हिंदुस्थानी संगिताचे मास्टर -मास्टर कृष्णराव
काही नावचं अशी असतात की ती ऐकल्यावर,आठवल्यावर कानात आपोआप आठवणीनी ऑर्गनचे, पायपेटीचे किंवा संवादिनीचे सूर उमटतात. कुठेतरी तंबोर्याचा आवाज येतो. तबल्याचा ताल घुमू लागतो. अशा नावांमध्ये मास्टर कृष्णराव, गोविंदराव टेंभे, छोटा गंधर्व अशा अनेकांची आठवण होते. या पंकतीतील एक नाव म्हणजेच मास्टर कृष्णराव. आजच्या दिवशी म्हणजे 20 ऑक्टोबरला वृद्धापकाळाने मास्टर कृष्णरावांचे निधन झाले, त्यांचा हा स्मृतीदिन.मास्टर कृष्णरावांची संगीत साधना मोठी होती. त्यांचे गुरू म्हणजे पं. भास्करबुवा बखले हे होते. आपल्याकडे संगीत विशेषत: शास्त्रीय संगीताला गुरूशिष्य परंपरेला फार महत्व आहे. त्यामुळे कोणाही गायकाचा उल्लेख हा तो कोणाचा शिश्य आहे असाच करायला हवा. मास्टर कृष्णरावांनी गायन प्रकारात हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताला महत्व दिले होते.
संगीत कारकीर्द
शास्त्रीय गायक, संगीत नट, संगीतकार अशी त्यांची फार मोठी आणि लक्षणीय अशी कारकीर्द घडली. ते पेशाने गयक होते. पुण्यातील भारत गायन समाज ही त्यांची संस्था होती. त्यांच्या एकुणच कारकीर्दीसाठी त्याचा साहित्य अकादमी रत्न सदस्यत्व, विष्णुदास भावे सुवर्णपदक, बालगंधर्व सुवर्णपदक देउन गौरव करण्यात आला होता. तर शासकीय मानाचा पुरस्कार पद्मभूषण त्यांना मिळाला होता.
कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर हे त्यांचे खरे नाव होते. पण मास्टर कृष्णराव या नावाने ते लोकप्रिय झाले.
मास्तर कृष्णरावांचा जन्म पुणे जिल्ह्यात आळंदी येथे झाला. त्यांचे कुटुंबीय देशस्थ यजुर्वेदी ब्राम्हण होते व कृष्णरावांचे वडील गणेशपंत हे वेदपठण करणारे ज्ञानी पंडित होते. त्यांच्या निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक मंडळी या नाटक मंडळीत बाल गायकनटाचे काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते ’संत सखू’ नाटकात विठोबाची भूमिका करत असत. ह्याच नाटक मंडळीत त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्वांचे मार्गदर्शन लाभले. नाटकाच्या फिरत्या दौर्याने सवाई गंधर्वांना मास्टर कृष्णरावांना योग्य प्रकारे शास्त्रोक्त गायनाचे धडे देता येत नव्हते. संगीत शारदा नाटकात कृष्णरावांची भूमिका बघून व गायन ऐकून भास्करबुवा फार खूष होते. त्यानंतर 1910 मध्ये मास्टर कृष्णरावांनी पंडित भास्करबुवा बखले यांचे शिष्यत्व स्वीकारले स्वतः सवाईगंधर्वांनी मास्टरांना बुवांकडे सोपवले होते .
आपल्या गुरूंच्या आग्रहास्तव मास्टर कृष्णरावांनी गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते बालगंधर्वांबरोबर मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी ’संगीत शारदा’, ’संगीत सौभद्र’, ’एकच प्याला’ यांसारख्या अनेक संगीत नाटकांत काही पुरुष (गायक नट) भूमिका आणि बर्याच स्त्री (गायक नट) भूमिकाही केल्या.
गुरूंच्या निधनानंतर गंधर्व मंडळींच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम मास्टर कृष्णरावांकडे आले. ’सावित्री’, ’मेनका’, ’आशा-निराशा’, ’अमृतसिद्धी’, ’संगीत कान्होपात्रा’ यांसारख्या नाटकांना संगीत देताना मास्टर कृष्णराव त्यातील प्रमुख अभिनेत्यांना संगीत तालीम देत असत. बालगंधर्वही त्यांना गुरुस्थानी मानायचे.
नंतरच्या काळात त्यांनी ’नाट्य निकेतन’साठी केलेल्या संगीत रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली ’कुलवधू’, ’एक होता म्हातारा’, ’कोणे एके काळी’ यांमधील गाणी त्यांतील भाव, गेयता व सुमधुरतेसाठी वाखाणली गेली.
मास्टर कृष्णरावांनी ’धर्मात्मा’, ’वहाँ’, ’गोपाळकृष्ण’, ’माणूस’, ’अमरज्योती’, ’शेजारी’ यांसारख्या चित्रपटांनाही संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या व इतर अनेक चित्रपटांतील गाणी खूप गाजली. त्यांनी एकूण 19 चित्रपटांना संगीत दिले. त्यात अत्रे फिल्म्सच्या गाजलेल्या ’वसंतसेना’ चित्रपटाचा समावेश आहे तसेच माणिक चित्रसंस्थेच्या ’कीचकवध’ चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी ’भक्तीचा मळा’ व ’मेरी अमानत’ चित्रपटांत भूमिकाही केल्या होत्या.
विशेषत: संगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मास्टर कृष्णरावांनी 1922 ते 1952 दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे. ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच ठुमरी, नाट्यगीत, भजन व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी रचलेले ’झिंजोटी’ रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे ’वंदे मातरम’ वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची 78 आर पी एम ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली.
अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली 19 पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील गायन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे 1940 ते 1971 या काळात लिहिलेले ’रागसंग्रहमाला’ नामक सात खंड त्यात समाविष्ट आहेत. या रागसंग्रहमालेस भारत सरकारची मान्यता लाभलेली आहे. हिंदुस्थानी संगीत टिकवण्यासाठी केेलेला हा प्रयत्न फार महत्वाचा आहे.
विशेष म्हणजे ’वंदे मातरम’ हे गीत बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरम् अनेकानेक विविध चाली लावून, त्यातल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी पंडित नेहरूंची भेट घेऊन व त्यांच्यासमोर संसदेत प्रात्यक्षिके देऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. नेहरूंनी आधीच ’जन गण मन ’ हे राष्ट्रगीत म्हणून निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली. परंतु ’वंदे मातरम’ ला पूर्णपणे न वगळता भारत सरकारतर्फे राष्ट्रीय गीत म्हणून अधिकृत दर्जा देण्यात आला. या घटनेनंतर मास्टर कृष्णरावांनी संगीतबद्ध केलेल्या वंदे मातरम् ची रेकॉर्ड विविध शाळा-महाविद्यालये, अनेक वैयक्तिक व सार्वजनिक संस्था वगैरे ठिकठिकाणी कित्येक वर्षे वाजवली जात असे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनंतीवरून मास्टर कृष्णरावांनी संपूर्ण बुद्ध वंदना सांगीतिक मीटरमध्ये बसवली व बाबासाहेबांनी त्याची ध्वनिमुद्रिका काढली. याकरिता मास्तर कृष्णरावांनी पाली भाषेचा अभ्यास केला होता.
पुणे येथे आजच्या दिवशी म्हणजे 20 ऑक्टोबर 1974 ला त्यांचे स्वतःच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांचा वारसा त्यांच्या कन्येने जपला. वीणा चिटको या त्यांच्या कन्येने काही काळ संगीतकार म्हणून कारकीर्द गाजवली. त्या मराठी भावगीत विश्वातील पहिल्या स्त्री संगीतकार म्हणून ओळखल्या जातात.