शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०१५

कोटाची किंमत वाढली आणि मोदींची कमी झाली

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूटाची किंमत ४ कोटी ३९ लाखापर्यंत जावून तो विकला गेला. शुक्रवारी पाच वाजता संपलेल्या लिलावात हा भाव ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना इंप्रेस करण्यासाठी आणि भारतातील श्रीमंती आणि समृद्धीचे प्रदर्शन करण्यासाठी नवलख्खा कोट शिवला खरा. पण हाच कोट त्यांना दिल्लीतील गड घालवण्यास कारणीभूत ठरला. त्यामुळे भाजपच्या लाखाचे बारा हजार होण्यापेक्षा या कोटाचे लाखाचे कोटी करून पक्षाची गेलेली पत शाबूत ठेवण्याचा फंडा मोदींनी काढला. पण यामध्ये मोदी देशाचे नेते आहेत हे विसरून पुन्हा गुजरातचे नेते आहेत असे स्पष्ट झाले.  अजूनही नरेंद्र मोदी यांना आपण देशाचे नेते आहोत आणि संपूर्ण देशाने आपल्याला स्विकारले आहे यावर विश्‍वास बसत नाही असे दिसते. त्यामुळे सुरक्षित गड म्हणून गुजरातचा आधार घेतला काय असा सवाल उपस्थित होतो. त्यामुळेच नवलख्खा कोटाची किंमत कोटीत गेली असली तरी मोदींची पत घसरली हे मात्र यातून दिसून आले.
  •    पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव लिहिलेल्या विशेष सुटाच्या लिलावाची बोली दुसर्‍या दिवशी १.४१ कोटींपर्यंत पोहोचली. बुधवारच्या सव्वा कोटीनंतर  भावनगरमध्ये बोटी तोडण्याचा व हिर्‍यांचा व्यवसाय करणारे लीला समुहाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक कोमलकांत शर्मा यांनी ही बोली लावली. 
  • शर्मा यांच्या काही मिनिटे आधी, सुरतचे हिरे व्यावसायिक मुकेश पटेल यांनी १.३९ कोटींची बोली लावली होती. हा सूट हिर्‍यासारख्या जपून ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. सुरतच्या सायन्स कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरू असलेला हा लिलाव शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता संपला आणि मोदींची खरी सुरत समोर आली.
  •      दिल्लीसाठी शिवलेल्या या कोटाचा लिलाव करण्यासाठी नरेंद्र मोदींना गुजरातला का पळावे लागले? अस्सं माहेर सुरेख बाई म्हणत नरेंद्र मोदींनी आपल्या भागात जाण्याचा आणि हा कोट विकण्याचा निर्णय घेतला. हा मोदींचा फार मोठा बचाव आहे. दिल्लीत आम आदमीच्या मफलरने ऐन विधानसभा निवडणुकीत या कोटाचा गळा आवळला. त्यामुळे या कोटाला दिल्लीत किंमत मिळणार नाही याची खात्री मोदींना पटली असावी. हा पंतप्रधान मोदींचा मानसिक पराभव म्हणावा लागेल.
  • मोदींचा हा सूट लिलावात खरेदी करू इच्छिणारे सगळे गुजरातमधील व्यापारी, भांडवलदार आहेत. त्यामुळे मोदींचे आणि भाजपचे कार्यकर्तेच असलेल्या लोकांकडून हा कोट खरेदी केला जात आहे. काळा पैसा पांढरा करण्याची ही नामी युक्ती भाजपने काढलेली आहे हे यातून स्पष्ट होताना दिसते आहे. कदाचित भारतीय जनता पक्षाला पक्षनिधीच्या माध्यमातून मिळालेला अमाप पैसा हिशोबात आणण्यासाठी हा कोट जवळपास दीड कोटीला विकला गेला असे दाखवून नवलख्खाचे दीडकोटी केले असावेत. पण या हातचलाखीसाठी त्यांना देशातला अन्य कोपरा सापडला नाही तर सुरतेला गुजरातमध्येच जावे लागले हे स्पष्ट दिसून आले. म्हणजे आपल्या गल्लीतील हे शौर्य देशभर डरकाळ्या फोडायला कुचकामी ठरणार असे दिसू लागले आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कोटाचा लिलाव राजधानी दिल्लीत का केला नाही? देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत किंवा महाराष्ट्रात का केला नाही? ज्या वाराणसी मतदारसंघातून ते निवडून आले त्याठिकाणी का केला नाही? असे अनेक प्रश्‍न यामुळे निर्माण होतात. विशेष म्हणजे या कोटाच्या लिलावातून आलेले पैसे हे गंगा शुद्धीकरणासाठी वापरले जाणार आहेत. मग वाराणसीतच त्याचा लिलाव का केला नाही असा प्रश्‍न पडतो. भ्रष्टाचाराचा, काळा पैसा या लिलावात लागून गंगेचे शुद्धीकरण कसे होणार? जी गंगा सर्वांना पवित्र आणि शुद्ध करते त्या गंगेचे काळ्या पैशाने शुद्धीकरण करण्याची किमया नरेंद्र मोदी करणार आहेत काय?
  •     आमच्या महाराष्ट्रात जर लिलावासाठी हा कोट आला असता तर तो बोहारणीने तरी घेतला असता की नाही हा प्रश्‍न पडला असता. कारण आमची बोहारीण ही तोलून मापून घेणारी असते. वापरलेल्या जुन्या कपड्यांच्या मोबदल्यात आणखी काही तरी चांगले काढा की असा तिचा आग्रह असतो. त्यामुळे या कोटाच्या बदल्यात महाराष्ट्रात एखादे पातेले आले असते आणि ती भोवारीण आपल्या टोपलीत बाहंडई बरोबर मोदई असे ओरडत निघून गेली असती.
  • पण काहीही असो नरेंद्र मोदींनी खादीच्या कुडत्यातून येवून नवलख्खा कोटात प्रवेश केला आणि त्यांची किंमत घसरली एवढे मात्र या देशाने बघितले आहे. देशभरात आलेली मोदी लाट कोटाच्या खिशात गेली आणि आता या लाटेला आपली पत सांभाळण्यासाठी गुजरातचाच आधार घ्यावा लागला हे निश्‍चित. लिलाव हा सगळीकडे चालू शकला असता. अगदी तीन चार दिवसात तो बंद करण्याची काहीही गरज नव्हती. मुंबईत घेवून किंवा दिल्लीत घेवूनही गुजराती व्यापार्‍यांना बोलवता आले असते. पण मुंबईत किंवा देशाच्या अन्य कोपर्‍यात लिलावासाठी गुजराती नागरिक, व्यापारी भांडवलदार आले असते तर गुजराती माणसांशिवाय या कोटाला कोणी किंमत देत नाही असा संदेश गेला असता. त्यामुळे हा लिलाव गुजरातमध्येच करण्याचा निर्णय भाजप आणि मोदींनी घेतला. पण त्यातून एक स्पष्ट झाले. ते म्हणजे कोटाची किंमत वाढली आणि मोदींची कमी झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: