संशयकल्लोळ
राज्यातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीत जो तो 'चमकोगिरी' करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यातून उगाचच वावड्या उठवणे, साप सोडणे, अफवा पसरवणे हे प्रकार गेल्या चार दिवसांत पहायला मिळाले. म्हणजे एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेला एकमेकांना 'एप्रिल फूल' करायचे प्रकार होत असतात, पण सध्या प्रत्येक राजकीय पक्ष, त्यांचे नेते एप्रिल फूलप्रमाणे 'नोव्हेंबर फूल' करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये वृत्तवाहिन्यांचे बातमीदार, अँकर आणि छायाचित्रकार यांची पळापळ पाहून इतका गोंधळ निर्माण होत आहे की तो पाहिल्यावर 'क'च्या बाराखडीच्या मालिका निर्माण करणाऱ्या आणि अतर्क्य कथांमध्ये प्रेक्षकांना गुंतवून ठेवणाऱ्या एकता कपूर किंवा मराठीतील रोहिणी निनावे यांनाही जमेल की नाही ही शंका आहे. यातून जो संशयकल्लोळ निर्माण होत आहे त्याइतके मनोरंजन कोणतीही वाहिनी करू शकेल असे वाटत नाही. म्हणजे झी, सोनी, कलर्स अशा हिंदी अथवा मराठी वाहिन्यांवर ज्या मालिका दाखवल्या जातात त्यामध्ये अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंध याला फारच महत्त्व असते. म्हणजे साधेसरळ जीवन जगणारे, एखादेही लफडे बाहेर नसणारे नवरे या जगात आहेत यावर कोणी विश्वासच ठेवणार नाही किंवा आपल्या नवऱ्याचे बाहेर कुठेच लफडे नाही, अनैतिक संबंध नाहीत. यामुळे सर्वसामान्य ्त्रिरया अस्वस्थ होत असाव्यात, त्यांच्या दृष्टीने तसा नवरा नसणे म्हणजे त्याचे ते डिसक्वालिफिकेशन म्हणावे लागेल असाच संदेश या मालिका देतात. तशीच संशयकल्लोळ, विवाहबाह्य आणि अनैतिकी संबंधांची मालिका राजकारणात सुरू झाली आहे. त्या संशयाच्या भोवऱ्यात लफडेबाजांचा पाठलाग करताना आमचे वाहिन्यांचे कॅमेरे आणि बातमीदार 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील केड्याप्रमाणे कुणाचं काहीही का होईना, मला काही मिळतंय का त्याप्रमाणे भरकटताना दिसत आहेत..अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंध म्हणजे मालिकेत नवरा-बायको सुरुवातीला आनंदी असतात, नंतर कोणीतरी भरकटतो. त्यातून घटस्फोट होतो. मग तो दुसरीकडे जातो. ती दुसऱ्याकडे जाते. बरं हे इथवर थांबत नाही. नवे घरोबे केल्यानंतरही ती पुन्हा त्या पहिल्याला डिवचते, तो पहिला पुन्हा दुसरीबरोबर असताना पहिलीच्या आठवणीत रमतो. त्यामुळे नवी राणी रुसते. तिचा नवा राजा काही वेगळेच चाळे करतो. असेच कथानक म्हणजे फक्त संशयाचे भोवरे आज राजकारणात दिसत आहेत. त्याचे एपिसोड वृत्तवाहिन्यांवर दाखवताना कॅमेरामन आणि बातमीदारांची पळापळ एखादा टीव्ही एपिसोड बनवणारा एडी, शेड्युलर असतो तशी झाली आहे. म्हणजे सेटवर कोणता सीन केव्हा येईल, कोणत्या कलाकाराला केव्हा टायमिंग दिले आहे, त्यासाठी स्पॉटदादापासून सगळे सांभाळून घ्यायचे आणि येईल तो सीन शूट करायचा. नंतर त्याचे एडिटिंग करायचे. नेमके कथानक कुठल्या दिशेने सरकेल हेही अतर्क्य असते. तोच प्रकार इथेही होताना दिसतो..
पहिल्या बातमीचा दुसऱ्या बातमीशी काही संबंध नाही. आत्ता जे बोलले त्याच्या विरुद्ध बातमी पाच मिनिटांत येते. हे प्रकार अतिशय हास्यास्पद आणि करमणूक करणारे आहेत. तिकडे महाराष्ट्राचे वाटोळे झाले तरी चालेल, पण आम्ही फालतू चर्चा, अतर्क्य वृत्त प्रसारित करून गोंधळ माजवून देणार हे नक्की. म्हणजे आज तरी माझ्या नवऱ्याची बायको किंवा तत्सम मालिकांत आणि आजच्या राजकारणात काहीच फरक दिसत नाही. म्हणजे तो गुरुनाथ सुभेदार आणि त्याची भोळीभाबडी बायको यांचा संसार चाललेला असतो, पण त्या गुरूचे लक्ष शनायाकडे जाते आणि तो राधिकाला वाऱ्यावर सोडतो. भोळीभाबडी राधिका आपली कर्तबगारी दाखवते आणि होते एका कंपनीची मालकीण. किती छान ना? तसाच आमचा युतीचा संसार चालला होता, पण या डॅम्बिस भाजपला बहुदा दुसरेच कोणीतरी आवडू लागले. सेनेला गाजर दाखवले आणि ऐनवेळी घटस्फोट झाला. मग काय सेनेने आमच्या राधिका मसालेसारखा फॉर्म्युला काढला. स्वत:च्या पायावर ३०० कोटींची कंपनी थोड्या दिवसांत उभी करून आपली कर्तबगारी दाखवायचा इरादा केला जातो. त्याप्रमाणे सेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सोयरिक जुळवायला सुरुवात केली. आता त्यांना कंपनी स्थापन करण्यापूर्वीच पुन्हा कोणीतरी सेनेला शुकशुक करून संशय निर्माण करतो. नारायण राणे आम्ही भाजपचेच सरकार स्थापन करणार असा साप सोडतात आणि हे सरकार युतीचे असेल असे भासवून ते सरकार स्थापन करण्याची जबाबदारी माझी आहे हे प्रसारमाध्यमांपुढे येऊन सांगतात. त्यामुळे नारायण राणे आपल्या आमदारांना शुकशुक करून बाहेर काढणार का, याची उगाचच भीती सेनेत निर्माण केली जाते. त्या वातावरणाचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादी घेतात. म्हणजे राधिकाच्या कंपनीत जसे राजवाडे, महाडिक गोंधळ घालतात तसाच प्रकार आहे की नाही? सध्याच्या राजकीय नाट्याची स्क्रीप्टही रोहिणी निनावे यांनी लिहिली आहे का? असाच प्रश्न पडेल, कारण इतके अनैतिक, विवाहबाह्य संबंधाचे कथानक कोणीच छानपैकी लिहू शकणार नाही. म्हणजे हा शुकशुकचा प्रकार चालला असतानाच आमच्या अजून जोर बैठकाच चालू आहेत, बैठकांचा जोर चालू आहे असे भासवून सेनेला गॅसवर ठेवण्याचा प्रकार काँग्रेस-राष्ट्रवादी करतात. आता पहिला नवरा हातून गेल्यावर दुसरा मिळालेला नवरा इतक्या सहजासहजी कसा गमवायचा? त्यामुळे त्याला चिकटून राहण्याशिवाय, त्याच्या प्रत्येक गोष्टीला होकार देण्याशिवाय नायिकेपुढे पर्याय उरत नाही. म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक आहे, थोड्या वेळात होणार हे नक्की असताना, त्यात सेनेबरोबर सरकार करण्याचे महत्त्वाचे निर्णय होणार हे नक्की असताना अजित पवार अचानक घाईघाईने बाहेर येतात. कॅमेरामन, बातमीदार त्यांच्यापाठोपाठ धावतात. त्यांना चकमा देण्यासाठी बैठक रद्द झाली असे सांगून आपण बारामतीला चाललो असल्याचे सांगतात. की लगेच बातमी झळकते, आघाडीत बिनसले. बैठक रद्द झाली. काका-पुतण्यात वाद झाला. एकापाठोपाठ एक साप सोडले जातात आणि वातावरण उगाचच संशयास्पद केले जाते. यापैकी काहीच घडलेले नसते, पण प्रेक्षकांची निव्वळ करमणूक करणे हे वृत्तवाहिन्यांचे धोरण राहिल्याने सत्य वृत्त देण्याची जबाबदारी कोणीच घेताना दिसत नाही. त्यामुळे या संशयकल्लोळाचे रसभरीत वर्णन करणे, त्यावर विश्लेषक, विविध पक्षांचे नेते यांना बोलते करणे आणि न घडलेल्या गोष्टीवर वायफळ चर्चा करणे, यात वृत्तवाहिन्या धन्यता मानतात. .विशेष म्हणजे एखादा एपिसोड कसा झाला आहे हे ज्या उत्सुकतेने त्या मालिकेतील कलाकार बघत असतात तसे सगळे राजकीय नेते, विविध पक्षांचे नेते एकत्र येऊन तो कार्यक्रम पाहतात. संशयकल्लोळाच्या या नाट्यात वृत्तवाहिन्यांच्या अतिरेकी वृत्तांकन करणाऱ्या प्रवृत्तीला उल्लू बनवले जाते. त्यामुळे ना सत्य समोर येते, ना खरे वृत्त कळते. फक्त करमणूक आणि गोंधळ घालून जेवढी लांबवता येईल तेवढी डेलीसोप मालिका लांबवली जाते. आजचे महाराष्ट्राचे राजकारण हे अशा मालिकांवरच आधारित असल्याचे दिसते. बाकी त्यात काहीच अर्थ राहिलेला नाही..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा