रविवार, २६ फेब्रुवारी, २०१७

आता फितुरांवर सर्जिकल स्ट्राईक करा

सैन्यातील नागरी पदांच्या भरतीसाठी रविवारी देशभरात होणारी लेखी परीक्षा पेपर आधीच फुटल्यामुळं रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणी ठाणे व पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं महाराष्ट्र व गोव्यात ठिकठिकाणी छापे टाकून शेकडो संशयितांना अटक केली आहे. पण ही बाब किती लज्जास्पद आहे हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे देशाच्या संरक्षणाचा प्रश्न असताना तिथे होणारा भ्रष्टाचार म्हणजे एकीकडे सर्जिकल स्ट्राईक होत असताना आपल्यावर स्ट्राईक होत आहे. देशातील विविध केंद्रांवर रविवारी सकाळी नऊ वाजता सैन्यातील भरतीसाठी लेखी परीक्षा होणार होती. त्यानुसार अनेक केंद्रांवर परीक्षा सुरूही झाली. मात्र, ही प्रश्नपत्रिका काल रात्रीच काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचं समोर आलं. त्यामुळं खळबळ उडाली. पोलिसांनी ठाणे, नाशिक, पुणे, नागपूरसह गोव्यात अनेक ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत 18 आरोपींसह 350हून अधिक उमेदवारांना अटक करण्यात आली. पण ही कारवाई करावी लागली हीच चिंतेची बाब आहे. म्हणजे अशाप्रकार सैन्य भरती होणार्‍यांच्या हातात जर देशाचे संरक्षणाची जबाबदारी जात असेल तर फार चिंतेची बाब आहे. सर्वात विश्वासाची आणि गुप्ततेची गरज सैन्य दलात असताना भ्रष्ट मार्गाने जर सैन्यभरती होत असेल यातून देशाच्या सुरक्षेची जबाबदारी तरी कोण घेईल? अशा मार्गाने पैसे देउन पेपर फोडून भरती होणारे सैनिक उद्या शत्रूला पैसे घेउन देशाचे दरवाजे उघडे करतील. त्यामुळे या लोकांवर कठोर कारवाईची गरज आहे.  रविवारच्या परिक्षेत प्रश्नपत्रिका फोडणार्‍यांनी उमेदवारांकडून एका प्रश्नपत्रिकेमागे 2 लाख रुपये घेतले होते. अनेक उमेदवारांना ही प्रश्नपत्रिका मिळाली. फुटलेली प्रश्नपत्रिका सैन्य भरती बोर्डानं पडताळणीसाठी पाठवली होती. या सार्‍यामुळं प्रामाणिकपणे तयारी करून परीक्षा देणार्‍या उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. काही दबवामुळे  भरती बोर्डानं ही परीक्षा रद्द केली आहे. त्यामुळं उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. पण ही फार चिंतेची बाब आहे. आज हा प्रकार उघड झाला आहे. यापूर्वी असे किती लोक पेपर फोडून भरती झाले आहेत ते तपासावे लागेल. आज पेपर फोडणारे पाकसारख्या शत्रूला सैन्यात गेल्यावर देशाची सिक्रेटस सांगू शकतात. हा भयानक फितुरीचा धंदा आहे. त्याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. या फितुरीवर सर्जिकल स्ट्राईक होणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: