शुक्रवार, २७ मे, २०२२

पटावरील खेळ


             उन्हाळ्याची सुट्टी असली की घराघरात बैठे खेळ खेळले जातात. उन्हात मुलांनी बाहेर पडू नये म्हणून खेळलेजाणारे हे पारंपारीक खेळ अनेक दशके नव्हे तर अनेक शतके आपल्याकडे खेळले जात आहेत. काही खेळ तर पुराण काळातही वर्णन केलेगेले आहेत. विविध आकार-प्रकारांच्या पटांवर सोंगट्या, फासे तसेच इतर साधनांनी खैळण्यात येणारे बैठे खेळ. प्राचीन काळापासून रूढ असलेल्या या खेळांत अनेक प्रकारच्या सुधारणा होत होत आजचे खेळ तयार झाले आहेत. आजकाल हे खेळ गेम म्हणून मोबाईलमध्येही खेळता येतात. अनेकजण लोकलमध्येही ते खेळत असतात. अशाच काही खेळांवरुन नजर मारली तर आपल्या संस्कृतीचे दर्शन घडेल.


प्राचीन काळी जमिनीवरच पट आखून आणि हाडे, गोट्या, फळांची कवचे वापरून असे खेळ खेळत. अत्यंत प्राचीन खेळांचे पट सर लेनर्ड वुली यांना अर येथील उत्खननात (इ. स. पू. सु. ३००० वर्षे), राजांच्या थडग्यात आढळले. पटावरील खेळाचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे नशिबाच्या भरवशावर आणि कवड्या फाशांच्या आकड्यांवर अबलबूंन असणारे क्रीडाप्रकार आणि दुसरा म्हणचे बौद्धिक कौशल्याला वाव असलेले क्रीडाप्रकार. बुद्धिचातुर्यावर अधिष्ठित असलेल्या खेळांमध्ये खेळाडूचा चाणाक्षपणा, दूरदर्शित्व, स्मरणशक्ती व कौशल्य हे गुणच जिंकण्याच्या दृष्टीने निर्णायक ठरतात.

नशिबावर हवाला ठेवणारे, सोंगट्यांच्या खेळांचे अनेक प्रकार आहेत. बॅकगॅमॉन हा सोंगट्यांचा एक प्राचीन खेळ आहे. तो इंग्लंडमध्ये चौदाव्या शतकातही खेळत. या खेळाचे मूळ असून तो ग्रीक लोकांमध्ये अगोदर प्रचलित होता व त्यांच्यापासूनच रोमन लोक तो शिकले. साप-शिडी सारख्या सर्वपरिचित खेळात क्रमांक घातलेल्या चौकोनांतून सर्वांत प्रथम अंतिम चौकोन गाठावयाची खेळाडूची खटपट चालू असते. त्यात शिड्यांनी व सापांनी काही मार्ग दाखविलेले असतात. या खेळाच्या पटास मोक्षपट असेही म्हणतात. शिडीचा मार्ग उत्कषार्चा, तर सापाचा अधोगतीचा असतो. सापाचे तोंड दर्शविलेल्या चौकौनात सोंगटी गैली, तर ती एकदम सापाच्या शेपटीपर्यंत मागे ओढली जाते. सोंगटी शिडीच्या पायथ्याजवळ पोहोचली, तर ती शिडीचे टोक गाठते. घोड्यांच्या शर्यतीच्या पटावर शर्यतीच्या मैदानाचा देखावा काढलेला असतो व त्यात दंडशासनाची आणि बक्षिसांची काही ठिकाणे दाखविलेली असतात. संत ज्ञानेश्वरांनी उत्कर्ष आणि अधोगतीच्या खेळाची रचना आपल्या सोपान आणि मुक्ताबाई या भावंडांसाठी केल्याचेकाही ठिकाणी उल्लेख आहेत.


प्राचीन काळी भारतात पटावरील अनेक खेळ प्रचलित होते. सोंगट्या, कवड्या, फासे इ. साधनांनी खेळावयाच्या द्यूत, चतुरंग (बुद्धिबळाचा प्राचीन खेळ) यांसारख्या अनेक क्रीडाप्रकारांचे निर्देश प्राचीन वाङ्‌मयात आढळतात. मोगलकाळात भारतात पचीसी हा सोंगट्यांचा खेळ फार लोकप्रिय होता. अकबर बादशाहाला ह्या खेळाचा इतका षोक होता, की त्याने आपल्या फतेपूर शीक्रीच्या प्रासादाच्या प्रांगणाच्या एका भागात सोंगट्यांच्या पटासारखी रचना केली होती. जनानखान्यातील सोळा दासी विविध चिन्हदर्शक विविध रंगांचे कपडे परिधान करून सोंगट्यांच्या जागी उभ्या राहत व खेळ चालू असता पडलेल्या दानानुसार हालचाली करीत. १८८० च्या सुमारास हा खेळ इंग्लंडमध्ये नेण्यात आला व तिथे त्यास प्रचलित ल्यूडो या आधुनिक इंग्लिश खेळाचे रूप लाभले. ल्यूडो हा खेळ आजही इंग्लंडमध्ये लोकप्रिय असून, ख्रिसमसच्या वेळी मुले तो खेळतात. आजकाल लोकलमध्ये हा खेळ खेळत आपला प्रवासातील वेळ घालवताना आपण पाहतो.

एकाधिकार (मोनॉपली) हा खेळ बराच गुंतागुंतीचा आहे. त्यात एक खेलाडू सावकार बनतो आणि प्रथम तो सर्व सवंगड्यांना सारखे पैसे वाटतो. प्रत्येक खेळाडूचे चिन्ह ठरवितात. पटावर शहरातील विविध वस्तींत विखुरलेल्या निरनिराळ्या किंमतींच्या वास्तू दर्शविलेल्या असतात. खेळाडूची सोंगटी त्या ठिकाणी पोहोचली, तर त्या खेळाडूला त्या वास्तूची किंमत सावकाराला मोजून ती वास्तू स्वत:च्या नावावर करता येते. दुसरा खेळाडू त्या वास्तूत पोहोचला, तर त्याला त्या जागेचे ठरलेले भाडे द्यावे लागते. या वास्तूंचे संचही ठरलेले असतात. एखादा खेळाडू संपूर्ण संचाचा मालक झाला, तर त्याला मूळ वास्तूत नव्या वास्तूंची, त्यांचे सावकाराला मोल देऊन भर घालता येते. तसेच चार घरांचे उपाहरगृहात रूपांतर करता येते व त्याला जास्त भाडे येते. डाव अंगावर आल्यास खेळाडूला आपल्या वास्तू विकूनही टाकता येतात. इतकेच नव्हे, तर त्या गहाणही टाकता येतात. अशा वेळी त्या वास्तूंचे मूल्य सावकाराकडून घेऊन त्यातून देणी भागविता आली, तरी वास्तूंवर मिळणारे उत्पन्नही कमी होते. पटावरील काही जागांवर लॉटरीसारखे लाभ होतात. तर काही ठिकाणी वाण्याचे बिल देणे अशासारखे स्मरण केलेले असते व ते देणे भागवावे लागते. एकच खेळाडू सधन राहिल्यावर हा खेळ संपतो. यास व्यापार हे रूढ नाव आहे.


ज्या खेळांत बौद्धिक कौशल्य दाखवावयास वाव असतो, अशा खेळांत बुद्धिबळाचा खेळ अत्यंत लोकप्रिय आहे. या खेळात प्रतिपक्षाची हत्ती, घोडा, उंट, वजीर, प्यादी अशी विविध मोहरी आपल्या मोहºयांनी मारता येतात व बुद्धीच्या जोरावर अखेर राजावर मात करता येते. मॉरेलिस हा खेळ चौदाव्या शतकात लोकप्रिय होता. या खेळाचा उल्लेख शेक्सपिअरच्या मिडसमर नाइट्स ड्रीम या नाटकात आढळतो. पेगॉटी हा आधुनिक खेळ साधासुदा आहे. चार खेळाडू आपापले रंगीत ध्वज पटावर रोवण्याचा प्रयत्न आपापल्या पाळीप्रमाणे करतात. ज्या खेळाडूचे पाच ध्वज एका रांगेत प्रथम येतात, तो डाव जिंकतो. पटावरील अनेक प्रकाराच्या खेळांत प्रतिपक्षाच्या जागेत आक्रमण करण्यासाठी योजनापूर्वक हालचाली कराव्या लागतात. प्राचीन काळापासून प्रचलित असलेल्या कोल्हा व हंस (फॉक्स अँड गीस) या खेळात हंसाच्या चार पांढºया सोंगट्या व कोल्ह्याच्या चार काळ्या सोंगट्या पटावर एका रांगेत मांडल्यावर खेळास प्रारंभ होतो. दोघेही परस्परांची फळी मोडण्याचा प्रयत्न करीत असतात. हल्‌मा हा खेळ त्यामानाने अधिक गुंतागुंतीचा आहे. त्याच्या पटावर २५६ चौकोन असतात. हल्‌मा हा खेळ दोन खेळाडूच खेळत असतील, तर समोरासमोरचे फक्त दोन कोपरे वापरतात. चार खेळाडू असले, तर अर्थातच चारही कोपरे वापरावे लागतात. त्यात सर्व खेळाडू स्वतंत्रपणे खेळतात किंवा दोघे भागीदार होऊ शकतात.

तब्ले हा सोंगट्यांच्या प्रकारात मोडणारा साधा व मनोरंजक क्रीडाप्रकार आहे. एका फळीला एका ओळीत सारख्या अंतरावर पाडलेली बारा भोके आणि त्या बारा भोकांच्या चार ओळी, असे या खेळाच्या पटाचे स्वरूप असते. पटाच्या भोकावर खुंटीच्या आकाराच्या तांबड्या व हिरव्या रंगांच्या प्रत्येकी बारा सोंगट्या असतात. हा खेळ दोन खेळाडूंनी खेळावयाचा असतो.


एकाकी (सॉलिटेअर) हा एकट्यानेच खेळावयाचा जुना फ्रेंच खेळ आहे. त्याचे अनेक प्रकार प्रचलित आहेत. काँम्प्यटरगेममध्ये याचे अनेक प्रकार आहेत. त्यात पत्त्याचा डाव लावण्याचा प्रकारही असतो. पण साधारणपणे सापशिडी, ल्युडो आणि व्यापार हा खेळ खेळला नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. पटाचा वापर जुगारासाठी खेळला जातो. महाभारत घडले ते या पटावरच्या जुगारानेच. शंकर पार्वती सारिपाट खेळत असतात हे अनेक कथांमधून दिसून येते. सारिपाटाच्या खेळातूनच गोरक्षनाथांनी मच्छिद्रनाथांची स्त्री राज्यातून सुटका केली होती. त्यामुळे हे खेळ आपल्या जीवनाचा आणि संस्कृतीचा एक भाग आहेत.

प्रफुल्ल फडके/ संस्कृती


9152448055

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: