- वाटेल ते बोलून प्रसिद्धीच्या झोतात राहणार्यांची फार मोठी मागणी केजरीवालांच्या आम आदमी पार्टीला जाणवू लागली. कारण बरेच वाचाळवीर सोडून गेल्यामुळे आणि क्रियेविण वाचाळता करण्याची जबाबदारी एकट्या अरविंद केजरीवाल यांच्यावर आल्यामुळे त्यांनी वॉंटेडची जाहीरात सोशल मिडीयावरून केली. त्या आमिषाला क्रिकेटवीर, समालोचक नवजोतसिंग सिद्धु बळी पडले आणि त्यांची चक्क विकेट उडवण्यात केजरीवालांना यशही मिळाले. त्यामुळे आप जैसा कोई मेरे जिंदगी में आये तो बात बन जाये म्हणत सिद्धू आपलेसे झाले.
- क्रिकेटमुळे नावारूपाला आलेला आणि आपल्या विनोदी शैलीच्या समालोचनाने कलाकार म्हणून प्रसिद्धी पावलेला नवज्योतसिंग सिद्धू भाजपामुळे राजकारणात आला. बारा वर्षानंतर आता त्याने भाजपाला रामराम ठोकला आहे े तसा राजकारणात वादग्रस्त नसलेला हा माणूस गाजतो आहे. सिद्धू नेहमी त्याच्या चटकदार बोलणे वा विधानाने गाजत असतो. पण यावेळी बहुधा प्रथमच चमत्कार घडला आहे. सिद्धू गाजतोय त्याच्या अबोल्याने वा मौनव्रत धारण केल्याने.
- या आठवड्यात संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आणि त्याच दिवशी सभागृहाचे अध्यक्ष असलेल्या उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, यांच्याकडे सदस्यत्वाचा राजिनामा देऊन सिद्धू अज्ञातवासात निघून गेला. पहिल्या दिवसापासून सिद्धूच्या भवितव्याविषयी तमाम लोक चिंतेत किंवा उत्सुक आहेत. कारण त्याने राज्यसभा सदस्यत्वाबरोबरच पक्षाचाही राजिनामा दिल्याचे वृत्त होते. त्याच्यासहीत त्याच्या पत्नीनेही पंजाब विधानसभेतील आमदारकीचा राजिनामा देऊन भाजपा सोडल्याचे वृत होते. पण ब्रेकिंग न्युज नेहमीच खरी नसते. म्हणून असेल, मंगळवारी सिद्धूच्या पत्नीने आपण आमदारकी वा पक्ष सोडला नसल्याचा खुलासा केला. सिद्धूने आम आदमी पक्षात प्रवेश केल्याची व तोच आपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार होणार असल्याचीही ब्रेकिंग न्युज होती. त्यामुळे हुरळलेल्या आप नेत्यांनीही त्याचे स्वागत करून टाकले. मात्र मंगळवार उजाडण्यापर्यंत धुरळा बसत गेला. आपल्या अस्सल स्वभावानुसार त्याने इथेही सर्वांना चकवा दिला.
- सिद्धू त्याच्या क्रिकेटमुळे नाही इतका टिव्हीच्या कार्यक्रमांनी गाजला व गाजतो आहे. त्याच्या खास शैलीला सिद्धूवाद असेही संबोधले जाते. कुठलीतरी शेरोशायरी वा तात्विक विधान करून सिद्धू टाळ्या मिळवतो. क्रिकेटमध्ये समालोचनातला त्याचा हा गुण ओळखून त्याला विनोदी कार्यक्रमात ओढले गेले. त्याच्याच खास किस्से शेरोसायरीसह त्याच्या हास्याच्या गडगडाटासाठी तो ख्यातनाम झाला. असा सिद्धू भाजपाने २००४ सालात अमृतसरच्या लोकसभा जागेसाठी उमेदवार म्हणून पुढे आणला आणि दोनदा जिंकून त्याने आपली कुवत सिद्ध केली. शिवाय टिव्हीस्टार असल्याने अन्यत्रही त्याला लोकप्रिय वक्ता म्हणून भाजपाने प्रचारसभात वापरले.
- आताही त्याच्या अनेक जुन्या भाषणांची चित्रणे काढून त्याने केजरिवाल यांची उडवलेली भंबेरी सोशल मीडियातून फ़िरते आहे. पण भाजपात रमलेल्या सिद्धूला पंजाबमध्ये अकाली दलाशी जुळवून घेता आले नाही. परिणामी २०१४ मध्ये त्याच्या उमेदवारीला अकाली दलाने विरोध केला आणि सिद्धू तेव्हापासून नाराज होता. त्याला बाजूला करून भाजपाने अमृतसर येथून अरूण जेटलींना उभे केले आणि पराभव ओढवून घेतला. पराभव स्पष्ट असतानाही भाजपाने लोकसभेत अकाली दलाचा पाठींबा हवा, म्हणूनच सिद्धूला दुखावले होते. तरीही सिद्धू शांत राहिला. त्याने अन्य कुठून उभे रहाण्यास नकार दिला होता. म्हणून त्याला राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेत आणले गेले. दोनच महिन्यांपुर्वी त्याची ही नियुक्ती झालेली होती. तेव्हाही तो त्याला नकार देऊ शकत होता. पण त्याने सदस्यत्व घेतले. याचा अर्थ त्याला पक्षात रहायचे होते. असे असताना त्याने राजीनामा का दिला? असे काय झाले की त्याला खासदारकी पुरेशी वाटेना आणि त्याने भाजपाला रामराम ठोकण्याचा पवित्रा घेतला. आज अकाली दल पंजाबमध्य आपली सर्व कुवत गमावून बसली आहे. त्याचे प्रत्यंतर गेल्या लोकसभेतच आलेले आहे. कॉग्रेसला जोर आला आहे आणि नगण्य नवखा असलेल्या आम आदमी पक्षाचे सर्व चार खासदार निवडून आले ते पंजाबमधून. याचे कारण ते आपचे कोणी झुंजार नेते वा कार्यकर्ते नव्हते. पंजाबमध्ये मागल्या दहा्पंधरा वर्षात जो नशेचा विळखा घट्ट होत गेला आहे, त्यामुळे राजकीय पक्षांविषयी नाराजी आहे. त्याच नशेबाजी विरुद्ध जे सेवाभावी कार्यकर्ते व संस्था कार्यरत आहेत, त्यांचेच म्होरके आपतर्फ़े लोकसभेला उभे होते आणि जिंकले.
- पंजाबमध्ये शीखधर्मिय असा कोणी चेहरा ‘आप’पाशी नाही. केजरीवाल त्यासाठी अनेकदा फ़ेटे बांधून मिरवूनही आले आहेत. पण त्यांना मुख्यमंत्री म्हणून स्विकारले जाणे अशक्य आहे. दुसरा कोणी राज्यव्यापी चेहरा नाही. अशा स्थितीत नाराज सिद्धू आपचा उमेदवार होऊ शकतो. आपल्याला पंजाबसाठी काही करायचे आहे. पण त्यासाठी भाजपात वाव नाही. भाजपा स्वबळावर पंजाबमध्ये लढायला तयार नाही, अशी तक्रार करून त्यांनी पक्ष सोडला आहे. त्यात तथ्य असेल, तर सिद्धूला मुख्यमंत्रीपदाचे वेध लागलेले आहेत. ते भाजपा अकाली दलाशी आघाडीत राहुन शक्य नव्हते. मग पक्षात राहुन उपयोग काय? त्यापेक्षा आपमध्ये जाऊन किस्मत आजमावायला काय हरकत आहे? या विचाराने सिद्धूने हा सिक्सर ठोकला आहे. पण हा रिऍलिटी शोमधील पंच प्रमाणे आहे. मिळाला तर टाळ्या, हशा नाहीतर फटफजीती. हवेतल्या हवेत डोक्यावरून जाणारा पंच.
रविवार, २४ जुलै, २०१६
सिद्धूचा पंच
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा