मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७

आता तयारीला लागा






साधारणपणे शरद पवार बोलतात त्याच्या नेमकं ते उलटं वागतात असे राजकीय निरीक्षक बोलतात. सोमवारी मध्यावधी निवडणुकीची आणि सरकारला पाठींबा न देता निवडणुकीला सामोरे जाण्याचा उल्लेख शरद पवार यांनी करताच भाजप नेत्यांना उकळ्या फुटल्या होत्या. आशिष शेलारांनी तसे बोलूनही दाखवले होते. शरद पवार बोलतात, त्याच्या नेमकं ते उलटं करतात, असं बोलून त्यांनी सरकार वाचवण्याची संधीच गमावली होती. नेमके त्याचे पडसाद आज उमटले.      शिवसेना-भाजप युती ही भाजपमुळे तुटली असल्याचा गौप्यस्फोट करतानाच राज्यातील फडणवीस सरकार पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हातभार लावेल अशा शब्दांत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याचे पुन्हा एकदा संकेत दिले आहेत. मुंबई महापालिका निवडणूक निकालानंतर मध्यावधी निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी राष्ट्रवादी तयार आहे, असा मध्यावधी निवडणुकीचा बॉम्ब शरद पवार यांनी सोमवारी ट्विटरवर टाकला होता. त्याला पुन्हा एकदा पुष्टी त्यांनी आज जोडली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यात त्यांनी शिवसेना-भाजप यांच्यातील वादावर भाष्य केले आहे. भाजपच्या सध्याच्या नेतृत्वाचे आणि शिवसेनेचे संबंध चांगले राहिले नसल्याने त्यांच्यात वाद होतोय. त्यामुळे हा वाद विकोपाला जाऊन महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर युती तुटणार, सरकार गडगडणार याची पूर्ण खात्री शरद पवारांना आहे. शरद पवारांनी म्हटलं आहे की, पूर्वी लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी या भाजप नेत्यांचे आणि शिवसेना नेत्यांचे संबंध मैत्रीपूर्ण असायचे. आता मात्र तशी परिस्थिती राहिली नसल्याचे शरद पवार म्हणाले. शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सेना-भाजपवाले एकमेकांवर खालच्या पातळीवर येऊन टीका करीत आहेत. भाजपसोबत सत्तेत राहण्यासाठीच शिवसेना शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची मागणी पुढे करीत आहेत. एकमेकांवरच्या कुरघोडयांचा उल्लेख शरद पवारांनी करून आता तयारीला लागाच, असाच इशारा दिला आहे. पुणे , पिंपरी चिंचवड पालिका आणि जिल्हा परिषादा जिथे राष्ट्रवादीचेे उरले सुरले राज्य आहे. तीथे आम्ही सत्तेत आहोत तुमचा विकास करू, असे बोलून भा ज पा ला शिरकाव करायला मिळू नये, यासाठी राष्ट्रवादीने आव्हान केले आहे.  त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवारांचे म्हणणे खूपच मनावर घेतल्याचे दिसत आहे. राज्यातील भाजप सरकार 23 तारखेनंतर कोसळले तर मध्यावधी निवडणुकांना सामोरं जाण्याची राष्ट्रवादीची तयारी असल्याचे पवार म्हणाले. अडीच वर्षात राज्यात निवडणुका आल्यास महाराष्ट्राचं फारसं काही नुकसान होणार नसल्याचा दावाही शरद पवार यांनी ट्विटरवर सोमवारी केला होता. आता त्यामुळे कार्यकर्तेही सक्रीय झाले आहेत. परंतु शरद पवार बोलतात त्याच्या विरूद्ध वागतात या राजकीय निरिक्षकांचा अंदाज खोटा ठरवण्याची संधी यामुळे शरद पवारांना आलेली आहे. ती ते सोडतात का हे पाहणेच मनोरंजक ठरेल. पण शरद पवारांना उक्ती आणि कृती यातील विरोधाभासाचा लागलेला कलंक दूर करण्याची ही संधी मात्र आहे. काही मातब्बर टाळी देऊन सांगत होते की शरद पवार हे भाजप पुरस्कृत राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील. त्या शक्यताही आता पुसण्याचे काम शरद पवारांना यातून करता येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: