शुक्रवार, ३ जुलै, २०२६

ईतिहासातील खºया नायकांना ओळखण्याची गरज


अलीकडेच कोलकाता महानगरपालिकेने ‘सुहरावर्दी अ‍ॅव्हेन्यू रोड’चे नाव बदलून ‘गोपाल मुखर्जी रोड’ असे ठेवले आहे. काँग्रेस, टीएमसी आणि डाव्या विचारवंतांचा असा युक्तिवाद आहे की, या रस्त्याला हुसेन शहीद सुहरावर्दी यांचे नाव न देता, त्यांचे काका सर हसन सुहरावर्दी यांचे नाव देण्यात आले होते. सर हसन सुहरावर्दी हे ब्रिटिश काळात एक प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि वैद्य होते, तसेच १९३० ते १९३४ दरम्यान कोलकाता विद्यापीठाचे कुलगुरू होते. बंगालमधील बहुसंख्य जनतेच्या मते, जाणीवपूर्वक विसरल्या गेलेल्या महान नायक गोपाळ पाठा (प्रचलित नाव) यांना योग्य तो सन्मान परत मिळवून देण्यासाठी हे नावबदल एक आवश्यक पाऊल आहे.


वास्तविक पाहता, नावबदलाला विरोध करणारे पक्ष आणि विचारवंत हा मुद्दा त्यांच्या सोयीनुसार मांडत आहेत आणि या चित्रातील गडद बाजू जाणीवपूर्वक लपवत आहेत. ज्या हसन सुहरावर्दींची ते एक महान शिक्षणतज्ज्ञ, वैद्य आणि समाजसेवक म्हणून सतत प्रशंसा करतात, ते खरेतर त्यांचे पुतणे हुसेन शहीद सुहरावर्दी यांच्या वारसा आणि राजकीय पार्श्वभूमीशी अतूटपणे जोडलेले आहेत. दोघेही केवळ एकाच कुटुंबाचे वंशज नव्हते, तर मुस्लीम लीगचे नेतेही होते. त्या दोघांनीही विभाजनवादी राजकारणाला खतपाणी घातले आणि ते जिनांच्या द्विराष्ट्र सिद्धांताचे कट्टर समर्थक होते. ६ फेब्रुवारी १९३२ रोजी कोलकाता विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात तत्कालीन गव्हर्नर स्टॅनले जॅक्सन यांच्यावर गोळीबार करण्यापासून महान क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिक बिनादास यांना त्यांनी बळजबरीने रोखले होते, म्हणून तत्कालीन ब्रिटिश सरकारने हसन सुहरावर्दी यांना ‘नाइट’ ही पदवी दिली.

या कृतीबद्दल बिनादास यांना ज्या दिवशी तुरुंगात टाकण्यात आले, त्याच दिवशी वसाहतवादी सत्तेप्रती त्यांची निष्ठा दाखवण्यासाठी हसन सुहरावर्दी यांना ‘नाइट’ ही पदवी देण्यात आली. त्यानंतर एप्रिल १९३३ मध्ये ब्रिटिश सरकारने कोलकातामधील एका रस्त्याला त्यांचे नाव दिले, ‘सुहरावर्दी अ‍ॅव्हेन्यू’. असेही म्हटले जाते की, हसन सुहरावर्दी यांनी ब्रिटिश सरकारचा निषेध म्हणून १९४६ मध्ये आपली ‘नाइट’ पदवी परत केली. हे देखील अर्धसत्य आहे. सत्य हे आहे की, भारताच्या फाळणीसाठी मुस्लीम लीगच्या मागणीला व्यापक स्वीकृती मिळवण्यासाठी त्यांनी आपली ‘नाइट’ पदवी परत केली. हसन सुहरावर्दी यांची मुलगी पुढे पाकिस्तानची पहिली महिला नागरी सेविका बनली, तिने संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानच्या शिष्टमंडळात काम केले आणि तिला मरणोत्तर पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘निशान-ए-इम्तियाज’ प्रदान करण्यात आला. जो ब्रिटिशांचा कट्टर भक्त होता, एका महान क्रांतिकारकाला तुरुंगात टाकण्यास दोषी होता आणि मुस्लीम लीगचा नेता म्हणून स्वत:साठी व आपल्या वारसांसाठी एका वेगळ्या अस्मितेवर आधारित स्वतंत्र देशात भविष्याची कल्पना करत होता, अशा माणसाच्या नावाने भारतातील कोणत्याही शहराला, रस्त्याला किंवा इमारतीला नाव का द्यावे? भारताच्या फाळणीसाठी जबाबदार असलेल्यांचा गौरव का करावा?


त्यांचा पुतण्या, हुसेन शहीद सुहरावर्दी यांच्या नावावर इतिहासात दोन हिंदू हत्याकांडांची नोंद आहे. त्यावेळी बंगालमध्ये मुस्लीम लीगचे अंतरिम सरकार होते आणि हुसेन शहीद सुहरावर्दी त्याचे पंतप्रधान होते. जिनांनी पुकारलेल्या बंगालमधील ‘प्रत्यक्ष कृती दिना’चे (Direct Action Day) नेतृत्व त्यांनी केले. त्यांनी हिंदूंच्या हत्याकांडाचे नियोजन केले आणि ते घडवून आणले. १६ आॅगस्ट १९४६ रोजीच्या प्रत्यक्ष कृती दिनापूर्वी त्यांनी कोलकात्याच्या २४ पैकी २२ पोलीस ठाण्यांमध्ये मुस्लीम प्रमुख आणि दोन ठाण्यांमध्ये अँग्लो-इंडियन प्रमुखांची नियुक्ती केली. त्यांनी पोलीस आणि सरकारी कर्मचाºयांना विनाकारण तीन दिवसांची रजा मंजूर केली. प्रत्यक्ष कृती दिनी, ते स्वत: पोलीस मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात बसले आणि दंगलखोरांविरुद्ध कारवाई करण्यापासून पोलिसांना रोखले.

याचा परिणाम असा झाला की, केवळ कोलकात्यातच ७२ तासांत ६,००० हून अधिक हिंदूंची कत्तल झाली, १७,००० हून अधिक जखमी झाले आणि १,००,००० हून अधिक हिंदू बेघर झाले. या दंगलीनंतर झालेल्या नोआखली दंगलीत हजारो हिंदूंची कत्तल झाली, बहुसंख्य लोकांची प्रचंड जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाले, तसेच माता-भगिनींचा अमानुष छळ झाला. हेच हुसेन शहीद सुहरावर्दी पुढे १९५६-५७ मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. देशाच्या आयकर विभागाने १९४५-४६ आणि १९४६-४७ या वर्षांसाठी त्यांच्यावर ५० लाख रुपयांचा कर लावला. तथापि, पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी उदारता दाखवत, तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई आणि बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री बिधान चंद्र रॉय यांना पत्र लिहून त्यांना या कारवाईतून सूट दिली. अखेरीस ते १९४८ मध्ये कायमचे पाकिस्तानात निघून गेले. याउलट, गोपाळ पाठा यांनी केवळ दंगलखोरांपासून हिंदूंचे रक्षण केले नाही, तर जिना, सुहरावर्दी आणि मुस्लीम लीग यांचा कोलकाता पाकिस्तानात जोडण्याचा कटही उधळून लावला. त्यामुळे ‘सुहरावर्दी अ‍ॅव्हेन्यू रोड’चे ‘गोपाळ मुखर्जी रोड’मध्ये रूपांतर करणे, हे इतिहासातील नायक आणि खलनायकांची खरी ओळख प्रस्थापित करण्याच्या दिशेने एक अर्थपूर्ण पाऊल आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: