शुक्रवार, २७ मे, २०२२

जागावाटपाचे धोरण


महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता कोणत्याही कारणांसाठी लांबविता येणार नाहीत. या निवडणुकांचा कार्यक्रम दोन आठवड्यांमध्ये जाहीर करा, या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने राज्यातील राजकारणाला सध्या जोर पकडला आहे. भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी नेत्यांची नुकतीच एक व्यापक बैठक झाली. या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढत या प्रकाराला राज्य सरकार जबाबदार असल्याचे जाहीर केले. त्याचवेळी आरक्षण असेल किंवा नसेल, तरी भाजप २७ टक्के तिकिटे ओबीसींना देणार असल्याचे जाहीर केले. हाच विचार प्रत्येक पक्षाने केला, तर ओबीसींना खºया अर्थाने न्याय मिळेल. ओबीसी उमेदवाराच्या विरोधात ओबीसी उमेदवारच देण्याचा विचार प्रत्येक पक्षाने केला तर कोणीही निवडून आले, तरी विजय ओबीसींचाच होईल. इम्पिरिकल डेटा, ट्रीपल फिल्टर या तांत्रिक गोष्टीत अडकलेल्या ओबीसी आरक्षणाबाहेर काढण्यासाठी सर्वांनी भारतीय जनता पक्षाप्रमाणे धोरण आखले पाहिजे.


या आरक्षणाच्या लटकत्या निर्णयामुळे राज्यातील कित्येक महापालिकांच्या निवडणुका लांबल्या आहेत. यात मुंबई महापालिकाही आहे. कोरोनाची आपदा आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांसाठी इतर मागासवर्गासाठीचे आरक्षण यामुळे मुदत संपूनही राज्यातील शेकडो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळापत्रकानुसार होऊ शकलेल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ओबीसी या प्रवर्गाच्या आरक्षणाला केवळ धक्काच लागला नसून धोकाही निर्माण झाला आहे; पण त्याचे राजकारण न करता त्यावर मार्ग काढता येऊ शकतो, अशी सकारात्मकता असणे गरजेचे आहे. प्रत्येक पक्षाने तिकीट वाटपात ओबीसींना वाटा दिला, तर आपोआपच हा प्रश्न निकाली निघू शकतो. मतदारसंघच कशाला उमेदवार ओबीसी दिला, तर आपोआप प्रत्येकाला न्याय मिळेल. अशी प्रकरणे न्यायप्रविष्ठ असताना, त्यातील दिरंगाईचा फटका ओबीसींना बसू नये यासाठी प्रत्येक पक्षाने जागावाटपाचे धोरण योग्य आखावे, हेच उत्तम.

कोणत्याही कारणासाठी किंवा मतदारसंघांची फेररचना झालेली नाही, यासाठी या निवडणुका अनिश्चित काळ प्रलंबित ठेवता येणार नाहीत, हे न्यायालयाचे निरीक्षण योग्य आहे. महाराष्ट्र सरकारने अशी वेळ येऊ शकते, याचा आधीच अंदाज बांधणे आवश्यक होते. राज्य सरकारने आपल्या अधिकारात राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी कायद्यातील बदल प्रस्तावित करणेही चूक होते. ते आता या निकालाने निरर्थकच ठरले आहे. वेळकाढूपणाचे धोरण या परिस्थितीला कारणीभूत ठरले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणातील त्रुटींसंबंधीचा कल आधीपासूनच लक्षात यावा, असा आहे. राज्य सरकारने दिलेला ओबीसींच्या संख्येबद्दलचा तपशील सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेला नाही. त्याबाबत, अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत. त्यातच, राज्य सरकारने ओबीसी आरक्षण लागू झालेले नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा आपल्याकडे घेतलेला अधिकार या निकालाने गैरलागू ठरला आहे. विधिमंडळात असा प्रस्ताव आल्यानंतर काही दिवसांतच सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे सन २०२० मध्ये मतदारसंघांची रचना करण्यात आली होती; त्यानुसार निवडणुकांचा कार्यक्रम आता जाहीर करावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या निवडणूक आयोगाबाबतही फारसे चांगले उद्गार काढले नाहीत. आता १४ महापालिका आणि जवळपास २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या तयारीला वेगाने लागणे, एवढेच आयोगाच्या हातात राहिले आहे. त्यात टाळाटाळ करता येणार नाही.


न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुकांची प्रक्रिया दोन आठवड्यांत सुरू झाली, तर मुंबईत ऐन पावसाळ्यात मतदान घेण्याची वेळ येऊ शकते. मुंबईतील पावसाळा हा जनजीवन पुरते विस्कळीत करू शकतो. त्यामुळे, आता या मुद्याची दखल सर्वोच्च न्यायालय घेते का, हे पाहावे लागेल. मात्र, इतर महापालिका, जिल्हा परिषदा व इतरही स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका आता लांबण्याचे काही कारण दिसत नाही. या निवडणुका लागणार हे गृहीत धरून राजकीय पक्षांनी तिकीट वाटपात आरक्षण दिले, तर हा मुद्दा सहज सुटू शकतो. मग २७ टक्केच काय जास्ती आरक्षणही मिळाल्यासारखे असेल. भारतीय जनता पक्षाने जर २७ टक्के आरक्षण ओबीसींसाठी देण्याचे जाहीर केले आहे, तर त्याचे अनुकरण सर्व पक्षांनी करायला काय हरकत आहे? फक्त भाजप हा राज्यातील मोठा पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी कशाप्रकारे उमेदवार दिले आहेत, कोणत्या मतदारसंघात ओबीसी उमेदवार दिले आहेत, त्याच भागात ओबीसी उमेदवार भाजप विरोधी पक्षांनी दिले, तर कोणीही निवडून आला तरी ओबीसीच विजयी होतील. पण भाजपने २७ टक्के तिकिटे दिली आणि अन्य पक्षांनीही दिली; पण वेगवेगळ्या मतदारसंघांत दिली, तर अनेक मतदारसंघात ओबीसी विरुद्ध खुला मतदारसंघ अशा लडती होतील. असा प्रकार झाला, तर न्याय मिळेलच असे नाही. ज्या मतदारसंघात ओबीसीची मते जास्त असतील त्या मतदारसंघात ओबीसींना उमेदवारी दिली जाईल, याची खबरदारी सर्व पक्षांनी घेतली, तर न्यायालयात झालेली कुचंबणा यातून दूर होईल.

या निकालामुळे महाराष्ट्रात एका अर्थाने छोटीशी सार्वत्रिक निवडणूकच होणार आहे. गेल्या काही दिवसांत झपाट्याने तापलेले राजकीय वातावरण आणि सर्वोच्च न्यायालयाचा आलेला हा निकाल; हा एक योगायोगच म्हणावा लागेल. याचे कारण, आता यापुढे राजकीय वातावरण शांत होणे सोडा; ते दिवसेंदिवस तापत जाण्याची शक्यता आहे. त्यासाठीचे मुद्दे एव्हाना प्रचारात आलेच आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेकदा राजकीय सीमा धूसर असतात. अनेक पक्षनिरपेक्ष गटातटांच्या आघाड्या होऊ शकतात. सध्याचे वातावरण मात्र तसे नाही. सध्या तिरस्काराची भावना प्रत्येक पक्षात आहे. ही भावना निवडणुकांना बाधक आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येक पक्षाने ओबीसी तिकीट वाटपाचे समान धोरण आखले, तर हा प्रश्न निकाली निघेल.

समाजभान


भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करतानाच ही परिस्थिती सुधारण्यासाठी १३ वर्षे लागतील, असा अंदाज मांडला. म्हणजे अर्थव्यवस्था आपली वनवासात गेलेली आहे आणि सगळे सुरळीत होण्यासाठी एक तप वाट पाहावी लागणार आहे हे अतिशय चिंताजनक आहे. खरंतर गेल्या ७५ वर्षांत नव्हते एवढे देशावरील कर्ज वाढले आहे. बेरोजगारी पुन्हा ७.८३ टक्क्यांवर पोहोचली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी समाजभान राखण्याची गरज आहे.


कोरोना नामक विषाणूने २०२०च्या मार्चपासून जगास मोठ्या प्रमाणात विळखा घातला. भारतही त्यातून सुटला नाही. या साथीमुळे जगभरातले सर्व व्यवहार बंद पडले. या एका वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले. ते भरून येण्यास आणखी किमान १२ ते १३ वर्षे लागतील, असा अंदाज आहे. रिझर्व्ह बँकेने एक अहवाल प्रसिद्ध केला, त्यात ही माहिती दिली आहे. देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने पूर्वपदावर येत आहे, हा केंद्र सरकारचा दावा असला, तरी ते पूर्णपणे खरे नाही हे त्यातून स्पष्ट होते. २०२०-२१मध्ये विकास दर उणे ६.६ टक्के राहिला. त्या पाश्‍र्वभूमीवर २१-२२चा विकास दर ८.९ टक्के होता. चालू वर्षी (२२-२३) हा दर ७.२ टक्के राहील असे गृहित धरले व आगामी काळात तो ७.५ टक्के असेल अशी अपेक्षा केली, तरीही कोरोनामुळे झालेले नुकसान भरून येण्यास २०३४-३५ हे वर्ष उजाडेल असे बँकेचे मत आहे. हा काळ मोठा आहे, देशाची अर्थव्यवस्था कोरोनाच्या साथीमुळे नाजूक बनल्याचे अहवालाने अधोरेखित केले आहे. आजच्या गतिमान युगात १२ वर्षांचा काळ हा फार मोठा काळ आहे. दर दोन ते तीन वर्षांत नवीन व्हर्जन येते आहे, डिजिटल युग आहे. आज आलेले उत्पादन केव्हा कालबाह्य होईल हे सांगता येत नाही. अशा काळात १२ ते १३ वर्षांचा कालावधी खूपच मोठा आहे. या अहवालात सरकारवरील वाढत्या कर्जाबद्दल मात्र चिंता व्यक्त केली आहे. या अहवालावर सरकारकडून प्रतिक्रिया आलेली नाही. त्यावर विरोधकांनीही फारशी चर्चा केली नाही. पण ही वस्तुस्थिती सर्वांना स्वीकारायला लागणार आहे. त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. कोरोनाकडे आपण युद्ध म्हणून पाहिले आहे, तर या युद्धाचे दूरगामी परिणाम आता सोसावे लागणार आहेत हे नक्की झाले आहे.

खरंतर कोरोना हे एक निमित्त आहे. त्याच्या आधीपासूनच याला सुरुवात झाली असावी. म्हणजे कोरोना आलाच नसता तर आपण एकदम खूप विकसीत झालो असतो असे कोणी छाती ठोकपणे सांगू शकत नाही. कोरोनाच्या साथीच्या आधी २०१७-१८पासून देशाचा विकासदर खालावत होता. तो मार्च २०२० अखेरीस अवघा ४ टक्के झाला, याचीही दखल रिझर्व्ह बँकेच्या अहवालात घेतली आहे. याच काळात श्रमबाजारपेठेत सुस्ती आली होती अशा आशयाची नोंद अहवालात आहे. त्याचा अर्थ या काळात बेरोजगारी वाढत होती. रोजगाराच्या संधी निर्माण केल्या गेल्या नाहीत. साहजिकच या काळातच वस्तू व उत्पादनांचा घरगुती खपही कमी झाला. खासगी खप हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे अहवालात म्हटले आहे. अर्थव्यवस्था दुर्बल बनत असतानाच कोरोनाच्या साथीचा आघात झाला. साथीच्या पहिल्या लाटेत बेरोजगारीने उच्चांक गाठला, कामगारांचा सहभागही कमी झाला असे अहवालात म्हटले आहे. अर्थव्यवस्थेने नीचांक पाहिला; पण त्या तुलनेत तिने लवकर उसळीही घेतली; पण ही सुधारणा असमान होती.


हॉटेल व अगत्य क्षेत्र, व्यापार, दळण-वळण, वाहतूक व अन्य काही सेवाही कामगार अधिष्ठित आहेत, पण त्यांची स्थिती बिकटच राहिली. कारण मागोमाग दुसरी लाट आली. बड्या कंपन्यांना फायदा झाला; पण दुर्बल कंपन्यांना तोटा झाला व काहींच्या बाबतीत तो वाढलाही. हे चित्र संघटित क्षेत्राचे आहे, असंघटित क्षेत्राची दुरावस्था अजून कायम आहे. या काळात सर्वाधिक फायदा हा औषध उत्पादक कंपन्या, मेडिकल, फार्मास्युटीकल कंपन्या आणि वैद्यक व्यवसायाला झाला. त्यामुळे एकीकडून आर्थिक शोषण आणि एकीकडे प्रचंड पोषण अशी विषमता या काळात वाढली. याशिवाय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राचे झालेले नुकसान प्रचंड आहे. हजारो व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या, त्यापैकी बहुसंख्य याच क्षेत्रातील होते. बड्या उद्योगपतीने आत्महत्या केल्याचे उदाहरण नाही. सध्या नोकरभरती मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र हे रोजगार माहिती तंत्रज्ञान, इंटरनेट आधारित सेवा या क्षेत्रात आहेत. अकुशल किंवा अर्धकुशल श्रमिकांना रोजगारासाठी वणवण करावी लागत आहे.

रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या अहवालातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारवरील कर्ज हा आहे. एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) ६६ टक्के ही कर्जाची उच्च पातळी मानली जाते. केंद्र सरकारने आपल्या वरील कर्ज या पातळीच्या खाली आणावे, तेही आगामी पाच वर्षांत; असे बँकेने म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकार १४ लाख ९५ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेणार आहेत. ढोबळ आर्थिक स्थिती चांगली राहिली तरीही पाच वर्षांत कर्जाचे प्रमाण ७५ टक्क्यांखाली येणार नाही, असे रिझर्व्ह बँकेचेच मत आहे. आरोग्य व शिक्षणावरील खर्च वाढवून कामगारांचा दर्जा वाढवण्याची सूचना बँकेने सरकारला केली आहे, पण सध्याचे सामाजिक वातावरण पाहता या सुधारणेत हे गलिच्छ राजकारण बाधा आणू शकते. धार्मिक विद्वेष वाढवून सत्ता हस्तगत करणे हा एककलमी कार्यक्रम राजकीय पक्षांचा आहे असे दिसते. मग कोरोनाकाळातील नुकसान भरून येणार कसे? त्यामुळे अर्थव्यवस्थेचे होत असलेले नुकसान भरून काढण्यासाठी सामाजिक सलोखा, शांतता आणि एकोपा निर्माण होणे याला प्राधान्य दिले पाहिजे. वैयक्तिक अहंकार, इगो बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्षांनी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी पुढे आले पाहिजे.

काळू-बाळूचा काळ


मराठी रंगभूमीवर लोकनाट्य तमाशा मंडळांनी आपली फार मोठी छाप पाडलेली आहे. त्यात काळू-बाळू या जोडीचा काळ हा एक अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. रघुवीर खेडकर, कांताबाई सातारकर, विठाभाऊ नारायणगावकर आणि काळू-बाळू हे एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रात धूमाकूळ घालत होते. प्रेक्षकांनी त्यांना चांगलेच डोक्यावर घेतले होते. यातील काळू-बाळू ही जोडगोळी अतिशय जबरदस्त होती. उपजत असलेली विनोद बुद्धी, निसर्गाने दिलेली जुळ्या भावंडांची किमया याचा योग्य वापर करत संपूर्ण महाराष्ट्राला काळू-बाळूंनी भारावून टाकले होते.


काळू आणि बाळू दोन जुळे भाऊ होते. काळू म्हणजे लहू संभाजी खाडे तर बाळू म्हणजे अंकुश संभाजी खाडे. वडिलोपार्जित तमाशाची परंपरा असणाºया संभाजी आणि शेवंताबाई कवलापूरकर या दाम्पत्यापोटी कवलापूर, जि. सांगली येथे १६ मे १९३३ रोजी या दोघांचा जन्म झाला. आधी काळूचा आणि मग बाळूचा जन्म झाला. काळू-बाळू सहा वर्षांचे असताना वडिलांचे अर्धांगवायूच्या झटक्याने निधन झाले. शिवा-संभाचा तमाशा त्या काळी वर्तमान काळातील घडामोडींवर भाष्य करणारा एकमेव तमाशा होता. सामाजिक समस्यांना वाचा फोडणारा हा तमाशा संभाजी खाडे अचानक निधन पावल्याने मोडकळीस आला. पुढे तमाशाचा फड कसा चालवायचा हा पेच निर्माण झाला. तमाशा बंद पडण्याच्या मार्गावर असताना गावातील लोकांच्या मार्गदर्शनामुळे शिवाने तमाशाचा बोर्ड उभा केला. काळू-बाळू १५-१६ वर्षांचे असताना वडिलांची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी तमाशा सुरू करायचा असा निश्चय केला. चुलती दुर्गाबार्इंच्या मदतीने तमाशा उभा करण्याचा प्रयत्न सुरू केला. हलगी, ढोलकी, झांज, तुणतुणे ही वाद्ये आणि वेशभूषा घेण्यासाठी जनावरांसाठी आणलेले वैरण विकून काळू-बाळूला दुर्गाबार्इंनी मदत केली. कवलापुरातील मुले एकत्र करून तमाशाच्या तालमी सुरू केल्या. आणि त्यांच्या या कष्टाला यश आले. तमाशाचा फड उभे करणे सोपे काम नाही. पण हे आव्हान त्यांनी जिद्दीने पेलले. अशा लोकांच्या मग कथा होऊ न जातात इतकी त्यांची कामगिरी सुंदर बनत जाते.

खरंतर तमाशाचा आत्मा म्हणजे सोंगाड्या सरदार आणि नाच्या. यांच्याशिवाय तमाशा पूर्णच होत नसे. तमाशात काम करणारी माणसे तर मिळाली, पण नाच्या आणि नाचे काही मिळेना, तेव्हा बाळूने तमाशात नाचकाम करण्याचा निर्णय घेतला. कागलवाडी येथील शकुंतला या जोगतीणीची मुलगी नायकीण म्हणून मिळाली. शकुंतलेबरोबर काळू-बाळूचा तमाशा उभा राहिला. पुढे शामराव, रामराव, धृपदा, मारूती, भीमराव हे कलावंत काळू-बाळूला येऊन मिळाले. काळू-बाळूने तमाशाची बांधणी एकदम जबरदस्त केली होती. सामाजिक भान असलेला तमाशा कलावंत भाऊ फक्कड यांनी लिहिलेला प्रेमाची फाशी हा वग सादर करायचा ठरवला. शामरावाने सूत्र हाती घेऊन सर्व कलावंतांना कथानक समजावून सांगितले. पात्रांची वाटणी केली आणि काळू-बाळूचा पहिला वग तमाशाच्या बोर्डावर उभा राहिला.


काळू-बाळू दोघेही जुळे असल्यामुळे कोण काळू की कोण बाळू हे ओळखणे कठीण होते. दोघांचा चेहरा, रंगरूप आकारमान तंतोतत जुळणारे. एकाला लपवावे आणि दुसºयाला उभे करावे असे हे जुळे भाऊ सगळीकडे नावलौकिक मिळवत होते. त्यांच्या नावाचा गवगवा हा सुप्रसिद्ध ज्येष्ठ तमाशा कलावंत बाबुराव पुणेकर यांच्यापर्यंत पोहचला. वगसम्राट बाबुराव पुणेकरांना काळू-बाळूच्या कीर्तीची माहिती झाल्यानंतर काळू-बाळूचा तमाशा पाहण्याची इच्छा प्रकट केली आणि आर्यभूषण थिएटरमध्ये एक खेळ आयोजित केला. काळू-बाळू पुण्याला प्रथमच आले होते. त्यांनी त्या रात्री जहरी प्याला हा वग सादर केला.

जवळजवळ १५ वगनाट्य काळू-बाळू तमाशा मंडळाने सादर केली. त्यात कोर्टात मला नेऊ नका, भाऊ भावाचा खुण कुणाचा, इंदिरा ही काय भानगड, भिल्लाची टोळी, प्रेमाची फाशी, दगलबाज मित्र, सत्ता द्यावी सुनेच्या हाती, रक्तात रंगली दिवाळी, इंडियन पिनल कोड कलम ३०२, तुझ्यासाठी वेडा झालो, शेराला भेटला सवाशेर, जिवंत हाडाचा शैतान, आणि जहरी प्याला इत्यादी सामाजिक, राजकीय घडामोडींवर भाष्य करणारी वगनाट्य सादर केली. या दोघांचे टायमिंग जबरदस्त होते. अंगातील लवचिकपणा आणि हजरजबाबीपणाही वाखाणण्यासारखा होता.


त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. कला महोत्सव हैदराबाद, आदिवासी लोककला परिषद भोपाळ, अखिल भारतीय नाट्यसंमेलन, कलागौरव पुरस्कार पुणे, लोकशाहिर भाऊ फक्कड स्मृती पुरस्कार सातारा, कलेचे शिलेदार पुरस्कार सांगली आणि भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पुणे महानगरपालिकेचा पठ्ठे बापुराव पुरस्कार, इत्यादी पुरस्कारांनी या जोडगोळीला सन्मानित केले. या दोघांचे वैशिष्ट्य हे होते की आजवरचे सर्व तमाशे चालले ते त्यातील नृत्यांगना, तमाशातील महिला कलावंत कोण आहे यावर. पण या दोन भावांच्या नावावर यांचा तमाशा चालत होता हे विशेष. जत्रेतून तमाशा होण्याची परंपरा आपल्याकडे असली, तरी तिकीट लावून हाऊसफुल्ल शो करण्याची ताकद या भावांमध्ये होती. आजही त्यांच्या लोकनाट्य तमाशाचे प्रयोग जुन्या प्रेक्षकांच्या चांगलेच स्मरणात आहेत.

- प्रफुल्ल फडके/तिसरी घंटा


9152448055\\

उपग्रह


             खगोलशास्त्र, अंतराळविज्ञान, ज्योतिष, ग्रह तारे याबाबत माणसाला नेहमीच आकर्षण असते. उत्सुकता असते. त्यामध्येकाहीतरी अदभूत आहे असेही बºयाचवेळा वाटते. आकाशगंगा, सूर्यमाला ग्रह, उपग्रह, तारे, तारका हेनेहमीच आपले लक्ष वेधून घेत असतात. अशापैकीच एक आकर्षण असतेतेउपग्रहाचे.


ग्रहाभोवती फिरणारा खस्थ पदार्थ म्हणजे उपग्रह . सूर्यमालेत निरनिराळ्या ग्रहांना किती उपग्रह आहेत याचे बरेच संशोधन झाले आहे. हे संशोधन सतत चालत असते. आपल्या पृथ्वीला एक उपग्रह आहे, त्याला आपण चंद्र म्हणतो. मंगळ आणि वरुण (नेपच्युन) यांना प्रत्येकी दोन उपग्रह आहेत, प्रजापतीला (यूरेनसला) पाच, शनीला दहा आणि गुरूला एकूण बारा उपग्रह आहेत. बुध, शुक्र व कुबेर (प्‍लूटो) यांना एकही उपग्रह नाही. सूर्यकुलात एकूण बत्तीस उपग्रह आहेत.

            ब्रह्मांडाची निर्मिती किंवा पौराणिक मालिका आपण पाहतो तेंव्हा हे बरेच गूढ वाटते. त्यामुळे अनाकलनीय वाटून त्यावर अभ्यास करण्याचा नादही आपण सोडून देतो. पण काही संशोधक, अभ्यासक, गणिती याचा सातत्याने अभ्यास करत असतात. लक्षावधी वर्षांपूर्वी, अत्यंत तप्त अशा वायुरूप वैश्व-वस्तूंच्या महाप्रचंड ढगापासून तारे आणि नंतर क्रमाक्रमाने प्राथमिक अवस्थेतील काही प्रचंड भाग निर्माण झाले हेच ग्रह झाले. या प्रचंड वायुराशीस चक्राकार गती होती, त्यांना अक्षीय (आसाभोवतील) परिभ्रमण आणि कक्षीय परिभ्रमण अशा दोन्ही गती होत्या. कालांतराने यातील उष्णता कमी कमी होऊन ते गोठू लागले. या अवस्थेमध्ये त्यांचे वेगवेगळ्या काळी आणखी वेगवेगळे खंड किंवा तुकडे म्हणजे शकले बाहेर फेकली गेली. ही शकले या गोठत चाललेल्या जनक वायुराशीभोवती वेगवेगळ्या अंतरांच्या कक्षांमधून फिरू लागली. हेच ते उपग्रह बनले. चक्राकार गतीमुळे उडालेली शकले या वायुराशीच्या फुगीर भागातूनच बाहेर पडली असावीत, त्यामुळेच बहुतेक उपग्रह जनक ग्रहाच्या विषुववृत्ताशी अत्यल्प कल ठेवून त्याच्या कक्षीय परिभ्रमणाच्या दिशेने त्याच्याभोवती भ्रमण करीत असलेले दिसतात.


उपग्रहाच्या कक्षेचा बृहदक्ष (लंबवतुर्ळाकार कक्षेच्या अक्षांपैकी सर्वांत मोठा अक्ष) आणि त्याचा प्रदक्षिणाकाल माहीत झाल्यास ग्रहाचे वस्तुमान चटकन काढता येते. उपग्रह हा ग्रहाभोवती फिरत असतो. पण ग्रह आणि त्याचे उपग्रह दोघेही मिळून सूयार्भोवती फिरतात. ग्रह आणि उपग्रह हे दोघेही त्यांच्या वस्तुमानाच्या समाईक मध्याभोवती फिरत असतात. ग्रहाच्या मानाने उपग्रहांचे वस्तुमान पुष्कळच कमी असल्यामुळे हा समाईक वस्तुमध्ये ग्रहाच्या पोटातच असतो. काही उपग्रह जनक ग्रहाच्या भ्रमणाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने आणि त्याच्या विषुववृत्त पातळीशी बराच मोठा कोन करून फिरत असलेले असेही आढळतात. या उपग्रहांना अनियमित उपग्रह म्हणतात. जनक ग्रहातून बाहेर पडल्यावर विशिष्ट परिस्थितीमुळे काही शकले जनक ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेबाहेर फेकली गेल्यामुळे ती सूयार्भोवती फिरू लागली व त्या कक्षेतूनही सुटल्यामुळे परत जनक ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत आली व त्या कक्षेत शिरतानाच्या विशिष्ट परिस्थितीमुळे ती अशा वक्र गतीने फिरू लागली असेवैज्ञानिक खुलासेआहेत. पण त्यावर अजूनही संशोधन सुरु आहे.

पृथ्वी आणि चंद्र या ग्रहोपग्रहाच्या जोडीचे एक वैशिष्ट्य आहे. इतर ग्रहांच्या उपग्रहांत आकाराने मोठे असे पाच उपग्रह आहेत व त्यातले तीन वस्तुमानानेही मोठे आहेत, पण त्यांच्या जनक ग्रहाशी त्यांची तुलना करता ते किरकोळ वाटतात. तसे पृथ्वी आणि चंद्राचे नाही. चंद्र आणि पृथ्वी यांच्या व्यासांचे गुणोत्तर १ : ४ आहे.  गुरूचा सर्वांत मोठा उपग्रह व गुरू यांच्या व्यासांचे गुणोत्तर सु. १ : २४ आणि ढोबळ मानाने हेच गुणोत्तर शनीचा सर्वांत मोठा उपग्रह व शनी यांच्या व्यासांचे आहे. यामुळेच भरती ओहोटीसारखा चंद्राचा प्रभाव पृथ्वीवर दिसतो.


गुरूच्या सात उपग्रहांना नावे दिलेली नाहीत. मार्सडेन नावाच्या ब्रिटिश ज्योतिर्विदांनी हेस्तिआ, हेरा, पोझाइडॉन, हेड्स, डिमिटर, पॅन आणि अड्रॅस्तिआ ही नावे ६ ते १२ या उपग्रहांना सुचविली आहेत. पण ती रूढ झालेली नाहीत. शनीला दहावा उपग्रह (यानुस) असल्याचा शोध लागला आहे परंतु त्याची आकडेवारी अजून उपलब्ध नाही. गुरूचे आयो, यूरोपा, गॅनिमिड व शनीचा टायटन या उपग्रहांना विरळ वातावरण आहे.

बहुतेक सर्व उपग्रहांचे कक्षीय परिभ्रमण मूळ ग्रहांच्याच दिशेनेअसते. याला अपसव्य म्हणजे घड्याळाच्या काट्यांच्या हालचालीच्या विरुद्ध दिशेने म्हणतात. असे असले, तरी गुरूचे ८, ९, ११ व १२ या क्रमांकांचे उपग्रह तसेच शनीचा फीबी, मिरांडा सोडून प्रजापतीचे सर्व उपग्रह व वरुणाचा ट्रायटन हे उलट दिशेने फिरतात. असे हे अदभूत आणि गूढ रम्य खगोलशास्त्रीय दर्शन आहे.


जन्माला आल्यापासून माणूस आकाशाकडे पहात असतो. लहान मूलही रडायला लागल्यावर त्याला चंद्र दाखवला की ते शांत होते. ग्रह, उपग्रह आणि तारकापुंजांशी आपलेनैसर्गिक नाते आहे. त्यामुळे त्याचे आकर्षण हे कायमच असते. अथांग, अमर्यादीत अशा या आकाशातील विज्ञानाचे कुतुहल म्हणूनच कायम आपल्याला असते.

प्रफुल्ल फडके/ संस्कृती


9152448055

पटावरील खेळ


             उन्हाळ्याची सुट्टी असली की घराघरात बैठे खेळ खेळले जातात. उन्हात मुलांनी बाहेर पडू नये म्हणून खेळलेजाणारे हे पारंपारीक खेळ अनेक दशके नव्हे तर अनेक शतके आपल्याकडे खेळले जात आहेत. काही खेळ तर पुराण काळातही वर्णन केलेगेले आहेत. विविध आकार-प्रकारांच्या पटांवर सोंगट्या, फासे तसेच इतर साधनांनी खैळण्यात येणारे बैठे खेळ. प्राचीन काळापासून रूढ असलेल्या या खेळांत अनेक प्रकारच्या सुधारणा होत होत आजचे खेळ तयार झाले आहेत. आजकाल हे खेळ गेम म्हणून मोबाईलमध्येही खेळता येतात. अनेकजण लोकलमध्येही ते खेळत असतात. अशाच काही खेळांवरुन नजर मारली तर आपल्या संस्कृतीचे दर्शन घडेल.


प्राचीन काळी जमिनीवरच पट आखून आणि हाडे, गोट्या, फळांची कवचे वापरून असे खेळ खेळत. अत्यंत प्राचीन खेळांचे पट सर लेनर्ड वुली यांना अर येथील उत्खननात (इ. स. पू. सु. ३००० वर्षे), राजांच्या थडग्यात आढळले. पटावरील खेळाचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे नशिबाच्या भरवशावर आणि कवड्या फाशांच्या आकड्यांवर अबलबूंन असणारे क्रीडाप्रकार आणि दुसरा म्हणचे बौद्धिक कौशल्याला वाव असलेले क्रीडाप्रकार. बुद्धिचातुर्यावर अधिष्ठित असलेल्या खेळांमध्ये खेळाडूचा चाणाक्षपणा, दूरदर्शित्व, स्मरणशक्ती व कौशल्य हे गुणच जिंकण्याच्या दृष्टीने निर्णायक ठरतात.

नशिबावर हवाला ठेवणारे, सोंगट्यांच्या खेळांचे अनेक प्रकार आहेत. बॅकगॅमॉन हा सोंगट्यांचा एक प्राचीन खेळ आहे. तो इंग्लंडमध्ये चौदाव्या शतकातही खेळत. या खेळाचे मूळ असून तो ग्रीक लोकांमध्ये अगोदर प्रचलित होता व त्यांच्यापासूनच रोमन लोक तो शिकले. साप-शिडी सारख्या सर्वपरिचित खेळात क्रमांक घातलेल्या चौकोनांतून सर्वांत प्रथम अंतिम चौकोन गाठावयाची खेळाडूची खटपट चालू असते. त्यात शिड्यांनी व सापांनी काही मार्ग दाखविलेले असतात. या खेळाच्या पटास मोक्षपट असेही म्हणतात. शिडीचा मार्ग उत्कषार्चा, तर सापाचा अधोगतीचा असतो. सापाचे तोंड दर्शविलेल्या चौकौनात सोंगटी गैली, तर ती एकदम सापाच्या शेपटीपर्यंत मागे ओढली जाते. सोंगटी शिडीच्या पायथ्याजवळ पोहोचली, तर ती शिडीचे टोक गाठते. घोड्यांच्या शर्यतीच्या पटावर शर्यतीच्या मैदानाचा देखावा काढलेला असतो व त्यात दंडशासनाची आणि बक्षिसांची काही ठिकाणे दाखविलेली असतात. संत ज्ञानेश्वरांनी उत्कर्ष आणि अधोगतीच्या खेळाची रचना आपल्या सोपान आणि मुक्ताबाई या भावंडांसाठी केल्याचेकाही ठिकाणी उल्लेख आहेत.


प्राचीन काळी भारतात पटावरील अनेक खेळ प्रचलित होते. सोंगट्या, कवड्या, फासे इ. साधनांनी खेळावयाच्या द्यूत, चतुरंग (बुद्धिबळाचा प्राचीन खेळ) यांसारख्या अनेक क्रीडाप्रकारांचे निर्देश प्राचीन वाङ्‌मयात आढळतात. मोगलकाळात भारतात पचीसी हा सोंगट्यांचा खेळ फार लोकप्रिय होता. अकबर बादशाहाला ह्या खेळाचा इतका षोक होता, की त्याने आपल्या फतेपूर शीक्रीच्या प्रासादाच्या प्रांगणाच्या एका भागात सोंगट्यांच्या पटासारखी रचना केली होती. जनानखान्यातील सोळा दासी विविध चिन्हदर्शक विविध रंगांचे कपडे परिधान करून सोंगट्यांच्या जागी उभ्या राहत व खेळ चालू असता पडलेल्या दानानुसार हालचाली करीत. १८८० च्या सुमारास हा खेळ इंग्लंडमध्ये नेण्यात आला व तिथे त्यास प्रचलित ल्यूडो या आधुनिक इंग्लिश खेळाचे रूप लाभले. ल्यूडो हा खेळ आजही इंग्लंडमध्ये लोकप्रिय असून, ख्रिसमसच्या वेळी मुले तो खेळतात. आजकाल लोकलमध्ये हा खेळ खेळत आपला प्रवासातील वेळ घालवताना आपण पाहतो.

एकाधिकार (मोनॉपली) हा खेळ बराच गुंतागुंतीचा आहे. त्यात एक खेलाडू सावकार बनतो आणि प्रथम तो सर्व सवंगड्यांना सारखे पैसे वाटतो. प्रत्येक खेळाडूचे चिन्ह ठरवितात. पटावर शहरातील विविध वस्तींत विखुरलेल्या निरनिराळ्या किंमतींच्या वास्तू दर्शविलेल्या असतात. खेळाडूची सोंगटी त्या ठिकाणी पोहोचली, तर त्या खेळाडूला त्या वास्तूची किंमत सावकाराला मोजून ती वास्तू स्वत:च्या नावावर करता येते. दुसरा खेळाडू त्या वास्तूत पोहोचला, तर त्याला त्या जागेचे ठरलेले भाडे द्यावे लागते. या वास्तूंचे संचही ठरलेले असतात. एखादा खेळाडू संपूर्ण संचाचा मालक झाला, तर त्याला मूळ वास्तूत नव्या वास्तूंची, त्यांचे सावकाराला मोल देऊन भर घालता येते. तसेच चार घरांचे उपाहरगृहात रूपांतर करता येते व त्याला जास्त भाडे येते. डाव अंगावर आल्यास खेळाडूला आपल्या वास्तू विकूनही टाकता येतात. इतकेच नव्हे, तर त्या गहाणही टाकता येतात. अशा वेळी त्या वास्तूंचे मूल्य सावकाराकडून घेऊन त्यातून देणी भागविता आली, तरी वास्तूंवर मिळणारे उत्पन्नही कमी होते. पटावरील काही जागांवर लॉटरीसारखे लाभ होतात. तर काही ठिकाणी वाण्याचे बिल देणे अशासारखे स्मरण केलेले असते व ते देणे भागवावे लागते. एकच खेळाडू सधन राहिल्यावर हा खेळ संपतो. यास व्यापार हे रूढ नाव आहे.


ज्या खेळांत बौद्धिक कौशल्य दाखवावयास वाव असतो, अशा खेळांत बुद्धिबळाचा खेळ अत्यंत लोकप्रिय आहे. या खेळात प्रतिपक्षाची हत्ती, घोडा, उंट, वजीर, प्यादी अशी विविध मोहरी आपल्या मोहºयांनी मारता येतात व बुद्धीच्या जोरावर अखेर राजावर मात करता येते. मॉरेलिस हा खेळ चौदाव्या शतकात लोकप्रिय होता. या खेळाचा उल्लेख शेक्सपिअरच्या मिडसमर नाइट्स ड्रीम या नाटकात आढळतो. पेगॉटी हा आधुनिक खेळ साधासुदा आहे. चार खेळाडू आपापले रंगीत ध्वज पटावर रोवण्याचा प्रयत्न आपापल्या पाळीप्रमाणे करतात. ज्या खेळाडूचे पाच ध्वज एका रांगेत प्रथम येतात, तो डाव जिंकतो. पटावरील अनेक प्रकाराच्या खेळांत प्रतिपक्षाच्या जागेत आक्रमण करण्यासाठी योजनापूर्वक हालचाली कराव्या लागतात. प्राचीन काळापासून प्रचलित असलेल्या कोल्हा व हंस (फॉक्स अँड गीस) या खेळात हंसाच्या चार पांढºया सोंगट्या व कोल्ह्याच्या चार काळ्या सोंगट्या पटावर एका रांगेत मांडल्यावर खेळास प्रारंभ होतो. दोघेही परस्परांची फळी मोडण्याचा प्रयत्न करीत असतात. हल्‌मा हा खेळ त्यामानाने अधिक गुंतागुंतीचा आहे. त्याच्या पटावर २५६ चौकोन असतात. हल्‌मा हा खेळ दोन खेळाडूच खेळत असतील, तर समोरासमोरचे फक्त दोन कोपरे वापरतात. चार खेळाडू असले, तर अर्थातच चारही कोपरे वापरावे लागतात. त्यात सर्व खेळाडू स्वतंत्रपणे खेळतात किंवा दोघे भागीदार होऊ शकतात.

तब्ले हा सोंगट्यांच्या प्रकारात मोडणारा साधा व मनोरंजक क्रीडाप्रकार आहे. एका फळीला एका ओळीत सारख्या अंतरावर पाडलेली बारा भोके आणि त्या बारा भोकांच्या चार ओळी, असे या खेळाच्या पटाचे स्वरूप असते. पटाच्या भोकावर खुंटीच्या आकाराच्या तांबड्या व हिरव्या रंगांच्या प्रत्येकी बारा सोंगट्या असतात. हा खेळ दोन खेळाडूंनी खेळावयाचा असतो.


एकाकी (सॉलिटेअर) हा एकट्यानेच खेळावयाचा जुना फ्रेंच खेळ आहे. त्याचे अनेक प्रकार प्रचलित आहेत. काँम्प्यटरगेममध्ये याचे अनेक प्रकार आहेत. त्यात पत्त्याचा डाव लावण्याचा प्रकारही असतो. पण साधारणपणे सापशिडी, ल्युडो आणि व्यापार हा खेळ खेळला नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. पटाचा वापर जुगारासाठी खेळला जातो. महाभारत घडले ते या पटावरच्या जुगारानेच. शंकर पार्वती सारिपाट खेळत असतात हे अनेक कथांमधून दिसून येते. सारिपाटाच्या खेळातूनच गोरक्षनाथांनी मच्छिद्रनाथांची स्त्री राज्यातून सुटका केली होती. त्यामुळे हे खेळ आपल्या जीवनाचा आणि संस्कृतीचा एक भाग आहेत.

प्रफुल्ल फडके/ संस्कृती


9152448055

हिंदुस्थानला आपला देश मानणारा सम्राट अकबर



भारतावर किंवा हिदुस्थानवर मोगली आक्रमण झाले, अनेक मुसलमान शासक इथे झाले; पण खºया अर्थाने हिंदुस्थानला आपला देश मानणारा मुसलमान राजा होता तो म्हणजे अकबर. अकबराच्या अनेक गोष्टी आजही आपल्या जीवनाचा एक भाग आहेत. आपल्याकडे ज्या गोष्टींकडे वैभव म्हणून बघितले जाते, त्या ऐतिहासिक बाबतीत नवरत्नांचा दरबार आणि अकबर-बिरबल यांच्या चातुर्य कथा याकडे तर आपल्याकडे एक सांस्कृतिक वैभव म्हणून पाहिले जाते.


अकबर हा भारताचा तिसरा मोगल सम्राट. हिंदुस्थानला आपला देश मानणारा हा पहिला मुसलमान राजा होता. त्याची राजवट चांगली होती. मोगल साम्राज्याचा पाया मजबूत करणाºया या राजाचे व्यक्तिमत्व लहानपणीच अनेक आपत्तींतून तावून सुलाखून निघालेले होते. राज्यारोहणप्रसंगी (१५५६) त्याच्या ताब्यात निश्चित असा कुठलाच प्रदेश नव्हता. विश्वासार्ह असे सैन्यही त्याच्या हुकमतीखाली नव्हते, तरीही त्याने आपला पालक बैरामखान याच्या मदतीने आपला एक जबरदस्त प्रतिस्पर्धी मुहम्मदशाह आदिल सूर याचा दिवाण हेमू याचा पानीपतच्या मैदानावर पतन केला (१५५६). नंतर सिकंदर सूरसारख्या इतर प्रतिस्पर्ध्यांनाही शरणागती पत्करण्यास लावून दिल्लीचे आपले आसन त्याने स्थिर केले.

१५५६ पासून १५६० पर्यंत पालक म्हणून सर्व सत्ता बैरामखानाच्याच हातात होती, परंतु बैरामखानाच्या क्रूर व अन्यायी कारभारामुळे असंतोष पसरला, म्हणून अकबराने युक्तीने त्याच्या हातून सत्ता काढून घेतली. बैरामने बंड केले; पण शेवटी त्यास अकबरास शरण जावे लागले. अकबराने त्यास सन्मानाने वागविले. बैरामखानानंतर अकबराची प्रमुख दाई माहम अनघा हिच्या गटाचे काही दिवस दरबारात वर्चस्व राहिले. माहम अनघाच्या मृत्यूनंतर अकबराने सर्व सत्ता स्वत:च्या हाती घेतली.


राज्यकारभार हाती घेतल्यानंतर पहिल्या सात वर्षांत (१५६० ते १५६७) माहम अनघाचा मुलगा आदमखान, अब्दुल्लाहखान उझबक या बंडखोरांची टोळी, रावळपिंडी जिल्ह्यातील गख्खर लोक व काबूल येथे असलेला त्याचा भाऊ मिर्झा हाकिम यांची बंडे त्याने मोडून काढली. गोंडवन, माळवा, रावळपिंडी जिल्ह्याचा ईशान्य भाग, चुनार, जौनपूर हे प्रदेश जिंकून घेतले. १५६८ मध्ये चितोड, १५६९ मध्ये जोधपूर व १५७० मध्ये बिकानेर, जैसलमीर, कालिंजर हेही प्रदेश त्याने जिंकले. १५७२ पर्यंत राणा प्रताप सोडून बहुतेक राजपूत राजांना त्याने शरण आणले.

१५७३ मध्ये गुजरातमधील मुसलमान राजांना पराजित करून तेथे त्याने आपला अंमल बसविला. १५७६ मध्ये हळदीघाटाच्या लढाईत त्याने राणा प्रतापचा पराभव केला. त्याच साली त्याने बंगालही जिंकला. १५८४ साली काबूलमध्ये राज्य करीत असलेला आपला सावत्र भाऊ मुहम्मद हाकिम वारल्यामुळे तो प्रांत अकबराने आपल्या ताब्यात घेतला. काश्मीरचा राजा युसुफशाह व त्याचा मुलगा याकुब यास त्याने कैदी म्हणून बिहारमध्ये पाठविले व काश्मीरचे राज्य आपल्या राज्यास जोडून घेतले (१५८६-१५८७). या काश्मीरच्या मोहिमेत त्याचा विश्वासू विद्वान मित्र बिरबल कामास आला. १५९१ ते १५९५ च्या दरम्यान अकबराने ओडिशा, सिंध, कंदाहार व बलुचिस्तान जिंकून घेतले. दक्षिण हिंदुस्थान जिंकण्याच्या हेतूने त्याने खान्देशच्या राजास मांडलिकत्व कबूल करावयास लावून अहमदनगरवर स्वारी केली; पण चांदबीबीच्या बहादुरीमुळे त्यास पराभव पत्करावा लागला (१५९५). १६०० मध्ये मात्र त्याने अहमदनगर जिंकण्यात यश मिळविले व त्याच्या पुढल्या वर्षी त्याने असीरगढही जिंकला. अशा तºहेने त्याने आपले राज्य पश्चिमेस काबूलपासून ते पूर्वेस बंगालपर्यंत व उत्तरेस हिमालयाच्या पायथ्यापासून दक्षिणेस नर्मदा नदीच्या खाली अहमदनगरपर्यंत वाढविले.


अकबर एक उत्तम राज्यकर्ताही होता. त्याने आपली शासनव्यवस्था न्याय, सहिष्णुता व गुणवत्ता या तीन तत्वां‍वर आधारलेली होती. अकबराची राज्यपद्धती एक तंत्री होती. त्याचा अधिकार अनियंत्रित होता. शासनाच्या सोयीसाठी महसूल, न्याय, धर्म, लष्कर, गुप्तहेर, टाकसाळ इ. खाती त्याने निर्माण केली होती. संपूर्ण राज्याची विभागणी अठरा सुभ्यांनंतर करण्यात आली होती. सुभ्यानंतर सरकार व सरकारनंतर परगणा अशी प्रांतिक शासनाची उतरण होती. प्रांतिक शासनाचा सुभेदार हा प्रमुख असे व तो दिवाण, सदर, अमील, बितिक्ची, पोतदार, फौजदार, कोतवाल, वाकेनवीस व इतर अधिकाºयांच्या मदतीने प्रांतिक कारभार चालवीत असे.

अकबराने घोड्यावर मुद्रा मारण्याची आणि माणसाचे व घोड्याचे सविस्तर वर्णन हजेरीपटावर लिहिण्याची पद्धत सुरू केली. तोडरमलच्या सहाय्याने त्याने केलेल्या शेतसाºयाच्या पद्धतीतील सुधारणा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जमिनीची पाहणी व मोजणी करून वर्गवारी करण्यात आली व उत्पन्नाच्या एकतृतीयांश हिस्सा शेतसारा ठरविण्यात आला. त्याची चलनपद्धतीही प्रशंसनीय होती. नाण्यांचे प्रकार, त्यांचे वजन, त्यांच्यातील शुद्ध धातू व त्यांचे कलाकृतीपूर्ण आकार अकबराच्या त्या क्षेत्रातील कामगिरीची साक्ष देतात.


हिंदूंसंबंधीचे त्याचे धोरण त्याच्या उदारदृष्टीची व मुत्सद्देगिरीची साक्ष देते. पूर्वीच्या मुसलमान राजांनी हिंदूंवर जुलमाने राज्य केले, म्हणून त्यांना हिंदूंच्या कट्टर विरोधाला तोंड द्यावे लागले. अशी परिस्थिती मोगल वंशावर येऊ नये, म्हणून त्याने मुसलमानेतर लोकांच्या मनात राज्याबद्दल आपुलकी निर्माण करण्याचे ठरविले. त्यांना जाचक व राजकीय दृष्ट्या कमी लेखणारे जझिया कर व यात्राकर रद्द केले. युद्धकैद्यांना गुलाम करणे किंवा त्यांना मुसलमान धर्म स्वीकारावयास लावणे बंद करून हिंदूंचे सामुदायिक धर्मांतरापासून रक्षण केले. हिंदूंमधील तंटे पूर्वी मुसलमान काजी निकालात काढत असत. अकबराने त्याकरिता ब्राह्मणांची नेमणूक केली. हिंदूंना आपल्या दरबारी नोकºया आणि मोठमोठ्या हुद्यांच्या व जबाबदारीच्या जागा दिल्या. इतकेच नव्हे, तर जैसलमीर, मारवाड व बिकानेर यांसारख्या राजपूत राजघराण्यांशी त्याने विवाहसंबंध जोडले. इतर मुसलमान राजांनी आपल्या हिंदू स्त्रियांस कधीच न दिलेले पूजाचार्दींचे धार्मिक स्वातंत्र्य अकबराने दिले. इतकेच नव्हे, तर राजमहालातच त्याने त्यांच्याकरिता मंदिरे बांधली. त्यांच्या दिवाळीसारख्या सणातही तो सहभागी होत असे. परिणामत: राजपूत हे अकबराचे निष्ठावान सेवक व मोगल साम्राज्याचे संरक्षक पाईक बनले.

अकबराने उलेमा व मुल्ला लोकांच्या सत्तेविरुद्ध व धर्मवेडेपणाविरुद्ध जिद्दीने लढा दिला. मुसलमानांत जर धार्मिक किंवा दिवाणी बाबतीत मतभेद निर्माण झाले, तर त्यांच्याबद्दलचा शेवटचा निर्णय देण्याचा अधिकार अकबराला देण्यात आला. मात्र, दिलेला निर्णय कुराणाशी सुसंगत, त्याचप्रमाणे राष्ट्रहिताला पोषक असण्याची गरज असे. अकबराने धर्माचा मूळ पाया मानवता मानून साम्राज्यातील सर्व धर्मांबद्दल सहिष्णुता बाळगली. हिंदू, ख्रिस्ती, जैन व पारशी धर्मगुरूंकडून त्यांच्या धर्मातील चांगल्या बाजू समजावून घेतल्या. सर्व जाती जमातींना एकाच मंदिरात एकाच पद्धतीने ईश्वराची आराधना करता यावी, म्हणून त्याने १५८१ साली दीन-ए-इलाही नावाचा धर्म स्थापन केला. हा धर्म सर्व धर्मातील चांगल्या निवडक तत्वांवर आधारित होता. मुख्य तत्व सर्वांशी सहिष्णुता हे होते. या धर्माचे अनुनायी शक्यतो मांसाहार करीत नसत. त्यागाच्या प्रमाणावर अनुयायांचा दर्जा ठरविण्यात येत असे. अकबर कोणालाही जबरदस्तीने आपल्या नवीन धर्मात आणू इच्छित नव्हता इतकेच नव्हे, तर राजकारणाच्या आड हा धर्म येऊ न देण्याचे व्यवहारी धोरणही त्याने पाळले. अकबराच्या मृत्यूबरोबरच त्याचा नवीन धर्मही संपुष्टात आला.


प्रफुल्ल फडके/संस्कृती

9152448055\\

वैयक्तिक प्रश्न


आपल्याकडे चर्चेला आणि टीकेला कोणताही विषय चालतो. काहीही केले तरी टीका ही होतेच. आता सध्या काँग्रेस आणि भाजपमध्ये सोशल मीडियावर राहुल गांधींवरून वाद सुरू आहे. काँग्रेस पक्ष ज्यांच्याकडे आशेने बघतो आहे, ते युवा नेते राहुल गांधी आपल्या नवनव्या कृतीमुळे सदैव टीकेचे आणि टिंगलटवाळीचे धनी होताना दिसत असतात. तसेच, ते गेले दोन दिवस पुन्हा होताना दिसले. नेपाळमधील एका नाइट क्लबमधील त्यांचा एक व्हिडीओ नुकताच काहींच्या हाती लागला आणि त्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली. खरंतर राहुल गांधी पबमध्ये, डिस्कोमध्ये गेले, नाइट क्लबला गेले, म्हणून इतके वाईट वाटण्यासारखे काहीच कारण नाही. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ते त्यांचे खासगी जीवन आहे. मजा मारायला ते गेल्याने काय असा डोंगर कोसळणार आहे? राहुल गांधी हे काही मोठ्या पदावरचे कोणी नाहीत, ज्यामुळे देशाची प्रतिमा खराब होईल. ते काही जबाबदार नेते नाहीत की, त्यांनी असे केल्याने त्यांच्यावर टीका केली पाहिजे. ते देशाचे पंतप्रधान असते, मुख्यमंत्री असते, एखाद्या महत्त्वाच्या पदावर असते, तर ही टीका योग्य ठरली असती; पण त्यांच्या खासगी जीवनात त्यांनी चार क्षण आनंदात घालवले, म्हणून इतके पोटात दुखायचे कारण नाही.


राहुल आपल्या एका मैत्रिणीच्या लग्नासाठी नेपाळला गेले आहेत, तेथील हा व्हिडीओ असल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसने दिले आहे. या स्पष्टीकरणाची काही गरज नव्हती. करावी त्यांनी चैन, ऐश. काय फरक पडतो? विरोधकांच्या मते मात्र, एकूण व्हिडीओतील दृश्ये ही लग्नसोहळ्याची दिसत नाहीत, तर एखाद्या नाइट क्लबची दिसतात आणि एका चिनी चेहरापट्टीच्या महिलेसोबत ते गोंधळलेल्या स्थितीत आजूबाजूला बघताना दिसत आहेत. त्यामुळे आधीच विरोधकांच्या रडारवर असलेल्या राहुल गांधींचा फजितवडा करण्यासाठी या व्हिडीओचा उपयोग त्यांच्या विरोधकांकडून झाला यात नवल नाही. त्यांच्यासोबतची ती महिला कोण याची शोधमोहीम आता सुरू होईल. शिवाय जिच्या लग्नासाठी ते नेपाळला गेले तिचा पती चिनी उद्योगपती आहे. त्यामुळे एकूणच राहुल यांना अडचणीत आणणारा हा व्हिडीओ आहे; पण खासगी आयुष्यात त्यांनी काय ऐषोआराम करावा यात कोणी हस्तक्षेप करू नये. जनतेने, मतदारांनी त्यांना नाकारल्यानंतर त्यांना वैयक्तिक आयुष्यात मजा मारू देत, काही बिघडायचे कारण नाही. मोठ्या पदावरच्या लोकांकडून आदर्शाची अपेक्षा ठेवली जाते. सामान्य माणसांकडून कोणी आदर्शाची अपेक्षा करत नाही. हजारो-लाखो लोक नाइट क्लबमध्ये जातात, धिंगाणा घालतात. त्याची कधी चर्चा होत नाही. तसेच, सामान्य माणसाचे जीवन ते जगत असताना, त्यावर इतकी टीका करण्याचे कारण काय?

राहुल गांधी सीएनएन या दूरचित्रवाणी वाहिनीच्या एकेकाळच्या पत्रकार सुमनिमा उदास यांच्या विवाह सोहळ्यानिमित्ताने नेपाळला गेलेले आहेत, असा खुलासा काँग्रेसने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स या तीन राष्ट्रांच्या दौ‍ºयावर आहेत. त्यावर देश संकटात असताना साहेब विदेशांत फिरत आहेत, अशी कुत्सित टीका काँग्रेसने नुकतीच केलेली होती. पण, पंतप्रधान मोदी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची भूमिका मांडण्यासाठी विदेश दौ‍ºयावर आहेत. ते व्यक्तिगत मौजमजा करण्यासाठी गेलेले नाहीत, हा मोठा फरक आहे; पण याची जाणीव काँग्रेसला नाही. त्याला उत्तर देण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी काय करतात हे दाखवायचे काहीच कारण नव्हते. पंतप्रधानांशी त्यांची तुलना कशी काय होऊ शकते?


प्रत्येकाला आपले वैयक्तिक आयुष्य असते. आपण काय करावे, कुठे जावे, कसे वागावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो आणि नेत्यांनाही खासगी आयुष्य आहेच. परंतु, नेते असल्याने समाज त्यांच्याकडून नैतिकतेची अपेक्षाही निश्‍िचत करीत असतो. राहुल यांच्या व्हिडीओमध्ये त्यांची नाइट क्लबसदृश्य ठिकाणची उपस्थिती वगळल्यास तसे आक्षेपार्ह काही नाही, परंतु एखादी चोरी पकडावी अशा प्रकारे हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राहुल गांधींनी कोठे जावे, काय करावे हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. परंतु एकीकडे आपला पक्ष संकटात आहे, फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे, तारणहाराची प्रतीक्षा करतो आहे, देशामध्ये महागाईसारखे प्रश्न ऐरणीवर आहेत, दंगे उसळत आहेत. अशा वेळी प्रमुख विरोधी पक्षाचा एक जबाबदार नेता म्हणून सक्रियपणे सरकारविरोधात मांड ठोकून उभे राहून जनतेला स्वत:प्रती आणि स्वत:च्या पक्षाप्रती विश्वास देणे तर दूरच, उलट अशा प्रकारे वैयक्तिक मौजमजेत व्यस्त असल्याचे चित्र निर्माण होणे त्यांच्या आणि पक्षाच्या प्रतिमेसही मारक ठरणारे आहे, हे नाकारता येणार नाही. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा त्यात मारल्या गेलेल्या एनएसजी जवान संदीप उन्नीकृष्णनच्या कुटुंबीयांचे अश्रूही वाळण्याआधी, तेव्हा काँग्रेसच्या सरचिटणीस पदावर असलेले राहुल गांधी आपला मित्र समीर शर्मा यांच्या विवाहाच्या निमित्ताने दिल्लीबाहेरील एका फार्महाऊसमध्ये पहाटे पाच वाजेपर्यंत पार्टी करण्यात दंग होते. तेव्हाही त्यांची अशीच छी-थू झाली होती. पण, तेव्हा ते सत्तेत होते. आता सत्तेत नाहीत. सत्तेतून गेल्यावर खासगी आयुष्यात कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. राहुल गांधींकडून अपेक्षाच कशी काय करता येईल?

राहुल गांधींच्या कामात सातत्य नाही, हे खुद्द शरद पवार यांनीही जाहीरपणे सांगितले आहे. ते राजकारणाकडे, पक्षाकडे गांभीर्याने पाहत नाहीत. राजकारण हे असे अर्धवेळ वावरण्याचे क्षेत्र नव्हे. त्यामध्ये झोकून द्यावे लागते. अहोरात्र काम करावे लागते, जनतेचा विश्वास कमवावा लागतो. ते त्यांना नाही जमत. मग त्यांनी नाइट क्लबमध्ये जाऊन नाच केला, तर काय बिघडले? त्यांना जे जमते ते करतात, इतका साधा विचार आहे. त्यावर टीका करण्याची गरज नाही. मुळात राहुल यांना वारसाहक्काने जरी पक्षाचे नेतेपद लाभलेले असले, तरी ते टिकविण्यासाठी शेवटी वैयक्तिक करिष्माच लागेल. आजवर ज्या-ज्या निवडणुका काँग्रेस पक्षाने त्यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या, त्यामध्ये पक्षाला दारूण अपयशच आलेले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर २०१९ मध्ये पक्षाचे अध्यक्षपद सोडून देण्याची पाळी त्यांच्यावर आली होती. पक्षाच्या २३ नेत्यांनी पक्षाध्यक्षांना पत्र लिहून संघटनात्मक बदलांची मागणी केली; पण तरीही त्यावर निर्णय होत नाही. पक्षाचे नेतृत्व करण्याची त्यांची क्षमता नाही आणि दुसºया कोणी ते करावे, असे कोणाला वाटत नाही. अशा परिस्थितीत राहुल यांनी आपल्याला काय आवडते ते केले, तर त्यात आश्चर्य वाटायला नको.

नेत्याने पुढे व्हायचे असते

 


कोणतेही युद्ध, लढाई जिंकायची असेल, तर नेत्याने पुढे व्हायचे असते. आपण नेहमीच छत्रपती शिवरायांचा आदर्श सांगतो. छत्रपतींच्या पराक्रमाचा इतिहास गौरवाने सांगतो; पण छत्रपती मोठे का झाले? तर ते सर्वात पुढे होते. कोणतेही युद्ध लढण्यासाठी, लढाईसाठी, मोहिमेसाठी शिवराय स्वत: बाहेर पडत होते, रस्त्यावर उतरत होते. त्यांच्या मागून मावळे होते. तुम्ही करा असे राजांनी कधी सांगितले नव्हते, तर आपण करू असे ते म्हणत. त्यामुळेच त्यांच्या मोहिमा नेहमीच फत्ते होत असत. राजांसाठी आपला जीव देण्यास प्रत्येक मावळा तयार असायचा. समोर मृत्यू आहे हे माहिती असतानाही मावळा त्यांच्याबरोबर उतरायचा. याचे कारण आपले राजे करून दाखवतात. फक्त आदेश सोडत नाहीत, त्यामुळेच लाख मेले तरी चालतील; पण लाखांचा पोशिंदा मरून चालणार नाही. या न्यायाने आपले प्राण हातावर घेऊन शिवकार्यात सर्व जण जमा होत होते. तानाजी मालुसरेंच्या घरात लग्न कार्य आहे, हे माहिती असल्यामुळे कोंढाण्याच्या मोहिमेची कल्पना राजेंनी त्यांना सांगितली नाही; पण चाणाक्ष तानाजी मालुसरेंना ते समजल्यावर आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे, असे म्हणत कोंढाण्याच्या मोहिमेवर तानाजी मालुसरे गेले आणि आपले प्राण अर्पण करून ती मोहीम फत्ते केली. कोणतीही मोहीम तेव्हाच यशस्वी होते, जेव्हा नेते पुढे येतात.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक संघर्षाच्या आंदोलनात पुढे होते. मग तो महाडच्या चवदार पाण्याचा असो वा काळाराम मंदिराचे आंदोलन असो. आपल्या अनुयायांना करा असे त्यांनी सांगितले नाही, तर आपण अगोदर केले पाहिजे आणि माझ्या मागून या असे सांगून नेतृत्व केले. म्हणून त्यांची आंदोलने यशस्वी झाली.

तुमची आंदोलने कितीही खरी असली, भूमिका योग्य असली, विचार खरा असला, तरी तो आदेश देऊन कधी यशस्वी होत नाही. आंदोलनात स्वत: उतरावे लागते. सध्याच्या भोंग्यांच्या आंदोलनाबाबत नेमके हेच होताना दिसत आहे. राज ठाकरे आदेश सोडत आहेत. हनुमान चालिसा वाचा म्हणून सांगत आहेत. कार्यकर्ते पेटून उठून त्या आदेशाचे पालन करत आहेत आणि पोलीस पकडून नेत आहेत. नेते घरात आहेत; पण जर राज ठाकरे म्हणाले की, आपण हे आंदोलन करूया. मी रस्त्यावर उतरतो, तर अशी आंदोलने चिघळणार नाहीत. कार्यकर्त्यांची धरपकड करावी लागणार नाही. सरकारला, शासनाला, प्रशासनाला त्याचा विचार करावा लागेल. त्यामुळे राज ठाकरे यांनी स्वत: छत्रपतींचा आदर्श घेऊन पुढे आले पाहिजे. एखाद्या मशिदीसमोर येऊन आपल्या कुटुंबीयांसह हनुमान चालिसा म्हणून दाखवली पाहिजे. पोलिसाच्या काठ्या कायकर्ते खात आहेत, त्यांना पोलीस पकडून नेत आहेत. त्यांच्यावर केसेस होत आहेत. नेते घरात आहेत तिथेच आहेत. अशाने आंदोलने यशस्वी होत नाहीत.


२००८ला मराठी पाटीचा विषय हातात घेतला. खळ्ळ खटॅक केले. काही अन्य भाषेतल्या पाट्या फोडल्याही; पण अंमलबजावणी झाली नाही. महाविकास आघाडी सरकारने २०२२ ला मराठी पाटीचा निर्णय घेतला. त्याचे सगळे श्रेय महाविकास आघाडी सरकारला जाते; पण २००८च्या आंदोलनात राज ठाकरे रस्त्यावर उतरले असते, एखादा दगड हातात घेतला असता, तर हा निर्णय तत्कालीन सरकारला २००८ ला घेणे भाग पडले असते. २००८ ला जे सत्तेवर होते तेच आता सत्तेत आहेत. मग अवघड काय होते? पण नेते घरात बसले आहेत आणि कार्यकर्त्यांना मार खायला, पोलिसांच्या तोंडी दिले जात आहे, असा संदेश गेला. प्रत्येक आंदोलनावेळी हाच संदेश जातो आहे. त्यामुळे आपण जर छत्रपती शिवरायांना देव मानतो, तर त्यांचा आदर्श घेऊन स्वत: आंदोलनासाठी उतरले पाहिजे, आंदोलनाचे नेतृत्व केले पाहिजे. मग आपोआप भोंगे खाली उतरतील. जो पुढे येतो तोच जिंकतो हा इथला नियम आहे.

कोणतेही आंदोलन यशस्वी होते, ते जेव्हा नेता आंदोलनात पुढे असतो तेव्हा. एसटी कर्मचाºयांचा संप ५ महिने झाला. पाच महिने आझाद मैदानावर कामगार होते; पण नेतृत्वच नव्हते. त्यामुळे हा संप फसला. आंदोलन यशस्वी झाले नाही. स्वयंघोषित नेते या आंदोलनात आपली पोळी भाजताना दिसू लागली; पण कर्मचाºयांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. जिथे नेता नाही, नेतृत्वाचा पुढाकार नाही तिथे लढाई जिंकता येत नाही.


महाराष्ट्रात अशी अनेक आंदोलने आहेत, जी नेतृत्वामुळे फसली. मुंबईतील गिरणी कामगारांचा संप झाला. अनेक महिने तो झाला. गिरण्या बंद पडल्या. गिरणी कामगार देशोधडीला लागले. नेत्यांचे काहीच नुकसान झाले नाही. कोणतेही आंदोलन, चळवळ ही यशस्वी होण्यासाठी नेतृत्वाने पुढाकार घेणे गरजेचे असते. २०१४ ला सत्तेवर आल्यानंतर २ आॅक्टोबर, २०१४ ला पंतप्रधान मोदींनी स्वच्छता मोहिमेचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे मोदींनी स्वत: हातात झाडू घेतला. त्यामुळे या स्वच्छता मोहिमेला राज्यभरातील नव्हे, तर संपूर्ण देशभरातील नेत्यांनी, विरोधकांनीही हातात झाडू घेतला आणि सफाईला पुढे आले. अगदी ज्येष्ठ नेते शरद पवारांनीही हातात झाडू घेतला होता. मोदींचे विरोधक असलेले अरविंद केजरीवाल यांनीही हातात झाडू घेतला. स्वच्छतेचा एक चांगला संदेश जगभरात गेला आणि आपल्याकडे स्वच्छतेची सवय लागली; पण नेतृत्वाने पुढे आल्यानेच हे यशस्वी झाले, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.

भोंग्यांचे राजकारण


देशात सध्या मशिदींवरील भोंग्यांच्या विषयावरून वातावरण तापवले जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेमध्ये मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारला ४ मेपर्यंत मुदत दिली आहे आणि ते उतरवले न गेल्यास तेथे दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला. त्याप्रमाणे काही ठिकाणी बुधवारी पहाटे मशिदींवरील भोंगे वाजले नाहीत, तर काही ठिकाणी राजकीय नेत्यांच्या चिथावणीने मुंब्रासारख्या भागात ते वाजले. त्यामुळे त्याला उत्तर म्हणून हनुमान चालिसा वाजली. त्यानंतर मनसैनिकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली. ही गोष्ट अत्यंत लांछनास्पद आहे. विनाकारण प्रतिष्ठेचा प्रश्न न करता, इगो न बाळगता काही गोष्टी सरकारने करणे आवश्यक होते; पण आम्ही विरोधकांचे ऐकले, नमलो आणि हा निर्णय घेतला, अशी भावना आज सरकारमध्ये आहे ही चुकीची आहे. सरकार आणि विरोधी पक्ष यांचे नाते शत्रुत्वाचे नसते. एकमेकांनी एकमेकांकडून काही अपेक्षा व्यक्त करायच्या असतात. त्या अपेक्षांची पूर्तता केली, तर त्यात कमीपणा नसतो, तर मोठेपणा असतो. मुलांनी, बायकोने नवºयाकडे, वडिलांकडे काही मागणी केली तर नवरा, वडील नमले आणि त्यांनी आणून दिले, असे आपण म्हणत नाही. त्याचप्रमाणे विरोधकांनी एखादी रास्त, सनदशीर मार्गाने मागणी केलेली असेल, तर ती पूर्ण करण्यासाठी सरकारने इतके ताणून धरणेही गरजेचे नसते.


उत्तर प्रदेशातील भाजप सरकारने सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्याचे सत्र सुरू केले आणि बहात्तर तासांत सहा हजार भोंगे उतरवले आहेत. एकाएकी देशातील सगळे महत्त्वाचे प्रश्न बाजूला पडले आणि भोंग्यांचा हा विषय एवढा तातडीचा का बनला आहे, हा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे. ध्रुवीकरणाचे राजकारण याखेरीज याला दुसरे उत्तर नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक विषय नाही, तो सामाजिक विषय आहे असा मुलामा जरी त्याला लावला जात असला, तरी त्याद्वारे धार्मिक ध्रुवीकरण करून त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचाच हा सारा प्रयत्न आहे, हे उघड आहे; पण तरीही त्या भोंग्यांचा त्रास होत असेल, तर ते बंद केले पाहिजेत. राज ठाकरे यांची भाषा कडक असेल, सांगण्याची पद्धत वेगळी असेल; पण न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला धरून ती मागणी होती, त्याचा विचार करण्याची गरज होती. पहाटेच्यावेळी लोकांना त्रास होईल, अशा स्वरूपात कोणीही भोंगा, लाऊडस्पीकर लावला तर ते गैरच आहे. तिथे जाती-धर्माचा विषय येत नाही. तो एक सामाजिक प्रश्न म्हणून बघणे गरजेचे आहे. उत्तर प्रदेशात योगी सरकारने उतरवलेले सगळे भोंगे काही मशिदींवरचे नव्हते. मंदिरांवरचे पण त्यात होते. याचा विचार करणे गरजेचे आहे.

मुळात भोंगे हा उपद्रवकारक प्रकार आहे, यात वादच नाही. सर्वोच्च न्यायालयाने आणि विविध राज्यांच्या उच्च न्यायालयांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत वेळोवेळी आपले निवाडे दिलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २००५ साली भोंग्यांबाबत तीन गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या. पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही ठिकाणी भोंगे लावण्यासाठी प्रशासनाची लेखी परवानगी आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत कोणालाही भोंगे लावून ध्वनीप्रदूषण करता येणार नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर राज्य शासनाला वाटले, तर केवळ वर्षातून जास्तीत जास्त पंधरा दिवसांसाठी आपले विशेषाधिकार वापरून रात्री दहाची कालमर्यादा बारा वाजेपर्यंत वाढवता येऊ शकते. सर्व राज्यांच्या न्यायालयांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. सी. लाहोटी आणि अशोक भान यांनी दिलेल्या या निवाड्याच्या अनुषंगानेच आपले निवाडे दिलेले आहेत. त्यामुळे न्यायालयाची या विषयातील भूमिका ही स्पष्ट आहे. असे असताना कोणत्याही ठिकाणी मग ते धार्मिक असो वा नसो जर बेकायदेशीरपणे भोंगे लावले जात असतील, त्यावरून कानठळ्या बसवणाºया आवाजात बोलले जात असेल, संगीत लावले जात असेल, तर आजूबाजूच्या नागरिकांसाठी ते उपद्रवकारक असल्याने त्यावर कारवाई करणे ही प्रशासनाची व पोलिसांची जबाबदारी ठरते.


असे असताना विरोधकांनी तशी मागणी केली, तर सरकारने तो प्रश्न प्रतिष्ठेचा न करता भोंगे काढण्याची भूमिका घेणे गरजेचे होते. विशिष्ठ समाज, विशिष्ठ धर्मीय यामुळे नाराज होतील आणि आपल्या मतांवर परिणाम होईल, असला संकुचित विचार करणे चुकीचे होते. मुस्लीम धर्मातील लोकांनाही शांतता हवी आहे. त्यांनाही भोंग्यांचा त्रास होतो, परंतु त्याकडे हेतुपुरस्सर कानाडोळा केला जातो. त्यामुळेच असे विषय तापविण्याची संधी राजकारण्यांना मिळते. विविध राज्यांच्या प्रशासनांनी जर सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर अशा प्रकारच्या बेकायदेशीर भोंग्यांबाबत कारवाई केली असती, तर या विषयाचे राजकारण करण्याची संधी कोणाला लाभली नसती. आम्हाला अमक्याचा त्रास होतो, म्हणून दुप्पट आवाजात तमके लावू असे म्हणणे हा तर निव्वळ बाष्कळपणा आहे.

ध्वनी प्रदूषण हे मानवी आरोग्यास अपायकारक आहे. त्यामुळे आपल्यापासून इतरांना उपद्रव होता कामा नये, एवढे जरी शहाणपण प्रत्येकाने बाळगले, तर हा विषयच निर्माण होणार नाही. परंतु, तेवढी समज नसलेली मंडळीच भोंगे लावून कर्णकर्कश आवाजात त्यावरून इतरांच्या जीवनात व्यत्यय निर्माण करीत असतात. कोठे कोण आजारी असेल, कोणी अभ्यास करीत असेल, याचाही विचार या महाभागांना करावासा वाटत नाही. भोंग्यांचा हा उपद्रव केवळ एखाद्या विशिष्ट धर्मियांकडूनच होतो असेही नाही आणि त्याचा त्रासही एखाद्या विशिष्ट धर्मियालाच होतो, असेही नव्हे. आपण या समस्येचा माणूस म्हणून विचार केला पाहिजे. भोंगे लावून जोरजोरात कोकला असे कोणत्या धर्माने सांगितले आहे? कुठल्याही धर्मात तसे सांगितले गेलेले नाही, कारण मुळात भोंग्यांचा शोध हा अर्वाचीन काळातला आहे. हे भान जर प्रत्येकाने ठेवले, तर त्याचा राजकीय फायदा उठविण्याची संधीच कोणाला मिळणार नाही.


आपल्याकडे भलतेसलते भावनिक विषय ऐरणीवर आणून मूळ प्रश्नांकडे कानाडोळा करायला लावण्याचे तंत्र राजकारणी सर्रास वापरत असतात. सध्या देशाला महागाईने ग्रासले आहे. इंधन, वीज, दूध, जीवनावश्यक वस्तू सगळे सगळे महागत चालले आहे. सर्वसामान्य जनतेचे महिन्याचे अंदाजपत्रक कोलमडते आहे. दिलासा द्यायचे सोडून केवळ माथी भडकवण्याचे हे काय प्रकार चालले आहेत?, गेल्या काही दिवसांमध्ये देशामध्ये विषारी वातावरण निर्माण झालेले दिसत आहे. राज्याराज्यांतून दंग्यांचे पेव फुटले आहे. कोण हे विष समाजामध्ये पसरवते आहे? समंजस समाजाने याचा विचार करायची वेळ आता नक्कीच आलेली आहे. हे सगळं थांबवले पाहिजे. सामान्यांना वेठीला धरणे थांबले पाहिजे.

प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाईन्स


9152448055\\

मखमली आवाजाचे गायक अरुण दाते


अनेक दशके आपल्या भावमधुर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे गायक म्हणजे अरुण दाते. आज ४ मे रोजी त्यांचा जन्मदिवस. तर याच महिन्यात ६ मे या तारखेला त्यांचे निधन झाले. अरुण दाते हे एक मराठी भावगीत गायक होते. भावगीताला आपल्या मखमली आवाजाने त्यांनी एका उंचीवर नेऊन ठेवले होते. त्यामुळे मराठी संगीतात अरुण दाते नावाचे एक सोनेरी मखमली पान आहे.


अरुण दातेंचे वडील रामूभय्या दाते हे इंदूरमधील प्रतिष्ठेचे गायक होते. त्यांच्या इच्छेनुसार अरुण दाते गायक झाले. अरुण दाते इंदूरजवळच्या धारला कुमार गंधर्वांकडे सुरुवातीला गाणे शिकले. त्यांनी पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे घेतले. दाते यांनी मुंबईमध्ये कापड अभियांत्रिकीचा अभ्यास सुरू केला. अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षीच्या परीक्षेत अरुण दाते नापास झाल्यावर वडिलांनी त्यांना गाणे शिकण्याचे प्रोत्साहन दिले.

अरुण दाते १९५५पासून आकाशवाणीवर गाऊ लागले. १९६२ मध्ये शुक्रतारा मंदवारा या अरुण दाते यांच्या पहिल्या गीताची ध्वनिमुदिका प्रकाशित झाली. हे गाणे त्यांनी गावे यासाठी संगीत दिग्दर्शक श्रीनिवास खळे त्यांना आग्रह करीत. आपण हिंदी भाषिक प्रदेशातील असल्याने आपले मराठी उच्चार शुद्ध नसल्याचे कारण सांगून दाते यांनी सुरुवातीला तीन वर्षे ते गाण्याचे टाळले. शेवटी एकदा ते ध्वनिमुद्रित झाले आणि अफाट गाजले. आजही त्या गाण्याची भुरळ संगीत रसिकांना पडते. कोणत्याही कार्यक्रमात नवे गायक ते सादर करतात, तेव्हा प्रत्येक जण अरुण दातेंची तुलना त्याच्याशी करतो. हेच त्या आवाजाचे आणि गायकीचे वैशिष्ठ्य आहे.


पुढे अरुण दाते आपल्या कार्यक्रमातही शुक्रतारा गाऊ लागले. वयाच्या पन्‍नाशीत त्यांनी भावगीतांवर आपले लक्ष केंद्रित केले. २०१०पर्यंत अरुण दाते यांचे शुक्रतारा या नावाने होणाºया मराठी भावगीत गायनाचे २५००हून अधिक कार्यक्रम झाले. त्यांचे ऊर्दूतील आणि मराठीतील गीतांचे पंधराहून अधिक अल्बमही लोकप्रिय आहेत.

मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते या कवी, संगीत दिग्दर्शक आणि गायक या त्रिकुटाने मराठी भावगीताला परत लोकप्रियता प्राप्त करून दिली होती. अरुण दाते यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, कविता कृष्णमूर्ती, पुष्पा पागधरे यांबरोबर द्वद्वंगीते गायली आहेत; पण या सर्वांमध्ये अरुण दाते यांचा आवाज हा कायम वेगळा जाणवतो. त्यातील मखमली स्पर्श फक्त कानांना नाही, तर मनालाही आनंद देतो.


त्यांच्या गायनाची ताकद इतकी अफाट होती की, एक प्रख्यात डॉक्टर त्यांना आलेल्या वैफल्यावस्थेमुळे आत्महत्या करण्यासाठी निघाले होते. त्यावेळी त्यांना दूरवरून कुठे तरी स्वर ऐकायला आले होते की, ‘या जन्मावर... या जगण्यावर... शतदा... प्रेम करावे..’ त्या मखमली सुरांनी त्या डॉक्टरांच्या मनात सकारात्मकता निर्माण केली आणि त्यांनी मग प्रॅक्टीस सुरू केली आणि न भुतो न भविष्यती असे यश मिळवले. पण या यशाचे श्रेय ते डॉक्टर अरुण दातेंना देतात. त्या स्वरांनी मला मृत्यूपासून मागे वळवले, असा गौरव ते या गायकाचा करतात.

मनाला अत्यंत आनंद देणारा असा स्वर, भाव अरुण दातेंच्या गायकीत आहे. त्यांच्या लोकप्रिय झालेल्या गीतांवरून नजर मारली तरी मन सुखावून जाते. कधी डोळ्यांच्या कडा ओलावतात, तर कधी मनात प्रेम उत्पन्न होते; पण त्यांच्या गायनाने कायमच मनाला आनंद दिला आहे.


‘अखेरचे येतील माझ्या शब्द ओठी...’ हे मंगेश पाडगावकर यांचे गीत यशवंत देव यांनी अरुण दाते यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केले आणि ते अनेकांच्या आयुष्याच्या अखेरच्या उंबरठ्यावरचे कबुली देण्याचे गीत ठरले. ‘जपून चाल पोरी जपून चाल’ हे अल्लड अवखळ प्रेमगीत दाते म्हणतात, तेव्हा खरोखरच बघणाºया नाही, तर ऐकणाºया जीवांचे हाल होतात. ‘डोळे कशासाठी’ हे त्यांचे असेच सुंदर भावगीत आहे. मनापासून भावना पोहोचवणारी गायकी त्यांच्या गायनातून प्रकट व्हायची. किती भावपूर्ण गाणी त्यांनी आपल्या मखमली आवाजांनी गायली आहेत. डोळ्यांत सांजवेळी, दिल्या घेतल्या वचनांची, दिवस तुझे हे फुलायचे, भातुकलीच्या खेळामध्ये राजा आणिक राणी, भेट तुझी माझी स्मरते, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, ही त्यांची अजरामर अशी गीते आहेत.

प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स


9152448055\\

कालमर्यादा

 


राजकीय खटले, सभांमधून प्रक्षोभक वक्तव्ये केल्यामुळे होणाºया केसेस, आंदोलनाच्या केसेस याचे निकाल तातडीने लागणे आवश्यक आहे. त्यासाठी इतकी दिरंगाई का होते, हे अनाकलनीय आहे. न्यायाधीशांची संख्या कमी आणि खटले जास्त हे अगदी गृहीत धरले, तरी राजकीय खटल्यांबाबत एक कालमर्यादा निश्चित करणे आवश्यक आहे. हे सगळे खटले फास्ट ट्रॅकवर चालवले जाण्याची आवश्यकता आहे.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सांगलीतील शिराळा कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. २०१२मधील हे प्रकरण आहे. कोणी म्हणतो २००८मधील ही घटना आहे. मराठी पाटीचे आंदोलन मनसेने खरंतर २००८ला केले होते; पण सांगलीत मराठी पाट्यांसाठी मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन केले होते, तेव्हा काही मनसे कार्यकर्त्यांसह राज ठाकरेंविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचप्रकरणी आता शिराळा कोर्टाने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे प्रकरण दहा वर्षांनी आता उकरून काढण्याचे कारण काय?, इतक्या दिवसांत ते निकाली का निघाले नव्हते?, राज्य सरकारने दुकानावरील पाटी मराठी असली पाहिजे, हा कायदा केल्यानंतर आता हे खटले बाजूला पडणे, निकाली काढणे, काढून टाकण्याची गरज होती. त्यामुळे आंदोलनाबाबत असणारे खटले किती दिवसांत सुटावेत याबाबत आता कालमर्यादा निश्चित करण्याची गरज वाटू लागली आहे.

मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली होती. राज्यात दुकानांवरील पाट्या या मराठीत असाव्यात, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यासाठी मनसैनिकांनी मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणी आक्रमक आंदोलने केली होती. त्याचप्रमाणे सांगलीतदेखील मनसैनिक रस्त्यावर उतरले होते. मराठी पाट्यांच्या मागणीसाठी काही कार्यकर्त्यांनी दुकाने बळजबरी बंद करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधान १०९, ११७, १४३ आणि मुंबई पोलीस कायदा १३५ नुसार मनसे कार्यकर्ते व राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल केला होता. तब्बल १० वर्षांपूर्वी दाखल या गुन्ह्याप्रकरणी सांगलीतील शिराळा कोर्टात आता सुनावणी सुरू आहे. त्यानुसार शिराळा कोर्टाने ६ एप्रिल रोजीच हे वॉरंट काढल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी राज ठाकरे यांना कोर्टात हजर करावे, असे आदेश सांगली कोर्टाने पोलिसांना दिल्याची माहिती आहे; पण राज्य सरकारने जर मराठी पाटीबाबत कायदा केलेला आहे, नुकतीच मंत्रिमडळात त्याला एकमुखाने, बहुमताने, सर्वानुमते मंजुरी झालेली आहे. त्याचे स्वागतही झालेले आहे, तर हा खटला शिल्लक राहतोच कसा हा प्रश्न आहे. यामुळे कोर्टाच्या कामाचा किती वेळ अनावश्यक घेतला जातो? असे किती तरी खटले विविध न्यायालयांत प्रलंबित आहेत. हे तातडीने निकाली लावणे आवश्यक आहे.


लोकशाहीत आंदोलन हा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक आंदोलनात खटले दाखल होतात, गुन्हे नोंदवले जातात. आपल्याकडे सातत्याने अशी आंदोलने होत असतात. या प्रत्येक आंदोलनातील आंदोलकांवर जे गुन्हे नोंदवले जातात, ज्या केसेस केल्या जातात त्या वर्षानुवर्ष चालवणे थांबले पाहिजे. आंदोलकांमध्ये मोठ्या संख्येने तरुण असतात, विद्यार्थी असतात, कॉलेजला जाणारी युवाशक्ती असते. त्यांच्यावर गुन्हे नोंदवल्याने, कोर्टाच्या केसेस असल्याने त्यांच्या करिअरमध्येही अनेकवेळा अडथळे निर्माण होतात. त्यामुळे हे खटले वेळेवर निकाली काढले गेले पाहिजेत. आंदोलकांकडून काही गंभीर गुन्हे झाले असतील, तर त्याचे वेगळे खटले केलेपाहिजेत; पण त्याबाबत कालमर्यादा निश्चित केली गेली पाहिजे. या प्रकारातील दिरंगाई कमी करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. सर्वच राजकीय पक्ष कोणत्या ना कोणत्या कारणाने आंदोलने करत असतात. आज सत्तेत असलेले उद्या सत्तेत असतीलच असे नाही. मग त्या रखडलेल्या खटल्यांचा दुरुपयोग केला जाण्याची शक्यता निर्माण होते. यासाठी राजकीय आंदोलनाचे खटले हे वेळेवर मार्गी लागण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकजुटीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

मनसेचे नेते राज ठाकरे यांना दहा वर्षांनी नोटीस आली, म्हणून हा विषय समोर आला; पण आपल्याकडे अशी किती तरी आंदोलने आहेत की, त्यातील आंदोलकांवर गुन्हे नोंदवले गेले आहेत. त्यांच्यावर केसेस दाखल केल्या आहेत. असे किती तरी खटले संपूर्ण देशभरात असतील. त्याचा एकत्रित विचार करून याबाबत ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. शेतकºयांची आंदोलने आहेत. दूध उत्पादकांची आंदोलने आहेत. विविध कर्मचारी संघटनांची, कामगार संघटनांची आंदोलने आहेत. शिक्षकांची आहेत, फेरीवाले, विक्रेते अशी किती तरी आंदोलने सतत होत असतात. त्यामध्ये अनेकवेळ राजकीय पक्ष उतरतात. नुकतेच एसटीचे मोठे आंदोलन, संप महाराष्ट्रात घडला आहे. यातही अनेक पक्षांनी सहभाग घेतला. त्याला बिगर राजकीय म्हणता म्हणता राजकीय वळण लागले. यातील आंदोलकांवर गुन्हे नोंदवले गेले. त्यांनी कायदा हातात घेतला. हे सतत कुठे ना कुठे तरी होत असते; पण यामुळे जनजीवन विस्कळीत होते. एसटीचे आंदोलन मिटवण्यात सरकार यशस्वी झालेले असले, तरी एसटी अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. त्यात अजून कित्येक जणांवर कुठे ना कुठे खटले आहेत. असे सगळे खटले सामोपचाराने मोडीत काढून, निकाली काढून जनजीवन विस्कळीत झाले असेल, तर ते पूर्वपदावर आणण्याची गरज आहे. त्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. दहा-दहा वर्षे खटले प्रलंबित राहणे योग्य नाही, यातील दिरंगाई दूर करणे गरजेचे आहे.

3 may

निरूत्तर

 


गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून ज्या गोष्टीची चर्चा होती त्या दोन सभा १ मे या दिवशी झाल्या. त्या म्हणजे औरंगाबाद येथील राज ठाकरे यांची भोंगा सभा आणि मुंबईतील देवेंद्र फडणवीस यांची पोलखोल सभा. दोन्ही सभा या दणदणीत झाल्या आणि त्या सभांमधून ज्यांच्यावर टीका केली त्या दोघांनाही निरूत्तर करणाºया होत्या.

मनसे-भाजप युती होणार, मनसे ही भाजपची बी टीम आहे, ती सुपारीबाज सभा होती, अशा त‍ºहेची टीका महाविकास आघाडीकडून करण्यात आली असली, तरी या दोन्ही सभांमधून निर्माण केलेल्या प्रश्नांनी दोन पक्ष निरूत्तर झालेले आहेत, हे नक्की. त्यांचे प्रवक्ते, नेते याला उत्तर म्हणून दिशा भरकटवण्याचे काम करतील; पण प्रश्नाला उत्तर देणार नाहीत हे नक्की. महाविकास आघाडीतील दोन पक्ष महत्त्वाचे आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. शिवसेनेच्या नावाने हे सरकार आहे, तर सरकार चालवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे भाजप आणि मनसे यांनी एकाच दिवशी दोन सभा घेऊन एकीकडे शिवसेनेला, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले होते. यात लक्ष्य केल्यानंतर उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नांचे उत्तर हे दोन्ही पक्ष देऊ शकणार नाहीत, तर फक्त टीकेवर टीका करतील. आजकाल राजकारणात विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी तुम्ही केंद्रात काय करताय, केंद्राने करावे, अशी बोलण्याची त‍ºहा सत्ताधारी दाखवतात. त्यातून त्यांचे पितळ ब‍ºयाचवेळी उघडे पडते. आपण उत्तर दिले आहे, याचे समाधान प्रवक्त्यांना वाटते; पण जनता, मतदार त्यामुळे ओळखते की, विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास हे सरकार कमी पडत आहे. विरोधकांनी कोणताही प्रश्न उपस्थित केला की, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लगेच केंद्राकडे बोट दाखवायचे. अरे हे राज्य करण्याबाबत निर्णय घ्यायला हा काय केंद्रशासित प्रदेश आहे का? ज्या ज्या वेळी विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत, तेव्हा तेव्हा शिवसेनेचे नेते, राष्ट्रवादीचे नेते निरूत्तर होतात आणि केंद्राने आम्हाला करून द्यावे, म्हणून मोकळे होतात. यातून केंद्र सरकार करू शकते, आम्ही करू शकत नाही हा संदेश जातो. हे या राज्यकर्त्यांना समजत नाही. हीच कमजोरी विरोधकांनी ओळखून पोलखोल आणि भोंगा सभेत सरकारला निरूत्तर केले आहे.


खरंतर शिवसेनेचे नेते म्हणत आहेत की, याला १४ तारखेच्या सभेत आम्ही उत्तर देऊ; पण १४ तारखेची सभा ही शिवसेनेची आहे, सरकारची नाही. या दोन सभांमधून विशेषत: राज ठाकरे यांच्या सभांमधून राज्य सरकारला जो प्रश्न विचारला होता, त्यासाठी १४ तारखेपर्यंत कसे थांबता येईल? राज ठाकरे यांचा सवाल आहे की, सरकार भोंगे उतरवणार की नाही?, शिवसेनेने भोंगे उतरवावे, असे त्यांनी कधीच म्हटलेले नाही. त्यामुळे राज्य सरकार म्हणून आता २४ तासांत काही कृती होणार का, याकडे जनतेचे लक्ष लागून राहिलेले आहे. हे भोंगे उतरवले गेले नाहीत, तर काही गडबड होईल याची चिंता संपूर्ण महाराष्ट्राला असताना सरकार गप्प बसणार आहे का?, सत्तेसाठी संपूर्ण राज्याचा बळी दिला जाणार आहे का?

या प्रकारामुळे बदनामी शिवसेनेची होणार आहे, तर फायदा राष्ट्रवादी करून घेणार आहे. पोलखोल सभेत महापालिकेतील अनियमीत व्यवहार आणि भ्रष्टाचारावर टीका केली, त्याचे उत्तर महापालिका आणि शिवसेना देणार आहे का?, का त्याबाबतही केंद्राने काय केले आणि काय केले नाही असेच उत्तर देणार? ते देता न आल्याने निरूत्तर होणार का, हा प्रश्न आहे.


राज ठाकरे यांच्या सभेत तेच ते मुद्दे होते, असा आरोप राष्ट्रवादीकडून केला जात आहे; पण तेच मुद्दे होते, तर ते खोडून का काढता आले नाहीत, याचे उत्तर महाराष्ट्राला हवे आहे.

१ मे रोजीच्या सभेत भाजपने पुन्हा बाबरीचा विषय काढला होता. बाबरीचा ढाचा जेव्हा पाडला, तेव्हा आदरणीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, ही मशीद जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल, तर मला त्यांचा अभिमान आहे. हे त्या कृतीचे कौतुक होते; पण याचा अर्थ असा नाही होत की, शिवसैनिक तिथे गेले असतील. नेमका हाच धागा पकडून शिवसेनेचे नेते हे भाजपचे नेते कुठे बिळात लपले होते, असा सवाल करतात. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केलेल्या सवालाला उत्तर शिवसेनेने दिले पाहिजे ही तमाम महाराष्ट्राची अपेक्षा आहे. ३० वर्षे हे आरोप किती भाजप नेत्यांनी घेतले, कोणावर किती खटले झाले, कोणी तुरुंगवास भोगला याची यादीच जाहीर करत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला सवाल केला की, कोणत्या शिवसेनेच्या राज्यातील नेत्याचा यात समावेश आहे? हा प्रश्न अर्थातच बिनतोड आहे. त्याला सडेतोड उत्तर देण्याची शिवसेनेकडून अपेक्षा केली जात आहे. आता १४ तारखेला उत्तर देतीलच, कारण उत्तर तयार करायला त्यांना तेवढा कालावधी हवा. पण प्रश्नाला उत्तर हे प्रश्नाने द्यायचे नसते, तर ते अचूक द्यायचे असते. याला शिवसेनेने उत्तर जर महाराष्ट्रातील कोणते भाजप नेते होते, असा सवाल केला तर ते त्यात फसतील. यासाठी बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यासाठी जे शिवसैनिक कारसेवेला गेले होते, त्यांची यादीच आता वाचून दाखवली पाहिजे. कोणाला कुठे अडवले, कोण कुठपर्यंत पोहोचले, कोणी तुरुंगवास सोसला याची यादीच त्यांनी दिली, तर हे भाजपचे नेते गप्प बसतील.


आता सगळ्यांनाच राम आठवायला लागला आहे. अगदी काँग्रेससुद्धा राम जप करायला लागली आहे, राज ठाकरे अयोध्येला जाण्याच्या तयारीत आहेत, शिवसेनेने तर २०१९च्या निवडणुकीपूर्वी पहले मंदिर फिर सरकार, अशी घोषणा दिली होती. शिवनेरीची मातीही तिकडे नेली होती. पण अयोध्येपर्यंत पोहोचण्याचा मार्ग कुणी खुला केला. बाबरीचा ढाचा कोणी पाडला याची कबुली देण्यासाठी कोण येतो आहे, हे महाराष्ट्राला अपेक्षित उत्तर आहे.

रविवारच्या झालेल्या दोन सभांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला निरूत्तर केलेले आहे. त्याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. त्यासाठी अगदी बाबरी पाडायला कोण गेले, कोण नाही याची यादी नसली तरी किमान सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे भोंग्यांबाबत आम्ही धोरण आखतो, अशी तरी घोषणा करणे आवश्यक आहे. भोंगे हा विषय सर्वच धर्मांसाठी आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याची हनुमान चालिसा रोखता आली, तशी मनसेची हनुमान चालिसा ४ मेपासून सुरू होण्याअगोदर ती रोखण्यासाठी हे सरकार काय धोरण आखते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे. हा प्रश्न ज्या कौशल्याने हे सरकार सोडवेल त्यावरून त्यांची कर्तबगारी सिद्ध होणार आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीतील प्रश्नाकडे हे सरकार केंद्राकडे बोट दाखवणार नाही, ही अपेक्षा आहे. राज्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अन्य राज्यांकडे बोट दाखवण्याची गरज नाही. योगींनी केले त्याचे अनुकरण करायला नको, म्हणून ममतांनी नाही केले, नितीशजींनी नाही केले असली पळवाट महाराष्ट्राला नको आहे.

2 may

युगादी


वैशाख शु्द्ध तृतिया म्हणजेच अक्षय्य तृतीया हा भारतीय हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्वाचा दिवस. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. आपली एकुणच संस्कृती ही कृषीप्रधान असल्याने शेतकºयांच्या दृष्टीने हा शेतीचा मूहूर्त करणारा आणि चांगले पिक यावे म्हणून असलेला उत्तम मुहूर्त आहे. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते. बरेचसे शब्द मराठी ग्रामीण भाषेत बोलताना त्याचे अपभृंश होतात, त्यातून कोणी आकीती म्हणतं. पण हा एक अत्यंत चांगला आणि पवित्र असा दिवस मानला जातो.


या दिवशी अन्नपूर्णा (देवी) जयंती, नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंती असते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे. १८ पुराणे लिहून झाल्यानंतर आता आपले काम पूर्ण झाले असे समजून कामातून निवृत्ती घेण्याचा विचार व्यासांनी केला होता. परंतु जोपर्यंत महाभारत लिहित नाही आणि त्यातील गीतोपदेश जगापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुम्हाला पूर्णत्व येणार नाही असे भगवंतांनी त्यांना सांगितले. परंतु आता मी थकलो आहे, लिहिण्याची ताकद नाही असेत्यांनी भगवंतांना सांगितले. तेंव्हा भगवंतांनी तुला उत्तम लेखनीक देतो असे सांगितले आणि श्री गणेशाला त्यांच्याकडे पाठवले. श्री गणेश हा पहिला स्टेनो टायपीस्ट, पहिला संगणक, पहिला लेखनीक आणि वेगाने काम करणारा पहिला फॉर्म्युला आहे. त्या श्री गणेशाने व्यासकृत महाभारत लिखाणास सुरुवात केली तो हा दिवस.

अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असला तरी, जर त्यादिवशी किंवा त्या दिवसापूर्वी गुरूचा किंवा शु्क्राचा अस्त झालेला असेल तर विवाहादी मंगल कार्ये करू नयेत असे काही ज्योतिष्यांचे मत आहे. या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय्य तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते. नर-नारायण या दोन देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता असे मानले जाते. परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जाते. या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते.


वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो अशी भारतीय संस्कृतीत धारणा आहे.

कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (‍अविनाशी) होते'. या दिवशी गंगेचे स्वगार्तून पृथ्वीवर अवतरण झाले अशीही आख्यायिका प्रचलित आहे.


जैन धर्मातही या दिवसाचे खूप महत्व आहे. भगवान वृषभदेव यांनी मोक्ष प्राप्त करण्यासाठी सहा महिने तप करावे लागले. त्याकाळात त्यांनी अन्नपाणी ग्रहण केले नव्हते, व त्यानंतर ते एकदा ग्रहणा साठी निघाले परंतु लोकांना आहार दानाची योग्य विधी माहीत नसल्या कारणाने त्यांना अजुन पुढील सहा महिने आहार घेता आला नाही अर्थात त्यांचा वर्ष भर उपवास झाला. एकदा हस्तिनापूर येथे ते आले असता तेथील राजाने त्यांना उसाचा रसाचा आहार दिला. तो दिवस अक्षय्य तृतीयेचा होता.

महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना व पूजा करतात. चैत्रातील एखाद्या दिवशी हळदीकुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलावून मोगºयाची फुले किंवा गजरा, आंब्याची डाळ आणि पन्हे देतात. हरभºयांनी ओटी भरली जाते.त्या हळदीकुंकू समारंभांचा (गौरी उत्सवाचा) अक्षय्य तृतीया हा शेवटचा दिवस असतो. या दिवशी चैत्रगौर उठवली जाते आणि पुन्हा देवघरात आणली जाते.


अक्षय्य तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात कृत, त्रेता, द्वापार आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणाºया काळाला महायुग असे म्हणतात. ही चार युगे महायुगाचे चार चरण असल्याचे मानले जाते. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला कल्पादीं' तसेच त्रेतायुगाचा १२,९६,००० सौर वर्षाएवढा त्रेतायुगाचा काळ प्रारंभ म्हणजे युगादी ही तिथी वैशाख शुद्ध तृतीयेला येते

या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते. बलरामाचे शस्त्र हेनांगर आहे. त्यामुळे तो शेतकºयांचा देव आहे. मातीत आळी घालणे व पेरणी ही कामे आवर्जून या दिवशी करतात. अक्षय्य तृतीयेनंतर पावसाळा येणार असतो. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे. मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे. या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृत्तिकेबद्दल कृतज्ञ भाव ठेवून काही शेतकरी पूजन केलेल्या मृतिकेमध्ये आळी घालतात. कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूरात आषाढात बेंदूर असतो. त्यामुळे आकीतीला आळं अन बेंदराला फळं हे शेतकºयांचेनियोजन असते. यादिवशी घातलेल्या वेलांना बेंदराच्या दरम्यान फळं येतात. काकडी, भोपळा, दोडका, दुधीभोपळा याचे विपूल पिक येते. या दिवशी घातलेल्या लाल भोपळ्याचे वेलाला आलेलेभोपळे वर्षभर विविध सणांसाठी, देवदिवाळीला घारगे बनवायला वापरले जातात.


महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्या कारणाने एकदा पावसाला सुरुवात झाली की, सतत पाऊस पडत राहिल्याने सुपीक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे पावसाळा तोंडावर असतांना मशागत केलेल्या भुसभुशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपे जाते. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे. आयुवेर्दात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही, अशी समजूत आहे.

याशिवाय हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो.पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात तांदळाची खीर, कैरीचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट दान करतात. असे केल्याने पितरांचा संतोष होतो असे मानले जाते.


या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कायार्चे फळ अक्षय्य(न संपणारे) असे मिळते.अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्‍त करून देणाºया देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाºया त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही.

प्रफुल्ल फडके/ संस्कृती


9152448055

सभाशास्त्र संपुष्टात


कोणत्याही राजकीय पक्षाची जाहीर सभा म्हटल्यावर प्रमुख वक्ता कोण आहे ही उत्सुकता असते. अमुक एक प्रमुख वक्ते आहेत, म्हणून प्रेक्षक ते काय बोलणार आहेत हे ऐकायला आवर्जून जात होते. राजकीय सभांना नागरिकांनी गर्दी करणे ही एक संस्कृती होती, त्याचप्रमाणे सभा नावाचे एक शास्त्र होते. सभा मग ती जाहीर असो वा संस्थेची अंतर्गत ती त्या प्रथेप्रमाणेच चालवली जायची. या सभेला उपस्थित असणाºया प्रत्येकाची दखल घेण्याची प्रथा होती. पण सभा या प्रकाराला एक प्रतिष्ठा होती. सभा म्हणजे फक्त कोणा एका वक्त्याने तासभर बोलणे आणि गर्दी जमवणे असा प्रकार नव्हता.


किंबहुना बीकॉम, बीएच्या अभ्यासक्रमातही एसपी किंवा सेक्रेटेरियल प्रॅक्टिस या विषयांत किंवा चिटणीसाचा व्यवसाय या विषयात सभाशास्त्रावर भरपूर प्रकरणे होती. कोणती सभा कशाप्रकारे घेतली जाते याची नियमावली होती. सभेची सूचना, कार्यक्रमपत्रिका वगैरे विषय अत्यंत महत्त्वाचे होते. याची पद्धती सभेच्या स्वरुपाप्रमाणे बदलत असली, तरी त्याची एक शास्त्रीय बैठक आणि संस्कृती होती. ती आजकाल बघायला मिळत नाही. याचे कारण मुख्य वक्त्यांनी आयत्यावेळी व्यासपीठावर येण्याची प्रथा सुरू झाली आणि सभेचे सांस्कृतिक स्वरूप नष्ट झाले.

पूर्वीच्या काळात अगदी १९७०च्या आणि आणीबाणीनंतरच्या काळातही अनेक मोठ्या वक्त्यांच्या जाहीर सभा झाल्या. हजारोंच्या संख्येने श्रोते या सभांना येत असत. त्याकाळी कॅमेरे, टीव्ही वाहिन्या नव्हत्या. त्यामुळे त्या विराट सभांचे चित्रीकरण नसेलही. पण त्या सभा सुसंस्कृत आणि सभाशास्त्राप्रमाणे होत असत. हे आजकाल बघायला मिळत नाही. त्यामुळे त्या सभेचे पावित्र्य राहत नाही. फक्त गोंधळ आणि घोषणा. म्हणजे एखाद्या गृहिणीने तासन्तास राबून सुग्रास स्वयंपाक बनवला असेल, तर तिची अपेक्षा असते की, तो ताटात व्यवस्थित सजवून, डावीकडचे उजवीकडचे क्रमाने वाढून ताट सजवून, त्याभोवती रांगोळी घालून सर्वांनी बसून जेवावे. पण अचानक कोणीतरी हात घालतो आणि बुफे असल्याप्रमाणे हात घालून खायला लागतो. त्यावेळी जसे त्या अन्नाचे पावित्र्य जाते तसेच आजकाल सभांचे होताना दिसते आहे.


हजारोंच्या गर्दीपुढे पूर्वी यशवंतराव चव्हाण, चरणसिंग, एस. एम. जोशी अशा कितीतरी एकसेएक वक्त्यांच्या सभा पाहिल्या आहेत. पण ते नेते कितीही मोठे असले, तरी शास्त्रशुद्ध पद्धतीनेच सभा साजºया केल्या जात होत्या. यामध्ये पाहुण्यांचे स्वागत, पाहुण्यांचा परिचय, सभेचा अध्यक्ष, प्रमुख वक्ता, आभार प्रदर्शन हे सर्व प्रकार असायचे. पाहुणा कितीही मोठा असला, तरी त्या पाहुण्यांचा परिचय करून देण्याची प्रथा होती. सभेला जो अध्यक्ष असायचा त्याचे नाव पुकारणे, त्याला अनुमोदन देणे, त्याच्या अध्यक्षतेखाली ही जाहीर सभा होत असताना प्रमुख वक्त्याने सर्वांची दखल घेणे, त्यानंतर अध्यक्षांचे सर्वात शेवटी भाषण होणे आणि मग आभार प्रदर्शन. अगदी सतरंज्या गुंडाळणाºयांपासून ते मंडपवाले, लाऊडस्पिकरवाले सर्वांचे आभार मानले जायचे. अध्यक्ष, पाहुणे, प्रमुख वक्ते हे वेळेवर हजर होत असत. उशीर झाला तरी सर्वजण आल्याशिवाय सभा सुरू केली जात नव्हती. ही सगळी संस्कृती आजकाल मोडीस निघालेली दिसते. त्यामुळे सभांचे पावित्र्यही राहिलेले दिसत नाही.

दीप प्रज्ज्वलन करायला कोणी वेगळाच, प्रतिमांना हार घालणारे वेगळेच, प्रमुख वक्ता येईपर्यंत प्रेक्षकांना थोपवून ठेवण्यासाठी तळातल्या नेत्यांनी भाषणे करायची आणि वेळ मारून न्यायची असल्या प्रकारांनी संपूर्ण जाहीर सभांचे शास्त्र आणि संस्कृती धुळीस मिळवली आहे. पूर्वी कितीही मोठा नेता असला, तरी आयोजक समोर उपस्थित प्रेक्षकांसमोर त्याचा परिचय करून द्यायचे, स्वागत केले जायचे आणि अध्यक्षांच्या संमतीने त्याला बोलायला लावले जायचे. आजकाल जाहीर सभांना अध्यक्ष हा प्रकारच नसतो. पूर्वी राष्ट्रगीताने सभेचा समारोप व्हायचा आणि सर्व दिग्गज नेतेही शेवटपर्यंत थांबायचे. पण आजकाल ही सभ्यता कुठे दिसत नाही. स्टेजवर बोलणाºया प्रत्येकाचे बोलणे ऐकून घेतले जात होते.


आजकाल सभा ही इव्हेंट झालेली आहे. त्याची मॅनेजमेंट ठेकेदारांना, इव्हेंट मॅनेज करणाºया संस्थांना दिली जाते. त्यामुळे स्टेज उभे करण्यापासून ते खुर्च्या मांडणे यापैकी कार्यकर्त्यांना काहीच करावे लागत नाही. सगळ्या गोष्टी पैसे टाकून केल्या जातात, त्यामुळे कार्यकर्ते फक्त छान छान कपडे घालून घोषणा देण्यापुरते दिसतात. यातून सभेची सभ्यता त्यांना समजत नाही, हे गेल्या काही वर्षांत अधोरेखित झालेले दिसते. अमूक एका नेत्याची सभा आहे हे जाहीर केले जाते आणि सायंकाळी सहाची सभा असली, तर नेता ८ ला येणार. सहा ते आठ तळातल्या लोकांनी खिंड लढवत आपली भाषणे ठोकायची. म्हणजे पूर्वी महाराष्ट्रातल्या जत्रांमधून कुस्तीचे फड भरायचे. त्यात हिंद केसरी वगैरे पेहेलवानांच्या कुस्तीची जाहिरातबाजी व्हायची. दादू चौगुले आणि सतपाल यांची कुस्ती अशी जाहिरात केली जायची. ती पाहायला फडावर गर्दी जमायची. ती कुस्ती सुरू होण्यापूर्वी छोट्या मुलांच्या कुस्त्या लावल्या जायच्या. वीस-पंचवीस अशा छोट्या कुस्त्या झाल्यावर मग निकाली कुस्ती लावली जायची. तसा प्रकार आता सभांबाबत होतो. त्यामुळे सभा झाल्यावर नंतर राजकीय कुस्त्या होताना दिसतात. विचार संपला, संस्कृती संपली आणि सभेचे शास्त्र संपले. सभेला इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाले आणि माणसे माणसांपासून दूर गेली. सभा माणसांना एकत्रित करण्यासाठी, समाजाला जोडण्यासाठी घेतल्या जात होत्या. आजकाल त्या समाजात फूट पाडण्यासाठी घेतल्या जात आहेत असे वाटते. त्यामुळे सभेतून विचारांपेक्षा करमणुकीला जास्त महत्त्व आलेले दिसते.

- प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाइन्स


9152448055\\

आपली जबाबदारी


राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे सर्वांनी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे असल्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले. त्याचप्रमाणे आरोग्यमंत्र्यांनीही रविवारी मास्कसक्ती होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सरकारने सक्ती करण्यापूर्वीच स्वत:ची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सगळ्या गोष्टी सरकारने करणे आवश्यक नाही. आपणच निग्रहाने मास्क वापरायला सुरुवात केली पाहिजे.


गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे चौथ्या लाटेला जर रोखायचे असेल, तर पुन्हा एकदा आपण स्वत:हून मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि कोविड प्रतिबंधक लस प्राधान्याने घेण्याची गरज असल्याचे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. सांगलीत महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस दलाच्या परेड ग्राऊंडवर आयोजित केलेल्या सोहळ्यात जयंत पाटील बोलत होते. कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले, तरीही राजकीय कार्यक्रम सर्वच पक्षांकडून गर्दीने केले जात आहेत. राजकीय नेत्यांचे निरीक्षक असतात, त्यांच्या अंतर्गत तपास यंत्रणा असतात. त्यांना अगोदरच याची कुणकूण लागलेली असते. फक्त निर्णय उशिरा घेतले जातात, सोयीने घेतले जातात. असे होता कामा नये. यासाठी सरकारने काही करण्यापूर्वीच नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

खरंतर कोरोनाच्या तीन लाटांचा यशस्वीपणे सामना करून आपण धैर्याने उभे आहोत; पण आता चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. या चौथ्या लाटेला उबंरठ्यावरच रोखायचे असेल, तर पुन्हा एकदा आपण स्वत:हून मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि कोविड प्रतिबंधक लस प्राधान्याने घेणे आवश्यक आहे. कोविडच्या चौथ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सज्ज करण्याचे निर्देश सरकारने दिलेले आहेत. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांबरोबर बैठक घेतली होती आणि परिस्थितीचा आढावा घेतला होता. ही सगळी लक्षणे पुढची लाट येण्याची शक्यता दाखवत आहेत. असे असताना नागरिकांनी अगोदरच सज्ज असले पाहिजे. खरंतर आज एक महिना होईल निर्बंध शिथिल करून. मास्कबंदी उठवली नव्हती, तर मास्क ऐच्छिक ठेवला होता. त्यामुळे आपण गेल्या दोन वर्षांपासून लागलेली मास्कची सवय कशाला बंद करायची हा प्रश्न आहे. पुन्हा आपल्याला बंधने नको असतील, तर आपण स्वयंशिस्त पाळणे अनिवार्य आहे.


महाराष्ट्राने समाज जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. कृषी, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, संशोधन, साहित्य, नाटक, चित्रपट, कला, संस्कृती अशा सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्राने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. देशातील प्रगतशील आणि पुरोगामी राज्य म्हणून आज महाराष्ट्राचा लौकिक आहे. असे असताना आपण प्रत्येक गोष्ट सरकारने करावी असा आग्रह धरणे चुकीचे राहील. ही चौथी लाट येण्यापूर्वीच आपण सज्ज राहिलो आणि ती थोपवली, तर त्यातून आपला फायदा होणार आहे. सतत बंद करून उद्योग, व्यवसाय, शाळा बंद ठेवून कोणाचे भले होणार आहे? आता बंद न करता कोरोना बरोबर जगायची सवय लावायची असेल, तर ही बंधने, मास्क वापरणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने सक्ती करावी आणि फतवा काढावा याची वाट पाहण्याची गरज नाही. गेल्या महिनाभरात लोकलमधून अनेक जण विनामास्क हिंडताना दिसतात. गर्दीच्या ठिकाणी मास्क हा कायमच वापरला पाहिजे. त्यासाठी कोरोना आहे की, गेला याचा विचार न करता कोणत्याही आजारापासून, संसर्गापासून रोखण्याचा तो उपाय आहे. आपल्या सुरक्षेसाठी त्याची गरज आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

गेल्या आठवड्यात दररोज रुग्णांचा आकडा वाढताना दिसत होता. मागच्या महिन्यात दररोज हजारच्या आत रुग्णसंख्या आलेली असताना, पुन्हा एकदा साडेतीन हजारांच्या पुढे हा आकडा गेला. कोरोनामुळे मृत्यू पावणाºयांच्या संख्येतही वाढ होताना दिसली. संपूर्ण देशात ही परिस्थिती नसली, तरी काही विशिष्ट राज्यांत हा आकडा वाढताना दिसला आहे; पण ही जी राज्ये आहेत त्यातून अन्य राज्यात प्रवास करणाºयांची संख्या मोठी आहे. आपण राज्य बंदी करू शकत नाही. कोणाला येण्यापासून रोखू शकत नाही. त्यामुळे आपल्यालाच काळजी घेणे आवश्यक आहे. सगळे अहवाल येईपर्यंत, सरकारी नियंत्रणे लावेपर्यंत खूप वेळ जातो. तोपर्यंत हा प्रसार वेगाने वाढण्याची भीती असते. यासाठी आपण सावध राहणे आवश्यक आहे. शक्य तिथे आणि शक्य तितके अंतर राखून राहणे आणि मास्क वापरणे याला आज तरी कोणताही पर्याय नाही. विनाकारण वाद घालण्यात, विरोध करण्यात काहीही अर्थ नाही. संकट आल्यावर त्याच्याशी मुकाबला करायला जाण्यापेक्षा संकट येऊच नये यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणजे मास्क वापरणे हा आहे. सरकारच्या सक्तीची वाट न पाहता आपण मास्क वापरला पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. 

मंगळवार, २६ एप्रिल, २०२२

हाथी चले अपनी चाल


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संयमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. कुणी कितीही टीका करण्याचा प्रयत्न केला, तरी त्याला प्रत्युत्तर देण्याच्या फंदात न पडता आपल्या कृतीतून जे ते उत्तर देतात ते नावाजण्यासारखे आहे. भारतीय जनता पक्षाचे किरीट सोमय्यांपासून छोट्या कार्यकर्त्यांपर्यंत एकीकडे टीकेची झोड उठवत असताना, आमचा कार्यकर्ता, शिवसैनिक ही आमची ताकद आहे, हे त्यांनी अत्यंत चाणाक्षपणे दाखवून दिले. अनुल्लेखाने टीकाकारांची तोंडे बंद केली, याला म्हणतात राजकारणातील मुत्सद्देगिरी.

मुंबईत रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. पहिलाच लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार त्यांना जाहीर झाला होता. या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी ते मुंबईत आले होते; पण पंतप्रधानांनाही बेदखल करून मुख्यमंत्र्यांनी आपल्या शिवसैनिकाला प्राधान्य दिले.


तुमच्या पक्षाचे आणि आमचे जमत नाही, आमच्यावर टीका करायची मग तुमच्या स्वागताला राजशिष्ठाचार म्हणून आम्ही का यावे?, आपल्या सरकारमधील प्रतिनिधी पाठवला आणि आमच्याकरता तुम्ही बिलकुल महत्त्वाचे नाही, आमच्यासाठी आमचा शिवसैनिक महत्त्वाचा आहे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. पंतप्रधान आणि लता मंगेशकर कुटुंबीयांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आणि आपल्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला त्यांनी महत्त्व दिले. गेले काही दिवस त्या नवनीत राणा, रवी राणा या प्रकरणावरून भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेवर, मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत. काही उद्योग नसल्यागत सगळ्या वाहिन्या आपापले कॅमेरे मातोश्रीवर लावून बसले आहेत, पण या सगळीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आम्ही तुमच्या टीकेला, भुंकण्याला काडीचीही किंमत देत नाही, हे त्यांनी दाखवून दिले. हाथी चले अपनी चाल या उक्तीप्रमाणे त्यांनी बेदखल करून या सर्व प्रकारांना उत्तर दिले हे फार महत्त्वाचे होते. आदळआपट करून काही होत नाही शांतपणाने काम केले, तर काही तरी ठोस उत्तर देता येते, झोंबेल असे ते उत्तर असते, हे त्यांनी कृतीतून दाखवले, ही बाब अत्यंत लक्षात ठेवण्यासारखी आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगेशकर कुटुंबीयांचा कार्यक्रम असताना, तीच वेळ साधत रविवारी अचानक चंद्रभागा शिंदे या ९२ वर्षांच्या महिला शिवसैनिकाच्या घरी भेट दिली, म्हणजे मुख्यमंत्र्यांना त्या कार्यक्रमात सन्मानाने बोलावले होते, दोन दिवस माध्यमात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर येणार अशा चर्चा होत्या; पण त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री गेलेच नाहीत. माझ्या दृष्टीने पंतप्रधान महत्त्वाचे नाहीत, माझ्या दृष्टीने लता मंगेशकर महत्त्वाच्या नाहीत तर शिवसैनिक महत्त्वाचा आहे, हे दाखवण्याला त्यांनी प्राधान्य दिले. बरे गेले काही महिने ते आजारी होते, त्यामुळे आजारपणामुळे मुख्यमंत्री कार्यक्रमाला आले नाहीत, अशी बातमी येऊ नये यासाठी त्यांनी आपण ठणठणीत आहोत, हे दाखवत सहकुटुंब ज्येष्ठ शिवसैनिकांच्या घरी जाण्याचा कार्यक्रम केला. याला राजकीय मुत्सद्देगिरी म्हणतात. गेल्या चार-पाच दिवसांतील घटना पाहता कोणत्याही नेत्याचा संयम सुटला असता. प्रतिक्रिया दिली असती, कडवट टीका केली असती; पण ते मुख्यमंत्र्यांनी टाळले. आपल्या एका कृतीतून त्यांनी काय-काय सिद्ध केले?


मुख्यमंत्र्यांच्या या अचानक घडलेल्या कार्यक्रमामुळे भाजपची नियोजित असलेली पोलखोल सभा रद्द करावी लागली. ज्या ठिकाणी चंद्रभागा शिंदे राहतात त्याच बिल्डिंगच्या खाली भाजपची रविवारी त्याचवेळी पोलखोल सभा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी स्टेज देखील उभारण्यात आला होता; मात्र मुख्यमंत्र्यांच्या गाड्या जाण्यासाठी हे स्टेज तोडावे लागले. हाथी चले अपनी चाल म्हणतात ते असे. अनुल्लेखाने मारणे म्हणतात ते असे.

मुख्यमंत्री येऊन गेल्यानंतर देखील या सभेला परवानगी नसल्याचे कारण देत पोलिसांनी उद्या ही सभा घ्या, असे आवाहन केले. या सभेला भाजप नेते नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर संबोधित करणार होते. सभा अचानक रद्द झाल्याचे दिसताच भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली; मात्र नितेश राणे यांनी सभेच्या ठिकाणी येऊन पोलखोल सभेला मुख्यमंत्री आणि सरकार घाबरत असल्याचे सांगितले, तसेच सोमवारी दणक्यात ही सभा घेऊ, असेही त्यांनी जाहीर केले; पण भाजपचा डाव मोडण्यात आपण वारंवार यशस्वी झाल्याचे त्यांनी दाखवून दिले.


२०१९ ला भाजपला मुख्यमंत्री बनवायचा होता; पण तो डाव काँग्रेस-राष्ट्रवादीला बरोबर घेऊन त्यांनी उधळून लावला. तोच प्रकार त्यांनी काल केला. आमचे शिवसैनिक सर्वांना भारी आहेत. तेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांच्यापुढे कोणी पंतप्रधान असोत नाही, तर कुणी भारतरत्न असोत. आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, ते आमचे शिवसैनिक. ही त्यांची मुत्सद्देगिरी अत्यंत दखल घेण्यासारखी आहे.

विरोधकांनी आगामी महापालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवून पोलखोल सुरू केली असली, तरी इथला मतदार आमच्या पाठिशी आहे, हे दाखवून निवडणुकीपूर्वी शिवसैनिकांत आशावाद निर्माण करण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले. ज्येष्ठ शिवसैनिकाच्या घरी जाऊन त्यांना घर देण्याचे, त्यांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याचे आश्वासन देऊन त्यांनी शिवसैनिकांत ऊर्जा निर्माण केलेली आहे. हे फार महत्त्वाचे होते. मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाहीत, दोन वर्षे मंत्रालयात गेले नाहीत, अशी टीका सातत्याने त्यांच्यावर होत होती; पण केव्हा घरातून बाहेर पडायचे असते, ते त्यांनी दाखवून दिले. पंतप्रधान आले, तरी आमच्यासाठी आमचा मतदार महत्त्वाचा आहे. आज या कृतीमुळे एका आजीला घर मिळाले, यात प्रत्येक शिवसैनिकाला समाधान आहे. प्रत्येक राजकारण्याने या कृतीतून काहीतरी शिकले पाहिजे.

चित्रकथी


लोककला आणि संस्कृतीमधील अनेक फॉर्म आपल्याकडे आजपर्यंत नाटकासाठी वापरले गेले आहेत. जांभुळआख्यान या नाटकासाठी गोंधळाचा फॉर्म वापरला होता. महानिर्वाणसाठी सतीश आळेकरांनी किर्तनाचा फॉर्म वापरला होता. अनेक नाटकांसाठी पथनाट्याचा वापर केला होता. पारंपरिक नटी सूत्रधाराचे फॉर्म वगळून ज्या मार्गाने कथा सांगितली जाते असे अनेक फॉर्म हे नाटकासाठी वापरले जातात. तसाच एक फॉर्म १९८० च्या दशकात एकांकीका आणि नाटकासाठी वापरला गेला होता. तो म्हणजे चित्रकथी.

चित्रकथी म्हणजे चित्रांच्या सहाय्याने सादर केलेली कथा. त्याप्रमाणे पडद्यावर पालखी आणल्याप्रमाणे रंगीत चित्रांचे फळे आणले गेले होते आणि त्यामागे खरे कलाकार. चित्र पुसल्याप्रमाणे, चित्रातील माणसांप्रमाणेच त्याची रंगभूषा वापरून बाहुल्या वाटाव्यात अशाप्रकारे कलाकारांचा वापर करून एक उत्तम नाट्य उभे केले होते. त्यासाठी हा चित्रकथीचा फॉर्म वापरला होता.


आदिवासी जीवनात चित्रकलेची फार मोठी परंपरा आहे. पिंगुळीच्या ठाकर आदिवासींचा चित्रकथी हा कलाप्रकार खूप नावाजलेला आहे. एका वेगळ्या चित्रशैलीतील परंपरा पिंगुळीच्या ठाकर आदिवासींनी जोपासली आहे; मात्र ही कला वारली कलेसारखी फक्त भिंतीचित्रांपुरतीच मर्यादित नसून, ती एक प्रयोगशील कला आहे. चित्रांच्या सहाय्याने कथा सांगण्याची कला म्हणजेच चित्रकथी.

‘वर्णकै: सह ये वक्तिस चित्रकथको वर: गायका यत्र गयन्ति विना तालेर्मनोहरम’, असा चित्रकथी कलेचा उल्लेख सोमेश्वराच्या मानसोल्लासमध्ये आढळतो. यावरून लक्षात येईल की, ही कला किती प्राचीन आहे ते. ठाकर आदिवासी १५ इंच लांब आणि १२ इंच रुंद आकाराच्या कागदावर एका विशिष्ट्य शैलीत चित्रे काढतात. वनस्पती आणि मातीच्या रंगाने ही चित्रे रंगवितात. रामायण, महाभारतातील एखादे आख्यान निवडून प्रसंगानुरूप चित्रे काढतात. कथानकाच्या घटनाक्रमानुसार त्यांचा क्रम ठरलेला असतो. कागदाच्या दोन्ही बाजूस ही चित्रे काढली जातात. एका कथानकाच्या चित्रांची एक पोथीच तयार होते.


चित्रकथी म्हणजे चित्रांद्वारे सादर केलेली कथा. या कथा सादरीकरणाला ठाकर कलावंत पोथी सोडणे म्हणतात. हे आदिवासी कलावंत गावातील मंदिरात चित्रकथीचा खेळ करतात. कलाकार मंदिरात घोंगडीवर मांडी घालून बसतात. सूत्रधार सर्वप्रथम पोथीची पूजा करतो. सूत्रधाराच्या समोर एक लाकडी फळी उभी केली जाते. सूत्रधाराच्या उजव्या हातात तीन तारी वीणा, तर डाव्या हाताच्या अंगठा आणि करंगळीमध्ये टाळ गुंतविलेला असतो. तर साथीदारांकडे डमरू आणि तुणतुणे ही वाद्ये असतात. सूत्रधार रिद्धीसिद्धीसह गणपतीचे चित्र फळीच्या आधाराने उभे करतो आणि गाऊ लागतो.

विघ्नहरासी गायो एकदंता देवागौरीहराचिया सुता सकट सरसी गुण गाता तुझे चरणी नमन माझे।। असे पद म्हणून गणपतीचे स्तवन करतो. त्यानंतर पान पलटून सरस्वतीचे चित्र समोर ठेवतो आणि सरस्वतीची आराधना करतो. रसिकांची मने जिंकू शकेन, अशी रसाळ वाणी मला दे अशी सरस्वतीकडे मागणी करतो आणि मग आख्यानाला सुरुवात करतो. रामायण, महाभारत आणि पौराणिक कथांवर आधारित आख्याने सूत्रधार सादर करतो. आख्यान सादर करताना प्रथम त्या प्रसंगाला अनुरूप असे चित्र फळीवर लावतात आणि त्याविषयी वर्णनपर ओवी गायली जाते आणि त्यानंतर त्या ओवीचे निरूपण सूत्रधार करतो, तसेच आख्यानातील पात्रांचे संवाद सूत्रधार आणि साथीदार बोलतात आणि कथानक पुढे नेतात, कथानकाच्या मागणीप्रमाणे वेगवेगळ्या प्रसंगाची चित्रे फळीवर लावली जातात. आख्यानाचे निरूपण करताना सूत्रधार मराठी भाषेसोबतच स्थानिक भाषेचा वापर विनोदासाठी करतो, तसेच काही दाखले देण्यासाठी विद्यमान घटनांचा आधार घेतात. सूत्रधाराचे निरूपण कौशल्य आणि गायनातील गोडवा रसिकांना खिळवून ठेवतो. पिंगुळीतील ठाकर आदिवासींकडे असलेल्या पोथ्यात रामायण, महाभारतातील अनेक आख्याने तसेच डांगीपुराण, नंदीपुराण, जालंदर वध, कपिलासूर अशी अनेक आख्याने आहेत. या आख्यानातील पदे, कवने आणि संवाद एका पिढीकडून दुसºया पिढीकडे मौखिक परंपरेने चालत असतात.


ही आपल्याकडे फार सुंदर लोककला आहे. पण कोणताही फॉर्म असला, कोणतीही लोककला, असली तरी त्यात रामायण आणि महाभारताशिवाय ती अपुरी आहे. दशावतार असोत व आणखी कोणत्याही प्रादेशिक नाटकांचा प्रकार त्याचप्रमाणे चित्रकथीतही अशा कथांचा वापर होतो, हे आपल्या संस्कृतीचे वैभव आहे. त्यामुळेच या फॉर्मची भुरळ रंगकर्मींना पडली.

प्रफुल्ल फडके/संस्कृती


9152448055\\

महाराष्ट्राला शांतता हवी आहे


गेले काही दिवस सर्वच राजकीय पक्षांनी महाराष्ट्राचे इतके वातावरण गढूळ केले आहे की, सगळीकडे अशांतता माजली आहे. महाराष्ट्रात असे वातावरण अभिप्रेत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या वक्तव्यामुळे भंग पावणारी अशांतता थांबवण्याची गरज आहे. सर्वच पक्षांत असे लोक आहेत, त्यांना आवर घालण्याचे काम सर्व पक्षांच्या नेत्यांनी केले पाहिजे. त्याचप्रमाणे सर्वच वृत्त वाहिन्यांनी अशा नेत्यांना थोडे डावलले पाहिजे. काही तरी करमणूकप्रधान वक्तव्य मिळतात, म्हणून त्यांचे कोट घेणे, प्रतिक्रिया घेणे हे प्रकार थांबवले पाहिजेत, कारण महाराष्ट्राला शांतता हवी आहे.


वृत्त वाहिन्यांनी काही दिवस किरीट सोमय्या, संजय राऊत, अमोल मेटकरी या नेत्यांची वक्तव्ये दाखवणे थांबवले पाहिजे. आता शुक्रवार, शनिवार संपूर्ण महाराष्ट्रासह मुंबईला वेठीस धरण्याचा प्रकार खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दोघांनी केला. त्यामुळे शिवसैनिक भडकले आणि दोन दिवस दुसरा कोणताही विषय टीव्हीवर दिसत नव्हता. त्यानंतर राणा दाम्पत्याला अटक झाल्यावर भाजप नेते किरीट सोमय्या हे खार पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले. त्यानंतर तेथून परतत असताना सोमय्यांच्या गाडीवर दगड भिरकावण्यात आला. किरीट सोमय्या कशासाठी गेले होते खार पोलीस ठाण्यात?, प्रत्येक गोष्टीत प्रतिक्रिया दिली पाहिजे, असे का सोमय्यांना वाटते?, तुम्हाला काय भ्रष्टाचाराची प्रकरणे काढायची आहेत ती काढा; पण वातावरण गरम असताना पोलीस ठाण्यात जाण्याची काय गरज होती?, तिथं ठिय्या देऊन शिवसैनिक दोन दिवसांपासून आहेत, हे सर्वांना माहिती होते. असे असताना आक्रमक शिवसैनिक अंगावर येणार हे गृहीत होते. असे असताना किरीट सोमय्या तिथे गेलेच कशासाठी?, राणा पती-पत्नी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेली होती. काँग्रेस पुरस्कृत ते उमेदवार होते. ते भाजपचे नेते, कार्यकर्ते नव्हते. मग त्यांना अटक केली, म्हणून तिथे बघायला सोमय्या कशासाठी गेले? त्यांनी भाजप प्रवेश केला असेलच, तर भाजपचे चंद्रकांत पाटील, आशिष शेलार हे जातील ना पाहायला. ते कोणीही गेलेले नसताना किरीट सोमय्या तिथले वातावरण बिघडवायला कशासाठी गेले, हा संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे.

कधीकधी आपलं बरोबर असलं तरी गप्प बसण्यातच शहाणपणा असतो. आधीच मुंबई पोलिसांवर दोन दिवसांपासून इतका ताण पडलेला आहे. तहान-भूक विसरून या कडक उन्हाळ्यात, काही दंगा होऊ नये, म्हणून त्यांना अहोरात्र काम करावे लागत आहे. अशा परिस्थितीत किरीट सोमय्यांचे काय कारण होते तिथे जाण्याचे?, तुमची यंत्रणा इतकी प्रभावी आहे, तर पाहिजे ती माहिती फोनवरून सोमय्यांना मिळाली असती; पण वातावरणात तणाव निर्माण करण्यासाठी तिथे जाणे टाळायला हवे होते. महाराष्ट्राला शांतता हवी आहे, यासाठी अशा नेत्यांना पक्षप्रमुखांनी आवर घातला पाहिजे.


किरीट सोमय्या यांना झेड प्लस सिक्युरिटी असतानाही हल्ला कसा झाला, हा प्रश्न विचारण्यात येत आहे. यावर आता सोमय्यांनी भाष्य केले आहे. किरीट सोमय्या म्हणाले, झेड सिक्युरिटीचा अर्थ असा आहे की, जे प्रोटेक्टी आहेत त्यांची सुरक्षा करणे. झेड सिक्युरिटी कायद्यात लिहिले आहे की, लोकल बंदोबस्त हा स्थानिक पोलिसांनी करायचा आहे. हजारोंची संख्या तिथे असताना, वातावरण तणावपूर्ण असताना पोलिसांवर ताण टाकायला ते बाहेरच का पडले?, पोलिसांना तेवढीच कामे आहेत का?, यापूर्वीही शिवसैनिकांकडून सोमय्यांवर हल्ले झालेले आहेत. असे असताना सोमय्यांनी अशा परिस्थितीत जाणे चुकीचे होते. त्यांना भाजपच्या नेत्यांनी का अडवले नाही?

कोणत्याही पक्षाचे मोठे नेते बोलत नाहीत. या संपूर्ण प्रकरणात भाजपचे केंद्रीय नेते बोलले नाहीत, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शांत होते. हा संयम महत्त्वाचा होता; पण प्रसिद्धीच्या सतत झोतात राहण्याची सवय लागल्याप्रमाणे किरीट सोमय्या, संजय राऊत हे मात्र सतत प्रतिक्रिया देत होते. त्यामुळे वातावरण बिघडत होते. महाराष्ट्रात अशा प्रकारे वातावरण तापवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. अतिपरिचयात अवज्ञा होते, त्याप्रमाणे सतत कॅमेºयापुढे आल्याने जनतेच्या मनातून तुम्ही उतरत आहात, हे अशा नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे. वाहिन्यांनीही प्रत्येक गोष्टीवर, घटनेवर याच नेत्यांची प्रतिक्रिया घेण्याची गरज नाही. जरा नवे चेहरे दाखवा. नाही तर वाहिन्यांचाही टीआरपी खाली येईल. एकाही वाहिनीला आपण कोणा वेगळ्या नेत्याची प्रतिक्रिया घ्यावी असे वाटत नाही.


प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाइन्स

9152448055\\