खरे तर हा विषय एका लेखात संपणारा किंवा पूर्ण होणारा नाहीच, तरीही त्याला आज हात घालत आहे. याचे कारण गेल्या काही दिवसांपासून अनेक ज्येष्ठ नागरिकांशी आलेला संपर्क पाहता त्यांचे काही प्रश्न असल्याचे जाणवले. आपल्याकडे ज्येष्ठ म्हणजे श्रेष्ठ असे म्हटले जाते, पण असे असूनही आपण कोणत्याही प्रक्रियेत सक्रिय नाही आणि निवृत्त झालो आहोत अशी भावना निर्माण झालेला एक ज्येष्ठांचा वर्ग आहे. त्यामुळे अनेक ज्येष्ठांना वैफल्य आल्यासारखे, नैराश्य आल्यासारखे दिसते. हे त्यांनी सोडले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
ज्येष्ठांचे असे काही प्रश्न नाहीत, तर ते सर्वांचे आहेत. कारण सर्वांनाच कधी ना कधी तरी ज्येष्ठ व्हायचे आहे. खरे तर ज्येष्ठ किंवा ज्येष्ठ नागरिक हा एक गोंडस शब्द आहे. म्हातारपण हाच खरा शब्द, पण म्हातारपण हे कधी वयाने येत नसते, तर ते मनाला येत असते. हे सगळ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे शाळेत असताना वर्गातल्या इतर मुलांपेक्षा जो मुलगा साधारणपणे उंच असतो तो उगाचच रांगेत सारखा दिसण्यासाठी वाकतो आणि कुबड काढून चालतो. ती सवय त्याला घातक ठरते. तसेच म्हातारपण हे मनाला आलेले कुबड आहे. हे कुबड आपण टाळले पाहिजे आणि आनंदी राहिले पाहिजे. माणूस म्हातारा होत नाही, मन म्हातारे होते. मन थकते. हा थकवा घालवणे आणि आनंदी जीवन जगणे फार महत्त्वाचे असते.
आम्ही काय करायचे हा विचार अनेकांना पडतो, पण वय जास्त झाले आणि म्हातारे झालो म्हणून आपण गबाळे कधी राहायचे नाही. काम करत असताना तुम्ही जसे चकाचक होता, तसेच निवृत्त झाल्यानंतरही राहिलात तर काहीच फरक पडणार नाही. कोण पाहतेय आम्हाला, आता काय आम्ही तरुण आहोत का? असे प्रश्न निर्माण करून आपणच गबाळे राहायचे टाळले पाहिजे. आपण दररोज टीव्ही बघतो. त्यात अमिताभ बच्चन हा ८० वर्षे पूर्ण केलेला तरुण त्याच उत्साहात गेली ५५ वर्षे पाहतो आहोत. बातम्यांमधून देशभरातले दौरे करणारे शरद पवार, राजनाथ सिंह, असे कितीतरी ८० वर्षे पूर्ण केलेले नेते आहेत. त्यांना कोणी म्हातारे म्हणत नाही. पंचाहत्तरीच्या घरात असलेले सुनील गावस्करसारखे खेळाडू कॉमेंट्री करायला त्याच उत्साहात दिसतात. जसे ते ३० वर्षांपूर्वी मैदानात उतरत होते. मग वयानुसार त्यांनी आपले कामाचे स्वरूप बदलले, तर आपण का ते करू नये?
गेल्या दहा-वीस वर्षांत आलेल्या विविध टीव्ही मालिका, तू तिथे मी, बागबान यांसारखे चित्रपट पाहून अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक उगाचच स्वत:ला असुरक्षित मानतात. आपण आपल्या मुलांना, सुनांना नकोसे आहोत असे वाटून अनेक जण स्वतंत्रपणे राहत असतात, पण असे नका करू. मुलांना तुम्ही हवे आहात असाही विचार करा. आपली मुले आपल्याला टाकतील, दूर जातील, असे विचारही मनात आणून असुरक्षित बनू नका. टीव्ही आणि चित्रपटांतील कथानक किती स्वत:ला लावून घ्यायचे याचा विचार करा. ते फक्त करमणुकीचे साधन आहे, पण आपली मुले, नातवंडे ही आपल्यापासून दूर जाणार नाहीत असा विचार करून, वसंत कानेटकरांची प्रेमाच्या गावा जावे या नाटकाप्रमाणे म्हातारपणी आपण फक्त प्रेम मिळवायचे आहे भरभरून, असाच विचार केला पाहिजे.
आज बहुतेक ज्येष्ठांना कसे होणार आमचे ही चिंता असते. आमच्या पुढच्या पिढीचे कसे होणार ही चिंता भासत असते. आम्हाला पेन्शन मिळत नाही. बँकांचे व्याजदर कमी होत आहेत. त्यामुळे आमचे भागणार कसे, असे वाटत असते. अशावेळी सहजीवन आणि एकत्र कुटुंबात राहणे हाच त्यावर उपाय आहे. आपण इतके उत्साहात असले पाहिजे की, कुठे थांबायचे आणि कुठे सुरू व्हायचे हे ठरवता आले तर म्हातारपणात प्रश्नच पडणार नाहीत. आम्ही लहानपणी इतके पैसे उडवत नव्हतो म्हणून मुलांना किती पैसे उडवताय असे अजिबात सुचवू नका. आज उपभोगाचे दिवस आहेत. पूर्वी रस्त्यावर खाणे, हॉटेलात जाणे सभ्य मानले जात नव्हते. जीवनशैली बदलली आहे. जा मुलांबरोबर विकेंडला हॉटेलात जेवायला. म्हातारपण, ज्येष्ठपण श्रेष्ठपण करून दाखवण्याची ही संधी असते. आपल्यासारखेच मुलांनी, सुनांनी केले पाहिजे, काटकसरीने वागले पाहिजे, असा अट्टाहास न बाळगता त्यांच्या स्टाइलने केलेल्या कृतीचे कौतुक करायला शिकले तर म्हातारपणी काहीच समस्या राहणार नाहीत. या वयात फक्त तोंडभर कौतुक आणि बक्षिसे वाटत राहा आणि आनंदी जीवन जगण्याचा मार्ग पत्करायचे व्रत घ्या, सगळे प्रश्न आपसुक सुटतील.
म्हणूनच म्हणतो की, ज्येष्ठांचे प्रश्न नाहीत, तर विषय आहेत. त्या विषयात प्रत्येकाने स्वत:ला गुंतवून घेतले पाहिजे आणि आनंद मिळवला पाहिजे. म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण का म्हणतात? तर आम्हाला बालपणी जे करायला मिळालेले नाही, परिस्थितीने जे करता आले नाही, ते आता करता आले तर पाहायचे आहे. लहानपणी सहलीला जायचे होते, पण ती छोटीशी सहल करायची आमची ऐपत नव्हती. आता जा फिरायला. ती इच्छा आता पूर्ण करा. आपल्या शाळेच्या, कॉलेजच्या वाड्यातल्या जुन्या मित्रांचे पत्ते, फोन नंबर मिळवा आणि गेट टुगेदर करा. तुमच्या कुटुंबीयांसमवेत त्यांना बोलवा. तुमच्या मुलांना त्यांच्याकडून कळू देत तुम्ही किती खोडकर होता, किती गमतीदार होता, किती उत्साही होता. तुमच्या बॅचचे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करा. तुम्हाला आवडत असलेली मुलगी, हिरॉईन याबाबत मोकळेपणाने आपल्या सहधर्मचारिणीला सांगा आणि तिचा लटका राग पाहा. या वयातही गालावर कसे गुलाब फुलतात याचा आनंद घ्या. पिंपळाच्या पानासारखे आहे हे सगळे. जाळी पडली तरी त्याचे सौंदर्य टिकून राहते. आंबा कशाही अवस्थेत आपणाला आवडतो. कैरी असली तरी छान आणि पिकलेला असला तर अधिकच छान. तसे आपण वागले तर म्हातारपण कोणालाच नकोसे वाटणार नाही.
प्रफुल्ल फडके/अन्वय
९१५२४४८०५५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा