सामाजिक मान्यतेनुसार ज्या सौंदर्याच्या कल्पना असतात त्या कल्पनेत बसणारी ती नव्हती. म्हणजे गौरवर्ण, गोल चेहरा वगैरे वगैरे. पण तीच्यामध्ये तेज होते. एकप्रकारची चमक होती. आत्मविश्वास हा गुण तिच्या चेहर्यावर प्रथमदर्शनीच दिसायचा. तिचे डोळे बरेच काही सांगून जायचे. त्यामुळे आत्मविश्वासाचे सौंदर्य तिच्या चेहर्यावर भरभरून वहायचे. हो, हे वर्णन स्मीता पाटील हिच्याबाबतच आहे. इतक्या आत्मविश्वासाने आणि सहजपणे काम करणारी अभिनेत्री या बॉलीवूडमध्ये आजही नाहीये. तशा फाजील आत्मविश्वासाने बोलणार्या कंगनासारख्या अनेक बोलबच्चन असतात, पण कसल्याही गॉसिपींगच्या भानगडीत न पडता आपल्या कामावर निष्ठा असणारा आत्मविश्वास दिसायचा तो स्मीता पाटीलमध्येच.
स्मीता पाटील ही अत्यंत साधीच होती. सावळी, मध्यमवर्गीय घरात शोभेल अशीच होती. पण तिच्या नजरेत विलक्षण तेज होते. डोळे विलक्षण बोलके होते. जे काही सांगायचे ते ती नजरेतून सांगायची. म्हणजे अगदी दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिकेपासून सुरू झालेला तिचा प्रवास भल्याभल्यांना चक्रावून टाकणारा ठरला. अवघ्या 10-12 वर्षांच्या काळात तिने चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर दरारा निर्माण केला, स्वत:ची छाप सोडली होती. अशा या स्मीता पाटीलचा आज जन्मदिवस.साधारणपणे 1970 ते 1980च्या दशकात बॉलीवूडमध्ये समांतर चित्रपटांची लाट आली. थेट जगण्याच्या प्रश्नांशी भिडणारे चित्रपट आले. वास्तव सांगणारे हे चित्रपट बघताना अनेक जण हादरून गेले. आणीबाणीपूर्व आणि नंतरचा तो काळ होता. समाजात प्रश्न खूप होते. प्रत्येकाला उत्तरे हवी होती. व्यक्त होण्यासाठी सामाजिक बांधिलकी मानणा-या मोजक्या लेखक, दिग्दर्शकांनी चित्रपट हे माध्यम जवळ केले. समांतर अथवा कलात्मक चित्रपट असे त्यांना समजले जाऊ लागले. अशा या कलात्मक अथवा समांतर चित्रपटांद्वारे स्मिता पाटीलचे सिनेसृष्टीत पदार्पण झाले. बघता बघता कलात्मक चित्रपटातील सुपरस्टार ते व्यावसायिक चित्रपटातील अभिनेत्री असा लौकीक तिने प्राप्त केला होता. या सगळ्यासाठी लागणारा फार मोठा आत्मविश्वास तिच्यात होता.
दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून काम करणार्या स्मिताला श्याम बेनेगल यांनी हेरले आणि चित्रपटात संधी दिली. मराठी शाळेच्या वातावरणात शिकलेल्या स्मिताच्या घरातही मराठीच वातावरण होते. वडील राजकारणात. आई-वडील या दोघांचा संबंध सेवादलाशी. त्यामुळे राष्ट्र सेवादलाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत स्मिताचा सहभाग असायचा. घरातून सामाजिक-सांस्कृतिक चळवळीशी ओळख झालेल्या स्मिताचा स्वभाव तसा जिद्दी, बंडखोर. घेतलेल्या निर्णयावर ती ठाम असायची. चित्रपटात काम करणार असल्याचा निर्णय तिने घरी सांगितला. तिच्या निर्णयावर घरच्यांचा विश्वास असल्यामुळे विरोधाचा प्रश्न नव्हताच. 1974पासून हिंदी चित्रपटात प्रवेश केलेल्या स्मिताने आपल्या प्रारंभीच्या चित्रपटापासूनच सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
वैशिष्ठ्य म्हणजे स्मिता पाटील ही केवळ काम करायची नाही, तर भूमिका अक्षरश: जगायची. ‘निशांत’, ‘चरणदास चोर’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केलेल्या स्मिताने मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले; पण सर्व चित्रपटांत तिने अस्तित्वाची छाप सोडली. प्रचंड मेहनत आणि आत्मविश्वासाने कामे केली. स्मिताच्या जगण्यात कुठेच खोटेपणा दिसत नव्हता. अभिनेत्री म्हणून वास्तव जीवनातही नाटकीपणाने वागण्याचा गुण कलाकारांमध्ये असतो, तो तिच्यात नव्हता किवा वास्तव जीवनातही अभिनय नव्हता. मात्र, अभिनयात तिचे जगणे ओतप्रोत भरलेले असायचे. तिला मिळालेल्या अनेक भूमिका पीडित, शोषित स्त्रीच्या असायच्या; पण या भूमिका करताना स्मिताने चाकोरीबाहेरची स्त्री दाखवली.
‘करोगे याद तो हर बात याद आयेगी’ ही ‘बाजार’मधील गझल पडद्यावर पाहताना स्मिताची त्या वेळची आर्त नजर अगदी आजही लक्षात राहणारी अशीच आहे. तिचे शरीर, आवाज खूप काही बोलून जायचे. ‘आक्रोश’मधील आदिवासी लहानू भिकूसोबतच्या प्रणयात त्याच्या खांद्यावर जेव्हा ती बोटं रुतवते तेव्हा प्रणयातील जिवंतपणा काय असतो हे स्मिताने दाखवून दिले. ‘चक्र’मधील अम्मा झालेल्या स्मिताचा झोपडपट्टीतील अंघोळीचा सीन खूप गाजला. बोल्ड असलेल्या स्मिताने चित्रपटाची गरज म्हणून तो सीन दिला; पण त्यामध्ये कुठेही वाह्यातपणा नव्हता. हा चित्रपट चालवण्यासाठी व्यावसायीकपणे स्मीताच्या हातातील आंघोळीच्या बादलीची आणि खांद्यावरून पाणी सोडण्याची पोस्टर्स देशभर झळकली. तिच्या आंघोळीची जाहीरात केली. पण यात कुठेही अश्लीलपणा नव्हता. म्हणजे राजकपूरची नायिका मग ती झीनत असो की मंदाकीनी, आंघोळ करताना पाहताना जशा पिटातल्या शिट्टया वाजत होत्या तसो प्रकार इथे झाला नाही. कारण हे आपण रोज बघतो आहोत, एखादी झोपडपट्टीतील महिला ज्या सहजतेने आडोशाला जाते आणि आपले नित्यकर्म उरकते, जे चित्र आपण लोकलमधून जातानाही सहजपणे पाहतो तसेच ते वाटून गेले.
‘मिर्च मसाला’मधील तिचा विद्रोह हा समग्र स्त्रियांना आपला वाटला. ‘वारिस’मधील पारोची भूमिका तिने ताकदीने पेलली. ‘अर्थ’ या गाजलेल्या चित्रपटात प्रियकराला दूर करणार्या स्त्रीची भूमिका तिने अफलातून केली. ‘उंबरठा’ या मराठी चित्रपटातील सुलभा महाजनची चाकोरीबाहेर जाण्याची धडपड, होणारी घालमेल, ‘मंथन’मधील एका मुलाची आई असताना विवाहित गिरीश कर्नाडवर जीव ओवाळून प्रेम करणारी प्रेयसी अशा कितीतरी भूमिकांचा उल्लेख करता येईल.
तिच्या नजरेत विविध पदर होते. अनेकदा चित्रपटांमध्ये ती भिंतीला टेकून उभी असताना दाखवले गेले. त्या वेळी तिच्या नजरेतील विविध पैलू अत्यंत ठळकपणे दिसून यायचे. वेदनेतही कला असते आणि सौंदर्य असते, हे स्मिताच्या नजरेतून कळायचे. सर्वांना वेड लावावे असे तिच्या चेह-यात काहीतरी खास होते. तिच्या अभिनयाला विचारांची खोली होती. म्हणून तर ‘स्पर्श’मध्ये मुख्य भूमिका सई परांजपेकडून दिली जात नाही, हे तिला कळले, तेव्हा ती सरळ व्यावसायिक चित्रपटांकडे वळाली. ‘शक्ती’, ‘नमकहलाल’, ‘कसम पैदा करनेवालों की’, अमृत यासारखे चित्रपट करताना स्मिताला पाहिले, तेव्हा सर्वांना धक्का बसला. कारण तत्कालीन अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, मिथून चक्रवर्ती यांच्याबरोबर या भूमिका होत्या. मात्र, या चित्रपटांमध्येही तिचा अभिनय लक्षात राहिला. सात वर्षे ती समांतर चित्रपटांशी संलग्न राहिली. व्यावसायिक चित्रपटांकडे ती अपरिहार्यता म्हणून वळली की अन्य काही कारणे आहेत, ते शोधण्यापेक्षाही ग्लॅमर नसताना अभिनयाच्या सामर्थ्यावर ती व्यावसायिक चित्रपटांत यशस्वी झाली होती.
स्मितामध्ये सामाजिक जाणीवही होती. म्हणूनच तिने 1980मध्ये महिला सबलीकरणावर भर द्यायला प्रारंभ केला होता. मातांच्या मृत्यूचे प्रमाण रोखले जावे यासाठी प्रयत्न केले. ‘उंबरठा’ चित्रपटाच्या खास शोचे उत्पन्न तिने महिलांसााठी कार्य करणा-या संस्थांना दिले. हा उदारपणा, हे दातृत्व तिच्या ठायी भरलेले होते. शोषित स्त्रीच्या वेदना, अत्याचार याबद्दल ती अस्वस्थ असायची. त्यामुळे भूमिका करताना आपल्या भावना, वेदना स्मिता पडद्यावर साकारते, असे प्रत्येकीलाच वाटायचे. वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी तिचे अकाली निधन झाले. तिचे जाणे हे आजही तितकेच अस्वस्थ करणारे आहे. पण आपल्या अल्प काळात तीने ज्या भूमिका केल्या त्या अत्यंत आत्मविश्वासाने केल्या होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा