मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

आपणच प्रयत्न केले पाहिजेत

आपल्याकडे कोकणचा विकास हा भांडवलदारी यंत्रणेतून करण्याचा, बाहेरची गुंतवणूक करण्याच्या विचाराने अनेक राजकीय पक्ष पछाडलेले दिसतात. त्यासाठी गेल्या दहा-पंधरा वर्षांत सेझसारखे प्रकल्प आणण्याचा प्रयत्न झाला, अनेक प्रकल्प आणले गेले; पण त्याहीपेक्षा वेगळे काही आहे, असा विचार करण्याची वेळ आलेली आहे.


विविध प्रकल्प आणि विकासाच्या नावाखाली शेतकºयांच्या जमिनी घ्यायच्या आणि विकास म्हणजे काय, तर गाव तिथे पाणी नाही; पण गाव तिथे वाईनशॉप, बिअरशॉपी पोहोचवण्याचे काम मात्र झाले, म्हणूनच कोकणच्या विकासासाठी नवे पर्याय शोधण्याची गरज आहे.

कोकणातील जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचे प्रयत्न होत असतील, तर ते हाणून पाडण्यासाठी कोकणच्या जनतेने सिद्ध झाले पाहिजे. भांडवलदारांच्या या प्रकल्पाला पर्याय निर्माण करण्याचे काम कोकणातील तरुणांनी केले पाहिजे.


प्रत्येक गोष्ट सरकारने केली पाहिजे असे नाही. काही सामूहिक संघटनेतूनही हे होणे शक्य आहे. सरकारने जर वेगवेगळे प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केला, तर त्या प्रकल्पाचे पुनर्वसन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे विस्थापित आणि प्रकल्पग्रस्त समाज तयार होतो. कोणत्याही प्रकल्पाने आम्ही आता ग्रस्त होणार नाही, यासाठी कोकणातील तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. नवी मुंबई प्रकल्पातील विस्थापितांचे पुनर्वसन गेल्या चाळीस वर्षांपासून पूर्ण झालेले नाही. त्यांचा लढा वर्षानुवर्षे चालू आहे. त्यामुळे कोकणातील कोणतेही सरकारकडून येणारे प्रकल्प नाकारण्यासाठीच सज्ज झाले पाहिजे. प्रकल्पांमुळे जमिनी काढून घेतल्या जातील. पैसा बघून मोह पडेल; पण तो क्षणभंगूर असेल. तो पैसा आपल्या भावी पिढ्यांना काय देणार आहे, याचा विचार केला पाहिजे. जमिनी प्रकल्पात विकून आलेल्या पैशांतून गाड्या घेता येतील, सोने घेता येईल, चकाचक बंगले बांधले जातील; पण त्या पैशांतून आपल्या पुढील पिढ्यांची कायमस्वरूपी सोय होईल काय, हे पाहावे लागेल. बाहेरच्यांनी येऊन येथे प्रकल्प राबवण्याऐवजी आपणच ते का राबवू नयेत, याचा विचार केला पाहिजे. याचाच अर्थ कोकणातील शेतीकडे उद्योग म्हणून पाहिले पाहिजे.

सहकाराने पश्चिम महाराष्ट्राचे परिवर्तन घडले. त्यामानाने कोकणात सहकार रूजला नाही. सहकार रूजला नाही, म्हणून इथे सेझ रुजवायचा प्रयत्न केला गेला. आता खरे तर कोकणातील तरुणांनी सहकाराचा मंत्र आता जपला पाहिजे. कोकणातील शेतीला उद्योगाचा नवा चेहरा देण्यासाठी पुढे आले पाहिजे. कोकणाचा विकास कोणी करणार असेल, तर तो कोकणातील माणसानेच केला पाहिजे. त्यासाठी बाहेरच्या भांडवली शक्तीची आम्हाला गरज नाही, हे दाखवून देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. इथले सगळे व्यवसाय हे छोट्या छोट्या संस्थांच्या माध्यमातून सहकाराने जोडले गेले पाहिजेत. बचतगटांच्या माध्यमातून इथल्या महिलांना क्रियाशील बनवले पाहिजे. बचतगटांचा वापर हा फक्त भिशीसारखा छोट्या स्वरूपात होत आहे, त्याऐवजी रोजगारनिर्मितीसाठी त्याचा वापर केला पाहिजे.


कोकणातील आंब्याचे मार्केटिंग सहकारी तत्वावर झाले, तर आंबा उत्पादकांना चांगला दर मिळू शकेल. आज उत्तर प्रदेशचे विक्रेते हापूस आंबे पेट्यांमध्ये घेऊन विकतात. मराठी माणसांना हापूस आंब्याचे महत्त्व पटवून देतात. भरमसाठ दर आकारून महाराष्ट्रातील शहरातच हे विक्रेते फिरतात, तेव्हा त्यांच्या खिशात आपला पैसा जातो आणि त्या प्रमाणात आंबा उत्पादकाला काहीही मिळालेले नसते, हे समजत असताना वाईट वाटून घेण्यापलीकडे काही हातात राहत नाही. यासाठी कोकणातील तरुणांनी सहकारी तत्वावर आंब्याचे एकत्रीकरण करून त्याची विक्री केंद्रे ठिकठिकाणी काढली, तर आपले मार्केटिंग चांगले होईल आणि शेतकºयाला, आंबा उत्पादकाला त्याचा चांगला फायदा होईल. आंब्याबरोबर कोकणातील विविध फळे आणि पिकांचे मार्केटिंग करण्याचे तंत्र अवलंबले, तर अनेकांना रोजगार उपलब्ध होईल. कोकणातील सहकारी बँकांनी आंब्याच्या झाडांना तारण ठेवून आंबा उत्पादकांना कर्जवाटप करावे. सहकारी तत्वावर शीतगृहांची निर्मिती करावी. पश्चिम महाराष्ट्रातील एकेकाळचे टाकाऊ म्हणून असलेले पीक म्हणजे काळा घेवडा किंवा त्याला काळे पोलीस म्हटले जाते, तोच गेल्या दशकापासून भरपूर पैसा मिळवून देणारे नगदी पीक झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात त्या काळ्या घेवड्याची उसळ कोणी खातही नव्हते; पण तोच घेवडा मोठ्या प्रमाणात विकून दिल्ली, पंजाब आणि उत्तर भारतात विकल्याने त्याला चांगला पैसा मिळू लागला. काळ्या पोलिसांना राजमा म्हणून नाव देऊन ती डिश पंचतारांकित हॉटेलपासून ते ढाब्यापर्यंत चांगली चालली. तशीच कोकणातील काही पिके ही बाहेर पाठवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. यासाठी फणसाची भाजी, केळफुलाची भाजी हे पदार्थ पंचतारांकित हॉटेलमध्ये नेण्याचा, छोट्या छोट्या हॉटेलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फणसाची भाजी करताना फणस चिरायला येत नाही, हाताला तेल लावावे लागते, म्हणून घराघरातून आजकाल होत नाही; पण सहकारी चळवळीच्या माध्यमातून, बचतगटांच्या माध्यमातून फणस कापून, चिरून दुधाप्रमाणे पॅकिंग करून ते जगभर विकता आले, तर त्याला चांगला दर येऊ शकतो. केळफुलाचे तसेच करता येईल. आपण जगाला कोकणचा हा मेवा विकून जगभरातील संपत्ती आपल्या कल्पकतेने वास्तवात आणली. त्यासाठी सहकारी चळवळीची मदत घेतली, तर कोणाचेही प्रकल्पासाठी जमिनी लाटण्याचे उद्योग चालणार नाहीत. काजू उत्पादकांची संस्था, नारळ उत्पादकांची संस्था, सुपारी, अमसूल उत्पादकांची संस्था या मोठ्या प्रमाणावर उभ्या राहिल्या पाहिजेत. आज कोकमसारखी सरबतं घरगुती प्रमाणात केली जातात. ती मोठ्या प्रमाणात केली तर पेप्सी आणि कोकाकोलापेक्षा कितीतरी चांगले पेय आम्ही घरोघर पोहचवू शकू. तरुणांनी यासाठी वेगवेगळे पॅटर्न राबवले पाहिजेत. स्ट्रॉबेरी, जलबेरा सारख्या नाजूक फूल आणि फळांचे जर जगभर मार्केटिंग होते, तर आम्ही या पदार्थांना का लोकांपर्यंत पाठवू शकत नाही. हुलगे, कुळीथ, कुळथाचे पिठ या वस्तू खाण्याची सवय जगाला लावली पाहिजे. बिरड्या कोकणातून देशात पसरू देत. दाखवून देऊ जगाला की, कोकण फक्त हापूस आंब्यापुरता मयार्दित नाही, तर अन्य पिकेही महत्त्वाची आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या मच्छीमारांच्या संस्था उभ्या करून माशांसाठी बाजारपेठ खुली करता येईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मासे खायला कोकणात आणि गोव्यात जायच्या ऐवजी संपूर्ण देशात कोकणचा मासा कसा पोहोचवता येईल याचा विचार केला, तर कोणी आपल्या जमिनी काढून घेण्याचा विचार करणार नाही.

प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाईन्स


9152448055\\

26 oct 2021

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: