ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा। काय भुललासी वरलीया रंगा।। असे संत चोखामेळा आपल्या अभंगात म्हणतात. ऊस वाकडा असला तरी त्याचा रस वाकडा नसतो, तो गोडच असतो. माणसाचे शरीर किंवा जात कशीही असली, तरी आत्म्याचे विठ्ठलावरील प्रेम श्रेष्ठ असते. बाह्य रूपाला भुलू नका. तर अंतरात्मा जाणा. ही आहे वारकरी संतांची शिकवण. ज्ञानदेवांना अभिप्रेत असलेला मानवता धर्म येथे दिसून येतो.
परेहुनि परते घर। तेथे राहू निरंतर॥
सर्वांचे जे अधिष्ठान। तेचि माझे रूप पूर्ण॥
संत नामदेवांचा हा अभंग लक्षात घेतला आणि संत ज्ञानदेवांचे (नामजपाद्वारे वाणीचा हात धरून) संजीवन समाधीसुखाचे अनुभवकथन पाहिले तर देवाचिये द्वारी म्हणजे काय ते नक्की लक्षात येईल. नामसाधनेला वैखरीपासून सुरुवात होते आणि हळूहळू या नामाला सूक्ष्मता येते आणि ते आतल्या आत सहज चालते. या वाणीला मध्यमा म्हणतात. मध्यमेत स्थिर झालेले नाम अंत:करणाला व्यापणास सुरुवात होते. तेथे नामाचा पश्यंती वाणीमध्ये प्रवेश होतो. साधक स्वप्रयत्नाने येथेपर्यंत पोचतो. पण पुढे परा वाणीत जप होण्यासाठी एकतर ईश्वरीकृपा तरी हवी किंवा सद्गुरूंनी अनुग्रह केला पाहिजे. सद्गुरू काही काळ याचा अनुभव देतात.
ज्ञानेश्वरांनी प्रत्येक गोष्ट आपले सद्गुरू आणि थोरले बंधू निवृत्तीनाथ यांना स्मरून आणि साक्षीने केलेली आहे. जे संत असा अनुभव साधकाला/शिष्याला देऊ शकतात तेच खरे सद्गुरू! तो अनुभव खरेच दिव्य असतो. सद्गुरू सत्शिष्याला परा वाणीची एक झलक दाखवून साधकाला साधनेची दिशा देतात. देवाच्या दारात नेऊन उभे करण्याचे काम सद्गुरू करतात. पण त्यासाठी आपल्या मनाची कवाडे उघडता आली पाहिजेत. त्यासाठी हवी श्रद्धा! श्रद्धेने जर देवाच्या दारात जीवनातील प्रत्येक क्षण नामाने भरत राहिलो तर चारी मुक्ती साधता येणे सोपे आहे. काही ठिकाणी क्षणभरी म्हणजे क्षणभर असा अर्थ घेतात. पण ज्ञानदेवांनीच हरिपाठाच्या २७व्या अभंगात सांगितले आहे, सर्वसुख गोडी साही शास्त्री निवडी। रिकामा अर्धघडी राहू नको॥ यावरून असे समजायला हरकत नसावी की, प्रत्येक क्षण नामाने भरता आला पाहिजे. प्रत्येक क्षणाच्याठायी ‘उभा’ राहा म्हणजे सावध राहा. हे सांगून ज्ञानदेव खºया ज्ञानाचा मार्ग दाखवतात.
प्रत्येक जण कुठे ना कुठे तरी उभा असतो. पण नेमके कुठे उभे असले पाहिजे हे ज्ञान ज्ञानदेव देतात. अगदी ट्रॅफिक हवालदारही नोकरीवर ‘उभा’ असतो. पण त्याचे अधिक लक्ष असते ते कोणता वाहनचालक नियमभंग करतो याकडे. देशाच्या सीमांचे रक्षण करणारा जवानही ‘उभा’ असतो. पण तो सावध असतो ते शत्रूंकडून काही हल्ला होणार नाही याची काळजी घेत सीमांचे रक्षण करण्याबाबतीत. पण ज्ञानदेव देवाचीये द्वारी उभे राहण्यास सांगतात. कारण आपल्याकडे भक्तांचे ४ प्रकार श्रीमद्भगवत गीतेत सांगितले आहेत. अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी! ज्ञानदेव ‘हरिपाठ’ हा जिज्ञासू/मुमुक्षू साधकासाठीच लिहीत आहेत. त्याची तुलना फक्त देशरक्षणासाठी सावध असणाºया जवानाशीच व्हावी असे वाटते. मुमुक्षू साधक जर सावधपणे देवाच्या दारात उभा राहिला तर चारी मुक्ती साधता येतात.
प्रफुल्ल फडके/संतकृपा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा