बुधवार, २९ ऑगस्ट, २०१८

भिकारसत्य

भारतात चार लाखांपेक्षा अधिक भिकाºयांची संख्या असल्याचे समोर आले आहे. केंद्रशासित प्रदेशात खूप कमी भिकारी असल्याचे आकडेवारीवरून पहायला मिळतं. मात्र लक्षद्वीप या राज्यात केवळ दोन भिक्षेकरी असल्याचं या आकडेवारीत पुढं आलं आहे. अहवालानुसार तेलंगणा हे राज्य भिक्षेकरीमुक्तीकडे वाटचाल करत आहे तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक भिकारी आहेत असे हा अहवाल सांगतो. यामध्ये २ लाख २१ हजार ६२७ पुरुष भिकारी असून १ लाख ९१ हजार ९९७ महिला भिकारी आहेत. संपूर्ण देशभरातील भिकाºयांची संख्या ही ४ लाख १३ हजार ६७० आहे असे अहवालात म्हटले आहे. हे तसे न पटणारेच वाटते. म्हणजे भारताची लोकसंख्या १३० कोटी आहे तर त्या तुलनेत ४ लाख भिकारी म्हणजे अगदी नगण्यच म्हणावे लागेल. म्हणजे ०.००३ इतकी कमी संख्या आहे अशी आकडेवारी दिसून येते. पण ही आकडेवारी  कशाच्या आधारे काढली याला काही आधार वाटत नाही. आज केवळ मुंबईचाच विचार करायचा झाला तर शेकडो हजारो नव्हे तर लाखाच्या घरात भिकारी मुंबईत दिसून येतात. त्यामुळे ही जाहीर केलेली आकडेवारी देशाचा चेहरा चांगला दाखवण्याचा प्रयत्न असला तरी ती पटणारी नाही. आजकाल मुंबईतील लोकल आणि रेल्वेस्थानकांत वेगवेगळ्या प्रकारचे भिकारी दिसू लागले आहेत. भिकाºयांची पारंपारीक जीवनशैली बदलली असून भिक मागण्याचे नवे फंडे किंवा प्रकार आता अस्तित्वात येताना दिसत आहेत. एकूणच सध्याचे जीवनमान, अर्थव्यवस्था, महागाई याचा विचार करता भिक मागणारांचे प्रमाण कमी झाले नसून ते फक्त बदलले आहे. हे बदललेले स्वरुप  अहवालकर्त्या संस्थेने पाहिले नसावे म्हणून हा माफक आकडा दिसून येत आहे. भिकारी म्हटले की साधारणपणे अंगावर मळके फाटके कपडे असणे, कळकट अंग, केस अस्ताव्यस्त झालेले, दाढी वाढलेली असा पोशाख समोर येतो. पण भिकाºयांच्या या वेशभूषेचेही आकर्षण तरुणाईला वाटू लागल्यामुळे तरुणांनी फॅशन म्हणून भिकारी लूक डेव्हलप केला. म्हणजे गुडघ््यावर किंवा कुठेही फाटलेल्या, उसवलेल्या, खिसलेल्या मळकट कळकट जीन्सची पँट ही फॅशन आहे. त्यामुळे भिकारी कोण आणि श्रीमंत कोण असा प्रश्न रेल्वेत बसल्यावर पडल्याशिवाय रहात नाही. मुलींच्याही ड्रेसमधील टॉपच्या बाह्या आज अशा प्रकारे आहेत की त्या खांद्यापासून दंडापर्यंत ओरबाडून फाडून काढल्यासारख्या दिसतात. खांद्यापर्यंत काहीतर पट्टी मध्येच भाग फाडल्यासारखा की त्यातून खांदे बाहेर येतील आणि नंतर पुन्हा बाही लावलेली. साधारणपणे भिकारणींचे कपडे, ब्लाऊज ज्या ठिकाणी फाटलेले असतात किंवा एखाद्या पिडीतेवर अत्याचार झाल्यावर कपडे जसे फाटलेले असतात तसे टॉप घालून मुली लोकलमधून प्रवास करतात, त्यामुळे नेमकी भिकारीण कोण आणि कॉलेजयुवती कोण असा प्रश्न कोणालाही पडतो. त्यात मुंबईत घामाने लोकलमध्ये कपडे आपोआपच अस्ताव्यस्त झालेले असतात. भिकाºयाचा लूक यायला फारसा वेळ लागत नाही. आजकाल केवळ फाटके कपडेच नाही तर तरुणांच्या दाढीचेही लूक विचित्र ठेवले जातात. गोटी काय, बोकडदाढी काय, मध्येच रंगवलेले काय, अस्तावस्त फेंदारलेले, जटा बांधल्यासारखे काय कोणी बो बांधते. त्यामुळे भिकारी आणि हे फॅशनबाज यांच्यात काही फरकच वाटत नाही. पाहणी अहवाल तयार करणारांना असे भिकारी कदाचित फॅशनेबल तरुण वाटले असावेत त्यामुळे प्रत्यक्ष पारंपारीक भिकाºयांचा खरा आकडा समोर आला नसावा असे वाटते. या फॅशनबाज तरुणांमुळे आपल्या धंद्यावर परिणाम होऊ नये म्हणून भिकाºयांनीही आपला ड्रेसकोड बदलल्याचे दिसते. आजकाल कांदिवली, मालाड, अंधेरी अशा स्थानकांसह अनेकठिकाणी  कार्पोरेट भिकारी निर्माण झालेले आहेत. विशेषत: रात्रीच्यावेळी हे भिकारी, त्यातही महिला भिकारी जास्त दिसून येतात. यांचे कपडे घरंदाज किंवा मध्यमवर्गियांसारखे असतात. आपण चहा किंवा सरबत घेण्यासाठी फलाटावरील दुकानापाशी उभे राहिलो की या महिला इंग्रजी अथवा तत्सम भाषा बोलत येतात आणि एक दोन नाही तर चक्क २० रुपयांची भिक मागतात. आपण कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही तर अंगाला हात लावून, आपल्याला एक वडा पाव आणि पाण्याची बाटली घेऊन द्या म्हणून आग्रह करतात. दया येऊन आपण दिले तर या महिला पटकन निघून जातात. पुढे अंगावर दागिने आणि भरगच्च कपडे घातलेल्या महिला कडेवर मूल घेऊन २० रुपये मागू लागतात. एक दोन नाही तर किमान २० रुपयांचा मीटर या भिकाºयांनी सुरु केला आहे. आता हातात थाळी घेणारे,गळयात झोळी अडकवलेले भिकारी नाही तर कार्पोरेट झालेले भिकारी उपलब््ध दिसतात. त्याचा या अहवालात कुठेही उल्लेख नसावा असेच वाटते. खरं तर भिकारी असणे ही शोकांतिका आहे. देशासाठी लांछनास्पद आहे. तरीही आहेत त्या भिकाºयांचा नेमका आकडा न सांगता तो चुकीचा सांगणे ही सुद्धा फसवणूकच म्हटली पाहिजे. पुरुष भिक्षेकरीगृह, सुधारगृह,आश्र्रमशाळा, वस्तीगृृहे अशा सर्व सुविधा असतानाही आज सर्व वयातील भिकारी नित्य दिसतात. रेल्वेतून प्रत्येकाला हात लावून पाया पडत एक दोन रुपये गोळा करणारी भावंड, पती पत्नी, कोणत्या तरी संस्थेचे कार्ड दाखवून मुके असल्याचे सांगून कार्डवर नाव लिहून पैसे गोळा करणारे भिकारी असे कितीतरी प्रकारचे भिकारी दिसून येतात. त्यात ठिकठिकाणी कोपºयात चरसी, दारुडे पडलेले असतात, त्यामुळे भिकारी कोण आणि बाकीचे कोण असा प्रश्न पडल्यामुळे त्यांची गणना चुकली असावी. पण लांछनास्पद बाब असली तरी भारतात भिकाºयांची संख्या भरपूर असणार आहे. भिक मागणे कायद्याने गुन्हा असला तरी असे लाखो लोक आहेत हे सत्य आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: