गर्दुल्ल्यांची वाढती संख्या हे मुंबईकरांपुढचे फार मोठे संकट आहे. जीवनवाहिनी मुंबई लोकल हाच गर्दुल्ल्यांचा अड्डा असल्यामुळे अनेकदा रेल्वे स्थानकात गुन्हे घडत आहेत, मात्र रोज डोळ्यासमोर घडणारे हे गुन्हे रोखण्यात पोलिसांना अपयश येत आहे.मुंबईतील गर्दुल्ले किंवा चरस, अफू, गांजा ओढणा-या नशाबाज व्यक्तींना पकडायला, त्यांच्यावर कारवाई करायला पोलीस का घाबरतात, असा प्रश्न निर्माण होत आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही लाईनवरच्या लोकलमध्ये आणि रेल्वे स्थानकांमधून या गर्दुल्ल्यांचा धोका आहे. त्याबाबत अनेक तक्रारी असूनही पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करण्यास धजावत नाही. त्यामुळे सामान्य माणसांचा, प्रवासी वर्गाचा मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलीस विश्वास गमावत आहेत.गर्दुल्ले लोकलमधून काहीही करत असतात. त्यांचा महिला व अन्य प्रवाशांनाही फार त्रास होत असतो; परंतु रेल्वेच्या सुरक्षाव्यवस्थेकडे या गर्दुल्यांवर नियंत्रण ठेवणारी कोणतीही उपाययोजना नाही. तसे हे गर्दुल्ले चोवीस तास रेल्वेच्या वाहिन्यांवर आणि स्थानकांवर पडीक असतातच. पण रात्रीच्या वेळी त्यांना जास्त चेव येत असतो. पश्चिम रेल्वेच्या रात्री उशिराच्या लोकल ट्रेनमधून मोठय़ा प्रमाणात या गर्दुल्ल्यांची संख्या असते. लोकलला गर्दी असते, त्यामुळे दरवाजातून आत शिरणे अवघड असते. तरीही हे गर्दुल्ले रात्रीच्या वेळी दरवाजे अडवून लोकलमध्ये बसतात. लोकलच्या दरवाजा आणि मधल्या पॅसेजमध्ये प्रवाशांना उभे राहणेही शक्य नसते, पण हे व्यसनी लोक खाली बसून, पाय पसरून, आडवे पडून राहतात. विशेषत: मोटरमनच्या दोन्ही बाजूने पहिले तीन डबे हे अत्यंत असुरक्षित असे असतात. दोन्ही बाजूंना लेडीज डबे असतात. त्यामुळे या गर्दुल्ल्यांची भीती महिलांना असते. त्यामुळे सगळी गर्दी या गर्दुल्ल्यांचा त्रास चुकवण्यासाठी मधल्या डब्यांच्या दिशेने येते. मधले ठरावीक डबे खचाखच भरलेले आणि हे बाकीचे डबे रिकामे जातात. हे रोजचे चित्र असते. महिला डब्यात सुरक्षारक्षक, पोलीस असतात तरीही गर्दुल्ल्यांपुढे कोणाचे काही चालत नाही.विशेष म्हणजे यामध्ये काही गर्दुल्ले हे रेल्वे कर्मचारी आहेत. त्यांना रेल्वेची खडानखडा माहिती असते. ट्रॅक, प्लॅटफॉर्म, कोण मोटरमन आहे याची सगळी माहिती असते. रेल्वे ट्रॅकवर काम करणा-या गँगमनचे कपडे, जॅकेट, हत्यारे हातात घेऊनही काही गर्दुल्ले, रेल्वेत दंगा करतात. गेले काही दिवस चर्चगेट बोरिवलीच्या रात्रीच्या जलद गाडीत असाच एक कर्मचारी दंगा करत असतो. अत्यंत गलिच्छ शिवीगाळ करत असतो. त्याच्या हातात शिट्टी असते. तो महिला डब्यात घुसतो, दिव्यांगांच्या डब्यात घुसून दंगा करत असतो. दिव्यांगांच्या डब्यात उभा राहून सर्वसाधारण डब्यातील प्रवाशांना हाका मारून शिवीगाळ करत असतो. महिला, वृद्ध काहीही न बघता गलिच्छ शिवीगाळ करत असतो. प्रत्येक स्टेशन आले की, तेथील कर्मचारी, मदतीसाठी असलेल्या पोलिसांना हाका मारून शिव्या घालत असतो. तरीही पोलीस बघ्याची भूमिका का घेतात, असा प्रश्न पडतो.काही चरसी, गर्दुल्ले प्रवाशांच्या मोबाईल, बॅगा, छत्र्या यावर लक्ष ठेऊन असतात. यामध्ये एक फार मोठे टोळके आहे. अत्यंत चपळाईने येऊन चो-या करण्यात ते पटाईत आहे. अंधेरी स्टेशनला या टोळक्यातील पाच-सहा प्रवाशांच्या शेजारी जाऊन बसतात. डुलकी काढण्याचे नाटक करतात आणि गोरेगाव आल्यावर अलगद प्रवाशांच्या हातातील मोबाईल, बॅगा गाडी सुटायच्या बेताला उचलून गाडीतून उडी टाकून पळतात. प्रवाशांना समजते तेव्हा त्याने उडी टाकलेली असते. गाडीने वेग घेतलेला असतो. प्रवासी तक्रार देण्यासाठी गाडीतून मालाड स्टेशनला उतरतात तेव्हा तिथेही कसली दखल घेण्याची सोय नसते. अंधेरी, गोरेगाव, मालाड आणि बोरिवली ही स्थानके गर्दुल्ल्यांसाठी सेफ झोन झालेला आहे. मालाडच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरील विक्रेते, भेळ विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते, सरबत विक्रेते यांच्यामध्येही त्या चरसी लोकांची खूप दहशत आहे. या स्थानकांवर रात्रीही गर्दी असताना लवकर दुकाने बंद करून स्वत:चा बचाव करण्यासाठी हे लोक प्रयत्नशील असतात. कारण रात्री जरा उशिरा भेळेचे अथवा कोणतेही दुकान उघडे दिसले की, ते त्या दुकानात काडेपेटी दे, माचिस दे अशी मागणी करून हल्ला करतात. प्लॅटफॉर्मवर अत्यंत भयानक अवस्थेत हे गर्दुल्ले असतात. हातात काठी असते, काहीही असते. पटकन धावत्या लोकलमध्ये दरवाजात उभ्या असणा-या लोकांच्या हातावर फटका मारून त्यांच्या हातातील बॅग, मोबाईल उडवण्यात हे मातब्बर असतात. अमली पदार्थ आणि व्यसनासाठी लागणा-या पदार्थासाठी हे लोक काहीही करायला तयार असतात. एखाद्यावर हल्ला करण्यापासून ते चोरीसारखे प्रकार या लोकांना अवघड नसतात. हे सर्व पोलिसांच्या डोळय़ांदेखत घडत असतानाही पोलीस मात्र कोणतीच कारवाई करू शकत नाहीत. पोलीस अशा चरसी, व्यसनी गर्दुल्ल्यांना पकडत नाहीत. त्यांना तुरुंगात टाकू शकत नाहीत. पोलिसांनाही त्यांची भीती वाटत असते. ही अत्यंत खेदाची बाब म्हणावी लागेल. विशेष म्हणजे एका पोलीस अधिका-याचेच म्हणणे आहे की, अशा लोकांची तब्ब्येत केव्हाही खराब होऊ शकते. त्यांना एखादा फटका मारला तर त्यांचा जीव जाण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांच्यामागे असणारी ताकद, त्यांचे परिवार, कायदे यामुळे आम्ही त्यांना पकडू शकत नाही. कोणाचा मोबाईल कशाप्रकारे मारला आणि कोणी मारला आहे हे आम्हाला समजलेले असते. पण आम्ही त्यांना पकडू शकत नसल्याची हतबलता त्यांनी व्यक्त केली. ही बाब अत्यंत भयावह आहे. कोणत्याही थराला जाणारे गर्दुल्ले आणि त्यांच्या पाठीमागून कार्यरत असणारी शक्ती हे मुंबईकरांपुढचे फार मोठे आव्हान आहे. या संकटापासून सीसीटीव्ही कॅमेरे असूनही पोलीस प्रवाशांना मदत करू शकत नाहीत, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
बुधवार, १ ऑगस्ट, २०१८
गर्दुल्ल्यांपुढे पोलीस का नमतात?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा