सध्या शिक्षण आणि गुणात्मक दर्जा ही बाब एक आव्हान बनून उभी आहे. आपल्या देशात साक्षरतेचे प्रमाण वाढल्याने बेकारीचा भस्मासुर अक्राळविक्राळ स्वरूपात उभा आहे. आपल्या देशात आज वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी उपलब्ध आहेत, परंतु कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांमध्ये पदवी प्राप्त केलेली तरुण मंडळीही छोटी छोटी कामे करताना दिसतात. आजच्या विज्ञान युगात आम्ही स्वयंरोजगार आणि मानव संसाधन या विषयांवर लक्ष केंद्रित करणे काळाची गरज बनली आहे, पण जे शिक्षण घेऊन विद्यार्थी बाहेर पडतात, त्यांना काहीही येत नसते असेच दिसते. म्हणजे पास होतात, मार्क मिळतात, पण व्यवहारात त्या शिक्षणाचा वापर करता येत नसेल, तर अशा शिक्षणाचा उपयोग काय? हे फक्त कागदोपत्री शिक्षण झाले. हे सांगण्याचे कारण म्हणजे बँकेत एक तरुण बराच वेळ ताटकळत उभा होता. त्याला पैसे भरायचे होते, पण ती स्लिप भरता येत नव्हती. त्याने चार-पाच स्लिप फाडल्या आणि खाडाखोड करून टाकल्या. फक्त नाव, तारीख, खाते नंबर, खात्याचा प्रकार त्या त्या रिकाम्या जागेत लिहायचा असतो, पण तेही त्या तरुणाला जमत नव्हते. आसपासच्या लोकांना विचारत होता. काऊंटरवर विचारत होता. मी सहज त्याला विचारले, तर तो बी.कॉम. झालेला होता. बी.कॉम. झालेल्या मुलाला बँकेत स्लिप भरता येत नाही? साध्या साध्या गोष्टी जमत नसतील, तर हे लोक मागेच राहणार ना? या लोकांना उपयोगी पडेल असे शिक्षण कधी मिळणार? गेल्या काही वर्षांत आपल्या देशात तांत्रिक शिक्षणपद्धती विकसित झालेली दिसते. आय.टी.आय., तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी, त्याचप्रमाणे वास्तुविशारद अशा विविध प्रकारांनी नटलेले तांत्रिक शिक्षणाचे जाळे चांगल्या प्रकारे विणलेले दिसते. मला माझ्या गावातच, जागेवरच, घराजवळच जॉब पाहिजे ही मानसिकता बदलता आली पाहिजे. महाराष्ट्रात, मुंबईत देशाच्या कानाकोपºयातून तरुण येतात आणि नोकºया करतात. मग हे आमच्या मराठी माणसांना का जमू शकत नाही? आता रस्ते, रेल्वे यात इतकी सुधारणा झाली आहे की, कोठेही पटकन जाता येते. मग घरापासून आपण लांब आहोत, असे का समजायचे? झाडाखाली झाड वाढत नाही. त्याप्रमाणे आई-वडिलांच्या सावलीत राहणे सुखावह असले, तरी स्वत:च्या विकासासाठी बाहेर पडणे गरजेचे असते. बाहेर पडल्याशिवाय व्यवहारी शिक्षण मिळणार नाही. आज टेक्नॉलॉजी ट्रान्स्फरच्या माध्यमातून विश्व जवळजवळ एक गाव बनला आहे. कौशल्य विकास हे सरकारचे ब्रीदवाक्यच बनले आहे. आज आपल्याला कला किंवा वाणिज्य शाखेचे तरुण भेटतील, पण तांत्रिक गुण असलेले तरुण मिळणे कठीण आहे. कार्पेंटर, फिटर, प्लंबर इत्यादी मिळणे मुश्किल झाले आहे. आजच्या तरुणांमध्ये व्हाइट कॉलर नोकरीसंबंधाने ही कामे करणे यात एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला आहे. ब्ल्यू कॉलर नोकरीत तांत्रिक शिक्षणाचा जादा तर उपयोग होतो. आता समाजामध्ये त्यासंबंधी प्रसार व्हायला पाहिजे. तांत्रिक शिक्षणाचे महत्त्व आजच्या तरुण मंडळींमध्ये शाळा-कॉलेज स्तरावरच समजून देण्याची गरज आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे, असा निर्धार करून आम्ही पुढचे पाऊल उचलण्याची गरज आहे. तरुण मंडळी आज पैशाच्या हव्यासापायी बेजबाबदार पद्धतीने वागताना दिसत आहेत. त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव होणे गरजेचे आहे. खरे तर व्यवसाय मार्गदर्शन ही आज काळाची गरज बनली आहे. त्यासाठी तरुणांना योग्य पद्धतीने व्यवसाय मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. जीवनामध्ये यश संपादन करणे ही एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. त्यानुसार आनंद मिळवून शिक्षण घेणे आणि जीवनात इमोशनल कोशंट सांभाळणे आवश्यक आहे. आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात आपण वेगवेगळ्या क्षेत्रांनी त्रस्त झालो आहोत. तांत्रिक शिक्षण योग्य प्रकारे समजून घेऊन काम हे सर्वतोपरी समजून त्याला श्रद्धेचे रूप देऊन ते काम योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. आजच्या तरुणांनी व्यवसाय आणि व्यवस्थापन समजून घ्यावे व व्यवसाय निश्चित करून बेकारीचा भस्मासुर नष्ट केला पाहिजे. त्यासाठी आजच्या तरुणाईमध्ये स्थिरता आणून त्यांना योग्य शिक्षण निवडून व्यवसायासाठी पात्र करणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आजची शिक्षण प्रणाली तरुणांना सक्षम बनवण्यात कमी पडत आहे, असे दिसून येते. आज उद्योगक्षेत्र झपाट्याने प्रगत होत आहे आणि आपली तरुण मंडळी या बदलत्या प्रवाहात सामील व्हावी म्हणून सरकार दरबारी प्रयत्न चालू आहेत. नीती आयोग आपल्या वेगवेगळ्या संशोधनांतून कौशल्य शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. आज आपण एक धावती नजर टाकली, तर आपल्याला दिसेल की, शिक्षण प्रणालीमध्ये बदल घडवून आणणे ही काळाची गरज आहे. वेगवेगळ्या शाळांमधून अटल टिंकरिंग लॅब्स सुरू करून शाळकरी मुलांना तंत्रज्ञानाची जाण लहान वयात करून देणे ही त्यामागची कल्पना आहे. त्याचप्रमाणे आज आपण हॅकॅथॉन म्हणून वेगवेगळ्या अभियांत्रिकी महाविद्यालयात स्टार्टअप हा प्रकार बघत असतो. या अनुषंगाने पंतप्रधान स्वत: लक्ष घालून त्या तरुण मंडळींशी संपर्क साधून त्यांची ऊर्जा वाढवताना दिसत आहेत. अॅप्सच्या माध्यमाने वेगवेगळ्या समस्यांवर मात करून एक सकारात्मक निर्णयाने नवीन युगाची संकल्पना घडताना दिसत आहे. स्टार्टअपच्या दिशेने प्रवास करून, अॅप्सची निर्मिती होऊन आपल्या देशाच्या समस्यांकडे लक्ष दिल्यास प्रगतीचा आलेख उंचावत जाईल, यात शंका नाही. पण हे फक्त कागदोपत्री राहून चालणार नाही. सरकारने एक पाऊल पुढे टाकल्यावर आपणही एक पाऊल पुढे टाकले, तरच प्रगती होईल. आपण मोबाइल गेम, चॅटिंग हे तंत्र सहजपणे आत्मसात केले. मग व्यवहारातील अन्य तंत्रे आम्हाला का जमत नाहीत? ही इच्छाशक्ती कमी पडते. केवळ बँकेचाच नाही, तर कोणताही फॉर्म भरताना माणसे चाचपडतात का? आपली माहिती आपल्याला लिहायची आहे. त्यात अवघड काय असते? आपल्या देशाची बेकारी, आणि बेकारीच्या भस्मासुराला नामशेष करण्यात आपल्या नागरिकांना जरूर यश संपादन होईल, यात शंका नाही. आज आमच्या देशाची तरुणाई या अनुषंगाने काम करून तांत्रिक क्षेत्रात मजल मारीत नोकºयांची समस्या दूर करील आणि जॉब सिकर्स दूर होऊन जॉब गिव्हर्स किंवा जॉब क्रिएटर्स बनले अशी आशा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा