सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०

डोळस संगिताचे इंजिनीयर रवींद्र जैन

रवींद्र जैन हे वेगळ्या शैलीचे संगीतकार होते. त्यांची आज 9 ऑक्टोबरला पुण्यतिथी. अलीगडच्या औष्णिक ऊर्जा केंद्रात अभियंता असलेले असलेले आयुर्वेदाचार्य पंडित इंद्रमणी जैन आणि किरण जैन, हे रवींद्र जैन यांचे आईवडील होते. अंध म्हणून जन्माला आलेल्या रवींद्र जैन यांना लहानपणापासून संगीताचा एक वेगळाच ’कान’ होता. दृष्टी नसतानाही त्यांनी संगीतातून एकाग ्रहोउन जी सप्तरंगी दुनिया पाहिली ती डोळस लोकांनाही दिसेल की नाही शंका आहे. त्या रंगीत सृष्टीचे ते डोळस अभियंता म्हणजे इंजिनीअर होते. वडिल इंजिनीअर असले तरी अंधपणाने रवींद्र जैन यांनी संगीताच्या सप्तसूरांची जी रचना केली होती ती अद्वितीय आणि अजरामर अशी आहे. त्यामुळे डोळस संगिताचे ते अभियंताच होते.

   जैन मंदिरांमध्ये ते लहानपणी भजन गात असत. त्यांची संगीतातील रुची पाहून त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना संगीताचे शिक्षण देण्यासाठी पंडित जनार्दन शर्मा आणि पंडित नथू राम यांच्याकडे पाठवले.
   ऑल इंडिया रेडिओ’साठी रेकॉर्डिंग करत असताना जैन यांची राधेश्याम झुनझुनवाला यांच्याशी ओळख झाली व त्यांनी जैन यांना मुंबईत आणले. मुंबईत आल्यावर जैन यांनी मोठमोठ्या निर्मात्यांसोबत काम करायला सुरुवात केली. 1972 मध्ये जैन यांनी संगीतकार म्हणून आपल्या करिअरला ’काँच और हिरा’ या चित्रपटाद्वारे सुरुवात केली. महंमद रफी यांच्या आवाजात त्यांनी आपले पहिले गाणे संगीतबद्ध केले होते. मात्र, ते गाणे रिलीज झाले नव्हते.
  1970च्या दशकामध्ये रवींद्र जैन यांनी त्यांनी संगीत दिलेले चित्रपट गाजले. विशेषत: राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटांचे संगीतकार म्हणून त्यांची ओळख होती. राज कपूर यांनी ’राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाद्वारे त्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणले. रवींद्र जैन यांनी हिंदीप्रमाणेच गुजराथी, पंजाबी, बंगाली, भोजपुरी, मल्याळी, तेलुगू, राजस्थानी अशा विविध भाषांतील एकूण सुमारे 150 चित्रपटांना संगीत दिले.
   प्रत्येक संगीतकाराला सतत नव्या आवाजाचाही शोध असतो. जैन यांना असा एक आवाज सापडला आणि त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत एक नवी खुमारी अवतरली. येसूदास यांच्यासारख्या दक्षिणी चित्रपटातील लोकप्रिय गायकाला त्यांनी हिंदी चित्रपटाच्या दुनियेत आणले. इतके की त्या काळात स्ट्रेपसिलच्या जाहीरातीसाठी येसुदास यांना संधी मिळाली त्यात रविंद्र जैन यांच्या गाण्याचा वापर केला होता.
रवींद्र जैन यांचे भक्ति संगीताचे काही आल्बम आहेत. मॉर्निंग सन’ हा त्यांचा आल्बम विशेष प्रसिद्ध आहे. पण आत्ता लॉकडाउनच्या काळात नव्या पिढीला त्यांची पुन्हा एकदा ओळख झाली ती रामायण या रामानंद सागर यांच्या मालिकेमुळे. अत्यंत भक्तीभावपूर्ण वातावरणात रविंद्र जैन यांनी रामायणाचे संगीत घराघरात पोहोचवले होते. त्यांचा आवाज लोकांच्या कायम लक्षात राहिला.
  आँखियोंके झरोके से, एक विवाह ऐसा भी था, काँच और हीरा, गीत गाता चल, चितचोर, चोर मचाये शोर, तपस्या,
दुल्हन वही जो पिया मन भाये, दो जासूस, नदियाँ के पार,
पति, पत्नी और वो, फकिरा या 1970 च्या दशकातील हलक्या फुलक्या पण गाजलेल्या चित्रपटातील त्यांची गाणी श्रवणीय अशी होती.
  त्यानंतर 1986 मध्ये राजकपूर यांनी राम तेरी गंगा मैली या चित्रपटासाठी रवींद्र जैन यांना संधी दिली आणि त्या संधीचे सोने त्यांनी करून दाखवले. ग्रेट शोमन राजकपूरने संधी दिल्याने दुसेर शोमन सुभाष घई यांनीही आपल्या चित्रपटातील पुढील काळात त्यांना संधी दिली. विवाह, सौदागर, हीना या सर्वच चित्रपटातील गाणी सुपरहिट ठरली.            1990 च्या दशकात सर्वदूर टिव्ही पोहोचल्यावर वाहिन्यांवरील विविध मालिकांना त्यांनी संगीत दिले. यात रामानंद सागर यांच्या रामायण आणि श्रीकृष्ण या दोन मालिकांचे त्यांचे संगीत चांगलेच गाजले. त्याशिवाय अलीफ लैला, इतिहास की प्रेरम कहानियाँ, जय गंगा मैय्या, राजा हरिश्चंद्र, साई बाबा यातील भजने आणि गीते ही कथानके पुढे सरकरवण्यास अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी करताना दिसतात.
  चित्रपटातील त्यांच्या गाजलेल्या गाण्यांमध्ये अखियोंके झरोके से, आज से पहले आज से जादा, गंगासागर, गीत गाता चल, गोपालकृष्ण याशिवाय गोरी तेरा गाँव बडा प्यारा (चित्रपट -चितचोर), जब दीप जले आना (राग यमन, चित्रपट -चितचोर), ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिये (चित्रपट - पति पत्नी और वो), तू जो मेरे सुरमें (चित्रपट -चितचोर) ही गाणी लोकांच्या कायम ओठांवर येणारी आहेत. तसेच तेरा मेरा साथ रहे (चित्रपट - सौदागर), दिल में तुझे बिठाकर (फकिरा), मेघा ओ रे मेघा (चित्रपट - सुनयना), मैं वही दर्पण वही (चित्रपट - गीत गाता चल), मैं हूँ खुशरंग (चित्रपट - हीना), राम तेरी गंगा मैली (चित्रपट राम तेरी गंगा मैली), ले जायेंगे ले जायेंगे, श्याम तेरी बन्सी पुकारे नाम (चित्रपट - गीत गाता चल), सजना है मुझे सजना के लिये (चित्रपट - सौदागर), सुन साहिबा सुन (चित्रपट - राम तेरी गंगा मैली), हर हर गंगे  ही गाणी कायम मनावर रेंगाळणारी अशीच आहेत.
     रवींद्र जैन यांना 1985 मध्ये ’राम तेरी गंगा मैली’ चित्रपटासाठी जैन यांना सर्वोत्कृष्ट संगीतकारासाठीच्या फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 2003 मध्ये मध्य प्रदेश सरकारने लता मंगेशकर पुरस्कार देऊन जैन यांचा गौरव केला होता. महाराष्ट्र सरकारनेही जैन यांचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर हा पुरस्कार देऊन यथोचित गौरव केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अमीर खुस्रो पुरस्कारानेही जैन यांना गौरवले होते. 2015 सालचा पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळाला होता.
  पं. हृदयनाथ मंगेशकर आपल्या भावसरगम या गाण्याच्या कार्यक्रमात निवेदन करताना रवींद्र जैन आणि रेखा यांचा एक विनोदी किस्सा नेहमी सांगत. त्याला रसिकही चांगली खळखळून दाद द्यायचे. अशा या जग न पाहणार्‍या संगीतकाराने आपल्या अंध डोळ्यांनी जे संगीतचे सूर आणि रंग पाहिले होते ते अत्यंत स्वर्गीय होते.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: