माणसाच्या जन्मदिवशीच किंवा वाढदिवसाच्या दिवशीच त्याचा मृत्यू होणे, असे फार क्वचित घडते. पण या देशात पंचवीस वर्षांपूर्वी स्वदेशीचा प्रसार करणाºया राजीव दीक्षित यांचा ३० नोव्हेंबर हा जन्मदिवसही आहे आणि मृत्यूदिनही आहे. १९६७ साली जन्माला आलेले राजीव दीक्षित यांचा दहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१०ला मृत्यू झाला. हा मृत्यू थोडा संशयास्पद आणि गूढ असला, तरी त्याची फारशी चर्चा झाली नाही, पण राजीव दीक्षित यांनी जो संपूर्ण देश आपल्या स्वदेशी अभियानाने पिंजून काढला होता त्याला तोड नव्हती. त्यांच्या कॅसेट आणि व्याख्याने ही अप्रतिम म्हणून गाजली होती. एका अर्थव्यवस्थेला, मल्टिनॅशनल कॉर्पोरेट बाजारपेठेला हादरवून सोडणारी त्यांची व्याख्याने क्रांतिकारक अशीच होती.
राजीव दीक्षित हे एक स्वदेशीचा प्रचार करणारे स्वदेशी अभियान चालवणारे भारतीय समाज सुधारक होते. स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मिती आणि उत्पादनाला प्रोत्साहन देऊन देशाचा विकास साधण्याची त्यांची कल्पना होती. आज कोरोनाच्या काळात चिनी मार्केटपासून दूर जाण्यासाठी पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारताची कल्पना मांडली आहे. लोकल उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन ते करत आहेत, पण हे कित्येक वर्षांपूर्वी राजीव दीक्षित यांनी सांगून देश पिंजून काढला होता. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या अगदी घाईला आल्या होत्या. त्यांनी स्वदेशी चळवळ बळकट केली, आपल्या अनेक व्याख्यानांतून त्यांनी स्वदेशी उत्पादनांबद्दल जनमानसांत प्रचार केला व लोकांना स्वदेशी वापराचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. ते भारतीय स्वाभिमान आंदोलनचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. राजीव भाई दीक्षित एक क्रांतिकारी होते. त्यांनी संपूर्ण भारतीय इतिहासाचा अभ्यास केला. ते स्वदेशी जागरणकर्ता होते.
राजीव दीक्षित यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९६७ रोजी उत्तर प्रदेशातील, अलिगढ जिल्ह्यातील नाह गावात झाला. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण फिरोजाबाद जिल्ह्यात झाले. त्यांनी एमटेकची पदवी आयआयटी कानपूरमधून प्राप्त केली आणि डॉक्टरेट फ्रान्समधून घेतली. ते अविवाहित होते. उच्च पगाराची नोकरी सोडून त्यांनी आपले आयुष्य देशासाठी व्यतीत केले. स्वदेशीचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या ध्वनिफितींमुळे ते प्रसिद्ध झाले. त्यांनी व्याख्याने ध्वनिमुद्रित करून ती नंतर लोकांना उपलब्ध होतील याची परिपूर्ण काळजी घेतली होती. भारताचा काळा पैसा विदेशी बँकांमध्ये अनधिकृतरीत्या कसा फिरतो आहे, हे पण त्यांनी उघड करून दाखवले.
भारतीयांनी गैर मार्गाने मिळवून स्विस बँकांमध्ये जमा केलेल्या सर्व काळ्या पैशांची माहिती उघड व्हावी, यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. स्वदेशीचा प्रचार गावोगावी जाऊन केला. जास्तीत जास्त लोकांनी स्वदेशी वस्तू वापरल्या, तर देशात रोजगार निर्माण होईल व देशातला पैसा देशातच फिरत राहील हे तत्त्व त्यांनी लोकांसमोर मांडले. सतत २० वर्ष व्याख्यान देत ते देशभर फिरले. भिलाईमध्ये व्याख्यानासाठी दौºयावर असताना, ३० नोव्हेंबर २०१० रोजी त्यांचे अचानक निधन झाले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला असे प्राथमिकरीत्या समजण्यात आले होते, परंतु अजूनही त्यांच्या मृत्यूचे खरे कारण अज्ञात आहे.
पण राजीव दीक्षित यांच्या व्याख्यानांचा, त्यांची कॅसेट ऐकून युवावर्ग इतका प्रभावित होत होता की अनेकांनी स्वदेशी, आयुर्वेदिक, हर्बर उत्पादने वापरण्यास सुरुवात केली होती. कोलगेट पामोलिव्हसारख्या कंपनीला तर त्याचा खूपच फटका बसला होता. त्यामुळे या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या जाहिरातीतून इंडिया हा शब्द कंपनीच्या नावाबरोबर लावायला सुरुवात केली. उत्पादनांच्या किमती इतक्या कमी ठेवल्या की, कमी किमती ठेवून मार्केट ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू झाले, पण राजीव दीक्षित यांच्या व्याख्यानांचा फायदा सर्वाधिक कोणी उचलला असेल तर तो गुजराती व्यापाºयांनी उचलायला सुरुवात केली. कारण त्या सुमारास आलेली स्वदेशी उत्पादने यांचे मार्जीन जास्त असल्याने त्याचा लाभ घेण्यास सुरुवात केली. अर्थात राजीवजींचा तसा हेतू नव्हता, पण कोणत्याही परिस्थितीचा फायदा घेणे हे व्यापारी वर्गाला जमते. त्याचा फायदा त्यांनी उठवला होता हे नक्की. म्हणजे आजच्या परिस्थितीत व्यापारी मास्क, सॅनिटायझर्स, साबण, जंतुनाशके यांचा इतका व्यापार करत आहेत की, कोरोना त्यांना वरदान ठरला आहे. तसेच पंचवीस वर्षांपूर्वी राजीव दीक्षीत यांनी निर्माण केलेले वादळ व्यापारी वर्गाला फायदेशीर ठरले होते. त्यामुळे स्वदेशी कंपन्यांविरोधात मल्टिनॅशनल कंपन्या यांच्यातील छुपे वॉर इतके टोकाला गेले होते की, कधी किमती कमी करून, उत्पादनाचा आकार कमी करून, किमती नियंत्रित ठेवल्या जात होत्या. तर कधीकधी अपप्रचार करूनही त्याला उत्तर दिले जात होते. यामध्ये एक गाजलेले वॉर म्हणजे दंतमंजन आणि पेस्ट यामध्ये आम्ही पूर्णपणे शाकाहारी घटकांचा वापर करतो. एका कंपनीने चक्क आम्ही दाताच्या पावडर आणि पेस्टमध्ये हाडांच्या पावडरचा वापर करत नाही, अशी हवा केली होती. त्यामुळे शाकाहारी किंवा जैन समाजाच्या लोकांनी काही टुथपेस्टवर अक्षरश: बहिष्कार टाकला होता. दातांच्या पावडर आणि पेस्टमध्ये माणसाच्या आणि प्राण्यांच्या हाडांच्या पावडरचा वापर होतो हे पुसून टाकण्यासाठी कितीतरी उपादकांना जिवाचे रान करावे लागले होते. त्यासाठी उत्पादनावर हिरवा आणि लाल रंगाचा ठिपका देण्याचा विचार करावा लागला होता. हे बाजारपेठेतील युद्ध पेटले होते, ते केवळ स्वदेशीमुळे.
राजीव दीक्षित हे अत्यंत निरपेक्ष भावनेने हे युद्ध लढत होते. ते जागरण करत होते. देशहितासाठी करत होते. देशी उद्योग मोठा व्हावा हा त्यांचा हेतू होता, पण त्याला कालांतराने माध्यमजगत आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी वेगळे वळण देण्याचा प्रयत्न झाला. पण राजीव दीक्षित यांचे विचार कायम चिरंतन आहेत. बााजारपेठेचा मार्ग बदलण्याचे काम त्यांनी केले होते. म्हणजे एकीकडे मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण सुरू झाले होते. परकीय कंपन्यांना दारे सरकारने उघडी केली होती. गॅट करारावार सह्या केल्या होत्या, आपण आर्थिकदृष्ट्या, उत्पादनाच्या दृष्टीने परावलंबी होण्यास सुरुवात झालेली असतानाच हे फार मोठे जागरण राजीव दीक्षित युद्धपातळीवर देशभर करत होते. या कार्यातच त्यांची अखेर झाली होती.