सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०

एलजीबीटीतून राष्ट्रवादीचे पुरोगामीत्व

     अखेर ती सुद्धा माणसे आहेत, त्यांनाही काही भावना आहेत. त्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. आता खुलेपणाने लोक बोलू लागले आहेत. त्यामुळे काळाची गरज ओळखून आपले पुरोगामीत्व सिद्ध करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेसने साधली. ते म्हणजे एलजीबीटी सेल निर्माण करण्याचा राष्ट्रवादीचा निर्धार. आता खुलेपणाने या वेगळ्या लोकांना सामावून घेउन त्यांच्यासाठी राष्ट्रवादीने एलजीबीटी सेल स्थापन केला हे फार मोठे पुरोगामीत्व आहे.

  प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये युवक, युवती, विद्यार्थी, कामगार, महिला, अल्पसंख्य अश्या अनेक संघटना असतात. या संघटना त्या विशिष्ट वर्गासाठी काम करतात. या संघटनांमार्फत राजकीय पक्षांना त्या विशिष्ट वर्गापर्यंत पोहचता येतं. असाच दुर्लक्षित असणारा समुदाय म्हणजे ’एलजीबीटी’ समुदाय. राष्ट्रवादी काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकत  या  समुदायासाठी स्वतंत्र सेलची स्थापना केली आहे.
  हा लेसबियन, गे, बायोसेक्सुयल आणि ट्रान्सजेंडर लोकांसाठी ही फार महत्वाची आहे. खरं तर आपण माणूस म्हणून जन्माला येत असतो. एकतर मी मुलगा म्हणून जन्माला यावे किंवा मुलगी म्हणून जन्माला यावे. हे ठरवण्याचा अधिकार कोणालाच नसतो. जे लिंग घेउन आपण जन्माला आलो आहोत ते स्वीकारण्या पलिकडे आपल्या हातात काही नसते. मुलाचा जन्म झाला तर आनंद, मुलीचा झाला तर कमी आनंद. पण या दोन्हींमधला झाला तर? त्या व्यक्तीचे, कुटुंबाचे पाप आहे असे समजून ती एक तिरस्करणीय व्यक्ती ठरते. उपेक्षित म्हणून त्याकडे पाहिले जाते, समाज वाळीत टाकतो, दुर राहतो, त्यांना कोंडून ठेवले जाते किंवा ही मुले घरातून बाहेर पडतात. निसर्गाने दिलेले जीवन जगतात.
गेल्या काही वर्षात अशा लोकांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अनेकांना अशा सहजीवनाचेही आकर्षण वाटू लागले आहे. त्यामुळे समलिंगी आकर्षण असणारी गे किंवा लेसबियन, होमो संस्कृती वाढू लागली. लिंगबदलाचे प्रकार वाढू लागले. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मी तो आहे की ती आहे आणि तो किंवा ती नसून अन्य कोणी आहे हे सांगण्याचे धाडस पूर्वी नव्हते. पण आजकाल आपण समलिंगी आहोत, आपण ट्रान्सजेंडर आहोत, अन्य आहोत हे वास्तव स्विकारले जात आहे. त्यामुळे वाढत्या संख्येमुळे या लोकांना त्यांचे लोकशाहीत प्रतिनिधीत्व मिळणे रास्त आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला ही कौतुकाची बाब आहे.
   एलजीबीटी सेल’ त्यांच्या समुदायातील वंचितांसाठी काम करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. हा सेल नेमकी काय कामं करणार? ’एलजीबीटी’ समुदायाला राजकीय पक्षात सामील करून ते मुख्य प्रवाहात येतील का? हा प्रश्न महत्वाचा आहे. पण काळाची गरज म्हणून हे टाकलेले पाउल फार महत्वाचे आहे. चोरी छुपके कुणीतरी पक्षात असण्यापेक्षा त्यांच्यासाठी खुलेपणाने वेगळा सेल तयार करणे हे धाडसी आणि पुरोगामीपणाचे लक्षण आहे.
      राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मराठ्यांचा पक्ष असा शिक्का काही लोकांनी मारला होता. तो पुसून टाकण्याबरोबरच आमचा पक्ष सर्वसमावेशक आहे हे दाखवण्याची संधी यानिमित्ताने राष्ट्रवादीला मिळाली आहे. समाजातील विविध वर्गापर्यंत, तळागाळातील वंचितांपर्यंत राजकारण पोहोचतं. पण ’एलजीबीट’ समुदाय राजकीयदृष्याही वंचित राहिला आहे. उत्तर प्रदेशात काही तृतियपंथी लोकसभेत गेले असा एखाददुसरा अपवाद वगळता खुल्या मतदारसंघातून तृतियपंथी, हिजडे, समलिंगी अशा लोकांना कोणी संधी देत नाही. त्यामुळेच या समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक स्तरांवर प्रयत्न केले जातात. पण एलजीबीटी सेल स्थापन करून राजकीयदृष्ट्या त्यांना महत्त्व देणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा पहिला राजकीय पक्ष ठरला आहे.
    राष्ट्रवादीने या ’एलजीबीटी’ सेलच्या राज्यप्रमुखपदी प्रिया पाटील यांच्यासह 14 जणांची निवड करण्यात आली आहे.  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे ’वेलफेअर बोर्ड’ स्थापन करण्यात आलं आहे.
   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुरोगामी विचार हे कायम भाषणातून न मांडता कृतीतून दाखवले आहेत. सभागृहात महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाबाबतही शरद पवार हे आघाडीवर होते.  देशात पहिल्यांदा महिला आरक्षण हे महाराष्ट्रात सुरू झालं. पहिल्यांदा युवती काँग्रेस हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालं आणि आता एलजीबीटी सेल हा सुध्दा राष्ट्रवादीने सुरू केला आहे. या सेलमार्फत एलजीबीटी समुदायाचे आर्थिक, सामाजिक प्रश्न सुटावेत हा यामागचा हेतू आहे, असं सुप्रिया सुळे यांनीच यावेळी जाहीर केले. हे पुढचं पाउल आहे.
    देश स्वतंत्र झाल्यापासून समाजातील समानता महत्त्वाची राहिली आहे. एलजीबीटी समाजाला समानतेची वागणूक मिळत नाही. लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा आजही पूर्णपणे बदललेला दिसत नाही. तो बदलण्याची गरज असल्याचं वारंवार बोललं जातं. पण प्रत्यक्षात काही होताना दिसत नाही.
विशेष म्हणजे या सेलसाठी 14 जणांची कमिटी स्थापन करण्यात आली आहे. यांच्या  माध्यमातून  जिल्हा आणि तालुका पातळीवर विविध संघटना तयार करण्यात येणार आहे. या माध्यमातून आता प्रत्येक शहरातील एलजीबीटींचे प्रश्न सोडवण्याचं काम राष्ट्रवादी करणार आहे. यापूर्वी महापालिका किंवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अनेकदा तृतियपंथी उमेदवार दिसले. पण अद्याप राज्यात कोणी निवडून आलेलं नाही. 2019 विधानसभा निवडणुकीत पिंपरी चिंचवडमधून नताशा लोखंडे या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. पण लोकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. कारण या समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन. या लोकांना मुख्य प्रवाहात येऊन अडचणी सोडविण्यासाठी  राजकीय पाठबळाची गरज होती. निवडणुकीत महिला आणि पुरुष असे आरक्षित वॉर्ड असतात. त्या आरक्षणात एलजीबीटी समाजालाही सामावून घेण्याची मागणी आता राष्ट्रवादी काँग्रेस या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे करणार आहे. आजकाल हे प्रमाण वाढल्याचे आपण रस्त्याने, रेल्वेने किंवा प्रवासातही पाहतो. निसर्गाने निर्माण केलेला हा जीव समाजाचा एक घटक आहे. तो वाळीत टाकणे, त्यांचा तिरस्कार करणे हे चुकीचे आहे. कोणीही जन्माला येताना मी कोण होणार आहे हे ठरवत नसतो. आपण मुलगा मुलगी की अन्य वर्गात जन्माला येणार आहोत हे कोणालाही ठरवण्याचा अधिकार नसतो. आजवर मुलगा मुलगी असा भेदभाव होता, स्त्रीयांना दुय्यम स्थान होते. आता त्या मुख्य प्रवाहात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून आघाडीवर आहेत. आता तृतियपंथी, हिजडे, छक्के, समलिंगी, लेसबियन, होमो, लिंग परिवर्तन केलेले  सगळे लोक समाजात येतील हे फार महत्वाचे काम राष्ट्रवादीने केलेले आहे. यातून आपले पुरोगामीत्व आणि दुरदर्शीत्व त्यांनी दाखवून दिलेले आहे. आता अशा प्रकारचा जन्म आपण घेतला आहे याबाबत कोणाला वाईट वाटत नाही. खुलेपणाने ते स्वीकारत आहेत. त्यांच्यावर चांगले चित्रपटही निघत आहेत. शुभमंगल जादा सावधान मधून त्यांनी याबाबत चांगली भूमिका घेतली होती. कार्पोरेट जगतात, आयटी क्षेत्रात सर्वाधिक गे कल्चर पहायला मिळते. त्यामुळे वाढती संख्या पाहता या लोकांना राष्ट्रवादीने मुक्त व्यासपीठ देण्याचे धाडस दाखवले आहे, त्याचे कौतुक करावे लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: