सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१७
आता हे फंडे नाही चालणार
निवडणूक पूर्व चाचण्या, अंदाज व्यक्त करून मतदारांवर हॅमर करण्याचा प्रकार काही वर्षापूर्वी पाहिला. प्रत्येक वाहिनीने अमूक एका पक्षाचा कल आहे हे जीव तोडून सांगत एक सरकार सत्तेवर आणलं. पण आता हे प्रकार चालणार नाहीत अशी आजची परिस्थिती आहे. हे निवडणूक आयोगाच्या लक्षात आल्यावर त्यांनी या प्रकारांवर बंदी घातली. तरीही काही माध्यमे शहाणी होत नाहीत त्याला काय म्हणावे? उत्तरप्रदेश निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर एक्झिट पोल जाहीर करणे ‘दैनिक जागरण’ या हिंदी दैनिकाला महागात पडले आहे. जागरणसारखे माध्यम कसे झोपले? निवडणूक आयोगाच्या सूचनांकडे या माध्यमाने दुर्लक्ष केले हे निश्चितच जागतेपणाचे लक्षण नव्हे. निवडणूक आयोगाने या प्रकरणात दैनिक जागरणविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पण वर्षानुवर्ष मान्यवर माध्यम असलेल्या या समूहाची नाचक्की झाली हे नक्की. उत्तरप्रदेशमध्ये 11 फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले होते. या मतदानानंतर जागरण समुहाने एक्झिट पोल प्रकाशित केला होता. यामध्ये पहिल्या टप्प्यात भाजपला सर्वाधिक जागांवर विजय मिळेल असे म्हटले होते. निवडणूक आयोगाने या एक्झिट पोलवर नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाच्या उल्लंघन केल्याप्रकरणी आयोगाने उत्तरप्रदेशमधील 15 जिल्ह्यांमधील निवडणूक अधिकार्यांना दैनिक जागरण समुहाच्या संपादकीय विभागा विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मतदानाच्या काळात जनमत चाचणी आणि एक्झिट पोल्सवरही बंदी असेल असे आयोगाने स्पष्ट केले होते. दैनिक जागरणचे कार्यकारी संचालक आणि संपादक यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे आयोगाने म्हटले आहे. यासंदर्भातील अहवाल तातडीने सादर करावा असे निर्देशही आयोगाने स्थानिक निवडणूक अधिकार्यांना दिले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा