- जातीयवाद आणि घराणेशाहीच्या राजकारणाला मूठमाती देऊन विकासाच्या राजकारणाची कास धरा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशाच्या जनतेला आवाहन केले आहे. पण खुद्द मोदी यांच्या भारतीय जनता पक्षातील मंडळी त्यांच्या या आवाहनाला सकारात्मक, सक्रिय प्रतिसाद का देत नाहीत, हा प्रश्न त्या राज्यातील जनते बरोबरच सर्वांना भेडसावत आहे. आपल्याकडे जात ही फक्त राजकारण करण्यासाठी असते, निवडणुकीसाठी असते. सामान्य माणसाला या जातीपातीचे काहीही पडलेले नसते. हे वारंवार सिद्ध झाले आहे.
- आपल्या जातीचा म्हणून माणसे गोळा करण्याचे तंत्र ही राजकारणात जाण्याची एक पायरी आहे. असे करणारी कोणतीही व्यक्ती कोणत्याही जातीचे भले करत नसते. हे जेव्हा समजेल तेव्हाच या देशात खर्या अर्थाने सुधारणा होतील.
- गेल्या काही वर्षांपासून आरक्षणाचा बाऊ करून मराठा आरक्षण मिळाले पाहिजे, मुस्लिमांना आरक्षण मिळाले पाहिजे म्हणून काही नेते आकांडतांडव करतात. हे निवडणुका जवळ आल्यावर केले जाते. एरवी आपल्या जातीचे लोक काय करतात याच्याशी त्यांना देणेघेणे नसते. आरक्षण दिले तरी सरकारी नोकर्या आहेत कुठे? नोकरीत आरक्षण दिले म्हणून मुस्लिम तरूण आपला हातचा व्यवसाय सोडून नोकरी धरतील काय? त्यामुळे हे सगळे राजकीय लोकांचे खेळणे आहे. कोणीही कोणाच्याही जातीचे भले करत नसतो. हे वास्तव आहे.
- काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही तेथील मतदारांनी लोकसभा निवडणुकीतील मतदानाची पुनरावृत्ती करावी अशी मोदी यांची इच्छा आहे. पण त्यासाठी सध्या जातीय समिकरणे जमवण्याचे प्रकार सर्वच पक्षांकडून होत आहेत. तिकीट वाटपावरून भाजपच्या नेत्यांनी मायावतींवर घाणेरडी टिका केली असली तरी सोशल इंजिनीअरींगचा प्रयोग करून त्यांनीच भाजपला बाहेरचा रस्ता दाखवला होता. सर्वांना समान संधी दिल्यानेच लोक मागे धावतात हे लक्षात घेतले पाहिजे.
- उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील मेळाव्यात मोदींनी मतदारांनी आता विकासाची कास धरावी असे आवाहन केले. आजवर या राज्यातील जनतेने इतर सर्व पक्षांना सत्तास्थापनेची संधी दिली पण त्यांनी जनतेला काय दिले, असा सवाल केला आहे. आजवर सत्ता उपभोगलेल्यांनी स्वतःचे खिसे भरले पण सर्वसामान्यांचे खिसे रितेच राहिले, अशी टीकाही त्यांनी केली. मोदी यांची गोरखपूर भेट विशेष महत्त्वाची होती. कारण त्यांच्याच पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी बहुजन समाज पक्षाच्या नेत्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या संदर्भात केलेल्या आचरटपणाच्या वक्तव्याने उत्तर प्रदेशात भाजप विरोधात संतापाची लाट उसळली होती. तिला काही प्रमाणात तरी आवर घालण्याचे काम मोदी यांना करणे भाग होते. पण नवे काहीतरी करू पाहणार्या मोदींनी राजकारण आणि लोकशाहीला जातीयतेच्या गाळातून बाहेर काढले पाहिजे.
- भाजप हा पूर्वी मूठभर लोकांचा, साडेतीन टक्के वाल्यांचा पक्ष म्हणून ओळखला जात होता. पण महाराष्ट्रात मुंडे महाजनांनी तो चेहरा बदलला. तसेच मोदींनी तोच पायंडा पाडला. पण आपली शेटजी-भटजींचा पक्ष ही वर्षानुवर्षांची प्रतिमा बदलण्यासाठी पक्षाचा संघर्ष सुरु असतानाच कोणी साधु महंत किंवा एखादी साध्वी काही बरळते आणि प्रतिमा बदलण्यासाठी पक्षाने चालविलेल्या प्रयत्नांवर पाणी फेरले जाते. पुन्हा या पक्षावर जातीयवादाची चिखलफेक केली जाते. संघाशी जोडले जाते. अगदी गांधी हत्येपर्यंत चर्चा लांबवली जाते. हे सगळे पुन्हा तीच घाण आणि तीच काडी वापरण्याचा प्रकार आहे. कधी आपण यातून बाहेर पडणार आहोत याचा विचार केला पाहिजे.
- वास्तविक दलित, मुस्लिम आदि विविध समाज घटकांना बरोबर घेतल्याविना आज कोणत्याही राजकीय पक्षाला सत्तासंपादनाचे स्वप्नही पाहता येणार नाही. उत्तर प्रदेशात एकटया दलित समाजाचीच २१ टक्के मते आहेत. मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने त्या दृष्टीने मोठे काम केले आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही. बसपचे संस्थापक काशीनाथ हे विद्वान आणि द्रष्टे नेते होते. त्याच्या निधनानंतर ‘बसप’ संपेल असे काहींना वाटत होते पण तो त्यांचा भ्रम ठरला. किंबहुना जेव्हा जेव्हा मोठे आघात होतात तेव्हा तेव्हा मायावतींचे यश अधिक झळाळून निघते असा इतिहास आहे. १९९५ साली एका शासकीय विश्रामधामात समाजवादी पक्षाच्या गुंडांनी त्यांच्यावर भीषण हल्ला केला.
- त्यातून वाचलेल्या मायावती काही महिन्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या. १९९७ साली त्या पुन्हा मुख्यमंत्री झाल्या. २००२ सालच्या निवडणुकीतही त्यांनी सत्ता संपादन केली. २००६ साली काशीराम यांच्या निधनानंतर, मार्च २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रचंड यश मिळवून मायावतींनी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवले आणि बसप संपला नसल्याचे दाखवून दिले. त्यांचा प्रभाव पूर्वी इतका राहिला नसल्याच्या वार्ता येत असतानाच दयाशंकर सिंह यांच्या वक्तव्याने मायावती पूर्वी इतक्याच बलशाली असल्याचे दिसून आले आहे. आपल्या दलित समाजाच्या सेवेसाठी आजन्म अविवाहित राहून समाजकार्य करण्याचा वसा घेतलेल्या मायावती हा तर राजकारणातला एक चमत्कारच मानायला हवा. पण असे असताना कोणत्याही जातीयवादाचा सत्तेसाठी होणारा सततचा वापर हाच या देशापुढचा फार मोठा धोका आहे.
सोमवार, २५ जुलै, २०१६
जातीयतेच्या गाळातून लोकशाही वर येणार कधी?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा