला, तो रोटी कपडा और मकान या चित्रपटातून. अत्यंत सुपरहिट अशा या चित्रपटाने त्यावेळी प्रेक्षकांच्या डोक्यात झिणझिण्या आणल्या होत्या. देशाला स्वातंत्र्य मिळून पंचवीस वर्षे झाली होती. या पंचवीस वर्षांत आपल्याकडे काय मिळाले? महागाई, भ्रष्टाचार, काळे धंदे, भूकमारी, महिलांवर अत्याचार, बेरोजगारी अशा असंख्य प्रश्नांना हात घालताना सामान्य माणसांची काय अवस्था आहे हे यातून दाखवून दिले होते. मिळालेली डिग्री नोकरी देऊ शकत नाही. व्यापारी भ्रष्टाचार करत आहेत. दुष्काळाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटातून बेरोजगारीचा प्रश्न प्रखरपणे मांडला होता. स्वातंत्र्याच्या पंचवीस वर्षांनंतर आम्ही काय कमावले यावर प्रकाश टाकणारा अत्यंत जळजळीत असा हा चित्रपट. यातील ‘महंगाई मार गयी...’ हे गाणे अजरामर असे गाणे आहे. या चित्रपटासाठी मनोजकुमारला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. अनेक नामांकने या चित्रपटाला मिळाली होती. ‘मैंना भुलूंगा...’ या गाण्यासाठी संतोष आनंद यांना उत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता, तर महेंद्र कपूर यांना ‘और नहीं बस और नहीं, गम के प्याले और नही...’ या गीतासाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर अनेक चित्रपटांत कामे करत तब्बल सात वर्षांनी मनोजकुमारने स्वत:ची निर्मिती केली. तो चित्रपट म्हणजे सुपरहिट ठरलेला क्रांती.
ब्रिटिशांच्या कालावधीतील एकोणिसाव्या शतकातील १८२५ ते १८७५ या कालखंडातील कथानक घेऊन ब्रिटिशांचे अत्याचार या चित्रपटात दाखवताना मनोजकुमार पुन्हा एकदा भारतकुमार झाला होता. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे दिलीपकुमारचे चित्रपटसृष्टीत झालेले पुनरागमन. क्रांती या चित्रपटातून चरित्र अभिनेता आणि सहनायकाच्या भूमिकेतच मनोजकुमारने दिलीपकुमारचे पुनर्वसन केले. त्यानंतर उतारवयातील नायक म्हणून दिलीपकुमारला प्रेक्षकांनी छान स्वीकारले. क्रांती चित्रपट देशभक्तीपर होताच, बिग बजेट आणि मल्टीस्टारकास्ट असा होता. शशी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, परवीन बाबी, सारिका, मदन पुरी, प्रेम चोप्रा असे दिग्गज या चित्रपटात होते. यातील गाणी, चित्रीकरण आणि सर्वच तांत्रिक बाबींवर मनोजकुमारच्या दिग्दर्शनाची कल्पकता दिसून येत होती. यातही मनोजकुमार भारत म्हणूनच आला होता. मनोजकुमार शेवटचा भारत म्हणून पडद्यावर आला, तो त्याचीच निर्मिती असलेल्या क्लर्क या चित्रपटातून. सपाटून आपटलेला असा हा चित्रपट. मनोजकुमार, रेखा, शशी कपूर, अशोक कुमार, अनिता राज, झेबा अशी चांगली कास्ट असूनही चित्रपटाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याने आणि देशभक्तीचे डोस ऐकायची तरुणांची मन:स्थिती संपुष्टात आल्याने हा चित्रपट पडला. त्यामुळे क्लर्क चालला नाही. पण भारतकुमार ही देशभक्त अभिनेता, निर्माता ही प्रतिमा मनोजकुमारने अखेरपर्यंत जपली, हे नक्की.
मनोजकुमारने ४० वर्षांत ५१ चित्रपट केले. यामध्ये स्वत:च्या निर्मितीबरोबरच अन्य निर्मात्यांकडेही त्यांनी कामे केली. देशभक्ती करता करता मनोजकुमारने संपूर्ण देशात भक्तिभावही रुजवला. १९७५ पर्यंत शिर्डी हे फारसे फेमस नव्हते, पण मनोजकुमारने शिर्डी के साईबाबा हा चित्रपट बनवला आणि या देवस्थानची ख्याती जगभर पसरली. हा चित्रपट सुपरहिट ठरलाच, पण या चित्रपटामुळे शिर्डी देवस्थान हे कायमचे यशाच्या शिखरावर गेले.
प्रफुल्ल फडके/ अन्वय
9152448055
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा