सोमवार, १७ मार्च, २०२५

‘मानसा मानसा कधी व्हशीन मशीन’

‘मानसा मानसा कधी व्हशीन मानूस?’ अशी निसर्गकन्या बहिणाबाई चौधरींची कविता आहे. बहिणाबार्इंनी मानसशास्त्र आणि जगाचा स्वभाव पूर्णपणे ओळखलेला होता. त्यामुळे त्यांनी जगातल्या माणसांच्या दुर्गुणांवर आपल्या कवितांमधून नेहमीच कटाक्ष टाकला होता. त्यामुळे ८५ वर्षांपूर्वी माणसाला कधी तू माणूस होणार, असा सवाल त्यांनी केला होता. कारण त्यांनी माणसातील पशुत्व, जनावर पाहिलेले होते. म्हणूनच त्यांनी माणसापेक्षा जनावरही बरे, असे आपल्या कवितेतून म्हटले होते.


‘मानसा मानसा तुझी नियत बेकार, तुज्याहुन बरं गोठ्यातलं जनावर’ असे म्हणून माणसापेक्षा जनावरं परवडली असे म्हटले होते. पण आज जर बहिणाबाई असत्या तर त्यांनी माणसाला माणूस हो, असा सल्ला दिला नसता तर अरे ‘मानसा मानसा कधी व्हशीन मशीन’ असाच सवाल केला असता. कारण माणसांपेक्षा मशीनच न डगमगता कामे करताना दिसतात. माणूस लाचार होतो, पण मशीन कधी लाचार होताना दिसत नाही.

आज सगळीकडे लाचारांची फौज दिसते आहे. त्यामुळेच अशा लाचार माणसाला आता मशीनकडून शहाणपणा शिकण्याची वेळ आलेली आहे, हे बहिणाबार्इंनी सांगितलेही असते कदाचित. म्हणजे माणसाने मशीन बनवले. त्या मशीनला मेंदू दिला नाही, पण ते मशीन, यंत्रणा मात्र आपल्या नियमावर ठाम असते. नियम तोडून कधीही जाताना दिसत नाही. म्हणजे अगदी पिठाच्या गिरणीचा पट्टा असला तरी सतत गोल गोल फिरायचा कंटाळा आला म्हणून चला थोडे फेरे उलटे घेऊ असे म्हणत नाही. अगदी तुटेपर्यंत काम करतो, पण आपल्या नियमात बदल करत नाही. हे माणसाला जमत नाही. रोजचा आपला मार्ग बदलण्याचा प्रयत्न करताना तो अधिकाधिक चुकत जातो. मग यंत्र आपल्यापेक्षा श्रेष्ठ ठरू लागली काय? मोबाइलचे बिल भरण्याची तारीख १० असेल तर ते वेळेत भरले नाही तर रात्री बारा वाजता तुमचा मोबाइल बंद होतो. तेव्हा तो मोबाइल विचार करत नाही की, मी एखाद्या महत्त्वपूर्ण व्यक्तीच्या नावाचा फोन आहे. कोण कोणत्या हुद्द्यावर काम करतो आहे किंवा समाजात त्या व्यक्तीचे स्थान, प्रतिष्ठा काय आहे हे ही यंत्रणा कधी बघत नाही. बिल भरा आणि पुन्हा फोन चालू करा, याशिवाय पर्याय नसतो. किंबहुना वेळेत बिल भरण्याची सवय माणसाला ते यंत्रच लावते. नाही ऐकले की तुम्ही डिस्कनेक्ट होता. माणसाचे तसे असते का? म्हणजे माणसापेक्षा यंत्रेच अधिक हुशार निघाली ना!


बिल भरले नाही म्हणून फोन कट होतो. विजेचे बिल भरले नाही तर लाइट कट होते. सगळ्या यंत्रणा बंद होतात. तुमचा रेल्वेचा पास ३० तारखेला संपला असेल तर तो तातडीने नवा काढावा लागतो. ही सगळी यंत्रणा अगदी काटेकोर असते. पण माणसाचे तसे आहे का? पगार वेळेवर होत नाही म्हणून माणूस कधी बंद पडतो का? माणसाने अशी ताकद दाखवली असती तर काय झाले असते? बीडमधली दोन दिवसांपूर्वीची धनंजय नागरगोजे या शिक्षकाची आत्महत्या ही अशीच क्लेशदायक आहे. १८ वर्षे बिनपगाराचा तो शिक्षक कसा काय जगला? अखेर आत्महत्या केली. आता दुसरी लाचार माणसे त्या जागी येऊन बसतील. ती येऊ नयेत म्हणून माणसाला वेळेत पैसे, पगार मिळाला नाही तरी स्वत:चे हाल करून घेत जगावेच लागते. हे जगणे म्हणजे अत्यंत लाजिरवाणे असते. त्यापेक्षा मरण पत्करले म्हणून त्याने आत्महत्या केली. अशा लाजिरवाण्या जगण्यावर बहिणाबार्इंनी अगदी कटाक्ष टाकला असता आणि म्हणाल्या असत्या की मानसा, मानसा कधी व्हशीन मशीन? आपल्याकडे सगळ्या प्रकारचे कायदे आहेत, पण पगाराबाबत एकही सक्षम कायदा का असू नये? आज खासगी असुरक्षित क्षेत्रातला असंघटित कर्मचारी हा अत्यंत दीनवाणे आयुष्य जगत आहे. त्याचा पगार वेळेत होत नसल्यामुळे त्याला अपमानित जीवन जगावे लागते आहे. पगार वेळेत न होण्यामुळे त्याला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. विजेचे बिल ठरावीक मुदतीत नाही भरले तर त्याला दंड भरावा लागतो. अशा दंडाची रक्कम खासगी असंघटित क्षेत्रातील नोकरदारांना सातत्याने भरावी लागत आहे. या लाजिरवाण्या माणसाला मुकाट्याने काम करावे लागते आहे. ही अत्यंत दयनीय अवस्था आहे. आपणच माणसांनी यंत्रणा बनवली ती नियमाप्रमाणे वागते, पण माणसाला मात्र आपला नियम तोडता येत नाही. कारण मशीन बंद राहिले तर नंतर पुन्हा सुरू करताना थोडे कुरकुरेल. पण माणूस कुरकुरला तरी काम बंद पडणार नाही याची खात्रीच असल्यामुळे मालक लोकांकडून, भांडवलदारांकडून त्यांचे वेतन वेळेत देण्याबाबत जागरूक असत नाहीत. आज या शोषणाला आपला देश फार मोठ्या प्रमाणात तोंड देत आहे. कारण ठरावीक एका तारखेला ठरावीक इतक्या अंतराने पगार हे झालेच पाहिजेत अशा प्रकारे कोणताही कायदा या देशात नाही. पगार उशिरा झाले म्हणून मालकांना, कंपनीला दंड होण्याची किंवा ती संस्था बंद ठेवण्याची कोणतीही यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध नाही. आज पैसा नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतात. पण नोकरी करणारा लाचार कर्मचारी आत्महत्या करताना दिसत नाही. अनेक खासगी कंपन्यांमध्ये, खासगी क्षेत्रात पगार वेळेवर होत नाहीत. कारण आपल्याकडे तसा कोणताही कायदा नाही की, पगार वेळेवर झाला पाहिजे असा आग्रह त्या कायद्याने करता येईल. पोलिसांनाही वेळेत पगार मिळत नाहीत. शिक्षकांनाही वेळेत पगार मिळत नाहीत. खासगी क्षेत्रात तर मालकांना माहितीही नसते की, आपल्या कर्मचाºयांचे पगार झाले आहेत अथवा नाही. कारण मधले लोक कर्मचाºयांच्या प्रश्नांबाबत कधीच वरपर्यंत बोलत नाहीत. मालकांपर्यंत प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी पोहोचतील अशी कोणतीही यंत्रणा नसते. त्यांच्या भावना तिथपर्यंत पोहोचतच नाहीत, त्यामुळे सगळे काही आलबेल आहे असे त्यांना वाटत राहते. यामध्ये आज खासगी क्षेत्रातला कर्मचारी भरडला जात आहे. त्यामुळे माणसाला मशीन बनता येईल का? पगार मिळाला तरच तू जेव, खा-पी. पगार मिळाल्यावर पुन्हा सुरू हो, अशी काही शटडाऊनची यंत्रणा आहे का? म्हणून म्हणावेसे वाटते, मानसा मानसा कधी व्हशीन मशीन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: