गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१८

गणेशोत्सवाचे राजकारण थांबवा

पादचारी व वाहतुकीला अडथळे ठरणाºया रस्त्यावरील मंडपांना परवानगी दिली जाऊ नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. यापार्श्वभूमीवर गिरगावात रस्ते अडवणाºया मंडपांना महानगरपालिकेच्या डी विभागाच्या अधिकाºयांनी मनाई केली. यावरुन राजकीय वातावरण तापले आणि शिवसेनेने त्यावरुन राजकारण सुरु केले. लगेच त्यावरुन भाजप सरकारवर टीका करण्याचे काम शिवसेनेने केले. शिवसेनेला भाजपवर टीका करायला फक्त निमित्त लागते. तेवढे निमित्त यामुळे मिळाले. विषय काय आणि आपण कुठे सरकत आहोत याचे भान न ठेवता शिवसेना नेत्यांनी लगेच भाजप स रकार आणि मोदींना आरोपीच्या पिजरºयात उभे केले. विषय काय? आपण बोलतो काय याचे कसलेही भान न ठेवता ही टीका केली जाते याचे आश्चर्य वाटते. हे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. असे निर्देश देण्याच्या सूचना काही न्यायालयाला पंतप्रधान मोदींनी दिलेल्या नव्हत्या. तरीही टीका केली गेली याचे सखेद आश्चर्य वाटते. गणेशोत्सव हा तमाम महाराष्टÑाचाच नाही तर आता तो ग्लोबल झालेला उत्सव आहे. तमाम भारताला त्याचा आनंद मिळत असतो. जगभरातून त्यासाठी लोक महाराष्टÑात दाखल होत असतात. त्यामुळे ही आपली महाराष्टÑाची संस्कृती आहे. त्या संस्कृतीचा अभिमान असला पाहिजेच, परंतु त्याचे कसलेही राजकारण करता कामा नये हे निश्चित. हा सण आपला पवित्र आणि आनंंद देणारा असा आहे. त्यामुळे त्याचे धार्मिक महत्व कधीही कमी होणार नाही. परंतु हा सण साजरा होताना त्यातील पावित्र्याला धक्का लागणार नाही याचेही भान ठेवणे आवश्यक आहे. उत्साहाच्या भरात जर गणेशोत्सव मंडळांकडून नागरिकांना त्रास होणारे प्रकार घडत असतील तर त्याची न्यायालयाला, प्रशासनाला दखल ही घ्यावीच लागेल. आज मुंबईतील खड्डे हा चिंतेचा विषय बनला आहे. अशातच जर मोठे खड्डे खणून वाहतुकीला अडथळे येणारे मंडप उभे केले जात असतील तर त्यामुळे काही गंभीर प्रसंग उद्भवू शकतो. वाहतूक कोंडी, रस्त्यावरील लोकांची गर्दी, भाविकांची गर्दी आणि मंडपामुळे अरुंद झालेली वाट. यामुळे चेंगराचेंगरीचे प्रकार निर्माण होऊ शकतात. एखाद्या दुर्घटनेमुळे सगळ्या उत्सवाला गालबोट लागू शकते. त्यामुळे मंडप टाकताना खबरदारी घेणे आवश्यक आहेच. याशिवाय उत्सव संपल्यानंतर ते खड्डे बुजवण्यासाठीही गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेतला पाहिजे. शहराचे, वातावरणाचे विद्रुपीकरण होईल असे कोणतेही कृत्य कोणीच करु नये. गणेशोत्सवाचे पावित्र्य हे मांगल्याने राखले गेले पाहिजे. त्याठिकाणी लावण्यात येणारी गाणी, भजने यांचा आवाज हा कर्णमधूर वाटला पाहिजे. कर्णकर्कष आवाजाने ध्वनीप्रदुषण होतेच पण आसपासच्या लोकांनाही खूप त्रास होतो. आपले सण लोकांना आनंद देणारे आहेत हे आपणच दाखवून दिले पाहिजे. थोड्या थोड्या अंतरावर निरनिराळी मंडळे असतील तर दोघांचे कर्णे दोन्हीकडून कर्कष आवाजात लावले जात असतील तर काहीच ऐकायला येत नाही आणि त्या भक्तीगीत असो, भजन असो कशाचाच आनंद मिळत नाही. त्याचप्रमाणे फुलांचे निर्माल्य, गुलाल, प्रसादाचे कागद आणि अन्य कचराही उत्सवानंतर बराच काळ तसाच राहतो. त्यामुळे वाहतुकीला रहदारीला अडथळे होतात. गणेशोत्सव हा कलागुणांचा सण आहे. त्यामुळे तो कलात्मकपणेच साजरा व्हायला पाहिजे. त्याचे पावित्र्य कुठेही कमी होता कामा नये यासाठी न्यायालयाने काही सूचना दिल्या असतील तर त्याचे राजकारण करण्यात काहीच अर्थ नाही. पण याचे भान शिवसेनेला कुठले असायला? चांगले काही करण्यासारखे नसले आणि चांगले मुद्दे नसले की यांना भावनीक साद घालायची वेळ येते. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशांचा चुकीचा अर्थ काढून त्याला राजकीय वळण देऊन मोदी आणि भाजपवर टीका करायला सुरुवात शिवसेनेनी केली, यातून त्यांचा बालीशपणा उघड झाला आहे. टीका करताना सेना नेते म्हणतात, पंतप्रधान मोदी हे मुसलमानी टोपी घालत नाहीत म्हणून ते हिंदुत्ववादी असा प्रचार सुरू आहे. पण मुसलमानी टोप्या घालणाºया काँग्रेसी राजवटीतदेखील हिंदूंच्या सण-उत्सवांचे असे धिंडवडे कधी निघाले नव्हते. पण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात हे सुरू आहे. हिंदूंच्याच सण-उत्सवात न्यायालय, प्रशासन आणि राज्यकर्त्यांचे असे अडथळे येत असतील तर या देशाचे भविष्य काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला असला तरी हा प्रश्न ज्या प्रशासनाने उठवला ते महापालिका प्रशासन मुंबईचे आहे. तिथे सत्ता शिवसेनेची आहे. म्हणजे आपलेच दात आपल्याच घशात जातील याचे भान न ठेवता महापालिका प्रशासनावर ताशेरे ओढायचे सोडून मोदी सरकारवर ताशेरे ओढले, हा पोरकटपणाच नव्हे काय? सध्या काँग्रेसचा पुळका असल्यामुळे काँग्रेसचे कौतुक शिवसेना करते आहे. पण काँग्रेसच्या आघाडीत शिवसेनेला स्थान मिळण्याची शक्यता नसल्याची जाणिव असल्याने तिसºया आघाडीचे प्रयत्न करणाºया ममता बॅनर्जींचा पुळका आला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनंी त्यांची भलावण केली. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुगार्पूजा आणि दुर्गा मिरवणुकीत कायदेशीर अडथळे आणले म्हणून ज्यांनी शिमगा केला त्यांचे राज्य आज महाराष्ट्रात आहे. ममता बॅनर्जींना तेव्हा देशद्रोही ठरवणाºयांनी राज्यातील गणेशोत्सवात अडथळे आणणाºया नोकरशाहीचे कान उपटू नयेत हे आश्चर्यकारकच आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे. वास्तविक पाहता हे निर्देश म्हणजे ना राज्य शासनाची भूमिका आहे ना केंद्र सरकारची ती भूमिका आहे. उच्च न्यायालय आणि महापालिका प्रशासन यांचा याच्याशी संबंध आहे. तो शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेचा विषय आहे. त्याच्यावरुन आकांडतांडव करण्यापेक्षा एक आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सेनेने पुढाकार घेतला असता तर बरे झाले असते. सत्तेत राहून आणि नसतानाही सत्ताधारºयांच्या नावाने ओरडायचे आणि आपले पाप झाकायचे ही सेनेची प्रथा आहे. पूर्वी असेच शरद पवारांच्या नावाने शिवसेना ओरडायची आणि प्रत्येक गोष्टीला पवारांना जबाबदार धरायची. तेंव्हा पवारांनी लातूरचा भूकंपही माझ्यामुळेच झाला काय असा सवाल करुन शिवसेनेचे तोंड बंद केले होते. पण महाराष्टÑाचा अभिमान असलेला गणेशोत्सव हा आदर्श साजरा करण्याची अपेक्षा बाळगण्यात गैर काहीच नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: