गुढीपाडवा हा एक हिंदू सण असून, तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सर(शके ) विश्वावसुचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इ. गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे पावित्र्य आणि समृद्धीचे, विजय आणि मांगल्य यांचे प्रतीक आहे. गुढीपाडव्यापासूनच श्रीरामजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो. या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा इतर भारतीय प्रांतांत चेटी चांद, उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते.
काठीपूजा आणि गुढी
काठीपूजन तसेच उत्सवी काठी ही मानवी इतिहासात विविध समुदायात केली गेलेली एक प्राचीनतम परंपरा आहे. महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसºया दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात. महाभारतातच खिलपर्वात श्रीकृष्ण त्याच्या संवगड्यांना इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव (इंद्रोत्सव) बंद करण्याचा सल्ला देतो. महाभारतातल्या आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे.
ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे मानले जाते. श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला. शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण निर्माण करून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला, अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू केले.
हिंदू परंपरेत भगव्या ध्वजाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे असा ध्वज लावून, त्याचे आरोहण करून त्याचे पूजन करावे असा संकेत रूढ आहे. या दिवशी संवत्सर फल श्रवण करावे, असा संकेत रूढ आहे. संवत्सर फल म्हणजे काय? तर त्या पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होत असते, त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती. म्हणजे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते. संवत्सर फलात देशकालाचाही निर्देश असतो, म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते. वर्षप्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल, त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे मानले जाते. म्हणजे सुरू होणारे वर्ष हे जर रविवारी सुरू होत असेल तर सूर्य हा त्या वर्षाचा अधिपती आहे असे समजले जाते. अशी एकूण ६० संवत्सरे असतात.
साठ संवत्सरांची वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केली आहे. एका विभागणीत पाच संवत्सरांचे एक युग अशा पद्धतीने साठ संवत्सरांची बारा युगे मानली जातात. तसेच संवत्सर चक्रातील ८व्या भाव नावाच्या संवत्सरापासून विजय या २७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरांचा स्वामी पालनकर्ता विष्णू आहे. ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित केल्यामुळे, तिला पहिले पद मिळाल्याने ती प्रतिपदा म्हणून ओळखली जाते. या तिथीला युगादी तिथी असेही म्हणतात. या दिवशी पंचांग श्रवण म्हणजेच वर्षफल श्रवण करतात. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते. वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते. नक्षत्र श्रवणाने पापनाश होतो. योगश्रवणाने रोग जातो. करणश्रवणाने चिंतिलेले कार्य साधते. असे हे पंचांग श्रवणाचे उत्तम फल आहे. त्याच्या नित्य श्रवणाने गंगास्नानाचे फल मिळते असे म्हणतात. मध्य युगात हा उत्सव राजा अथवा त्याच्या अधिकाºयांकडून साजरा केला जात असे. सात गावांचा अधिपती असलेली व्यक्तीही हा उत्सव संपन्न करीत असे. आता आपण घरोघरी हा उत्सव साजरा करतो.
भारतात वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा, संवत्सर प्रारंभ करण्याच्या विविध रूढी असल्या तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. या शालिवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष ममत्व वाटण्याचे कारण असे की, हा शक सुरू करणारा राजा शालिवाहन हा एक महाराष्ट्रीयन होता. आपले पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळे इतर काही प्रांतांत कुठे कार्तिक प्रतिपदेला, तर कुठे मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानीत असले तरी शालिवाहन शक मात्र सर्वदूर रूढ आहे. या विषयातील जाणकारांना शालिवाहन शकाचा आधार आणि संदर्भ घ्यावा लागतो.
कृषी आधारित सण
नवे धान्य आल्यावर सुरू होणारा पहिला महिना आणि नव्या वर्षाचा पहिला दिवस म्हणून हजारो वर्षांपासून हा सण साजरा केला जातो. हा कृषी आधारित आपल्या व्यवस्थेचा संकेत देतो. यात वापरल्या जाणाºया वस्तूंचा शेतीशी संबंध आहे. पीक आल्यामुळे शेत जमिनी रिकाम्या झालेल्या असतात. त्या स्वच्छ करून पावसाळ्यात घेतल्या जाणाºया नव्या पिकाची तयारी सुरू करण्याचा हा दिवस. यासाठी पाडव्यापासून महिनाभर जमिनीची कामे केली जात. धान्य साठवण झाल्यामुळे त्यांचे कीडा-मुंगीपासून रक्षण करण्यासाठी कडुलिंबाचा वापर केला जातो. त्यासाठी गुढीला कडुलिंब वापरतात. त्याचा आपणही आहारात वापर करून आणि आंघोळीच्या पाण्यात टाकून निर्जंतुक व्हावे यासाठी कडुनिंबाचा पाला वापरतात. साखरेची गाढी म्हणजे शक्तिवर्धक ग्लुकोज असते. या दिवसात अशक्तपणा येतो. आजकाल सलाईन देतात, त्या काळात ती सोय नव्हती, तेव्हा अशक्तपणा दूर करणारी गाठी, खडीसाखर या पदार्थांना महत्त्व होते. बांबूचे बन साधारणपणे बांधाच्या कडेला असते. पीक लावल्यावर गुरेढोरे त्यात शिरू नयेत म्हणून बांबूचे कुंपण झाप तयार करून केले जाते. ते बांबू कापण्याचा हा दिवस. या बांबूच्या बनात साप असतात. ती बने मोकळी केल्याने साप शेत जमिनीत जातात. त्याचा परिणाम शेतातील धान्यांचा नाश करणारे उंदीर कमी होतात. या सगळ्या शेतीला पूरक वस्तूंचे जतन केले तर, आपण यशाचे कळस गाठू शकतो हे सांगणारा हा गुढीचा प्रतीकात्मक सण आहे. त्या गुढीचा संबंध हा कृषिक्षेत्राशी आहे. आपले सगळे सण हे शेतीच्या तंत्राशी निगडित आहेत. त्यानंतर अक्षय्य तृतियेला बीजरोपण होते. ग्रामीण भाषेत आकीतीला आळं अन् बेंदराला फळ अशी म्हण आहे. शेतीच्या नियोजनाप्रमाणे पाडव्याला जमीन मोकळी करून अक्षय्य तृतियेला वेल घातले की, बेंदराच्या सणाला म्हणजे आषाढ महिन्यातील तेराव्या दिवशी फळे येतात. हा कालावधी साधारण ७० दिवसांचा आहे. या सगळ्याची सुरुवात पाडव्यापासून होते, म्हणून पाडवा गोड, तर वर्ष गोड म्हणतात. नियोजन व्यवस्थित होते.
प्रफुल्ल फडके/ अन्वय
९१५२४४८०५५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा