२५ जुलैला आषाढी एकादशी आहे. अजून चार दिवसांनी देहू-आळंदी आणि महाराष्ट्रातून वारीला सुरुवात होईल. त्यानिमित्ताने आजपासून आपण संतकृपा या मालिकेतून वारी आणि वारकरी संतांच्या शिकवणुकीचा आस्वाद घेणार आहोत. ‘काय विठोबाचे नाम घेता कळे। पाप ते पळे पूर्वजन्मीचे।। असे संत नामदेवांनी म्हटले आहे. म्हणजे विठ्ठलाचे नाव घेताच पूर्वजन्मीची पापे आणि मनातील वाईट विचार पळून जातात. आजपासून आपल्या मनाची पंढरी करून या नामस्मरणाच्या प्रवासाला सुरुवात करूया. वारीचा प्रवास हा नामसंकीर्तनातून होत असतो. नाम घेता घेता आपणच विठ्ठलमय होऊन जातो. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम असा हा वारीचा आणि वारकºयांचा प्रवास असतो. हा जो क्रम आहे तो फार महत्त्वाचा आहे. सगळ्यातून निवृत्त होण्याची जाणीव निवृत्तीनाथ देतात. निवृत्तीनंतर ज्ञान प्राप्ती होते. सगळ्या लोभ, माया, पाशांपासून निवृत्त झालो तरच ज्ञान प्राप्ती होते. त्यानंतर पुढच्या प्रवासाचा सोपान म्हणजे जीना. हा सोपान पार केल्यावर मुक्तीचे द्वार उघडते. मग उरतो तो एकनाथ. त्या नाथाला शरण गेल्यावर सगळे काही साध्य होते. ते साध्य करण्याचे साधन म्हणजे नामस्मरण. नामस्मरणातून देवत्व प्राप्त होते हे सांगतो तो नामदेव. मग सगळे भेदाभेद गळून पडतात. तुझे माझे काही शिल्लक उरत नाही. तू का राम? मी का राम? असे काही शिल्लक राहात नाही. सगळे काही विठ्ठलमय आहे हे सांगतात ते तुकाराम. अशी ही परंपरा आहे. या परंपरेतून मनाची अवस्था अशी तयार करायची की, आत्मा-परमात्मा याची ओळख होईल. त्यातून आत्मज्ञान प्राप्त होईल. या आत्मज्ञानाचा सोहळा म्हणजे ही वारी. त्या वारीसाठी विविध संतांचे अभंग, कीर्तन, नामस्मरण, भारुडे, हरिपाठातील अभंग यांचा आधार घेत हा प्रवास सुरू होतो. त्याचे शाब्दिक दर्शन करणारी ही संतकृपा नावाची वारी आहे.
‘वारी’ म्हणजे केवळ चालणे नव्हे, तर ती आहे विठ्ठलभेटीची अनावर ओढ! दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाºया आणि विठ्ठलाच्या चरणी लीन होणाºया भक्तांना ‘वारकरी’ म्हणतात. त्यामागे फार मोठा अर्थ आहे. वारीची परंपरा शेकडो वर्षे जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत पंढरीची वारी करत असत, असा उल्लेख आढळतो. पुढे संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि इतर सर्व संतांनी या परंपरेला भक्तीचे आणि समतेचे मोठे स्वरूप दिले. वारीमध्ये कुठलाही उच्च-नीच भेदभाव नसतो. सगळे सारखे असतात. म्हणूनच एकमेकांच्या पाया पडतात. लहानमोठा असा विचार न करता एकमेकांच्या पाया पडण्याची प्रथा फक्त वारकरी संप्रदायात आहे. खांद्यावर पताका, गळ्यात तुळशीची माळ आणि मुखात ‘ज्ञानबा-तुकाराम’चा गजर, हाच वारकºयाचा खरा दागिना! नवनाथी संप्रदायातून, दत्त संप्रदायातून जो भक्तिमार्ग दाखवला आहे, त्या भक्तीची पताका घेऊन जाणारा हा मार्ग आहे. त्या मार्गावरून जाणाºयाला आत्मज्ञान आणि आत्मभान साधता येते. रामकृष्ण हरि!
संतकृपा/प्रफुल्ल फडके
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा