शुक्रवार, २४ मार्च, २०१७

इथेही अनेकांना वाव आहे

     उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील संत, महंतांमध्ये, धर्म, पंथांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. भविष्यात आपणही या राज्याचे मुख्यमंत्री, गेला बाजार खासदार, आमदार, महापौर, नगराध्यक्ष होवू शकतो अशी स्वप्नं आता संन्याशांना पडू लागली आहेत.
      योगी आदित्यनाथ यांनी शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रातील बहुतेक मठ, आश्रम, मठी, देवालये, देवस्थानं यातून चैतन्याचे वारे वाहू लागले आहे. यावर्षींच्या गुढी पाडवा स्वागत यात्रेत याचे चित्र उमटले तर आश्चर्य वाटायला नको.
     तसे महाराष्ट्रात बुवा, बापू यांना तोटा कधीच नव्हता. प्रत्येकाचे एकेक संस्थान आहे. विरार ते ठाणे एक संस्थान. या संस्थानचे लोक लोकलमध्येही नामस्मरण करत असतात आणि वह्यांमध्ये नामलेखन करत असतात. नंतर त्यांच्या श्रेष्ठींच्या चरणी त्या वह्या अर्पण करून पुण्यप्राप्त करतात. यांचे मोठे प्रस्त आहे. अनेकवेळा या बापूंचे स्वयंसेवक गणेशोत्सव, नवरात्रात स्वयंसेवकगिरी करून सामान्य माणसांचा आशीर्वादही प्राप्त करतात. त्यामुळे या बापूंचा ‘हात’ सतत वर असल्याने काँग्रेसमधून त्यांना संधी आहे. भविष्यात त्यांना संधी असली तरी हा आशीर्वादाचा हात कोणाच्या माथी पडतो यावरून त्यांना संधी मिळू शकेल. त्यामुळे भक्तगणांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. म्हणजे बापूंचे भक्त आणि नमोंचेही भक्त सुखावले आहेत.
ठाणे दक्षिण ते रायगडात असलेल्या एका पंथाच्या लोकांनाही यामध्ये काही हरकत नाही. अर्थात केवळ समाजसेवा हाच त्यांचा उद्देश असल्यामुळे आणि विचारांची बैठक समाजसेवेची असल्यामुळे या महाराजांना सध्या तरी त्यात स्वारस्य नाही. पण काही भक्तगण यासंदर्भात बैठका घेउन महाराजांच्या भवितव्याबाबत बोलत आहेत. अर्थात उज्वल भवितव्याबद्दल स्वप्न पहात आहेत. अर्थात महाराजांनी आपल्या पंथाचा राजकीय कारणासाठी कोणीही लाभ उठवू नये यासाठी चांगलीच खबरदारी घेतली आहे. आपण समाजसेवा करतो तो समाजातील, माणसातील ईश्वर म्हणून करतो. समर्थ राष्ट्र उभारणीसाठी आपण कार्य करतो. आपण आतल्या अनुयायांच्या हृदयावर राज्य करतो. त्यामुळे असे स्वप्न कोणी पाहू नये याबाबत हे महाराज दक्षता बाळगून आहेत. पण तरीही भक्त आणि नमोभक्त हे महाराज आमचेच म्हणून त्यांच्या नावाचा टिळा लावायला लागले आहेत.
       तळकोकणाती जगदगुरू नाणिजचे महाराजांचे अनुयायांना तर स्वप्नच पडू लागली आहेत. आता आपले मेळावे, सामुदायिक विवाह,  धर्मांतर हे सगळं भविष्यात वर्षा बंगल्यावरच होणार अशी स्वप्न पडून प्रत्येकाच्या खिशाला वर्षा बंगल्यातील महाराजांचे फोटो असलेली पेनं लटकू लागली आहेत. आता महाराज म्हणून नाही तर मुख्यमंत्री म्हणून ते राजदंड घेउन विमानातून प्रवास करू शकतील अशी स्वप्न या भक्तगणांना पडू लागली आहेत. गणी गणी गणात बोते म्हणण्याऐवजी काहीजण गणी गणी वर्षात जाते असा जयघोष सुरू केला आहे.
परवाच ऐकलं, की या महाराजांनी आपलं शक्तीप्रदर्शन आता आणखी पॉवरफूल करण्याचे आदेश आपल्या अनुयायांना दिले आहेत. एक ग्रामसेवक का तलाठी ते व्हाया जगदगुरूपद मुख्यमंत्री हा प्रवास कसा असतो याविषयी चांगले लेखन कोण करू शकेल अशा काही लेखकांची परिषद घेतली होती म्हणे. म्हणजे सुशीलकुमार शिंदे यांनी एका चपराशाचा मी मुख्यमंत्री कसा झालो हे जसे रंगवून सांगितले आहे तसेच हे महाराज मी एका ग्रामसेवकाचा मुख्यमंत्री कसा झालो याचे चरित्र आगावू लिहिण्याच्या सूचना दिल्या आहेत. म्हणजे ज्या दिवशी हे महाराज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत त्याच दिवशी या चरित्राचे प्रकाशन करण्याचे फर्मान त्यांनी काढले आहे. या महाराजांना आपण मुख्यमंत्री नाही तर राजे झालो ेआहोत असेच वाटू लागले आहे. त्यामुळे चार दिवसांपूर्वी जे लोक महाराजांना नुसता नमस्कार करत होते, ते आता मंडपात प्रवेश करताना महाराजांचा विजय असो असे म्हणत जात आहेत. या राज्याचे मुख्यमंत्री व्हायचे असेल तर योगी आदित्यनाथांप्रमाणे आपणही थोडी वादग्रस्त वक्तव्ये केली पाहिजेत, चर्चेत राहिले पाहिजे असे महाराजांना वाटत आहे. त्यामुळे येत्या काळात कोणी किती मुले जन्माला घालावीत याबाबत फर्मान कधी काढायचे यावर त्यांनी चिंतन करण्यास सुरूवात केली आहे.
पण एकुणच योगी आदित्यनाथांच्या मुख्यमंत्री होण्याने भगवा परिवार उत्साहाने सळसळत आहे. त्यात नाणिज संस्थानचे महाराज आघाडीवर आहेत. तर विरारचे बापू, रायगडचे समर्थकही आपापल्या महाराजांची नावे चर्चेत ठेवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून भगवी लुंगी, भगवी धोतरं, टी शर्ट यांना चांगले मार्केट आले आहे. गळ्यात रूद्राक्ष, तुळशी आणि स्फटीकांच्या माळांच्या बाजारातही तेजी आली आहे. पण पुरोगामी महाराष्ट्रात इथे आम्हालाही वाव आहे हे दाखवण्यास भक्तगणांमध्ये स्पर्धा सुरू होताना आपल्याला पहावे लागेल. हा योग महाराष्ट्रात आलाच तर नवी घोषणा असेल दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रातही नरेंद्र.
-प्रफुल्ल फडके
8108454555

शुक्रवार, १७ मार्च, २०१७

शिवसेनेला खरंच कर्जमाफी हवी आहे का?


राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना सध्या सत्तेतील सहभागी शिवसेना जो काही तमाशा घालत आहे, त्यावरून प्रश्न निर्माण होतो, की शिवसेनेला खरोखरच शेतकर्‍यांची कर्जमाफी हवी आहे का? शिवसेनेला अचानक हा शेतकर्‍यांबाबत पुतना मावशीला पान्हा का फुटला आहे? शिवसेनेचा यामागचा हेतु फार चांगला आहे असे मानण्याचे कारण नाही. सामान्य माणसांना शिवसेनेचा हा कावा समजणार नाही इतके सामान्य माणसांना शिवसेना मूर्ख समजते का?
शिवसेनेला शेतकर्‍यांशी काही देणेघेणे नाही. शेतकर्‍याबद्दल शिवसेनेला कसलंही प्रेम नाही. शिवसेनेला फक्त भारतीय जनता पक्षाला अडचणीत आणायचे आहे. मागच्या महिन्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला अपयश आले आणि भाजपला यश मिळाले ते सेनेला सलते आहे. त्याचा सूड उगवण्यासाठी हा पुतना मावशीचा पान्हा फुटला आहे.
शिवसेनेला खरोखरच अधिवेशन चालू द्यायचे नाही, शेतकर्‍यांच्याबद्दल प्रेम आहे तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी शेतकर्‍यांसाठी आपले राजीनामे का दिले नाहीत? शिवसेनेने ही नाटकं करण्यापूर्वी आपल्या मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्याकडे सोपवावेत. ते शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे न सोपवता सरकारकडे सोपवावेत आणि मग ही नाटकं करावीत. आपण जोपर्यंत या सरकारच्या मंत्रिमंडळात आहोत, मंत्री पदावर आहोत तोपर्यंत ही असली नाटके करण्यात काहीही अर्थ नाही. कोणीही फसणार नाही. पण शिवसेनेची अवस्था धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी झाली आहे. या नाटकीपणाला कोणीही फसत नाही.
मुंबई महापालिकेत सत्तेपर्यंत जाण्याचा शिवसेनेचा मार्ग भाजपने रोखला. आज मुंबई महापालिकेत भाजपच्या मेहरबानीमुळे शिवसेनेला महापौर, सगळी अध्यक्षपदं मिळत आहेत. त्यामुळे भाजपची ही मेहरबानी म्हणजे आपल्यावर उपकार नाहीत हे दर्शवण्यासाठी आमच्या पाठींब्यावर तुमचे सरकार आहे हे बिंवण्यासाठी शिवसेनेची ही धडपड सुरू आहे. शिवसेनेला कधीही शेतकर्‍यांबद्दल प्रेम नव्हते. हा शिवसेनेचा रडीचा डाव आहे.
शेतकर्‍यांची कर्ज माफ करावी असे जर शिवसेनेला वाटते आहे, तर ती कशी करावी? त्यासाठी कुठून पैसा आणावा? ती वित्तीय तूट कशी भरून काढावी याबाबत मार्गदर्शन करावे. हे केले तर शिवसेनेकडे काही दृष्टी आहे हे मानता येईल. परंतु कसलाही अभ्यास नाही, फक्त हुल्लडबाजी करायची या हेतुने अधिवेशनाचा वेळ वाया घालवण्यासाठी जे चालले आहे त्यामुळे भाजपची नाही तर शिवसेनेची बेइज्जती होत आहे. विरोधी पक्ष त्याचा फायदा उठवत आहेत. माकडाच्या हातात कोलीत म्हणतात त्याप्रमाणे शिवसेनेच्या हातात कोलीत देउन काँग्रेस राष्ट्रवादी धुडघूस घालत आहेत. यात भाजप संपणार नाही तर शिवसेनेला फटका बसेल हे निश्चित.
शेतकरी कष्टकरी यांच्याबद्दल शिवसेनेला इतका कनवाळा आहे तर याच शिवसेनेने मुंबईतील मराठी माणसाचे, गिरणी कामगारांचे संरक्षण का केले नाही? गिरणी कामगारांना बेघर करून तयार झालेल्या मॉलला विरोध का केला नाही? मुंबईतील गिरणी कामगार 1980 च्या दशकापासून देशोधडीला लागत असताना शिवसेना गप्प  का बसली? गिरणी कामगार हे खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांचे बांधव होते. एक भाउ गावात शेती करत होता तर एक गिरणीत. अशा गिरणी कामगारांचे रक्षण शिवसेनेने का केले ेनाही? गिरणी कामगारांचे पुनर्वसन अगोदर करावे. सामान्य माणसांना 1 रूपयात झुणका भाकर देणार ही घोषणा हवेत विरून गेली. झुणका भाकर केंद्राच्या नावावर जागोजागी मिळवलेल्या जागांचे काय झाले याचा हिशोब अगोदर करावा. महाराष्ट्राचे भले अशा शिवसेनेच्या चुकीच्या धोरणाने नाही होणार तर सभागृहाचे कामकाज सुरू ठेवून होणार आहे हे शिवसेनेने लक्षात घेतले पाहिजे. शिवसेना हा जो खड्डा करत आहे, तो स्वत:साठी आहे हे लक्षात घ्यावे.
-प्रफुल्ल फडके
8108454555

मंगळवार, १४ मार्च, २०१७

भाजपने काढला 2013 चा वचपा


गोव्यात दुसर्‍या नंबरचा पक्ष असूनही सरकार स्थापन करून भाजपने काँग्रेसचा 2013 चा वचपा काढला आहे. गोवा आणि दिल्ली ही तशी एकेकाळची केंद्रशासीत प्रदेश होती. त्यानंतर ही दोन्ही राज्य झाली. एक पर्यटनाची राजधानी तर एक देशाची राजधानी.
2013 मध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुका या भाजपला बरंच काही शिकवून गेल्या होत्या. कारण त्याच निवडणुकीने भाजपची केंद्रात सरकार आणण्याची उमेद वाढवली होती. अण्णा हजारेंच्या ऑगस्ट 2011 च्या आंदोलनाचा फायदा उठवून आणि काँग्रेसवरच्या नाराजीचा फायदा उठवत केजरीवाल यांनी आपची स्थापना केली. काँग्रेसवरची नाराजी, अण्णांच्या आंदोलनाचा फायदा आणि 16 डिसेंबर 2012 ला झालेल्या निर्भया कांडाचा फायदा किंबहुना गैरफायदा उठवत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत विधानसभेत आव्हान उभे केले. काँग्रेसचे जाणे हे या निवडणुकीत निश्चित होते. भाजप सत्तेवर येणार हेही तितकेच निश्चित होते. पण ऐनवेळी अरविंद केजरीवाल यांनी मतविभागणी, नाराजी याचा फायदा उठवत दुसर्‍या क्रमांकाच्या जागा मिळवल्या.
भाजप हा सर्वात जास्ती जागा मिळवलेला एक नंबरचा पक्ष होता. 31 जागा त्यांनी मिळवल्या. केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने तब्बल 27 जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळवला होता. शीला दीक्षित दीर्घकाळ मुख्यमंत्री असुनही या पक्षाला दोन अंकी संख्या गाठता आली नव्हती. परंतु भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने आम आदमी पार्टीला पाठींबा देउन आपचे सरकार आणले.
यावेळी केजरीवाल यांनी बरीच नौटंकी केली. मेट्रोने जाउन आपण खूप साधे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. छोटे घर, मोफत पाणी असे अनेक विषय घेउन दिल्लीकरांच्या अपेक्षा वाढवल्या. परंतु यातले त्यांना काहीच करता आले नाही. ही विधानसभा पूर्णकाळ चालली नाही. लगेचच निवडणुका लागून आप पूर्ण बहुमत मिळवून सत्तेवर येण्यात यशस्वी झाली.
भाजपने त्यावेळी मोठे युद्ध जिंकण्यासाठी छोटी लढाई हरणं योग्य ठरेल अशी भूमिका घेत केजरीवालांना दीड दिवसांच्या गणपतीप्रमाणे दिल्लीत बसवले आणि नंतर पाच वर्षांसाठी स्थापना केली. हे कोणाच्या लक्षात आले नाही. दिल्लीत जर 2013 ला भाजपने सरकार स्थापन केले असते, तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत केजरीवाल यांचा आप लुडबुडला असता आणि भाजपला डोकेदुखी झाली असती. कारण आपचे उपद्रवमुल्य भाजपने ओळखले होते. या उपद्रवमुल्याचा वापर काँग्रेसने शस्त्र म्हणून केला होता. याच शस्त्राला भाजपने गोव्यात संरक्षण मंत्र्यांचे शस्त्र वापरून उत्तर दिले आहे.
दिल्लीत 2013 ला काँग्रेसने केलेल्या राजकारणाचा वचपा आत्ता भाजपने काढला आहे. दिल्लीत 2013 ला पहिल्या क्रमांकाचा पक्ष असूनही सरकार स्थापन करू न देण्याचा काँग्रेसचा डाव आत्ता भाजपने खेळला आहे. गोव्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष असतानाही काँग्रेसला सत्तेपासून रोखायचे आणि भाजपने  सत्ता स्थापन करण्याची ही संधी भाजपने साधली. याला वचपा म्हणा, सूड म्हणा, धडा शिकवला म्हणा काहीही म्हणा पण राजकारणात जसा कोणी कोणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो, तसेच राजकारणात असा मागचा वचपाही काढला जातो हे लक्षात घेतले पाहिजे. 2014 नंतर दिल्लीत झालेल्या निवडणुकीत भाजपला फटका बसला असला तरी त्याचाही वचपा गोव्यात काही महिन्यांनी निघेल यात शंकाच नाही. आज एक नंबरचा असलेला गोव्यातला काँग्रेस कधी गाळात जाईल हे सांगता येत नाही. याला म्हणतात राजकारण.
-प्रफुल्ल फडके/8108454555


गुरुवार, ९ मार्च, २०१७

डोळस समिक्षक वि.भा. देशपांडे


ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे म्हणजेच विश्वनाथ भालचंद्र देशपांडे यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. नाट्यक्षेत्रातील अभ्यासक असले तरी त्यांची नाटकाकडे पाहण्याची दृष्टी फार वेगळी होती. ही दृष्टी फार कमी समिक्षकांना लाभते. त्यामुळेच विभांचे वेगळेपण पाच दशके टिकून राहिले. त्यांच्या कार्याची त्यासाठीच दखल घेणे उचित वाटते.  मराठी माणूस आणि नाटक हे नातंच वेगळं आहे. किंबहुना माणसाच्या अंगात हाडं, रक्त असतं तसंच मराठी माणसाच्या अंगात नाटक भिनलेलं असतं. रक्ताचे जसे वेगवेगळे गृप असतात ए, बी, एबी, ओ तसे मराठी माणसांचे नाट्यगुणांचे वेगळेपण असते. कोणी नट असतो, कोणी प्रेक्षक असतो, तर कोणी समिक्षक असतो. पण नाटकाशी जोडलेला असतो. ओ गटाची माणसे जशी दुर्मिळ आणि वेगळी तशी स्थिती वि.भा. देशपांडे यांची होती. डॉ. देशपांडे हे पाच दशकांहून अधिक काळ सांस्कृतिक क्षेत्रात, त्यातही विशेषतः नाट्यक्षेत्रात योगदान देत राहिले. डॉ. देशपांडे यांनी मराठी नाट्यकोश या जवळपास 1200 पानी ग्रंथाचे लिखाण व संपादन करून मराठी कोशवाङ्मयात मोलाची भर टाकली होती. त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेतली पाहिजे. नव्या पिढीने त्यांचे मोठेपण जाणले पाहिजे. डॉ. वि.भा. देशपांडे यांची प्रकाशित पुस्तकांची संख्या 50 पेक्षाही  अधिक असेल.  यातील  ‘नाटकातली माणसं’, ‘गाजलेल्या भूमिका’, ‘नाटक नावाचं बेट’ , ‘निळू फुले ’, ‘॥ नाट्यभ्रमणगाथा ॥’ , ‘निवडक नाट्यप्रवेश: पौराणिक’ , ‘वारसा रंगभूमीचा’, ‘आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा’ ही त्यांनी लिहिलेली काही प्रसिद्ध पुस्तके आहेत.  प्रत्येक हौशी आणि व्यावसायिक रंगकर्मींने ही पुस्तके वाचली पाहिजेत. नाटकातील माणसं या पुस्तकातून त्यांनी जे  काही वर्णन, किस्से टिपले आहेत ते अंतर्मुख करायला लावणारे आहेत. साधारण 1970 ते 1990 हा काळ हौशी कलाकारांमधील कौटुंबिक वादाचा काळ होता. कारण तेंव्हा नाटकात काम करणं, त्यात करीअर करणं हे प्रतिष्ठेचं मानलं जात नव्हतं. त्यामुळे या महाराष्ट्राने अनेक चांगले कलाकार गमावले आहेत. नाटक हे हौसेपुरतं करा चरितार्थासाठी नोकरी करा असा विचार सगळीकडं डोकावत होता. त्यामुळे नाटकातली माणसं हे पुस्तक फार महत्वाचं वाटतं.   नाटक, साहित्य, संगीत या गोष्टींवर नितांत प्रेम करणार्‍या वि भा देशपांडे यांना आजवरच्या प्रवासात भेटलेली माणसे आणि त्यांच्याकडून आलेले अनुभव म्हणजेच त्यांचे पुस्तक ‘नाट्यभ्रमणगाथा’. नाट्य-साहित्य क्षेत्रातल्या दिग्गजांना त्यांना जवळून पाहता आले. अनेकांशी त्यांचा स्नेह, मैत्र जुळले. त्यांचे अनुभव वि.भां. नी या गाथेतून टिपले आहेत.   
वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, निळू फुले, विजया मेहता, ज्योत्स्ना भोळे, भीमसेन जोशी, कमलाकर सारंग अशी अनेक मंडळी त्यांना भेटली. त्यांची नाटके, त्यांचे प्रयोग, त्यांच्या कलेची आणि व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये वि. भा. देशपांडे यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत आणि स्पष्टपणे लिहिली आहेत. रंगभूमीच्या इतिहासातील अनेक घटना-प्रसंगही त्यांनी यातून उलगडले आहेत. उत्कृष्ट संपादनासाठी त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याचसोबत त्यांना नाट्यगौरव पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, कॉसमॉस पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. परंतु पुरस्कारांनी सन्मानीत करण्यापेक्षाही वि.भा.देशपांडे यांचे मोठेपण अधिक होतं. त्यांच्याकडून शिकणं, नाटक जाणून घेणं हे फार मोठं होतं. वेगवेगळ्या ठिकाणी नाट्यप्रवेश, एकपात्री स्पर्धा आयोजित केल्या जातात. तेंव्हा हौशी रंगकर्मींना ऐनवेळी कोणते प्रवेश हुडकायचे? त्यासाठी असंख्य नाटके वाचायला पाहिजेत. पण वि. भा. देशपांडे यांनी अशा प्रवेशांचे पुस्तक तयार केल्याने रंगकर्मींवर फार उपकार केले होते. त्यामध्ये ऐतिहासीक, पौराणिक, सामाजिक असे वेगळे भाग करून रंगकर्मींचे काम फार सोपे केले होते. समिक्षक आहोत म्हणजे केवळ टिकाच केली पाहिजे असा अनेकांचा समज असतो. पण चांगल्याचे कौतुक करण्याचे मोठे मनही त्यांच्यात होते. समिक्षक हा काही सर्वज्ञ नव्हे. त्याचा फक्त दृष्टीकोन आहे, हे ते ठामपणे सांगत, म्हणूनच ते एक डोळस समिक्षक होते. रंगकर्मींच्या उणिवा स्पष्टपणे सांगणारा, त्यांनी काय केलं पाहिजे हे मोकळेपणाने सांगणारे आणि रंगभूमीवर मनापासून प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे वि. भा. देशपांडे. त्यांच्या जाण्याने खरंच एक उणिव नाट्यक्षेत्रात निर्माण झालेली आहे. त्यांना मन:पूर्वक श्रद्धांजली.  - प्रफुल्ल फडके   8108454555