गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०१४

देवेंद्राचा राज्याभिषेक

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बिगर काँग्रेस मुख्यमंत्री स्बवळावर पहिल्यांदाच होत असल्याबद्दल सर्वात प्रथम देवेंद्र फडणवीस यांची मन:पूर्वक अभिनंदन करायला पाहिजे. महाराष्ट्राच्या 18 व्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र गंगाधर फडणवीस यांची भारतीय जनता पक्षाने एकमताने निवड केल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातली, ‘दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’, ही घोषणा प्रत्यक्षात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 288 पैकी 122 म्हणजे सर्वाधिक जागा मिळाल्याचा निकाल जाहीर झाला, तेव्हापासूनच मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांचे नाव आघाडीवर होते. मुख्यमंत्रिपदाच्या नावाच्या चर्चेत माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा, केंद्रीय नगरविकास मंत्री नितीन गडकरी, एकनाथ खडसे यांच्या नावांची प्रसार माध्यमातून चर्चा सुरू असतानाही, फडणवीस मात्र अत्यंत शांत होते.     पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या पाठबळावर आपणच मुख्यमंत्री होणार, असा आत्मविश्वास देवेंद्र फडणवीस यांना असल्यामुळेच या चर्चेच्या गदारोळात त्यांनी कोणत्याही प्रतिक्रिया व्यक्त केल्या नव्हत्या. निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात, शिवसेनेने भाजपवर जहरी टीका केल्यावरही, अत्यंत संयमाने आपल्या पक्षाचा झंझावती प्रचार करणार्‍या प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांच्या नेतृत्वावरच राज्यातल्या जनतेनेही विश्वास दाखवला आणि या पक्षाला विधानसभेत प्रथम क्रमांकाचे स्थानही मिळवून दिले.     भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ नेता निवडीच्या बैठकीच्या आधी एकनाथ खडसे यांचा रुसवा-फुगवा वगळता, फडणवीस यांची नेतेपदी योग्य प्रक्रियेने निवड झाली आहे. गेली पंधरा वर्षे काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचार, घोटाळे आणि अंदाधुंदीच्या कारभाराने वैतागलेल्या राज्यातल्या जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करायचे मोठे आव्हान फडणवीस यांच्यासमोर आहे. त्याचबरोबर काँग्रेसमधील भ्रष्ट नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्यामुळे त्यांचा उपद्रव सहन करीत फडणवीस यांना राज्य करायचे आहे.देवेंद्र फडणवीस यांना वयाच्या अवघ्या 44 व्या वर्षी मुख्यमंत्रिपदावर विराजमान होण्याचा सन्मान मिळाला आहे. फडणवीस यांचा अभ्यासू आणि संयमी नेते असा लौकिक आहे. एलएलबी आणि एमबीए या पदव्या मिळवल्यावर अत्यंत तरुण वयात आधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि नंतर भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय राजकारणात उतरलेल्या या नेत्याला 25 वर्षांचा राजकारणाचा अनुभव आहे. त्यांचे वडील गंगाधरपंत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. भाजपचे क्रियाशील कार्यकर्ते होते. विधान परिषदेचे सदस्यही होते. बालपणीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेल्या फडणवीस, यांनी आणीबाणीच्या काळात वडिलांना तुरुंगात डांबले जाताच, ते शिकत असलेल्या इंग्रजी शाळेच्या नावात इंदिरा असा शब्द असल्याने, ती शाळा सोडली आणि मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतले. बालपणापासूनच अफाट मित्रसंग्रह असलेल्या या युवकाने लहान वयातच नागपूर महापालिकेची निवडणूकही लढवली. ती जिंकली आणि वयाच्या 27 व्या वर्षी नागपूरचे महापौर व्हायचा मानही मिळवला. सलग चार वेळा नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले फडणवीस हे स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते आहेत आणि आता नियतीनेच महाराष्ट्राचे अखंडत्व कायम ठेवायची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.    स्वच्छ आणि निष्कलंक राजकारणी, अजातशत्रू नेता, असा लौकिक असलेल्या फडणवीस यांनी विरोधी पक्षात असताना, सरकारच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले. मंत्र्यांच्या गैरव्यवहाराचा पंचनामा केला. पण राजकारणात असताना, त्यांनी कधीही, कुणाशी व्यक्तिगत वैर केलेले नाही.  त्यामुळेच सर्व पक्षातल्या नेत्यांशी त्यांचे मैत्रिपूर्ण संबंध असले, तरी ताठ बाण्याच्या या स्वाभिमानी नेत्यावर विकाऊपणाचा शिक्का मारायचे धाडस त्यांच्या विरोधकांनाही झालेले नाही. सत्तेसाठी नको त्या लोकांना आपल्या पक्षात घेतल्याचा आणि त्यांना उमेदवारी दिल्याचा कलंक फक्त त्यांना असला तरी व्यक्तिश: देवेंद्र फडणवीस हा मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेता आहे. चांगला नेता असेल तर काँग्रेसमधून आलेल्या फडतूस लोकांनाही कसे दाबायचे हे त्यांना समजेल यात शंका नाही. राज्याच्या हितासाठी अशा काँग्रेसमधून आलेल्यांची खोगीरभरती हीच लायकी असल्याचे ते दाखवून देतील. शेकापक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेल्यावर राम ठाकूर यांना ज्याप्रमाणे काँग्रेसने अडगळीत टाकले, लोकसभेची उमेदवारी दिली नाही त्याचप्रमाणे प्रशांत ठाकूर यांची लायकीही भाजप नेते दाखवून देतील. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे कसब पणाला लागेल.     अत्यंत अभ्यासू आणि सामाजिक प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्या समस्या विधानसभेच्या व्यासपीठावर धाडसाने मांडणार्‍या फडणवीस यांना महाराष्ट्रातल्या जनतेच्या सामाजिक प्रश्नांची जाण आहे. विदर्भातल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र सरकारने दिलेल्या मदतीतला घोटाळा, आदर्श घोटाळा, समाज कल्याण विभागातला घोटाळा, यासह अनेक घोटाळ्यांवर त्यांची तोफ सरकारवर आग ओकत राहिली. 70 हजार कोटी रुपयांच्या जलसिंचन घोटाळ्याची चिरफाड आणि पंचनामा त्यांच्यामुळेच झाला. आमदारकी मिळाल्यावरही त्यांचे जमिनीवरचे पाय कधीच सुटलेले नसल्यानेच, शेतकरी, कामगार आणि सामान्य जनतेशी त्यांचा संपर्क सतत असतोच. आपल्या मतदारसंघातल्या मतदारांनाही ते वारंवार भेटत राहतात. महाराष्ट्राच्या मूलभूत समस्यांची सोडवणूक करतानाच, मागासलेल्या भागांना झुकते माप दिले गेले पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. स्वीकारलेल्या भूमिकेपासून त्यांनी कधीही माघार घेतलेली नाही. तोड पाण्याच्या राजकारणात ते कधीही अडकलेले नाहीत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, वसंतदादा पाटील या माजी मुख्यमंत्र्यांप्रमाणेच सामान्य आणि कष्टकरी जनता हेच फडणवीस यांचे आराध्यदैवत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या जमीनदार कुटुंबात जन्मलेल्या फडणवीस यांची नाळ मात्र बालपणापासूनच सामान्य जनतेशी जोडली गेली. त्यांच्या लोकप्रियतेचे आणि नेतृत्वाचे यश ते हेच आहे. प्रशंसेने ते कधी हुरळले नाहीत आणि पराभवाने कधी खचले नाहीत. अंधारातून प्रकाशाच्या दिशेने सतत पुढे जाणे, हाच त्यांचा निग्रही स्वभाव राहिलेला आहे. सलग पंधरा वर्षे त्यांचा पक्ष विरोधात होता. त्यामुळे सत्तेची महत्त्वाकांक्षा त्यांना नव्हतीच. आमदार झाल्यावरही त्यांच्या नेहमीच्या स्वभावात आणि वागण्यात काहीही बदल झाला नाही. आपण सामान्य जनतेचे सेवक आहोत आणि सार्वभौम जनता हीच आपली मालक आहे, अशा ध्येयवादानेच ते राजकारण करत राहिले. आता मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यावर अडचणींचे डोंगर ओलांडून त्यांना जावे लागेल. अनेक समस्यांवर मात करतानाच, विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि उर्वरित महाराष्ट्राला समान सामाजिक-आर्थिक न्याय द्यावा लागेल. मुख्यमंत्रिपदाचा त्यांच्या डोक्यावरचा सोनेरी मुकूट पूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या गलथान आणि उधळपट्टीच्या कारभाराने मलीन झालेला आहे. तो स्वच्छ करावा लागेल. राज्याच्या तिजोरीवर तीन लाख कोटी रुपयांचे प्रचंड कर्ज जुन्या सरकारने केलेले असल्याने, व्याज, कर्जफेड करत विकासासाठी नवा निधी उपलब्ध करावा लागेल. टोलधाडीतून सामान्य जनतेची मुक्तता करावी लागेल. महिलांच्या सुरक्षिततेची समस्याही महत्त्वाची आहेच. राज्याच्या सर्व भागातील अपुर्‍या राहिलेल्या धरणे आणि कालव्यांच्या बांधकामांच्या पूर्ततेसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करावा लागेल. त्यांच्यासमोरची आव्हाने बिकट आहेत. पण त्यावर त्यांना मात करून जनतेच्या आकांक्षा पूर्ण कराव्या लागतील. महाराष्ट्राच्या या तरूण मुख्यमंत्र्याला त्यांच्या तडफदार आणि जनताभिमुख कारभारासाठी शुभेच्छा.  

बुधवार, २९ ऑक्टोबर, २०१४

याचिकेतून पितापुत्रांचे नाव कसे वगळले?


  • माजी मंत्र्यांच्या शैक्षणिक संस्थांना कवडीमोलाने जमिनी दिल्याच्या ठपक्यावरून नारायण राणे, छगन भुजबळ, पतंगराव कदम, राधाकृष्ण विखे पाटील यांना नोटीस बजावली आहे. सत्तेचा दुरूपयोग करून भूखंड लाटणार्‍यांना लगाम हा घातलाच पाहिजे. भारतीय जनता पक्षाचे  मुख्यमंत्रीपदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत आवाज उठवल्यामुळे या नोटीसा बजावल्या गेल्या आहेत. सत्तेत भाजप येताच झालेली ही कारवाई महत्त्वाची आहे. पण हाच न्याय सर्वांना लागू का नाही असा प्रश्‍न उपस्थित होतो. कारण कॅगच्या अहवालाचा  आधार घेवून या नोटीसा बजावल्या गेल्या आहेत.
  • कॅगच्या अहवालात प्रशांत ठाकूर-राम ठाकूर यांनी सिडकोच्या संचालकांना अंधारात ठेवून कवडीमोलाने भूखंड लाटल्याचे स्पष्ट झाले होते. पण त्यांच्यावर कारवाई का झाली नाही, त्यांना नोटीस का आली नाही ही बाब लक्षात घेतली पाहिजे. भाजप सत्तेवर आल्यावर आपल्यावर कारवाई होईल या भीतीमुळे प्रशांत ठाकूर भाजपमध्ये गेले आहेत काय हे स्पष्ट झाले पाहिजे. केवळ जे एन पी टी, विमानतळाचे ठेके घेण्यासाठीच नाही, तर कोणतीही कारवाई आपल्यावर होवू नये या स्वार्थी हेतुने पितापुत्रांनी भाजपची वाट धरली हे या घटनेवरून दिसून येते. देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारचा पक्षपात केला असेल आणि फक्त काँग्रेस नेत्यांनाच नोटीसा पाठवल्या गेल्या आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्यांना पाठवल्या गेल्या नाहीत तर हा अन्याय होईल. ही भाजपने केलेली फसवणूक म्हणावी लागेल. भाजप सत्तेवर येण्यापूर्वीच भ्रष्टाचाराचा कलंक घेवून जनतेसमोर येईल. हा कलंक भाजपला लावण्याचे काम प्रशांत ठाकूर यांच्यामुळे होत आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घेतले पाहिजे.
  • कवडीमोलाने भूखंड उपलब्ध करून दिल्याच्या आरोपाप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारसह माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, नारायण राणे, माजी मंत्री छगन भुजबळ, पतंगराव कदम, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शैक्षणिक संस्थांना नोटीस बजावली आहे. त्यांना 21 नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत. हेमंत पाटील यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. याचिकेवरील सुनावणीनंतर न्यायमूर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपिठाने हे आदेश दिले आहेत. परंतु हेमंत पाटील यांनी राम ठाकूर- प्रशांत ठाकूर यांना या याचिकेतून का वगळले? या पितापुत्रांनी तर सिडकोच्या संचालकांना अंधारात ठेवून नियमबाह्य असा भूखंड लाटला आहे. असे असताना याचिकेतून त्यांना का वगळले गेले? कॅगच्या अहवालात याबाबत स्पष्ट ताशेरे मारले आहेत. तरीही ठाकूर पितापुत्रांना याचिकेतून  का वगळले? न्यायालयाच्या त्यांना नोटीसा का आल्या नाहीत? फक्त  सत्तेबाहेर पडलेल्या काँग्रेस नेत्यांनाच या नोटीसा बजावल्या गेल्यामुळे एका गलिच्छ राजकारणाचा वास याठिकाणी येत आहे. काँग्रेसमध्येच असलेल्या भ्रष्ट अशा प्रशांत ठाकूर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून ते शुद्ध झाले असे देवेंद्र फडणवीस यांना वाटते काय? नितीमत्तेची भाषा करणार्‍या भारतीय जनता पक्षाला हे वर्तन शोभते काय? याचा सवाल आता भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींना द्यावा लागेल. कलंकीत आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना उमेदवारी देवून भाजपने आधीच राज्यातील प्रतिमा डागाळली आहे. त्यात आता जनहितयाचिकेत फक्त काँग्रेसच्याच नेत्यांच्या चौकशीचे आदेश काढण्यामुळे पक्षपाती धोरण दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाला सामोरे जातानाच हा अपशकुन होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्वच्छ प्रतिमेमुळे स्वबळावर निवडणुका लढवताना सहज बहुमत मिळाले असते. पण प्रशांत ठाकूर यांच्यासारख्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या माणसाला उमेदवारी देवून भाजपची प्रतिमा मलिन झाली आहे. अशा मलिन प्रतिमेमुळेच महाराष्ट्राने भाजपला स्पष्ट बहुमतापासून दूर ठेवले आहे.  अशा परिस्थितीत स्वच्छ चारित्र्याच्या देवेंद्र फडणवीस यांना सरकारची प्रतिमा स्वच्छ ठेवायची असेल तर प्रशांत ठाकूर यांचीही चौकशी केली पाहिजे.
  • कॅगच्या अहवालाचा आधार घेवून हेमंत पाटील यांनी याचिका दाखल केली. माजी मंत्र्यांना कवडी मोलाने दिलेल्या भूखंडाच्या चौकशीची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेनुसार कॅगने आपल्या अहवालात विलासराव देशमुख यांनी त्यांच्या मांजरा या शैक्षणिक संस्थेला 24 हजार चौरस मीटरचा भूखंड मंजूर केला होता. त्याबाबत ठपका होता. 
  • माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या भारती विद्यापीठाला 20 हजार चौरस मीटर जागा दिल्याबाबत कॅगने ठपका ठेवला आहे. तर छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील एमईटीसाठी 50 हजार चौरस मीटरचा भूखंड कवडीमोलाने दिल्याचा ठपका कॅगच्या अहवालात आहे. त्याचप्रमाणे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही कवडीमोलाने भूखंड लाटल्याचा ठपका कॅगच्या अहवालात आहे. या सर्वांबरोबरच रामशेठ ठाकूर- प्रशांत ठाकूर यांच्या रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळाला सिडकोचा भूखंड कवडीमोलाने दिल्याचा ठपका कॅगच्या अहवालात आहे. या अहवालात इतके स्पष्टपणे म्हटले आहे की सिडकोच्या संचालकांना अंधारात ठेवून हा भूखंड मुख्यमंत्र्यांच्या सहीने राम ठाकूर यांनी लाटला आहे. सिडकोच्या संचालकांनी आणि अधिकार्‍यांनी अशा प्रकारे भूखंड देता येत नाही असा शेराही मारला होता. तरीही तो दिला गेला. असे असतानाही यावरून केलेल्या याचिकेतून प्रशांत ठाकूर यांना का वगळले गेले? का ते वगळण्यासाठीच त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता? अशा दागी, कलंकीत, भ्रष्ट आमदारांच्या जीवावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असतील तर ते भाजपचे आणि महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल. शुद्ध चारित्र्याचे, सभ्य, सुसंस्कृत उमेदवार भाजपला मिळाले नाहीत म्हणून ही परिस्थिती ओढवली की काय याचा विचार करावा लागेल. भाजपचे नवे सरकार आपल्या भ्रष्ट आमदारांना असेच पाठीशी घालणार असेल तर देवेंद्र फडणवीस आणि भाजपला कर्नाटकाप्रमाणे फटका बसल्याशिवाय राहणार नाही. कर्नाटकात येदीयुरप्पांना कानडी जनतेने धडा शिकवला. त्यांची सत्ता काढून घेतली. तशीच वेळ पुढच्या निवडणुकीत भाजपवर ओढवल्याशिवाय राहणार नाही. भ्रष्टाचाराच्या पायावर उभारलेले सरकार अशी महाराष्ट्रातील भाजप सरकारची, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा प्रशांत ठाकूर यांच्यामुळे झालेली आहे. ती सुधारण्यासाठी सर्वात प्रथम कॅगच्या अहवालावरून प्रशांत ठाकूर- राम ठाकूर यांनाही न्यायालयाने नोटीस बजावली पाहिजे. त्याबाबत याचिका दाखल झाली पाहिजे. हेमंत पाटील यांनी याचिकेतून  राम ठाकूर यांना का वगळले याचे स्पष्टीकरण आले पाहिजे. या याचिकेतून भाजपच्या नेत्यांची नावे वगळण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते काय हे समोर आले पाहिजे.
  • कॅगच्या अहवालाचा मुद्दा भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस यांनीच उपस्थित केला होता. आघाडीचे सरकार असताना काँग्रेस नेत्यांना पाठीशी घालण्यासाठी कॅगचा अहवाल दडपण्यात आल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनीच केला होता. त्यामुळे या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना प्रतिवादी केले आहे. आता अशा परिस्थितीत त्यांच्याच पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या प्रशांत ठाकूर यांना ते पाठीशी घालत असतील तर भ्रष्टाचाराच्या पायावर उभारलेले सरकार अशी प्रतिमा सत्ता स्थापन करताना भाजपची होणार आहे. एवढा मोठा कलंक घेवून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. हा कलंक पुसण्यासाठी प्रशांत ठाकूऱ यांचीही चौकशी केली तर भाजपची प्रतिमा उजळेल हे निश्‍चित.


पृथ्वीवर राज्य करणार्‍यांना घालवले ते देवांवर राज्य करणार्‍यांना कसे टिकू देतील?

  •    
  •     देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्याचा योग्य निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. लोकसभा प्रचारापासूनच मोदी यांच्या डोळ्यासमोर फडणवीस यांचे नाव होते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात नागपूरमध्ये मोदींनी त्यांचे जाहीर कौतुक केले तेव्हाच त्यांच्या मनात काय आहे हे स्पष्ट झाले होते. भ्रष्टाचारमुक्तीचा प्रचार करणार्‍या मोदींना त्या प्रचाराच्या पार्श्वभूमीला शोभेल अशी व्यक्ती निवडणे क्रमप्राप्त होते. मोदींच्या सुदैवाने महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मोहरा पक्षाजवळ होता. 
  • गेली पंधरा वर्षे फडणवीस विधानसभेत आहेत. अभ्यासू आमदार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्यांच्यातील अनेक गुणांचे वर्णन विविध चित्रवाहिन्यांवरून मंगळवारपासून सुरू आहे. त्याची पुनरावृत्ती करण्याची गरज नाही. मात्र या सर्व काळात त्यांच्या हेतूंबद्दल विरोधकांनीही कधी शंका घेतली नाही वा सत्ताधार्‍यांशी साटेलोटे असल्याचा आरोप त्यांच्या पश्चातही कधी त्यांच्यावर झाला नाही, हा गुण सर्वाधिक महत्त्वाचा आहे.
  •     फक्त मुख्यमंत्रीपदी स्वच्छ आणि चारित्र्यसंपन्न चेहरा दिला तशीच काळजी मोदी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी उमेदवारी देताना घेतली असती तर आज अल्पमतातील सरकार स्थापन करण्याची नामुष्की भाजपवर आली नसती. स्वबळावर 150 जागा मिळतील अशी परिस्थिती असताना काँग्रेसमधून आलेल्या प्रशांत ठाकूर यांच्यासारख्या भ्रष्ट आणि निष्क्रिय नेत्यांना उमेदवारी दिल्यामुळे मतदारांनी भाजपला बहुमतापासून रोखले. प्रशांत ठाकूर यांच्यासारख्या नेत्यांच्या समावेशामुळे भाजपचा चेहराच कलंकीत झाला आहे. त्यामुळे या सगळ्या भ्रष्ट लोकांना बरोबर घेवून स्वच्छ प्रशासन देवेंद्र फडणवीस कसे देतात हे पाहणे मनोरंजक ठरेल.
  • महाराष्ट्रातील राजकारणाची अलीकडील स्थिती अशी झाली आहे की विरोधक कोणाला म्हणावे असा प्रश्न पडावा. गेल्या काही वर्षांत विरोधकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कळपात सामील करून घेण्याचा उद्योग सत्ताधार्‍यांनी केला. त्यामध्ये त्यांना इतके यश आले की तोडपाणी केले जाते, अशी तक्रार करण्याची वेळ खुद्द शरद पवार यांच्यावर आली. असल्या चक्रात फडणवीस कधी अडकले नाहीत. पण आपल्या पक्षात असे तोडपाणी करणारे ठेकेदार त्यांनी घेतले त्याची शिक्षा त्यांना अल्पमताचे सरकार स्थापन करण्याची वेळ ही आहे.  सत्ताधार्‍यांशी फडणवीस यांचे कधीच वितुष्ट नाही. त्यांनी कधी बेलगाम आरोप केले नाहीत. सत्ताधार्‍यांशी त्यांचे संबंध सौहार्दाचे राहिले असले तरी त्यामध्ये त्यांनी कधी सलगी येऊ दिली नाही. मात्र सत्ता मिळवण्याच्या जिद्दीत नको त्या लोकांना बरोबर घेण्यामुळे देवेंंद्र फडणवीस यांची उंच प्रतिमा लहान झाली.
  •  लहान वयात तारतम्य बाळगणार्‍या व्यक्तीकडे महाराष्ट्राची सूत्रे जात असतील तर ते शुभलक्षण आहे. सत्तेच्या चौथर्‍यांशी सलगी नसणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला हवा होता. पण फक्त मुख्य माणूस स्वच्छ असून चालत नाही. काँग्रेसचे काय झाले? पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमा स्वच्छ आणि सभ्य अशीच होती. पण त्यांचे सहकारी असलेले भ्रष्ट होते. त्यापैकीच एक भ्रष्ट असे काँग्रेसचे आमदार प्रशांत ठाकूर होते. नगराध्यक्ष असताना एकाच रस्त्याची वेगवेगळ्या नावाने चार चार वेळा टेंडर काढून पैशाचा अपहार केल्याप्रकरणी नगरविकास खात्यामार्फत प्रशांत ठाकूर यांची चौकशीही सुरू होती. पण सत्तेचा दुरूपयोग करून त्या चौकशीचा अहवाल गुलदस्त्यात ठेवला. आता सत्तापालट झाल्यावर चौकशी लागणार या भितीने प्रशांत ठाकूर यांनी भाजपत उडी मारली. अशा लोकांना बरोबर घेवून देवेंद्र फडणवीस सामान्यांना हवे असे सरकार कसे देवू शकतील? त्यामुळे आमटीत पडलेल्या झुरळासारखे प्रशांत ठाकूर यांच्यासारखे कीटक देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे दूर करतात हे पाहणे आता आपल्या हातात आहे.  भ्रष्टाचार विरहीत कारभार आणि विकास हे मुद्दे भाजपने लोकसभेपासून पुढे केले होते. नरेंद्र मोदींनी त्याचीच लाट निर्माण केली. निवडणुकीतील लाटेचा अर्थ हाच होता. मोदी यांना तो अर्थ नीट उमगला, म्हणून गुडघ्याला बाशिंग लावून बसलेल्यांना थारा न देता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली. पण चेहरा स्वच्छ देताना बाजूचे सहकारी जर भ्रष्ट असतील तर त्यांच्यावर नियंत्रण फडणवीस ठेवणार का हा  खरा प्रश्‍न आहे. कॅगच्या अहवालात ताशेरे ओढले असताना, नियमबाह्य सिडकोचा भूखंड लाटणार्‍या प्रशांत ठाकूर यांच्यावर देवेंद्र फडणवीस कारवाई करतील तर ते खर्‍या अर्थाने छत्रपतींप्रमाणे निस्पृह राजे ठरतील. नगरविकास खात्याने प्रशांत ठाकूर यांच्या भ्रष्टाचाराची केलेल्या चौकशीचा अहवाल निरपेक्षपणे न्यायबुद्धीने देवेेंद्र फडणवीस सादर करणार असतील तर ते खरे महाराष्ट्राचे राजे ठरतील. देवेंद्रपद मिळवण्यासाठी इंद्राला शेकडो यज्ञ करावे लागतात. असे यज्ञ म्हणजे प्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचार, अत्याचाराचा नि:पात असतो. तसा देवेंद्र फडणवीस करतील तर त्यांना त्यांचे नावही शोभून दिसेल. नाहीतर भोजनावळी घालणारे पेशवेकालीन नाना फडणवीस म्हणून त्यांच्यावर एखादे घाशिराम कोतवाल सारखे नाटक तयार होईल. देवेंद्र फडणवीण यांनी देवेंद्र झाले पाहिजे, फडणवीस झाले नाही तरी चालेल. बुद्धीमत्तेच्या बाबतीत नाना फडणवीसांप्रमाणेच देवेंद्र चतुरस्त्र आणि चलाख आहेत. फक्त ही चलाखी भ्रष्ट अशा भाजप आमदारांना पाठीशी घालण्यात त्यांनी खर्च करू नये ही अपेक्षा. आज प्रशांत ठाकूर यांच्यासारखे कलंकीत आमदार त्यांच्या बरोबर आहेत. अशा भ्रष्ट आमदारांचे टोळके त्यांनी जवळ ठेवले तर फडणवीसांचा कारभार हा काँग्रेससारखाच भ्रष्ट होईल. फडणवीस यांचीही अवस्था स्वच्छ प्रतिमा असूनही पृथ्वीराज चव्हाणांसारखी होईल. पृथ्वीवर राज्य करणारे ते पृथ्वीराज. स्वच्छ प्रतिमा असूनही महाराष्ट्रात त्यांना राज्य टिकवता आले नाही. कारण बरोबर प्रशांत ठाकूर यांच्यासारखे कलंकीत, भ्रष्ट, निष्क्रीय आमदार होते. आता तर देवांवर म्हणजे स्वर्गावर राज्य करणारे देवेंद्र महाराष्ट्रात आले आहेत. तेही जर ठाकूरांसारख्या आमदारांवर विसंबून राहिले तर  इंद्र ज्याप्रमाणे शापीत भगेंद्र झाला तशी अवस्था देवेंद्राची होईल.
  •    फडणवीस यांची निवड होत असताना पक्षातून उमटलेल्या प्रतिक्रिया भाजपबद्दल प्रतिकूल मत बनवणार्‍या आहेत. गटबाजीच्या मोहात बडे नेतेही अडकले. शक्तिप्रदर्शन करण्याची वेळ गडकरींसारख्या मातब्बर नेत्यावर यावी यातच भाजपचे आतले स्वरूप काय आहे हे कळून येते. खडसे यांनी उघड शक्तिप्रदर्शन केले नसले तरी ताकद दाखवण्याची संधी सोडली नाही. तावडे यांनी दिल्ली गाठली होती. एकूण सर्व प्रकार हे काँग्रेस पक्षाप्रमाणेच होत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांचा ठसा दूर राहिला, मुखवटाही भाजपला दाखवता आला नाही. पक्षातील या दुफळीचा इथे उल्लेख करण्याचे कारण म्हणजे यातून देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरची आव्हाने लक्षात यावीत.  महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची नामावळ जपत, या सर्वांचा आशीर्वाद असल्याचे त्यांनी सांगितले असले तरी वस्तुत: नरेंद्र मोदी व अमित शहा वगळता अन्य कुणाचाही त्यांना आशीर्वाद नाही. त्या दोघांच्या भरवशावर त्यांना मुख्यमंत्रिपदाचा गाडा हाकायचा आहे.
  •  सौजन्यशील स्वभाव इथे उपयोगी नाही. सर्वांना बरोबर घेताना त्यांचा पृथ्वीराज चव्हाण होऊ नये. केवळ समजुतीने नव्हे तर कर्तृत्वाने पक्षातील महत्त्वाकांक्षी नेत्यांना आपल्या बाजूने वळवावे लागेल. शरद पवार हेही लहान वयात मुख्यमंत्री झाले. पण त्यांच्यावर यशवंतरावांचा वरदहस्त होता व तेव्हा महाराष्ट्रावर यशवंतरावांची पकड होती. फडणवीस यांच्यावर मोदींचा वरदहस्त असला तरी मोदींची महाराष्ट्रावर पकड नाही. तशी असती तर गडकरी वाड्यावर आमदारांनी गर्दी केलीच नसती. फडणवीस यांच्याकडून अपेक्षा ठेवताना हा फरक लक्षात ठेवला पाहिजे.
  •       दुसरे आव्हान हे पक्षबांधणी व कार्यक्षम कारभाराचे आहे. नेहमी पहिल्या पाचात येणार्‍या विद्यार्थ्याकडून अधिक अपेक्षा असतात. महाराष्ट्राचे तसेच आहे. हे राज्य सर्वच क्षेत्रांत पुढारलेले असल्याने येथील लोकांच्या अपेक्षाही वाढलेल्या आहेत. लोकांना फक्त कार्यक्षम नव्हे तर गतिमान व भ्रष्टाचारमुक्त कारभार हवा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कामे केली नाहीत असे नव्हे. बरीच चांगली कामे केली. मात्र ही कामे करताना ते स्वत: गब्बर झाले. श्रीमंतीतून मस्ती आली व ती लोकांना आवडली नाही. स्वच्छ व गतिमान कारभार करणे सोपे नाही. महाराष्ट्रातील प्रशासनाचाही लौकिक पहिल्यासारखा राहिलेला नाही. सरकार चालवण्याबरोबर पक्ष बांधून काढावा लागेल. पक्षबांधणी झाली नाही तर काँग्रेसमुक्त भारत होऊ शकत नाही. स्वच्छ पाटी व जनतेबद्दल कळकळ ही फडणवीसांची जमेची बाजू. मात्र पक्षांतर्गत कुरबुरी, भ्रष्ट व सुस्त प्रशासन आणि दुबळी पक्षसंघटना ही तीन आव्हाने त्यांच्यासमोर आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आमदारांनी पृथ्वीवर राज्य करायला आलेल्यांना टिकू दिले नाही ते देवांवर राज्य करणार्‍या देवेंद्राला सहजासहजी कसे टिकू देतील याचा विचार केला पाहिजे...

गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०१४

सध्याचा भाजप म्हणजे हापूसच्या पेटीत रायवळ आंबे

  • आपण किती बेअक्कल आहोत हे दाखवण्यासाठी प्रशांत ठाकूर आणि राम ठाकूर यांच्यात सध्या चढाओढच लागलेली दिसत आहे. पराभव समोर दिसत असल्यामुळे बहुदा पितापुत्रांना शब्दांचाही अर्थ कळेनासा झालेला दिसतो. अर्थात अक्कल असती तर त्यांना मास्तरकी सोडायची वेळ आली नसती. या बावळट पितापुत्रांना साक्षात्कार झाला की म्हणे , प्रशांत ठाकूर यांच्या विकासकामांवर आमदार विवेक पाटील यांनी शिक्कामोर्तब केले. अर्थात असे त्यांना वाटण्याचे कारण एकतर ते झोपेत स्वप्न पहात असावेत किंवा रात्रीची उतरली नसावी, त्यामुळे अर्धवट अवस्थेत दिवास्वप्न पहात असावेत. पण या त्यांच्या बावळटपणामुळे पनवेलकरांना प्रश्‍न पडला आहे की शब्दांचा अर्थ कळत नाही, वाक्याचा अर्थ कळत नाही त्याला मास्तर कोणी केला? नशिब आपण त्याच्या हाताखाली शिकलो नाही, नाहीतर आपणही असेच प्रशांत ठाकूरांसारखे निष्क्रिय झालो असतो.
  • प्रशांत ठाकूर यांनी जो दोन दिवसांपूर्वी वचननामा नामक खोटारडेपणाचानामा प्रसिद्ध केला आहे, त्यावरून रामप्रहरच्या बोरूबहाद्दरांनी  600 कोटींची शेकडो विकासकामे केली असे आपल्या अग्रलेखातून म्हटले होते. त्याला सवाल केला होता की, जर 600 कोटी रूपयांची विकासकामे केली असे म्हणता, तर मग काँग्रेस सोडण्याची वेळ का आली? पण या बिनडोक पितापुत्रांना त्याचा अर्थ कळला नाही. त्याचे उत्तर देण्याची हिंमत नाही, त्यामुळे सोयीचा अर्थ लावला. पण पितापुत्र बिनडोक असले म्हणजे मतदार बिनडोक नाहीत. मतदारांना बेअक्कल ठरविण्याच्या या पितापुत्रांच्या बावळटपणामुळे पितापुत्रांना मतदारच त्यांची जागा दाखवून देणार आहेत.
  • बुडत्याचा पाय खोलात म्हणतात त्याप्रमाणे प्रशांत ठाकूर यामुळे आणखी अडचणीत आले आहेत. त्याच लेखात विचारले होते की 600 कोटी रूपयांची कामे केली म्हणता मग ते पैसे कुठे खर्च केले हे सांगा. तर त्यावर यांची दातखिळ बसली. कारण कामे केलीच नाहीत तर सांगणार कोठून? जो विकासकामे करू शकतो, ज्याने एवढी विकासकामे केली आहेत त्याला निवडून येण्याची चिंता करण्याचे कारण नसते. मग काँग्रेसमधून आपण निवडून येणार नाही हे समजल्यावर काँग्रेस सोडली. त्यामुळे प्रशांत ठाकूर यांच्या निष्क्रियतेवर त्यांच्या या बावळटपणामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. विकासकामे केली होती तर काँग्रेस सोडण्याची गरज काय होती हा साधा प्रश्‍न होता. पण तो प्रश्‍न केल्यामुळे प्रशांत ठाकूर यांचे पुरते वस्त्रहरण झाले. पितापुत्रांचा थयथयाट झाला. आता मतदारांनी 600 कोटीच्या विकासकामांचा हिशोब विचारला तर काय करायचे? या भितीने त्यांनी आमदार विवेक पाटील यांनी आमच्या कामावर शिक्कामोर्तब केले म्हणून स्वत:चीच स्वत: पाठ थोपटून घेण्याचा बावळटपणा केला. पण जग हे बघते आहे.
  • प्रशांत ठाकूर काँग्रेस सोडताना मुख्यमंत्री किती निष्क्रिय आहेत, काही कामे करत नाहीत, कसली मंजूरी देत नाहीत असे सांगून मुख्यमंत्र्यांच्या नावाने खडे फोडून काँग्रेस सोडणारा आमदार हा 600 कोटी रूपयांची कामे करूच शकत नाही हे सर्वांना माहित आहे. काँग्रेसमध्ये गेल्यामुळे कसलाही विकास करता आला नाही, ही काँग्रेस निष्क्रिय आहे, नुसती आश्‍वासने देते असे गळा ताणून, घसा खरवडून प्रशांत ठाकूर 13 सप्टेंबरला सांगत होते. मग ही कामे झाली असे भाजपच्या वचननाम्यात कसे काय सांगू शकता? त्यामुळे प्रशांत ठाकूर यांनी जर काही केले असेलच तर ते भाजपने केले असे ते कसे काय सांगू शकतात? या सगळ्या थापेबाजीमुळे प्रशांत ठाकूर स्वत:च निर्माण केलेल्या जाळ्यात अडकले आहेत आणि शेकापक्षावर टिका करत सुटले आहेत.
  • असे पाठ फिरवून, पाय लावून पळून जावून मतदार तुम्हाला दारात उभे करणार नाही. जे प्रश्‍न कर्नाळाने उपस्थित केले आहेत त्याची उत्तरे द्यावीच लागतील. 600 कोटी रूपये कुठे खर्च केले हे प्रशांत ठाकूर यांनी सप्रमाण, पुराव्यानिशी जाहीर करावे. एवढी विकासकामे करणार्‍या माणसाला पराभवाची भिती का वाटली? त्या भितीने काँग्रेस सोडून भाजपमध्ये यावेसे का वाटले? असेल अंगात पुरूषार्थ, कर्तृत्त्व तर द्या उत्तर. पनवेलमध्ये सगळेच काही राम ठाकूर यांचे विद्यार्थी नाहीत. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात हे प्रश्‍न आहेत. या प्रश्‍नांची उत्तरे देण्याचा बाणेदारपणा प्रामाणिक माणसातच असतो. या प्रश्‍नांची उत्तरे अनेक दिवसांपासून प्रशांत ठाकूर टाळत आहेत यातच त्यांच निष्क्रियपण सिद्ध होत आहे. हा निष्क्रियपणा झाकण्यासाठी विषयाला बगल दे, खोटे गुन्हे नोंदव, पोलिसांना हाताशी धर असले प्रकार करत आहेत. पण प्रशांत ठाकूर यांना मतदान होईपर्यंत हा प्रश्‍न मतदार विचारल्याशिवाय राहणार नाहीत. कारण येत्या 19 तारखेला प्रशांत ठाकूर दुसर्‍या क्रमांकावरही असणार नाहीत. त्यांना तिसर्‍या क्रमांकावर जावे लागले आहे.
  • कोणताही भ्रष्ट दगड भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून आणावा आणि त्याला भाजपच्या मतदारांनी मतदान करावे हे कदापि शक्य होत नाही. ती प्रथा फक्त काँग्रेसमध्ये पूर्वी होती. त्यामुळे स्वत:ची निष्क्रियता झाकण्यासाठी आणि ठेकेदारी करण्यासाठी भाजपमध्ये गेलेल्या प्रशांत ठाकूर यांना आता जास्तीत जास्त मतदारांनी नाकारायचे ठरवले आहे.
  • गद्दारी ज्यांच्या रक्तात भरलेली आहे त्या नासक्या रक्ताला आता पुन्हा संधी मिळणार नाही. जनता दलाशी गद्दारी. शेतकरी कामगार पक्षाशी गद्दारी. काँग्रेसशी गद्दारी. राष्ट्रवादीशी गद्दारी करून आता भाजमध्ये गेल्याने शुद्ध होतील असे समजत आहेत. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी आम्ही काँग्रेसमध्ये जातो, सत्तेच्या माध्यमातून ते प्रश्‍न सोडवता येतील. असे सांगून शेतकरी कामगार पक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेले. दहा वर्षात केद्रात, राज्यात त्यांची सत्ता होती. तेव्हा एकही प्रश्‍न त्यांना सोडवता आला नाही. जे एन पी टीचे , सिडकोचे ठेके मात्र घेता आले. त्यासाठी मुख्यमंत्री भेटत होते. फक्त टोल प्रश्‍नावर निर्णय घ्यायला मुख्यमंत्री भेटत नव्हते? वाढदिवसाला यायला मुख्यमंत्र्यांना वेळ होता पण टोलचा निर्णय घ्यायला वेळ नव्हता? अरे किती फसवाल? कोण विश्‍वास ठेवणार आहे तुमच्यावर? सिडकोच्या संचालकांना अंधारात ठेवून भूखंड लाटला, त्यावर मुख्यमंत्र्यांची चूपचाप सही घेता येते मग टोलप्रश्‍नावर त्यांना बोलायला का जमत नाही? कारण प्रशांत ठाकूर यांना माहित होते. त्यांना फक्त मतदारांन फसवायचे होते. पण मतदारांनी प्रशांत ठाकूर यांचा स्वार्थीपणा ओळखला आहे. म्हणूनच जवळजवळ शंभर वेळा प्रश्‍न विचारून झाला आहे की, जर सायन पनवेल रस्त्याचे काम प्रशांत ठाकूर यांना मिळाले असते तर त्यांनी टोलचे आंदोलन केले असते का? याचे उत्तर देता न आल्यामुळे त्यांची 9 इंच फाटली. ती सावरण्यासाठी प्रश्‍नांना बगल देण्याचे काम ते करत आहेत. पण जेवढी ते उत्तर देण्याची टाळाटाळ करत आहेत, तेवढे त्यांचे मतदार आणखी दिवसेंदिवस कमी होताना दिसणार आहेत.
  • आज काँग्रेसच्या भ्रष्ट नेत्यांना प्रवेश दिल्यामुळे राज्यभर भाजपबद्दल  संतापाची लाट आहे. महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालेल्या भाजपला सत्तेपर्यंत पोहोचू द्यायचे नाही हे अस्सल मराठी माणसाने निश्‍चित केले आहे. ज्या काँग्रेसला नाकारायचे, ज्या भ्रष्ट आणि निष्क्रिय काँग्रेसला नाकारण्यासाठी मतदार जागृत झालेला असताना त्याच भ्रष्ट नेत्यांना आपल्या पक्षातून उमेदवारी देण्याचे पाप जर भाजप करीत असेल तर त्यांना त्यांची जागा मराठी माणूस दाखवून दिल्याशिवाय कसा राहील? आंब्याच्या दिवसात ते बाहेरून आलेले विक्रेते हापूस आंबे म्हणून कागदी खोक्यातून, चकाकच पॅक अशी खोकी विकत असतात. हापूस हा शब्दही त्यांना माहित नसतो. पण रत्नागिरी हापूस म्हणून मराठी कोकणी माणसालाच ते असे आंबे विकायला येतात. एखादा माणूस ती पेटी विकत घेतो. आत उघडून पाहिल्यावर लक्षात येते की हा हापूस नाही. हा तर रायवळ आंबा आहे. तसे हे बाहेरून आलेले उपरे भाजपचे लोक हापूसच्या पॅकींगमध्ये प्रशांत ठाकूर यांच्यासारखे रायवळ, आढी नासवणारे आंबे हापूस म्हणून विकत आहेत. पण मतदार आता पेटी उघडून दाखव म्हणतील. हापूस असेल तरच घेतील. नाहीतर भिरकावून देतील. तसेच प्रशांत ठाकूर यांना जनता आता प्रश्‍न विचारते आहे की, 600 कोटी रूपये कुठे गेले? कशावर खर्च केले? ठाकूर इन्फ्राप्रोजेक्टने सायन पनवेल मार्गाचे काम केले असते तर टोलमाफीचे आंदोलन केले असते का? भोपाळच्या घातक  कचर्‍याचे तळोजात आणून जाळून टाकण्याचा जो विषप्रयोग होणार होता त्याला विरोध का केला नाही? पनवेलचे आमदार असूनही त्या प्रश्‍नावर चर्चा होत असताना पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी तेथून पळ का काढला? दहा वर्षात केंद्रात राज्यात सत्ता असताना जमले नाही मग आता कसे जमेल? या प्रश्‍नांची प्रशांत ठाकूर उत्तरे देवूच शकणार नाहीत. कारण उत्तर फक्त प्रामाणिक माणूसच देवू शकतो. ज्यांच्या अंगात दम असतो असा पुरूषार्थ असलेला माणूसच उत्तर देवू शकतो. हे निष्क्रिय लेचे पेचे का या प्रश्‍नांची उत्तरे देणार?

बुधवार, ८ ऑक्टोबर, २०१४

काँग्रेस उमेदवार आयात करणारा भाजप म्हणजेच आघाडी सरकार आहे


  • राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचा आघाडी सरकारवर, काँग्रेसवर राग होता. पण निवडणुकीची प्रक्रीया सुरू झाली आणि विरोधी पक्षांकडून काँग्रेस राष्ट्रवादीवर टिका न होता परस्परांवर टिका होताना दिसते आहे, त्यामुळे सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाचवेळी भारतीय जनता पक्षावर टिका करताना दिसत आहेत. त्यामुळे राजकारणापासून दूर असलेल्या  सामान्य मतदाराला आश्‍चर्य वाटत आहे. एका सभ्य सामान्य माणसाने याबाबत शंका विचारल्यामुळे आणि त्याच्या आग्रहाखातर आज त्याच विषयावर लिहीत आहे.
  • सत्य असे आहे की आजही शिवसेना, मनसे आणि छोटे छोटे विरोधी पक्ष काँग्रेस आणि आघाडी सरकारविरोधातच ओरडत आहेत. फक्त त्याचा अर्थ सामान्य माणसाने समजून घेतला म्हणजे त्या नव्या रूपात आलेल्या आघाडी सरकारला नाकारणे सोपे जाईल. आज जो निवडणुकीच्या मैदानात उतरलेला भारतीय जनता पक्ष आहे, तो पक्ष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रित रूप आहे. भाजपच्या नावाखाली काँग्रेसचेच भ्रष्ट लोक भाजपने उभे केले आहेत. त्यामुळे भाजप म्हणजेच महाराष्ट्रातील निष्क्रिय आघाडी सरकार आहे हे लक्षात घेवून भाजपला साफ नाकारण्याचे काम केले पाहिजे. जे ओरीजनल भाजपचे नेते आहेत ते या दलदलीत फसले आहेत, कमळाच्या देठाखाली आहेत आणि प्रशांत ठाकूर यांच्यासारखे पाकळ्यांना चिकटून बसले आहेत. त्या पाकळ्या आता पाडण्याची वेळ आलेली आहे.
  • ज्या विश्‍वासाने भारतीय जनता पक्षाच्या हातात केंद्राची सत्ता मतदारांनी दिली, त्या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राचा विश्‍वासघात केलेला आहे. ज्यांना नाकारण्यासाठी मतदार सज्ज झाला होता त्यांनाच आपल्या पक्षात प्रवेश देवून भ्रष्टाचार्‍यांचे शुद्धीकरण केले जात आहे. ओरीजनल भाजपच्या नेत्यांना हे मान्य नाही. 6 ऑक्टोबरला प्रशांत ठाकूर यांच्या सभेसाठी सूषमा स्वराज यांना आमंत्रित केले होते. पण आजारपणाचे कारण सांगून त्यांनी येणे टाळले. पण पक्षादेश म्हणून त्यांना पुन्हा आज यावे लागते आहे, पण त्यांच्या भाषणात ती धार असणार नाही जी धार काँग्रेस विरोधात, यूपीए सरकारविरोधात, सोनिया गांधींविरोधात भाषण करताना असायची ती धार असणार नाही. सूषमा स्वराज यांना लागणारे हे लांछन असेल की काँग्रेसच्या एका भ्रष्ट, निष्क्रिय माणसासाठी आपल्याला प्रचाराला यावे लागते आहे. महाराष्ट्रातल्या भाजपने केलेली ही पापे भविष्यात देशव्यापी अद्दल घडवणारी ठरेल. सोनिया गांधींना पंतप्रधानपदापासून रोखणार्‍या सूषमा स्वराज मुंडण करायला निघाल्या होत्या, संन्यास घेणार होत्या, अनवाणी राहणार होत्या, श्‍वेत वस्त्र परिधान करणार होत्या. त्याच बाणेदार सूषमा स्वराज प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी केवळ पैसा ओतला आहे म्हणून येतात यामुळे त्यांची प्रतिमा मलिन झालेली आहे. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सूषमा स्वराज या पंतप्रधान झाल्या पाहिजेत असे मत व्यक्त करून त्यांची योग्यता दाखवली होती. त्याच सूषमा स्वराज एका भ्रष्ट, काँग्रेसमधून आलेल्या आणि केवळ पैशाच्या तालावर नाचवणार्‍या माजी आमदाराच्या प्रचारासाठी येतात यावरून भाजपाचे किती नैतिक अध:पतन झाले आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
  • अटलबिहारी वाजपेयी नेहमी सिद्धांताच्या गोष्टी करायचे. आता त्यांनी भाजपमधून अंग काढून घेतल्यानंतर पैसा हाच सिद्धांत भाजपने अंगीकारला आहे का? अटलजींबद्दल केवळ भाजपच्याच नाही तर संपूर्ण देशात आपलेपणा होता,विरोधकही त्यांचा आदर करायचे. आज तशा तोडीचा एक तरी नेता भाजपमध्ये आहे काय? तर याचे उत्तर नाही असेच येईल. कारण ज्या काँग्रेसला नाकारण्यासाठी मतदार सज्ज झाला होता त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपने उमेदवारी दिली. काय म्हणून भाजपला मतदारांनी निवडून द्यायचे? त्यामुळे सेना मनसे करीत असलेली भाजपवरची टिका ही काँग्रेसवर केलेलीच टिका आहे. भाजप म्हणजे बुरखा बदललेली काँग्रेस आहे हे लक्षात घेवून त्यांना नाकारायचे आहे.
  • प्रशांत ठाकूर यांच्यात भाजपने काय पाहिले हो? कोणते कर्तृत्त्व त्यांच्यात होते? केवळ भरमसाठ पैसा ओतणारा नेता म्हणून त्यांना तिकीट विकले? स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देवून राज्यातील काँग्रेसला वाचवायचे या धोरणाने ज्या प्रशांत ठाकूर यांना काँग्रेसने तिकीट नाकारले, त्यांना भाजप उमेदवारी देते ही भाजपच्या नैतिक अध:पतनाची सुरूवात की राज्यातून भाजप हद्दपार करण्याची वेळ आली म्हणायची? सूषमा स्वराज यांनी याचे उत्तर आज दिले पाहिजे.
  • पहिल्यांदाच आमदार झाले तेव्हा नागपूर हिवाळी अधिवेशनाच्यावेळी मुक्कामाला प्रशांत ठाकूर नागपूरला गेले. त्यांना म्हणे त्यावेळी चहा पिऊन कंटाळा आला होता म्हणून पित्तावर उतारा पडण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला कोणीतरी दिला. त्यांनी आपल्या खोलीमध्ये खानसाम्याकडून दूध मागवले. त्या दुधात साखर नव्हती. त्यामुळे त्यांनी दुधात साखर घालून चमच्याने ढवळली आणि दूध प्यायले. ते दूध प्यायले आणि त्यांचा डोळा आणि कपाळ दुखायला लागले. दुपारी पुन्हा तसेच घडले. संध्याकाळी तसेच घडले. तेव्हा त्यांनी डॉक्टरांना पाचारण केले आणि सांगितले की ‘इथले दूध प्यायल्यानंतर माझा डोळा दुखतो, कपाळाचा असा भुवईजवळचा भाग टोचल्यासारखा खुपतो.’ डॉक्टरांनी तपासले पण त्यांना काही नेमके दुखणे समजेना. दुसरे दिवशी पुन्हा तसेच घडले. तेव्हा डॉक्टर तिथे आले आणि म्हणाले, ‘मागवा पुन्हा दूध, आपण चेक करू. नेमका काय प्रॉब्लेम आहे ते.’ काँग्रेस आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा दूध मागवले. दुधात साखर घातली. चमच्याने ढवळले आणि ग्लास तोंडाला लावला. लगेच ओरडले,‘ हे पहा डॉक्टर दूध पितानाच जास्त दुखते आहे.’ डॉक्टर हसले आणि म्हणाले, ‘दोष दुधात नाही तर तुमच्यात आहे. ग्लासातला चमचा काढा आणि मग दूध प्या. चमच्यासकट ग्लास तोंडाला लावल्यामुळे तो चमचा वर टोचतो आहे.’ म्हणजे ज्या माणसाला ग्लासातला चमचा हटवता येत नाही म्हणून ओरड करतो तो माणूस टोलनाका कसा हटवू शकणार? पक्ष बदलून, आपली निष्क्रियता झाकता येईल काय? अशा लोकांना भाजपमध्ये घेवून भाजपने नेमके काय साधले आहे?
  • आज भारतीय जनता पक्ष हा काँग्रेसचा अजंडा राबवण्यासाठी सत्तेवर येवू पहात असेल तर त्याला इथेच रोखला पाहिजे. ठेकेदार आणि टक्केवारी वाल्यांना आपल्या पक्षात घेवून पैशाच्या मागे लागलेला भारतीय जनता पक्ष आम्हाला नको आहे हे मतदारांनी दाखवून देण्याची हीच वेळ आहे. आपल्याला हवा आहे तो अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंडे यांचा भाजप. आयात केलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या 55 नेत्यांना तिकीटे देणारा भ्रष्ट भाजप हा महाराष्ट्र कधीही स्विकारणार नाही.
  • आज हाच भाजप महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाला आहे. विदर्भाला स्वतंत्र राज्य करण्याचे, महाराष्ट्राचा लचका तोडण्याचे काम भाजप करणार असेल तर महाराष्ट्राने त्यांना साफ नाकारले पाहिजे. या संयुक्त महाराष्ट्रासाठी मुंबईतील आंदोलकांनी हौतात्म्य पत्करले. 106 हुतात्मे झाले तेव्हा हा संयुक्त महाराष्ट्र झाला. त्या हुतात्म्यांच्या टाळूवरचे लोणी खाऊन हा भाजप जर पुन्हा महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी आला असेल तर त्यांना गल्ली ते दिल्ली नाकारावे लागेल. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या निवडणुकीत महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्‍नाबाबत का कोणता शब्द दिला नाही? कारण त्यांचा याच्याशी काही संबंधच नाही. सीमाप्रश्‍नावर फक्त शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना हेच पक्ष लढू शकतात. पनवेलचे माजी आमदार दिवंगत दत्तूशेठ पाटील यांना सीमा प्रश्‍नावरील लढ्यासाठी तुरूंगवास भोगावा लागला आहे. त्या तात्यांना या महाराष्ट्राचे तुकडे करणारे भाजपचे नेते आपल्या मतदारसंघात येतात हे पाहून किती दु:ख होत असेल? प्रकल्पग्रस्तांचे नेते शेकापचे माजी खासदार दिवंगत दि. बा. पाटील यांनीही संयुक्त महाराष्ट्र आणि सीमाप्रश्‍नावर लढा दिला होता. त्यांना काय वाटत असेल? या पनवेलच्या आदरणीय दैवतांचा अपमान करणार्‍या भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांची अनामत रक्कम जप्त करण्याचे काम आपल्याला केले पाहिजे. भाजपचे देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगुंटीवार हे सरळसरळ आम्ही विदर्भ वेगळा करणारच असे जाहीरपणे सांगतात. त्याचवेळी हतबलपणे नरेंद्र मोदी म्हणतात आम्ही महाराष्ट्राचे तुकडे करणार नाही. एकाचवेळी असे दोन तोंडाने बोलणार्‍या नेत्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल. आज विदर्भ वेगळा करतील, उद्या मुंबई वेगळी करतील. अशा महाराष्ट्राच्या शत्रूंना हद्दपार केले पाहिजे.

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०१४

19 तारखेला पराभव झाल्यावर प्रशांत ठाकूर भाजपमध्ये असतील का?


  • उरण आणि पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आमदार विवेक पाटील आणि बाळाराम पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांचा विजय निश्‍चित झालेला आहे. कारण शेतकरी कामगार पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. रस्त्यावर उतरून लोकांना मदत करणारा पक्ष आहे याची सर्वांना खात्री आहे. युती आणि आघाडी यांच्यात राज्यभरात कितीही कुरघोड्या झाल्या तरी शेतकरी कामगार पक्ष मात्र आपले स्थान राखून आहे, राखून राहील आणि त्यांचे संख्याबळ वाढतच जाईल यात शंकाच नाही.
  • गेल्या वर्षभरात मुंबईतही शेतकरी कामगार पक्षाने आपली चांगली ताकद निर्माण केलेली आहे. कारण हा पक्ष कष्टकर्‍यांचा, सामान्यांचा आणि शेतकर्‍यांचा आहे. त्यामुळे या पक्षाची गरज आहे हे सामान्य मतदारांमध्ये रूजले आहे.
  • रामशेठ ठाकूर-प्रशांत ठाकूर यांना वाटते आपण नसलो म्हणजे शेतकरी कामगार पक्ष शून्य होईल. पण गद्दारी करणार्‍या या पितापुत्रांना मतदारांनी दाखवून दिले आहे की तुम्ही गेल्यावर शेकापक्ष संपला नाही तर वाढला आहे. रामशेठ ठाकूर शेतकरी कामगार पक्षात होते तेव्हा 2004 मध्ये शेकापक्षाचे फक्त 2 आमदार होते. त्यानंतर ठाकूर पितापुत्र काँग्रेसमध्ये गेले आणि शेकापक्षाचे 2 चे चार आमदार झाले. ताकद दुप्पट झाली. उलट काँग्रेसपक्ष क्षीण झाला. पंचायत समिती, जिल्हा परिषद यामध्ये असलेले काँग्रेसचे सदस्य कमी होत गेले. ग्रामीण भागात असलेली काँग्रेस नष्ट झाली. त्यामुळे गेल्या पाच वर्षात सर्वाधिक ग्रामपंचायती या शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात आल्या.  कृषी उत्पन्न बाजारसमितीत तर काँग्रेस शून्य झाली. पनवेल तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत काँग्रेस शून्य झाली आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाने काँग्रेसमुक्त पनवेल-उरण हे केव्हाच करून टाकले आहे. त्यामुळे काँग्रेसमधून आपल्याला तिकीट मिळणार नाही, मुलाखतीलाही आमंत्रण दिले गेले नाही, प्रशांत ठाकूर यांची निष्क्रियता स्पष्ट झाल्यामुळे काँग्रेसने दुसरे उमेदवार शोधण्यास सुरूवात केली होती. गेल्या सहा महिन्यात आम्ही आमच्या अग्रलेखातून दुसराच काटा येणार हे वारंवार सांगितले होते. तसेच झाले. त्यामुळे प्रशांत ठाकूर लगेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले.
  • राज्यातले भारतीय जनता पक्षाचे नेतेही निष्क्रिय आणि लबाड आहेत. आयत्या बिळावर नागोबा होणारे आहेत. कसला विचार नाही की आचार नाही. त्यामुळे शिवसेनेशी गद्दारी करून स्वबळाची भाषा करू लागले. पण स्वबळावर लढण्याची भाषा करू लागले. पण स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी तेवढे उमेदवार तरी हवेत ना भाजपकडे? मग काय त्यांनी गद्दारांची शोधाशोध सुरू केली. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना, शेतकरी संघटना, अपक्ष अशा वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार, माजी आमदार आपल्यात घेवून कसेबसे दोनअडीचशे उमेदवार उभे केले. पण त्यात ओरीजनल भाजपचे पन्नासही उमेदवार नाहीत. ज्या शिवसेनेने आपल्याला मोठे केले त्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणार्‍या भारतीय जनता पक्षाने शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणार्‍या, काँग्रेसशी गद्दारी करणार्‍या प्रशांत ठाकूर यांना आपली उमेदवारी दिली. कसे मतदार यांना निवडून देतील? मतदारांना काय मूर्ख समजतात हे लोक?
  • काँग्रेसमध्ये जावून काँग्रेस संपवली आणि आता भारतीय जनता पक्षात जावून भाजपला खिंडार पाडण्यापलिकडे हे गद्दार काही करू शकणार नाहीत. प्रशांत ठाकूर यांनी जाहीर करावे की 19 तारखेला त्यांचा पराभव झाल्यानंतर प्रशांत ठाकूर भाजपमध्ये असतील का? 19 ऑक्टोबरनंतर पराभव झाल्यानंतर प्रशांत ठाकूर नरेंद्र मोदींचे, सूषमा स्वराज यांचे गोडवे गातील का? नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देवून हातात झाडू घेवून सफाई करतील का? हे निव्वळ स्वार्थाचे आणि सोयीचे राजकारण करत आहेत. आज राज्यातील भारतीय जनता पक्ष हा स्वार्थी, भ्रष्टाचारी आणि बरबटलेल्या नेत्यांचा पक्ष आहे. बाटग्यांचा पक्ष आहे. आयात केलेल्या नेत्यांचा पक्ष आहे. त्यामुळे केंद्रात जरी भाजपला शत प्रतिशत भाजप म्हणत मतदारांनी कौल दिला तरी राज्यात भाजपला जनता नाकारेल यात शंकाच नाही. त्यामध्ये सर्वात दारूण पराभव होईल तो पनवेल विधानसभा मतदारसंघातून प्रशांत ठाकूर यांचा.
  • 2009 च्या निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांनी अण्णा हजारे यांचे प्रमाणपत्र खरेदी करून आपण स्वच्छ असल्याचे दाखवून प्रचार केला होता. आता हेच प्रशांत ठाकूर अण्णा हजारेंना विसरले आहेत. अण्णांवर टिका करतात. अण्णांवर बोलण्यास टाळतात. वारंवार पक्ष बदलणार्‍या, भ्रष्ट अशा प्रशांत ठाकूर यांना अण्णा हजारे आता विकत तरी प्रमाणपत्र देतील का? ठाकूर इन्फ्रास्ट्रक्चरला सायन पनवेल महामार्गाचा ठेका मिळाला नाही म्हणून मी हे आंदोलन केले, या आंदोलनाला अण्णांचा पाठिंबा आहे असे पत्र प्रशांत ठाकूर यांनी आणून दाखवावे.
  • आज सूषमा स्वराज यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांना प्रचारासाठी यावे लागते यातच प्रशांत ठाकूर यांची लायकी दिसून येते. त्यांना स्थानिक काय माहिती आहे? त्यांना पाहण्यासाठी म्हणून लोक येतील. त्यांना ऐकण्यासाठी लोक येतील. पण याचा अर्थ जमलेली गर्दी ही काही मतदारांमध्ये परिवर्तीत होईल असे समजण्याचे कारण नाही. शेतकरी कामगार पक्ष क्षीण झाला असे राम ठाकूर- प्रशांत ठाकूर आपल्या वर्तमानपत्रातून   म्हणतात मग त्याच्याविरोधात प्रचार करण्यासाठी एवढे मोठे नेते त्यांना का आणावे लागतात? पितापुत्र क्षीण झाले आहेत, त्यांच्या भ्रष्ट आणि निष्क्रिय कारभारामुळे जनता त्यांन विटली आहे याची जाणिव झाल्यामुळे पितापुत्रांना वैफल्य आले आहे. त्यामुळे यांच्याकडे बघून तरी आम्हाला मतदान करा असा टाहो फोडण्याचे काम प्रशांत ठाकूर करीत आहेत. पण त्यांच्याकडे बघून लोकसभेला जनतेने भरभरून कौल दिलेला आहे. विधानसभेला त्यांचे काही काम नाही. त्यामुळे प्रशांत ठाकूर यांना घरीच बसावे लागणार आहे हे निश्‍चित.
  • राहुल गांधी, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर फोटो काढून घेतले. त्याचे भांडवल पाच वर्ष केले. आता तसेच फोटो सूषमा स्वराज, नितीन गडकरी यांच्याबरोबर काढून आपली चर्चा चालू आहे, टोल बंद होणार आहे असे फसवण्याचा प्रयत्न प्रशांत ठाकूर करणार आहेत. सगळ्यात विनोदाचा भाग म्हणजे प्रशांत ठाकूर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या कटआउटबरोबर फोटो काढला आणि त्यांच्याशी आपली चर्चा झाली म्हणून तो फोटो रामप्रहरमध्ये छापला. हा खोटेपणा अंगलट आल्यामुळे काँग्रेसने ही घाण पहिली बाहेर काढली पाहिजे म्हणून लाथाडायला सुरूवात केली. ती घाण आता भाजपमध्ये येवून पडली आहे. परंतु नरेंद्र मोदींनी या देशात स्वच्छतेचे आवाहन केलेले आहे. त्याप्रमाणे इथला मतदार स्वच्छता अभियानात भाग घेणार असून प्रशांत ठाकूर यांना कचर्‍याप्रमाणे लांब फेकून देणार आहे. जसा आमदार विवेक पाटील यांनी तळोजातील घातक कचर्‍याला विरोध केला त्याचप्रमाणे इथला मतदार प्रशांत ठाकूर यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. एकदा आमदारकीची संधी देवूनही प्रशांत ठाकूर यांनी काय केले? याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. पनवेल मतदारसंघात भोपाळचा घातक विषारी कचरा आणून टाकण्याचे षडयंत्र सुरू होते. त्याला लोकप्रतिनिधी म्हणून विरोध करणे प्रशांत ठाकूर यांचे कर्तव्य होते. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यामागे नेमका अर्थ काय होता हे सगळ्या मतदारांना समजले आहे. त्या घातक कचर्‍याला आमदार विवेक पाटील यांनी विरोध केला नसता तर प्रशांत ठाकूर यांच्या कृपेने तो कचरा तळोजात आला असता, इथल्या नागरिकांचे जीवन धोक्यात आले असते. यावर आमदार विवेक पाटील यांनी विधानसभेत आवाज उठवला. पण आपल्या मतदारसंघाचा प्रश्‍न असूनही प्रशांत ठाकूर यांनी तेथून पळ काढला, चर्चेत भाग घेतला नाही, याचा अर्थ मतदारांनी समजून घेतला आहे. ज्या भ्रष्ट आणि स्वार्थी  भाजपच्या नेत्यांना, ज्या विनोद तावडेंना प्रशांत ठाकूर यांचे समर्थन करायचे आहे त्यांनीही याचा जबाब दिला पाहिजे. पनवेलकरांना मृत्यूच्या दाढेत नेणार्‍या प्रशांत ठाकूर यांना तुम्ही उमेदवारी देता, म्हणजे तुम्ही किती विषारी आहात हे पनवेलकरांनी पाहिले आहे. त्यामुळेच भाजपला मतदार आता नाकारतील हे निश्‍चित आहे. राम ठाकूर प्रशांत ठाकूर यांनी शेकापक्ष क्षीण झाला आहे असे म्हटले आहे पण प्रत्यक्षात त्यांनी काँग्रेस क्षीण केली आणि आता भाजप क्षीण करण्यासाठी ते भाजपत गेले आहेत.

600 कोटींची विकासकामे केली आहेत, मग काँग्रेस सोडण्याची वेळ का आली?


  • काँग्रेसचे बंडलबाज नेते आणि भाजपत येऊन सोंगाड्याची भूमिका करणारे प्रशांत ठाकूर यांनी आपला वचननामा जाहीर केला आहे. त्याचबरोबर  आपल्या प्रचारात ते नेहमी सांगत आहेत की गेल्या पाच वर्षात मी 600 कोटींची विकासकामे केली. 600 कोटींची शेकडो विकासकामे केली असतील असे जर प्रशांत ठाकूर यांचे म्हणणे आहे तर मग त्यांना काँग्रेस सोडण्याची वेळ का आली? पृथ्वीराज चव्हाण कामे करत नाहीत, ऐकत नाहीत, निर्णय घेत नाहीत अशी टिका करत कोणतीही विकासकामे केली नाहीत अशा थापा मारून प्रशांत ठाकूर यांनी काँग्रेस सोडली. मग जी 600 कोटी रूपयांची कामे केली अशा थापा ते मारत आहेत तेव्हा ती मंजूर केल्याची जाहीरातबाजी खारघरपासून ते खोपोलीपर्यंत प्रशांत ठाकूर यांनी केली होती. त्यामुळे यातले नक्की खरे काय आहे हा प्रश्‍न पनवेलकरांना पडला आहे. मुळात निष्क्रिय आणि भ्रष्ट असलेले प्रशांत ठाकूर 600 कोटींची कामे केली असे सांगत आहेत यावर कोणी विश्‍वासच ठेवू शकत नाही. कदाचित ठाकूर इन्फ्राप्रोजेक्टने घेतलेल्या विविध ठेक्यांची यादी ते देतील. पण तो त्यांनी धंदा म्हणून स्वार्थापोटी केलेला असेल. त्याचा विकासकामाशी काही संबंध नाही. काँग्रेसची सत्ता असल्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून, केंद्राकडून 600 कोटींपेक्षा जास्त रकमेचे सिडकोचे, जेएनपीटीचे ठेकेे मिळवले असतील. पण यातून फक्त पितापुत्रांचे भले झाले आहे. जनतेचे भले झाले नाही हे पनवेलकर जाणून आहेत. त्यामुळे शेकडो कामे केली एवढच त्यांना सांगता येते. पण या शेकडोपैकी एक तरी दाखवा असे सांगितले तर पितापुत्रांना दातखिळ बसते.
  • गेल्या पाच वर्षात पनवेल विधानसभा मतदारसंघाचा कायापालट केला असे प्रशांत ठाकूर यांचे वचननाम्यात म्हणणे आहे. पण कायापालट म्हणजे पाच वर्षांनी आपल्या निष्क्रियतेमुळे उमेदवारी मिळणार नाही आणि  काँग्रेसची सत्ता येणार नाही हे लक्षात आल्यावर पक्ष सोडला. स्वत: पक्ष बदलला हाच काय कायापालट? उलट पनवेल पंचवीस वर्ष मागे नेऊन ठेवले. पनवेल मतदारसंघातील रस्ते अत्यंत खराब आहेत. एखाद्या खेड्यात जावे असे ते रस्ते आहेत. काँग्रेसच्या म्हणजे प्रशांत ठाकूर यांच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकेला नागरिकांना पाणी पुरवता येत नाही. स्वच्छतेच्या नावाने बोंब आहे. राम ठाकूर यांचे जन्मगांव असलेल्या गव्हाण शिवाजीनगर या भागातील लोकांना लाल रंगाचे माती मिश्रीत पाणी प्यावे लागते. जे आपल्या जन्मगावासाठी काही करू शकत नाहीत त्यांनी कोणती शेकडो कामे केली आणि 600 कोटी रूपये कुठे खर्च केले हे जाहीर करावे. 600 कोटी रूपयांचा हिशोब द्यावा नाहीतर जनतेची फसवणूक थांबवावी. या प्रश्‍नाचे उत्तर ते देवूच शकणार नाहीत. कारण पितापुत्रांची, प्रशांत ठाकूर यांची निष्क्रियता समोर आणली की त्याचे उत्तर द्यायचे नाही ही त्यांची प्रथा आहे.
  • यापूर्वीही त्यांना अनेक प्रश्‍न विचारले होते. पण त्या प्रश्‍नांचे मुद्देसूद उत्तर देण्याचा पुरूषार्थ त्यांच्यात नसल्यामुळे आता सोंगाड्याची भूमिका त्यांना करावी लागत आहे. आम्हाला सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिली नाहीत तरी चालेल पण पनवेलकरांसाठी फक्त तीन प्रश्‍नांची उत्तरे द्या नाहीतर तोंड काळे करा. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी असल्या भ्रष्ट नेत्याला उमेदवारी देवून पक्षाचा घात केला आहे. भाजपने प्रशांत ठाकूर यांच्या या भ्रष्ट कारभाराचेे समर्थन केले आहे काय याचे उत्तर द्यावे आणि प्रशांत ठाकूर यांना या तीन प्रश्‍नांची उत्तरे देण्यास भाग पाडावे.
  • पहिला प्रश्‍न असा की भोपाळचा घातक विषारी कचरा पनवेल विधानसभा मतदारसंघात आणून टाकण्याचा घाट घातला जात असताना त्याला विरोध प्रशांत ठाकूर यांनी का केला नाही? त्यावर विधानसभेत चर्चा सुरू असताना त्या चर्चेत भाग न घेता तेथून प्रशांत ठाकूर का पळून गेले? त्यावेळी जर आमदार विवेक पाटील यांनी त्याला विरोध केला नसता तर आज पनवेलकर मृत्यूच्या दाढेत असते. पनवेलकरांचा हा घात करण्याचा घाट प्रशांत ठाकूर यांनी घातला याचे भारतीय जनता पक्ष समर्थन करणार आहे काय?
  • दुसरा प्रश्‍न असा की खारघर टोल नाक्याबाबत असलेले प्रशांत ठाकूर यांचे आंदोलन हे खोटारडेपणाचे आंदोलन आहे. सायन पनवेल महामार्गाचे काम ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट या प्रशांत ठाकूर यांच्या कंपनीला मिळाले नाही म्हणून सूडबुद्धीने टोलकंपनीला त्रास देण्यासाठी त्यांनी आंदोलन केले. हे काम ठाकूर इन्फ्राप्रोजेक्टला मिळाले असते तर प्रशांत ठाकूर यांनी हे आंदोलन केले असते का? भाजपच्या नेत्यांनी या प्रश्‍नाचे उत्तर  प्रशांत ठाकूर यांच्याकडून विचारून घ्यावे आणि कोणते निखारे आपण पदरात बाळगले आहेत हे भाजपने लक्षात घ्यावे.
  • तिसरा प्रश्‍न असा की 600 कोटी रूपयांची विकासकामे केली असे प्रशांत ठाकूर म्हणत आहेत. गेल्या पाच वर्षात काँग्रेसचे आमदार असताना ही जर कामे त्यांनी केली असतील तर त्या 600 कोटी रूपयांचा खर्च कोठे केला, कोणती विकासकामे केली याचा तपशिल त्यांनी द्यावा. इतकी भरभक्कम कामे काँग्रेसचे आमदार असताना प्रशांत ठाकूर यांनी केली असतील तर त्यांना पक्ष सोडून भगवी वस्त्र का धारण करावी लागली?
  • या प्रश्‍नांची उत्तरे प्रशांत ठाकूर देवू शकणार नाहीत. हा विषय ते भलतीकडे घेवून जावून त्याला वेगळे वळण देतील. पण आता मतदार गप्प बसणार नाही. तुम्ही पैशाच, बळाचा, पोलिसी ताकदीचा कसलाही वापर केलात तरी पनवेल मतदारसंघातील प्रत्येक घराघरात हा प्रश्‍न आता पोहोचलेला असेल. जाहीर सभांमधून याचा उल्लेख केल्याशिवाय तुम्हाला मतदार स्विकारणार नाहीत. 
  • पनवेल मतदारसंघातील निवडणूक ही आता सरळ सरळ एकतर्फी होताना दिसत आहे. शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांचे पारडे एवढे जड झाले आहे की त्याच्या जवळपासही प्रशांत ठाकूर पोहोचू शकत नाहीत. विविध पाहणी अहवालांमध्ये आलेल्या अंदाजानुसार बाळाराम पाटील हे तर भरघोस मतांनी विजयी होणार आहेतच पण प्रशांत ठाकूर तिसर्‍या क्रमांकावर फेकले जात आहेत. लढतीतूनच बाद होत आहेत. याची जाणिव भाजपलाही झालेली आहे. त्यामुळेच पहिल्या फळीतल्या भाजप नेत्यांनी सूषमा स्वराज यांनी सोमवारी येण्याचे टाळले. आधी निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा प्रचार आणि मग वेळ मिळाला तर शेवटच्या टप्प्यात तिसर्‍या क्रमांकावरच्या नेत्यासाठी यायचे या धोरणाने भाजप नेत्यांनी पहिल्या टप्प्यात प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाठ फिरवली. भारतीय जनता पक्षाला फक्त आपली मतांची टक्केवारी वाढवायची होती. भाजपची पनवेलमध्ये ताकत फारशी नव्हतीच. त्या ताकदीत ठाकूर यांच्यामुळे शे पाचशे माणसे आली तर काही टक्के मतदान वाढेल एवढाच त्यांचा उद्देश होता. त्यामुळेच भाजपनेही पडेल उमेदवार म्हणूनच प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाहिले आहे. याचे कारण जे आधी काँग्रेसचे आमदार होते, गेल्या दहा वर्षात ते काँग्रेसमध्ये असल्यापासून केंद्रात आणि राज्यात त्यांचीच सत्ता होती. तेव्हा ते काही करू शकले नाहीत ते आता काय करू शकणार आहेत? प्रशांत ठाकूर यांच्या निष्क्रियतेची कल्पना भाजप नेत्यांना आहे. पनवेल नगरपालिकेत नगराध्यक्ष असताना एकाच रस्त्याची चार चार वेळा टेंडर काढून केलेल्या भ्रष्टाचाराची कहाणी भाजपच्या नेत्यांना माहित आहे. त्याची नगरविकास खात्यामार्फत चौकशी सुरू असल्याचे भाजप नेत्यांना माहित आहे. सत्तेचा दुरूपयोग करून त्या चौकशीला मंदगतीने करण्यासाठी प्रशांत ठाकूर यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यापासून सगळ्या काँग्रेस नेत्यांचे उंबरे झिजवले होते हे सर्वांना माहित आहे. त्यामुळेच जर सत्तांतर झाले तर ही चौकशी होणार. आपल्याला तुरूंगात जावे लागणार या भितीने प्रशांत ठाकूर आता भाजपत आले आहेत हे देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, सुधीर मुनगुंटीवार या सर्वांना माहित आहे.
  • प्रशांत ठाकूर यांनी वचननाम्याचे प्रकाशन केले आहे. पण कोणाच्या वचनावर लोक विश्‍वास ठेवतात? जे वारंवार वचन मोडतात, शब्द कधी पाळत नाहीत त्यांच्यावर कोण विश्‍वास ठेवणार आहे? प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी आम्ही काँग्रेसमध्ये जातो अशी थापेबाजी करून ठेकेदारी करायला गेलेल्या पितापुत्रांना एकही प्रकल्पग्रस्तांचा प्रश्‍न सोडवता आला नाही. कुठे गेले दहा वर्षांपूर्वी दिलेले हे वचन? त्यामुळे असल्या वचननाम्यावर कोणी विश्‍वास ठेवणार नाही. कितीही हरामचा, भ्रष्टाचाराचा पैसा ओतला तरी तो पाण्यात जाणार आहे. मतदार प्रशांत ठाकूर यांना स्विकारणार नाहीत. कारण त्यांच्यात प्रश्‍नांना उत्तरे देण्याची हिंम्मत नाही. हिंम्मत ही फक्त प्रामाणिक माणसात असते. तोच बाणेदारपणाने उत्तर देवू शकतो. प्रशांत ठाकूर यांच्यासारखे भ्रष्ट, निष्क्रिय नेते हे फक्त प्रश्‍नांना बगल देतात. चर्चेतून पळ काढतात.

गुरुवार, २ ऑक्टोबर, २०१४

भाजपअंतर्गत संघर्षच भाजपला सत्तेपासून दूर ठेवेल

  • शिवसेनाभाजप युती आपल्या अटीवर टिकवून ठेवण्यासाठी राजकीय तमाशाचे जे फड रंगले त्यात भाजप नेत्यांचे पितळ उघडे पडले. युती तुटल्यामुळे आपल्या वाट्याला जास्त जागा आल्या आहेत त्यामुळे आपला फायदा होईल असे भाजपला वाटत आहे. युती तुटल्याने भाजपचा कितपत फायदा होईल,  हे आज सांगता येत नसले तरी या राजकीय वगनाट्याचा फायदा हा आहे की भाजपअंतर्गत उफाळून आलेला नेतृत्वाचा संघर्ष झाकला गेला आहे. 
  • महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याच्या सुमारास मुख्यमंत्री म्हणून आपला चेहरा पुढे आणण्याची स्पर्धा भाजप नेतृत्वात सुरू झाली होती. कानाफुसीचे संघतंत्र ‘केंद्रात नरेंद्र-राज्यात देवेंद्र’ असा कानमंत्र देऊ लागले होते. यामुळे अस्वस्थ झालेल्या दुसर्‍या दावेदारांनी आपापला दावा पुढे करायला सुरुवात केली होती. त्यामुळे हे आपसातील संघर्ष आणि स्पर्धा करणारेच एकमेकांना पाडायला कारणीभूत ठरतील. भाजप म्हणजेच काँग्रेस आहे हे वारंवार सांगण्याचे कारण हेच की पूर्वी आपल्याकडे एक समीकरण होते. शरद पवारांसारखे नेते उघडपणे ते बोलून दाखवायचे की काँग्रेसचा पराभव कोणी करू शकत नाही. कोणताही विरोधी पक्ष करू शकत नाही. काँग्रेसचा पराभव काँग्रेसच करू शकते. आज भाजपचे तेच झाले आहे. हे सगळे स्वयंघोषित संभाव्य मुख्यमंत्री एकमेकांना पाडण्यास कारणीभूत होतील. 
  • देवेंद्र फडणवीस गटाने दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र ही घोषणा दिल्यावर एकनाथ खडसे यांनी उत्तर महाराष्ट्राचे कार्ड समोर केले होते. अनेक वर्ष एकनाथ खडसे म्हणून ओळखले जाणारे खडसे लोकांच्या मनात घर करण्यासाठी स्वत:चा उल्लेख आपल्या कार्यकर्त्यांकडून नाथाभाऊ असे करू लागले. उत्तर महाराष्ट्राने सातत्याने भाजपला साथ दिली असल्याने मुख्यमंत्री त्याच भागातील झाला पाहिजे हे त्यांनी सांगायला सुरुवात केली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंना शह देण्यासाठी त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी बहुजनांचा चेहरा म्हणून ज्या विनोद तावडे यांना पुढे आणले, त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात तावडेंना फारसे स्थान नसल्याने फडणवीस नाथाभाऊ यांच्या संघर्षात आपला टिकाव लागणार नाही, हे हेरून त्यांनी या जोडगोळीला शह देण्यासाठी वेगळीच खेळी केली होती. त्यांनी स्वत:ऐवजी पंकजा मुंडे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले. विनोद तावडे यांची ही खेळी आणि लबाडी म्हणजेच एक विनोद होता. पंकजा मुंडे यांनी स्वत:हून मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली नसली तरी भाजपअंतर्गत आणि भाजपबाहेरच्या वर्तुळातदेखील त्यांच्या ‘संघर्ष यात्रे’कडे मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीच्या रूपात पाहिले गेले आहे. अनुकंपा तत्वावर नेतृत्त्व सोपवण्याची प्रथा फक्त काँग्रेसमध्ये आहे. इंदिरा गांधींच्या निधनानंतर सगळ्या वरिष्ठ आणि अनुभवी नेत्यांना डावलून राजीव गांधींना पंतप्रधान केले गेले. त्यावर संघ परिवाराने आणि तत्कालीन भाजपने कडाडून टिका केली होती. पण तोच भाजप आणि भाजपमधील स्वार्थी आणि मतलबी विनोद तावडेंसारखे कार्यकर्ते आता पंकजा मुंडे पालवे यांना पुढे करून काँग्रेसचीच री ओढत आहेत.
  • पंकजा मुंडे यांनी तर दुहेरी आव्हान भाजप नेतृत्वापुढे उभे केले आहे. त्यांच्या ‘संघर्ष यात्रे’ने त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत आणले आहेच, शिवाय गोपीनाथ मुंडे यांची पक्षावर होती तशी पकड निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे.  प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर भाजप नेतृत्वाने गोपीनाथ मुंडेंचे पंख छाटण्याचे, त्यांना अडगळीत टाकण्याचे आणि प्रसंगी त्यांचा अपमान करण्याचे जे प्रयत्न केले; ते पंकजा मुंडेंनी अगदी जवळून पाहिले आहेत. आज पक्षाच्या निवडणूक जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर गोपीनाथ मुंडेंना स्थान मिळाले असले तरी मृत्यूच्या काही दिवस आधी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना सुखासुखी स्थान मिळाले नव्हते. त्या घडामोडी कन्या म्हणून पंकजांनी जवळून पाहिल्या आहेत. आज जे मुंडेंचे गोडवे गात आहेत तेच विनोद तावडेंसारखे नेते मुंडेंचे खच्चीकरण करण्यासाठी गटबाजी करत होते हे विसरून चालणार नाही. 
  • जनसमर्थनाच्या बळावर पक्षांतर्गत विरोधकांनी दिलेली आव्हाने आपल्या पित्याने परतवून लावली हे पंकजाने पाहिले आहे. त्यामुळे अशा भाजप नेतृत्वापुढे आपला टिकाव लागायचा असेल तर गोपीनाथ मुंडेंच्या मागे असलेले जनसमर्थन आपल्या मागे टिकून राहिले पाहिजे हे त्यांनी हेरले. त्यांना केंद्रात राज्यमंत्रिपद देण्याचा घाट होता.  महाराष्ट्रापासून आणि मुंडेंच्या अफाट लोकप्रियतेपासून दूर नेण्याचा पक्षश्रेष्ठींचा डाव पंकजांनी उधळून लावला. त्यांनी संघर्ष यात्रा काढली. या यात्रेसाठी त्यांनी पक्षनेतृत्वाकडे परवानगी मागितली नव्हती. पक्षनेतृत्वाला फरपटत त्यात सामील व्हावे लागले होते. महाराष्ट्र भाजपमध्ये पुढे काय घडणार याची ही चुणूक समजली पाहिजे. आज मोठ्या गप्पा मारणार्‍या आणि नेतृत्त्वावर आपला हक्क सांगणार्‍या भाजप नेत्यांची लायकी काय आहे हे गोपीनाथ मुंडे गेले तेव्हाच दिसून आले. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी प्रचंड जनसागर जमला होता. त्या जनसागराला आवर घालणे, आपल्या काबूत ठेवणे हे तावडे, खडसे, फडणवीस यापैकी कोणालाही शक्य झाले नाही. दु:खी अवस्थेत असलेल्या पंकजा मुंडे यांना हातात माईक घेवून गर्दीला आवाहन करावे लागले. यातच या सगळ्या बाशिंग बांधलेल्या नेत्यांची लायकी दिसून आली.
  • भाजपमध्ये मुंडेंना जी वागणूक मिळाली त्याबद्दलचा मुंडे समर्थकांचा रोष अद्यापही कमी झालेला नाही. याची झलक संघर्ष  यात्रेच्या समारोपप्रसंगी पाहायला मिळाली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा भाषणासाठी उभे राहताच पंकजा मुंडे यांनी  समर्थकांना शहा यांच्या भाषणात घोषणाबाजी न करण्याचे आदेशवजा आवाहन केले. ही बाब बहुतेक राजकीय निरीक्षकांच्या नजरेतून सुटली असली तरी महत्त्वाची आहे. जो प्रकार अंत्यसंस्कारावेळी घडला तोच प्रकार इथेही घडला.
  • पण युती तुटल्यामुळे या चर्चांना विराम मिळाला. चव्हाट्यावर येत असलेला भाजपचा अंतर्गत संघर्ष मागे पडला.   शिवसेनेशी जागावाटपावरून झालेल्या तणातणीमुळे तो झाकलाही गेला. शिवसेनेसी संघर्ष चालला होता तेव्हा एकमेकांचे पाय ओढणारे भाजप नेते हातात हात घेत असल्याचे चित्र पुढे आले. युती तुटल्यामुळे भाजपकडे उमेदवार नाहीत इतक्या जागा हाती आल्या. भाजप नेतृत्वात जागा वाटपावरून वाद होण्याचे टळले. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाताना एकसंघ भाजप असे चित्र निर्माण झाले. असे चित्र निर्माण झाले नसते तर याचा भाजपला फटका बसू शकला असता. पण काहीच दिवसांपूर्वीचे हे चित्र मतदारांनी विसरून चालणार नाही. मनात राहिलेल्या या सूप्त इच्छा केव्हाही उफाळून येवू शकतात. फडणवीस यांना नेता मानले तर विनोद तावडेंसारखे नेते त्यात काटे पसरणार. त्यामुळे भाजप हा पक्ष महाराष्ट्राला काँग्रेसप्रमाणेच अस्थिरतेकडे घेवून जाईल यात शंका नाही. अर्थात, महाराष्ट्र भाजपच्या नेतृत्वाची क्षमता लक्षात घेता त्यांच्या पदरी किती जागा पडतील हे आताच सांगता येत नाही. यामुळे भाजप नेतृत्वाला महाराष्ट्रात सरकार बनवण्यासाठी ‘मातोश्री’चे उंबरठे झिजविण्याशिवाय पर्याय उरणार नाही. इथेच शिवसेनेशी झालेल्या संघर्षाचा आज दिसत असलेला फायदा उद्या मोठ्या तोट्यात परिवर्तित होऊ शकतो. निवडणूक पूर्व सर्वेक्षणात जी आकडेवारी भाजपला दाखवली जात होती त्याच्या निम्मीही संख्या भाजपला मिळणे शक्य नाही. भारतीय जनता पक्षाला 50 जागांपेक्षा जास्त यश मिळणार नाही ही वस्तुस्थिती आहे. तर क्रमांक एकचा पक्ष हा शिवसेनाच महाराष्ट्रात राहील असे वातावरण आहे.
  • त्यामुळेच निवडणुकीनंतर शिवसेनेशी पुन्हा वाटाघाटी करण्याचा प्रसंग येईल तेव्हा भाजप नेतृत्व एकसंघ असणार नाही. झाकला गेलेला नेतृत्व संघर्ष पुन्हा डोके वर काढील. त्या वेळी पुन्हा प्रत्येक जण आपले घोडे पुढे दामटण्याचा प्रयत्न करेल. आपल्याला ते पद मिळणार नसेल तर आपल्या सहकार्‍यांपैकी कोणालाही मिळू नये, असेही प्रयत्न होतील. याचा शिवसेनेलाच अधिक फायदा होईल. उद्या भाजप-शिवसेना मिळून सत्ता हस्तगत करण्यासारखी परिस्थिती आली आणि शिवसेनेच्या जागा भाजपपेक्षा कमी आल्या तरी भाजप नेतृत्वाच्या संघर्षामुळे उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री होण्याची अधिक संधी असणार आहे. किमान आधीच्या वाटाघाटीत ज्यांनी अतिउत्साहाने उद्धव ठाकरे यांच्याशी पंगा घेतला,  त्यांचा पत्ता तरी उद्धव ठाकरे कापतील.  उद्धव ठाकरे बाळासाहेबांसारखे किंगमेकरच्या भूमिकेत येतील. अशा वेळी संघ आणि भाजप नेतृत्वाला जे नको तेच घडण्याची शक्यता आहे. शिवसेनेशी संघर्ष करण्यापासून चार हात दूर राहिलेल्या पंकजा मुंडे यांचा भाग्योदय होऊ शकतो. युती तुटली तरी शिवसेनेने मुंडे भगिनींविरुद्ध उमेदवार उभे केले नाहीत हे लक्षात घेण्यासारखे आहे. 
  • भाजपतील मुख्यमंत्रिपदासाठीच्या संघर्षाचा आणखी एका व्यक्तीला फायदा होण्याची शक्यता आहे. ती व्यक्ती म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. या सगळ्या काळात गडकरी यांनी मुत्सद्दीपणे पाळलेले मौन त्यांच्या पथ्यावर पडू शकते. गडकरींनी भाजपत चाललेल्या सत्तासंघर्षाला खतपाणी घातले नसले तरी कानाडोळा नक्कीच केला आहे. महाराष्ट्रातील भाजपची स्थिती लक्षात घेतली तर त्या पक्षाचे स्वबळावर सत्तेत येण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही.  कोणत्याही राज्याच्या निवडणुकीत कोणत्याही पंतप्रधानांनी घेतल्या नसतील इतक्या सभा मोदींच्या होणार आहेत. यावरून भाजपकडे मोदी या नावाशिवाय काहीही नाही हे लक्षात घेतले पाहिजे. मुख्यमंत्रिपदासाठी संघर्ष करणार्‍या महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या हाती धुपाटणे येण्याचीच शक्यता सर्वात जास्त आहे.

बुधवार, १ ऑक्टोबर, २०१४

उपर्‍या नेत्यांमुळे भाजप महाराष्ट्राला घातक

  • भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते एकनाथ खडसे, मुंबईचे आशिष शेलार आणि विनोद तावडे यांच्यामुळे युती तुटल्याची सल शिवसेनेला आहे. त्यामुळे या तिघांच्या पराभवासाठी शिवसेनेने विशेष रणनीती आखल्याचे वृत्त आहे. शिवसेना हे जे काही करीत आहे ते अत्यंत योग्य असून अशा स्वार्थी नेत्यांना हटवणे हीच काळाची गरज आहे.
  • विनोद तावडे यांच्यासारखा स्वार्थी आणि मतलबी नेता कोणी नसेल. फेब्रुवारी महिन्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीत केवळ अपघाताने ते आमदार झाले. त्यावेळी युती असतानाही तावडे मनसेच्या पायर्‍या झिजवत होते. परंतु राहुल नार्वेकरांनी गुपचूप आपला उमेदवारी अर्ज काढून घेतला आणि ते राष्ट्रवादीत दाखल झाले. त्यामुळे विनोद तावडेंना विधानपरिषदेची संधी मिळाली. नाहीतर तेव्हाच त्यांना पराभव पत्करावा लागला असता. विनोद तावडे यांच्यात निवडून येण्याची क्षमता नाही. फोडाफोडीचे राजकारण करून गटबाजी निर्माण करणे एवढेच त्यांचे भारतीय जनता पक्षातील योगदान आहे.
  • भारतीय जनता पक्षात मुंडे गट, गडकरी गट हा जो प्रकार सुरू झाला तो या विनोद तावडे यांच्यामुळेच. त्यामुळे एकेकाळी काँग्रेस हा पक्ष जसा गटातटांचा पक्ष होता तसा भारतीय जनता पक्ष हा गटातटांचा पक्ष झालेला आहे. अशी गटबाजी कोणत्याही पक्षासाठी घातक असते त्याचप्रमाणे ती महाराष्ट्रासाठीही घातक आहे. त्यामुळे अशा पक्षाला, विनोद तावडेंसारख्या नेत्याला पराभूत करणे हे मतदारांचे कर्तव्य आहे.
  • विनोद तावडे यांच्यासारख्या खोटारड्या नेत्याला अशी अद्दल घडवलीच पाहिजे. उरणमध्ये आल्यावर जाहीर कार्यक्रमात आमदार विवेक पाटील याची स्तुती करतात. त्यांनी केलेल्या विकासकामांबद्दल गौरवोद्गार काढतात आणि प्रशांत ठाकूर यांच्या पक्षप्रवेशावेळी उरणच्या आमदारांवर टिका करतात. हा खोटेपणा केवळ विनोद तावडेंसारखे नेतेच करू शकतात. त्यामुळे अशा नेत्यांना रोखण्याचे काम शिवसेना करणार असेल तर शिवसेनेचे कौतुक करायला पाहिजे.
  • कारण छत्रपतींचा आदर्श ठेवून शिवसेना काम करीत असताना शत्रूच्या विरोधात लढण्यापूर्वी शिवरायांनी स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त केला होता. तसेच हे विनोद तावडे, एकनाथ खडसे आणि आशिष शेलार हे महाराष्ट्राचे स्वकीय शत्रू आहेत. त्यामुळे त्यांचा पराभव हा केलाच पाहिजे.
  • मुळातच भाजपचे नेते इतके भरकटले आहेत की त्यांना आता पराभव समोर दिसू लागला आहे. आपण काय करतो काय नाही याचे कसलेही भान त्यांना राहिलेले नाही. सत्तेसाठी रेडिमेड नेते कार्यकर्ते विकत घेण्याची  त्यांनी प्रथा चालवली आहे. निष्क्रिय आणि भ्रष्ट अशा प्रशांत ठाकूर यांना  भारतीय जनता पक्षात भगव्या पायघड्या घालण्यामागे विनोद तावडे यांनीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या तावडे गटाच्या सगळ्यांना म्हणजेच प्रशांत ठाकूर यांनाही चांगलीच पराभवाची धूळ आता चारावी लागणार आहे.
  • आज भारतीय जनता पक्षाला कसलाही चेहरा नाही. सत्ता हातात आल्यानंतर कोण मुख्यमंत्री असावा याचा चेहरा त्यांच्याकडे नाही. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला यश मिळाले ते नरेंद्र मोदींमुळे. मोदी हेच भारताचे पंतप्रधान असतील, ते पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत असे जाहीर केल्यामुळे मतदार तिकडे वळला. पण आज मुख्यमंत्रीपदाबाबत तसे नाही. एकतर बहुमत मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यात मुख्यमंत्री कोण होणार याबाबत प्रत्येकाला डोहाळे लागले आहेत. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे आणि विनोद तावडे सगळ्यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडत आहेत. त्यामुळे आपल्याला समर्थन मिळण्यासाठी प्रत्येकजण आपला गट मोठा करू पहात आहे. या गटबाजीमुळे  देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे आले तर विनोद तावडे लगेच बंडखोरी करण्याच्या पवित्र्यात असतील. खडसे आपली वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे अत्यंत अस्थिर आणि बेभरवशी अशी स्थिती महाराष्ट्रात भाजपची आहे.
  • भाजपचा कार्यकर्ता हा शिस्तीत तयार झालेला असतो. संघ मैदानावरील संस्कारातून तो घडत असतो. त्याचे वक्तृत्व, कर्तृत्व हे अभ्यासपूर्ण असते. पण आज हे जे सगळे उपरे आले आहेत ते थेट घुसले आहेत. अत्यंत बेशिस्त आणि बेभरवशी असे हे लोक आहेत. त्यामुळे त्यांना संघ परिवार आणि ओरीजनल भाजपचे लोक कधीही स्विकारणार नाहीत. देशप्रेम आणि अखंड हिंदुस्थान हे संघाचे तत्व आहे. पण जे पक्षातच अखंडता ठेवू शकत नाहीत, गटबाजी तयार करतात त्यांच्याकडे कसले आले आहे देशप्रेम आणि अखंडत्वाची भावना? त्यामुळे तावडेंप्रमाणेच या काँग्रेसमधून आलेल्या उपर्‍या भाजपवाल्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल.
  • देशाच्या दृष्टीने नरेंद्र मोदी हे योग्य नेतृत्त्व असले तरी सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्राच्या दृष्टीने भाजप हा हितावह नाही. भारतीय जनता पक्ष हा पळपुट्यांचा पक्ष आहे. काँग्रेसमधून तिकीट मिळणार नाही हे लक्षात आल्यावर प्रशांत ठाकूर काँग्रेसमधून पळाले आणि भाजपत घुसले. हेच पळपुटे सत्तेसाठी धर्मांधपणे बाबरी मशिद पाडायला गेले. मशिद पाडल्यानंतर तेथून पळून गेले. आम्ही काही केले नाही म्हणून सारवासारव करू लागले. अगदी अडवाणींपासून मुरली मनोहर जोशींनी तेच केले. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्या खंबीरपणे सांगितले की मशिद पाडणारा शिवसैनिक असेल तर त्याचा आम्हाला अभिमान आहे. याला म्हणतात पुरूषार्थ. नाहीतर हे भाजपवाले लोकांना फक्त भडकवायचे आणि नंतर पळून जायचे.  शिवसेनाप्रमुखांना हिंदुहृदयसम्राट ही पदवी मिळाली त्यामुळेच. पण शिवसेनाप्रमुखांना डिवचण्यासाठी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या लबाड नेत्यांनी, आशिष शेलार, विनोद तावडे यांनी नरेंद्र मोदी जेव्हा दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आले होते तेव्हा मुद्दाम हिंदुहृदयसम्राट नरेंद्र मोदी असा उल्लेख करून शिवसेनाप्रमुखांचा अपमान केला होता. सम्राट एकच असतो. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान असतील पण ते हिंदुहृदसम्राट नाहीत. तो हक्क फक्त शिवसेनाप्रमुखांचाच असेल. पण शिवसेनेला चिडवण्यासाठी या भाजपच्या मतलबी लोकांनी तावडे बेवड्यांनी नरेंद्र मोदींना हिंदूहृदयसम्राट म्हटले होते. त्याची सल प्रत्येक शिवसैनिकाने ठेवली पाहिजे. अशा तावडेंच्या मागे असलेल्या प्रत्येक उपर्‍या भाजपच्या नेत्याला, उमेदवाराला निवडून पराभूत केले पाहिजे.
  • महाराष्ट्र म्हटल्यावर पहिले नाव पुढे येते ते छत्रपती शिवरायांचे. या छत्रपतींच्या नावाने आता हे भारतीय जनता पक्षवाले मतांचा जोगवा मागू लागले आहेत. शिवरायांचा आशीर्वाद म्हणून ते पोस्टरबाजी करत आहेत. पण त्यांना हा अधिकार पोहोचत नाही. कारण भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाला आहे. अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता आले नाही तर स्वतंत्र विदर्भाचे तरी होवू असे स्वप्न गडकरी, मुनगंटीवार यांना पडत आहेत. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे काम हाच भाजप करीत आहे. त्यामुळेच अशा भारतीय जनता पक्षाला आता त्यांची जागा दाखवण्याची हीच वेळ आहे.
  • अतिशय फसव्या जाहीराती आणि खोटे बोलायचे काम हे उपरे भाजपवाले करीत आहेत. या उपर्‍यांनी ओरीजनल भाजप कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून पक्ष हायजॅक केला आहे. तीथे निष्ठावंतांचे काहीही चालत नाही. त्यामुळेच पितापुत्रांसारख्या खोटारड्या आणि संधीसाधूंना भाजपमध्ये प्रवेश दिला जातो आहे. या लोकांना लाज कशी वाटत नाही? ज्यांच्यावर आपण गेली दहा वर्ष टिका करत आलो. ते कसे वाईट आहेत हे सांगत आलो. तेच आता कसे बरोबर आहेत हे तुम्ही सांगता? मग कबूल करा तेव्हा आम्ही खोटे बोलत होतो म्हणून. पण कसली नीतीमत्ता नसलेली ही माणसे आहेत. विनोद तावडे यांच्यासारख्या स्वार्थी नेत्याने अशा लोकांना भारतीय जनता पक्षात आणून आपला गट मोठा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पक्षाचे, महाराष्ट्राचे तुकडे करणार्‍यांना हद्दपार करण्याची हीच वेळ आहे.