मंगळवार, १ सप्टेंबर, २०१५

आचार्य अत्रे

  • आचार्य अत्रे अर्थात प्र. के. किंवा प्रल्हाद केशव अत्रे यांची आणि माझी ओळख झाली ती मी पाचवीत असताना. हे वाक्य तसे दचकायला होईल असे आहे पण या नावाची ओळख मला झाली ती पाचवीच्या बालभारतीच्या पुस्तकातील मोती या धड्यातून. प्राथमिक शाळेत त्यांचे काही लेखन येवून गेले असेल तर ते आठवत नाही, पण पाचवीत जी या नावाची ओळख झाली तिथपासून एक वर्षाआड ते बालभारतीत असायचेच. बालभारती, कुमारभारती आणि युवकभारती अशा जवळपास दहा वर्ष त्यांनी कधी प्र के अत्रे तर कधी केशवकुमार या नावाने साथ दिली. तेथूनच आचार्य अत्रे यांची पुस्तके वाचण्याची ओढ लागली.
  •        मराठीतील अष्टपैलू साहित्यिक, शिक्षणतज्ञ, चित्रपटनिर्माते-दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, वक्ते आणि नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. आता आचार्य अत्रे यांचे निधन हे आमच्या जन्मापूर्वीच झालेले असले तरी लेखणीच्या सामर्थ्यावर ते अजरामर झाल्यामुळे त्यांचे साहित्यिक रूप मला सतत दिसत होते.  म्हणजे मोतीपासून सुरू झालेल्या सोबतीने नंतर पाठ्यपुस्तका साने गुरूंजीवर लिहीलेला मृत्यूलेखही अजून आठवतो. मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी असे त्यांनी साने गुरूजींचे वर्णन केले होते. त्यानंतर कुमारभारतीत आम्ही कोण या केशवसुतांच्या कवितेचे विडंबन घेवून केशवकुमार म्हणून ते समोर आले. तर महाविद्यालयीन काळात लिंकनचा विनोद घेवून युवकभारतीत आले. तेव्हा आचार्य अत्रे म्हणजे विनोदी लेखक अशी मुलांमध्ये क्रेज होती. पण विनोद हा त्यांचा फक्त एक गुण होता. सर्व रसांमध्ये लिलया फिरणारे ते फार मोठे रसायन होते.
  •   अत्रे ह्यांचा जन्म सासवड, जिल्हा पुणे येथे झाला. त्याचे शिक्षण सासवड, पुणे, मुबंई व लंडन या ठिकाणी बी.ए.,बी.टी,टी.डी. पर्यंत झाले. पुण्यातील कँप एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत प्रथम शिक्षक आणि पुढे प्राचार्य म्हणून त्यांनी काम केले. नंतर काही काळ पुण्याच्या नगरपालिकेचे ते सदस्य होते. या विविध पेशांमध्ये काम करताना माणासांचे निरिक्षण करून त्यांना कथा, कादंबरी, नाटकांतून रंगवण्याचे महान कार्य त्यांनी केले.
  • े १९३३ पासून नाट्य व चित्रपटसृष्टीत त्यांनी प्रवेश केला. १९४० मध्ये सुरू केलेल्या साप्ताहिक नवयुगपासून अखेरपर्यंत वृत्तपत्रक्षेत्रातच ते कार्यरत राहिले. याचबरोबरच ‘अत्रे थिएटर्स’ या नाट्यसंस्थेमार्फत रंगभूमीशी त्यांचे व्यावासायिक नाते राहिले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी आपली कर्तुत्व आणि लेखणी यांद्वारे मोठे कार्य केले.
  •    साने गुरुजींची ‘श्यामची आई’ म्हणजे मराठी साहित्यातील एक सोनेरी पान आहे. त्यावर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी श्यामची आई नावाचाच चित्रपट बनविला.  या चित्रपटाला पहिले राष्ट्रपती पदक मिळाले. इ.स. १९२३ साली अत्र्यांनी अध्यापन मासिक सुरू केले. इ.स. १९२६ मध्ये रत्नाकर व इ.स. १९२९ साली मनोरमा, आणि पुढे इ.स. १९३५ साली नवे अध्यापन व इ.स. १९३९ साली इलाखा शिक्षक ही मासिके काढली. १९ जानेवारी १९४० साली त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले
  • आचार्य अत्रेंचे कर्‍हेचे पाणी हे पाच खंडातील आत्मचरित्र आहे. याशिवाय चांगुणा, मोहित्यांचा शाप या कांदबरीचे लेखन त्यांनी केले. झेंडूची फुले व गीतगंगा हे कवितासंग्रह लिहिले. अशा गोष्टी अशा गंमती, कावळ्यांची शाळा, फुले आणि मुले, बत्ताशी आणि इतर कथा ही कथासंग्रहाची पुस्तके त्यानी लिहिली.
  • याशिवाय अध्यापक अत्रे, आषाढस्य प्रथम दिवसे, इतका लहान एवढा महान, केल्याने देशाटन, क्रांतिकारकांचे कुलपुरुष, चित्रकथा भाग-१, चित्रकथा भाग-२, दलितांचे बाबा, दूर्वा आणि फुले, मराठी माणसे, मराठी मने, महापूर, महाराष्ट्र कालचा आणि आजचा, मी कसा झालो? ह्या त्यांच्या काही उल्लेखनिय कलाकृती.
  • आचार्य अत्रे यांनी प्रथम ‘मकरंद’ व नंतर ‘केशवकुमार’ या टोपणनावांनी काव्यलेखन केले. झेंडूची फुले हा त्यांच्या विनोदी व विबंडन-कवितांचा संग्रह. त्यात जुन्या वळणाचे कविता यांतील लकबांचे व वैगुण्यांचे विडंबन केलेले आहे. आधुनिक मराठीतील विडंबन काव्याची परंपरा उपयुक्त काव्यसंग्रहापासून मानण्यात येते. बालकवी व गोविंदाग्रज यांच्या कवितांचा ठळक परिणाम दाखविणारी त्यांची अन्य स्फुट कविता गीतगंगा (१९३५) या संग्रहात आहे.
  •    नाशिक येथे १९४२ मध्ये भरलेल्या २७ व्या महाराष्ट्र साहित्य-संमेलनाचे ते अध्यक्ष होते. याशिवाय ३८ वे नाट्यसंमेलन, बेळगाव, १० मराठी पत्रकार-संमेलन आणि बडोदा, इंदूर व ग्वाल्हेर येथील प्रादेशिक साहित्यसंमेलने यांची अध्यक्षपदेही त्यांनी विभूषित केली आहेत.
  • अत्र्यांनी केलेल्या विविध विषयांवर लेखनात अनेक चरित्रे, व्यक्तिदर्शने, मृत्यूलेख, प्रवासवर्णने, वृत्तपत्रीय लेख, साहित्यविषयक लेख आणि भाषणे, शालेय पाठ्यपुस्तके इत्यादींचा समावेश आहेत.
  •     आचार्य अत्रे यांची नाटके तर अजरामर आहेत. लग्नाची बेडी, मोरूची मावशी आणि तो मी नव्हेच या नाटकांनी तर पन्नास वर्ष मराठी रंगभूमीवर धूमाकूळ घातला. अनेक अभिनेते, दिग्दर्शकांना ओळख दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: