ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. आपल्या मतांशी ठाम असणा-या एका विचारवंत व्यक्तिमत्त्वाचा अंत सोमवारी झालेला आहे. त्यांच्या विचाराशी पक्के असण्याचा अर्थ इतका मजबूत होता की त्याला कोणी हट्टीपणा म्हणू शकत नव्हते तर विचार म्हणत होते. त्यामुळेच भगव्या वातावरणात जन्माला येऊनही त्यांनी अखेरपर्यंत लाल बावटाच हातात घेतला होता.लाल बावटय़ाने अखेरच्या टप्प्यात नाकारले तरी त्यांनी त्या लाल बावटय़ाशी आणि विचारांशी फारकत घेतली नाही, तर ते विचारांशी कायम राहिले हेच त्यांचे मोठेपण होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची सोमनाथ चटर्जी यांची गणना होते. संसदीय प्रणालीतील सर्वोच्च घटनात्मक पद असलेले लोकसभेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. हे भूषवताना त्यांनी नवा आदर्शवाद निर्माण केला होता. आपल्या संयमी कामकाजाने त्यांनी या अध्यक्षपदाची धुरा उत्तमपणे सांभाळली होती. अत्यंत अभ्यासू संसदपटू अशीच त्यांची ख्याती होती. १४व्या लोकसभेत ते पश्चिम बंगालमधील बोलपूर मतदारसंघातून निवडून आले होते. सोमनाथ चॅटर्जी हे प्रसिद्ध वकील आणि हिंदू महासभेचे संस्थापक अध्यक्ष निर्मलचंद्र चॅटर्जी यांचे पुत्र होते. म्हणजे हिंदुत्ववादी विचारसणीतून जन्माला आलेले ते समाजवादी आणि कम्युनिस्ट नेते होते. काळाची गरज ओळखून त्यांनी लाल बावटा खांद्यावर घेतला हे त्यांच्या विचारसरणीतून जाणवते. सोमनाथ चटर्जी हे परखड विचारांचे स्पष्टवक्ते नेते होते. आपली मते व्यक्त करताना त्यांनी कधी संकोच केला नाही की कोणाची तमा बाळगली नाही. समोर कोण आहे याचा विचार न करता योग्य वेळ साधून व्यक्त व्हायचे, अशी त्यांची पद्धती होती. चॅटर्जी यांनी नुकतीच पंचायत निवडणुकांवरून राज्य निवडणूक आयोगावर टीका केली होती. व्यवस्था आणि प्रशासनावर टीका करताना त्यांनंी कधीही मागे-पुढे पाहिले नाही. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीवर त्यांनी कडाडून टीका करताना निवडणूक यंत्रणेलाही दोषी ठरवले होते. आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत पश्चिम बंगालच्या निवडणुकीत इतका हिंसाचार कधीच पाहिला नसल्याचे त्यांनी म्हटले होते. यावरून त्यांनी निवडणूक आयोगाबरोबरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर गुप्तपणे शरसंधान केले होते. कम्युनिस्ट पक्षांमध्ये माकम आणि भाकम असे दोन पक्ष प. बंगालमध्ये कार्यरत आहेत. माकम हा जगभर पसरलेला पक्ष असताना भारतीय विचारधारेला धरून घेऊन जाणारा पक्ष म्हणून मकाप अस्तित्वात आला. त्याचीच साथ कायम चटर्जी यांनी दिली होती. दहा वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व केलेले चॅटर्जी यांनी १९६८ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. त्यानंतर १९७१ मध्ये पहिल्यांदा ते लोकसभेवर निवडून गेले होते. सोमनाथ चॅटर्जी यांना १९९६ साली उत्कृष्ट संसदपटूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. २००४ ते २००९ या काळात ते लोकसभेचे अध्यक्ष होते. २००८ मध्ये सोमनाथ चॅटर्जी यांनी पक्षादेश मानण्यास नकार दिला, त्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. सीपीएमने त्यावेळी काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर चॅटर्जी यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. पश्चिम बंगालमध्ये दीर्घकाळ दोन दशकांपेक्षा अधिक काळ कम्युनिस्टांची सत्ता राहण्यात सोमनाथ चटर्जीसारख्या कडव्या आणि परखड विचारांच्या नेत्यांचा भाग फार मोठा होता. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भांडवलदारांची सत्ता न येता सर्वसामान्यांची सत्ता यावी यासाठी त्यांनी डाव्या पक्षांचा मार्ग स्वीकारला होता. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या हाती सत्ता सहजपणे गेली. ती हस्तांतरीत होण्यासाठी खूप काळ लागणार हे निश्चित होते. म्हणूनच सोमनाथ चटर्जी यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात करताना डावा विचार जवळ केला. भगव्या विचारसरणीतून ते डावीकडे झुकले ते यासाठीच. कारण काँग्रेसची स्थापना ही ज्या कारणासाठी झालेली होती तो काळ आणि कारण संपलेले होते. या देशात कायमस्वरूपी ब्रिटिश राज्य करतील, असे काँग्रेसला वाटत होते. त्यामुळे इंग्लंडमध्ये ज्याप्रमाणे हुजूर आणि मजूर असे दोन पक्ष आहेत तसाच एक प्रबळ विरोधी पक्ष भारतात असला पाहिजे, असे अनेकांना वाटले. या विचारातूनच काँग्रेसचा जन्म झाला. त्यातही ब्रिटिश अधिकारी आणि नेत्यांचा पुढाकार होता. त्यामुळे ब्रिटिश देश सोडून गेल्यावर तसे पाहता काँग्रेस चालू ठेवायची काहीच गरज नव्हती. काँग्रेसचे विसर्जन व्हावे असे खुद्द महात्मा गांधींनाही वाटत होते. पण पंडित नेहरूंनी त्याला विरोध केला आणि तीच काँग्रेस पुढे चालू ठेवत सत्ता मिळवली. त्यामुळे हे स्वातंत्र्य होते की सत्तांतर होते असाच विचार तेव्हा अनेकांनी केला. ब्रिटिशांच्या हातातून काँग्रेसच्या हातात देश गेला. स्वातंत्र्य मिळाले का, गुलामगिरी संपली का, असे अनेक प्रश्न तेव्हा अनुत्तरीत होते. त्यामुळे मुळातच भांडवलदारी पक्ष असलेल्या भांडवलदारी विचारसरणीचा असलेल्या काँग्रेसला विरोध करणारी शक्ती या देशात निर्माण होण्याची गरज होती. ती भारतातील कम्युनिस्ट पक्षांकडून पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती; परंतु चीन रशियाप्रमाणे टोकाची भूमिका घेणारा मार्क्सवाद इथे रुजणार नाही हे ओळखणारेही अनेकजण होते. अशा विचारांच्या घालमेलीतच सोमनाथ चटर्जी यांची कारकीर्द घडू लागली. काँग्रेस हा त्यांचा शत्रू नंबर एक होता, कारण तो भांडवलदारांची पाठराखण करणारा पक्ष होता. जनसंघ किंवा भाजपशी जवळीक साधण्याचा माकप भाकपचा कधी विचारच नव्हता, कारण त्यांच्यादृष्टीने जनसंघ किंवा भाजप हा जातीयवादी पक्ष आहे. त्यामुळे शत्रूचा शत्रू तो मित्र या नात्याने काँग्रेसचा शत्रू असला तरी तो आपला मित्र होऊ शकणार नाही, त्यापेक्षा भाजपचा शत्रू जो आहे त्या काँग्रेसशी हातमिळवणी केलेली बरी, या विचाराने २००४ ला कम्युनिस्टांनी मनमोहन सिंग सरकारला समर्थन दिले आणि सोमनाथ चटर्जी लोकसभा अध्यक्ष झाले. पण अण्वस्त्र करारावरून भांडवलदार देशांचे बटीक होऊ नये म्हणून काँग्रेसचे समर्थन काढून घेतले आणि चटर्जीची कारकीर्द संपुष्टात आली. पण शेवटपर्यंत आपल्या विचारांशी मात्र ते ठाम राहिले, हेच त्यांचे वैशिष्टय़ होते. अशा स्पष्ट विचारांच्या नेत्याला लाल सलाम.
बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८
स्पष्ट विचारांचा नेता
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा