अकरावी प्रवेशाची चौथी यादी मंगळवारी जाहीर झाली. अजूनही प्रवेश प्रक्रिया सुरूच असल्यामुळे अकरावीच्या अभ्यासाला नेमकी कधी सुरुवात होणार हा प्रश्न आहे. दहावीचा निकाल लागून बरोबर २ महिने झाले. ८ जूनला निकाल लागला आणि अजूनही अकरावी प्रवेशाचा प्रश्न मिटलेला नाही.परीक्षेनंतर निकाल लागेपर्यंतचे तीन महिने आणि निकालानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्याने जवळपास दोन महिने असे एकूण सलग ५ महिने दहावीनंतरचे विद्यार्थी अभ्यासाशिवाय बसून आहेत. शैक्षणिक वर्ष दहाच महिन्यांचे असते, त्यामुळे जवळपास एक टर्म इतका कालावधी या विद्यार्थ्यांचा वाया गेलेला आहे. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचा एवढा कालावधी असा वाया जाणे हे निश्चितच योग्य नाही. त्यामुळे दहावीच्या निकालानंतर किती दिवसांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे, याबाबत एक कायदा करण्याची गरज आहे. दहावीच्या परीक्षेनंतर ३ महिन्यांत निकाल लावणे बंधनकारक आहे, त्याचप्रमाणे निकालानंतर अकरावीचे कॉलेज एक महिन्याच्या आत सुरू करणे बंधनकारक असले पाहिजे. याद्यांवर याद्या लागत आहेत आणि अकरावी प्रवेशाचा घोळ काही केल्या मिटत नाही. प्रत्यक्षात परिस्थिती फार वेगळी आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये जागा भरल्या गेलेल्या नाहीत, रिकाम्या आहेत. ठरावीक महाविद्यालयांनाच पसंती देण्यामुळे अनेकांनी अनेक ठिकाणी नावनोंदणी केलेली आहे. साहजिकच उपलब्ध जागा आणि इच्छुक विद्यार्थी यांचे गुणोत्तर प्रमाण भिन्न आहे. याद्यांवर याद्या प्रसिद्ध होत आहेत, पण नेमके किती विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत आणि किती वंचित आहेत याचा नेमका आकडा बाहेर येत नाही. उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांचे वाढलेले प्रमाण आणि गेल्या काही वर्षापासून सुरू असलेला ‘बेस्ट फाईव्ह’चा फॉर्म्युला, यामुळे विद्यार्थ्यांची गुणात्मक कामगिरी चांगली दिसत आहे. गुण वाढल्यामुळे अपेक्षा वाढल्या आहेत. साहजिकच जास्तीत जास्त चांगल्या आणि जास्तीत जास्त जवळचे महाविद्यालय मिळवण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. आज उत्तीर्णाची नेमकी संख्या आणि उपलब्ध विद्यार्थी संख्या याची नेमकी आकडेवारी समोर येताना दिसत नाही. त्याचप्रमाणे सरकारने काही स्वप्नवत अशा योजना राबवल्या, पण त्याचा नेमका काय उपयोग झाला याचे कोणतेही उत्तर आज सरकारकडे नाही. दहावी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांची कलचाचणी सरकारने घेतली. पण त्या चाचणीतील निष्कर्षाप्रमाणे किती जणांना प्रवेश मिळेल, याची कसलीही शाश्वती नाही. यापूर्वी तिस-या यादीनंतर ऑनलाईनसाठी ८० हजार जागा रिक्त राहिल्या आहेत, असे सांगण्यात आले होते. या जागांवर किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या यादीनंतर रिक्त राहणा-या जागांवर प्रवेश न झालेल्या आणि प्रथम पसंती मिळूनही प्रवेश नाकारणा-या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या आतापर्यंत तीन याद्या जाहीर झाल्या आहेत. तिस-या यादीत यंदा एकूण १ लाख १७ हजार २३४ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला होता. त्यापैकी फक्त ५४ हजार ७२७ विद्यार्थ्यांनाच प्रवेश जाहीर करण्यात आला असून तब्बल ६२ हजार ५०७ विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष या चौथ्या यादीकडे लागून राहिले आहे. उपलब्ध जागांच्या तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने चौथ्या यादीनंतरही प्रवेशासाठी अनेक जागा रिक्त राहणार आहेत. त्यामुळे या रिक्त जागांवर पहिल्या तीनही प्रवेश फे-यांतील प्रवेश नाकारणा-या किंवा प्रवेशापासून कोणत्याही इतर कारणांमुळे रिक्त राहणा-या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी आयोजित करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी ही चौथी फेरी महत्त्वाची असणार आहे. विशेष म्हणजे, अल्पसंख्याक कॉलेजांमध्येही ५० हजारांहून अधिक जागा अद्याप रिक्त आहेत. त्यामुळे समुपदेशन फेरीमध्ये यंदा अल्पसंख्याक कॉलेजांचे पर्याय अधिक असण्याची शक्यता आहे. केंद्रीय प्रवेश फेरीतून बाहेर पडण्याची मुभा मिळाल्यानंतर अनेक अल्पसंख्याक कॉलेजेसनी अल्पसंख्याक कोटय़ाबरोबरच संस्थांतर्गत, व्यवस्थापन कोटय़ातील जागा कॉलेजच्या स्तरावर भरण्याचा पर्याय स्वीकारला. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांकडून पुरेसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसत आहे. प्रथम पसंती, प्राधान्य आणि नंतर अन्यत्र प्रवेश मिळाल्यामुळे प्रवेश नाकारणे यामुळे अनेकांचे भवितव्य अधांतरी राहते. विद्यार्थी संख्या आणि नोंदणी होणा-यांची संख्या यांच्या प्रमाणात महाविद्यालये प्रॉस्पेक्टस् वाटत नाहीत. एखाद्या महाविद्यालयाची विद्यार्थी संख्या ४०० असेल, तर ५ हजारांपेक्षा जास्त प्रॉस्पेक्टस्ची विक्री होते. यामुळे अनेक विद्यार्थी अनेक ठिकाणची प्रॉस्पेक्टस् घेतात आणि अर्ज करतात. त्यामुळे ब-याचवेळा आकडा फुगवला जातो. चांगले गुण असलेल्या विद्यार्थ्यांनी अनेक ठिकाणी अर्ज केल्यावर सगळीकडे त्यांना प्रवेश मिळतो. अशा प्रकारे एकाच विद्यार्थ्यांला चार ते पाच ठिकाणी प्रवेश मिळू शकतो, असे यादीत नाव आले तर तो नेमका कुठे अॅडमिशन घेणार आणि उर्वरित ठिकाणी ती जागा रिक्त राहणार. त्यामुळे त्या अन्य महाविद्यालयातील ३ जागांवर विद्यार्थ्यांचे नुकसान होत असते. म्हणजे एखाद्या वधू-वर सुचक मंडळाची असते तशीच परिस्थिती इथे होते. वधू-वर सूचक मंडळात लग्नासाठी नावनोंदणी होते; परंतु नाव नोंदणीनंतर कुठेतरी जमते. पण लग्न जमल्यानंतर आमचे आता झाले आहे, असे त्या मंडळाकडे कळवले जात नाही. साहजिकच लग्न ठरल्यानंतरही त्यांना स्थळे सुचवली जातात. तसेच इथे घडते. अमूक एका ठिकाणी अॅडमिशन घेतल्यानंतर बाकीच्या ठिकाणची अॅडमिशन कॅन्सल करा, असे कोणी विद्यार्थी कळवत नाहीत. त्यामुळे काही जागा विनाकारण रिक्त राहतात. यासाठी काहीतरी नियम होणे गरजेचे आहे. या संथ प्रवेश प्रक्रियेमुळे आणि यादीवर यादी लागल्यामुळे अकरावीचे कॉलेज अभ्यासक्रम नेमके कधी सुरू होणार हा प्रश्नच आहे. ही सगळी प्रक्रिया संपेपर्यंत सप्टेंबर उजाडेल. मग गणपती, नवरात्र दिवाळी पाठोपाठ आहेच. कधी होणार विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि पहिल्या सत्रात काय शिकणार अकरावीला हे विद्यार्थी असा प्रश्न आहे. त्यामुळे हा प्रवेशाचा घोळ मिटवण्यासाठी काही नियम तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम ठरविला पाहिजे.
मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८
अकरावी प्रवेशाचा घोळ कायम
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा