लोकांच्या श्रद्धेचा आणि भाबडेपणाचा फायदा घेणा-या भोंदू बाबा-बुवांनी उच्छाद मांडला आहे. या तथाकथित धर्माचा-यांकडून पोकळ आदर्शवाद मांडला जात आहे आणि त्याचा थेट परिणाम समाजावर होत आहे. त्यात मौलानांचीही भर पडली आहे. अशा प्रकारच्या ढोंगीबाबांना समाजातून हद्दपार करण्याची वेळ आली आहे. औरंगाबादमधील खुलताबाद येथील दग्र्यातील मौलानाने नुकताच एक वादग्रस्त दावा केला आहे. दग्र्यात आसेचे झाड असून या झाडाचे फळ खाल्ल्यास निपुत्रिकांना मुले होतात, असा या मौलानाचा दावा आहे. मौलाना इतकेच बोलून थांबत नाहीत, तर म्हणतात ही फळे खाल्ल्यास तृतीय पंथीयांना देखील मूल होऊ शकते. अंधश्रद्धा पसरवणे आणि जादूटोणा विरोधी कायदा करणारा हाच तो महाराष्ट्र, ज्याला पुरोगामी म्हणून ओळखले जाते. हा कायदा व्हावा आणि अंधश्रद्धांना आळा बसावा यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी आपले बलिदान दिले. त्याच महाराष्ट्रात अशा गोष्टींचा दावा कोणी करत असेल तर ती लांच्छनास्पद गोष्ट आहे.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या औरंगाबादमधील कार्यकर्त्यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून हा प्रकार समोर आला आहे. या मौलानावर जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली आहे. पण गुन्हा दाखल करून काय साध्य होणार हा प्रश्न आहे. या कायद्याअंतर्गत शिक्षा झाल्याचे समोर येणे गरजेचे आहे. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असे मौलाना, भिडे गुरुजी नामक प्रस्थ यांचे दावे होतच राहणार. या मौलानाविरोधात गुन्हा नोंदवला आहे, तसाच आपल्या बागेतील आंबा खाऊन मुले होतात असा दावा करणा-या भिडे गुरुजींविरोधातही गुन्हा नोंदवला आहे. पण या लोकांना त्याची काहीच फिकीर नाही. अशी अंधश्रद्धा पसरवून, लोकांना भ्रमित करणा-या प्रवृत्तीला कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. तरच त्या कायद्याचा उपयोग आहे. नुसता कायदा करून काहीच उपयोग नाही, तर असे मौलाना, गुरुजी यांच्यावर कारवाईचा बडगा उचलणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे औरंगाबादजवळील खुलताबाद येथे हजरत शेख शा जलालउद्दीन गंजे रवा सफरवर्दी यांचा हा दर्गा आहे. या दर्गा परिसरात अनेक नमुनेदार आणि जादुई गोष्टी असल्याचा दावा मौलाना करताना दिसतात. ते सांगतात की इथे आसेचे झाड आहे, त्या झाडाची फळे खाल्यावर निपुत्रिकांनाच नाही तर तृतिय पंथीयांनाही मुले होऊ शकतात. याच ठिकाणी ‘परियो का तालाब’ देखील आहे, तोही जादूचाच आहे. दर्गा परिसरातील आसेच्या झाडाबाबतच्या चमत्कारांचा दावा मोहम्मद समीर मुजावर या मौलानांनी केला आहे. ‘परियो का तालाब’ येथे आंघोळ केल्यास त्या व्यक्तीच्या अंगात असलेले भूत, प्रेतात्मा निघून जातात, दुर्धर आजारही बरा होतो, लग्न जमत नसेल तर लग्नही होते, असाही दावा मौलानांनी केला. ही चक्क फसवणूक आहे. असा दावा करून हतबल लोकांना फसवण्याचा प्रकार यातून घडू शकतो.या मौलानाने अवैज्ञानिक चमत्कारांचा दावा करून जनतेची फसवणूक केली आहे. हा जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा ठरतो. पण त्यावरून पुढे कारवाई होणार का, असा खरा सवाल आहे. आजवरचा अनुभव असा आहे की, अशी अंधश्रद्धेची दुकानदारी जिथे चालते त्या ठिकाणी कारवाई करायला पोलीस पुढे येत नाहीत. टाळाटाळ करतात. पोलिसांवर दबाव टाकून कारवाई करावी लागते, तरच ती होते. भिडे गुरुजींनी आंब्याचा दावा करून तीन महिने उलटले. पण त्यांच्यावर कसलीही कारवाई झालेली नाही. कुठे तरी नाशिकमध्ये किरकोळ गुन्हा नोंदवला आहे, त्यांना न्यायालयानेही हजर राहण्यास सांगितले, पण ते न्यायालयालाही जुमानत नाहीत. खुलेआम सगळीकडे हिंडत आहेत, पण कोर्टात, पोलीस स्टेशनला बोलावले तर जात नाहीत. हा उन्मत्तपणा कोठून येतो? कायद्यापुढे जर सगळे सारखेच आहेत तर भिडे गुरुजींवर कारवाई का केली जात नाही? पोलिसांना ते का सापडत नाहीत? अशा लोकांना असे मिळणारे संरक्षण हेच अंधश्रद्धांचे पीक फोफावण्यास कारणीभूत ठरते. आज असे मौलाना, गुरुजी देशभरात धुमाकूळ घालत आहेत. त्यांच्यामागे लोक धावत जात आहेत. हे अत्यंत लाजिरवाणे असे आहे. सरकारने अंधश्रद्धेबाबत जादूटोणविरोधी कायदा केला तो काय फक्त बासनात गुंडाळून ठेवण्यासाठी केला का? डॉ. दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर घाईघाईने अधिसूचना काढून तो कायदा केला आणि सरकारने सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला.पण गेल्या पाच वर्षात या कायद्याअंतर्गत कितीजणांवर कारवाई झाली? एकीकडे असा कायदा केला जातो आणि पुण्यातच ते पोळ नामक पोलीस अधिकारी प्लँचेट करून दाभोलकरांचा आत्मा बोलवतात. हे सगळे टीव्हीवरून दाखवले जाते. ही भंपकगिरी पोलिसांच्या साक्षीने होत असेल तर असे मौलाना, गुरुजी यांचे फोफावेल नाहीतर काय होईल? पोलीस स्टेशनमध्ये प्लँचेट करून दाभोलकरांचा आत्मा बोलावला होता, खुनासंबंधी काही माहिती तो आत्मा देत होता. आता त्या हत्येचे धागेदोरे पोलिसांना सापडले आहेत. असे असताना तो पूर्वीचा प्लँचेटचा प्रकार दिशाभूल करणारा होता हे स्प्पष्ट होत आहे. त्यात पोलिसांचा हात आहे. यामागचा नेमका अर्थ पुढे आला पाहिजे. कायद्याचे रक्षकच जर कायद्याला न जुमानता असले प्रकार करत असतील तर सामान्यांनी करायचे काय? आता हा मौलाना तृतीय पंथीयाला मूल होईल असे सांगतो. पण ते फळ खाल्ल्यानंतर तयार होणारा गर्भ नेमका कुठे वाढणार आहे याबाबत मौलानाकडे उत्तर आहे का? गर्भ वाढण्यासाठी गर्भाशय असावे लागते, ते तृतिय पंथीयाच्या शरीरात असते का? असले अशास्त्रीय दावे करून लोकांना फसवणूक करणा-यांवर कारवाई केली गेली नाही, तर असे प्रकार वाढत जातील. रोज नवा मांत्रिक, मौलाना, गुरुजी तयार होईल. म्हणूनच अशा लोकांवर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. डॉ. दाभोलकर जिवंत असताना अंनिसने ११ लाखांचे बक्षीस ठेवले होते. चमत्कार सिद्ध करून दाखवा आणि ११ लाख मिळवा. ते बक्षीस आजवर कोणीही जिंकलेले नाही. आता अंनिसने भिडे गुरुजी, मौलाना यांना आव्हान दिले पाहिजे. द्या आंबा आणि निपुत्रिकांना मूल झालेले सिद्ध करून दाखवा. द्या ते फळ आणि होऊन जाऊदे तृतिय पंथियाला मूल. बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला, असे आव्हान देण्याची हीच वेळ आहे. नाही सिद्ध करता आले हे आव्हान, तर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे.
शनिवार, २२ सप्टेंबर, २०१८
बाप दाखवा, नाहीतर श्राद्ध घाला!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा