शुक्रवार, २७ जून, २०२५

पापविनाशी पंढरीची वारी


पंढरीची वारी केल्याने माणूस पापमुक्त होतो. कित्येकदा आपल्याला पाप म्हणजे नेमके काय हेच माहीत नसते. आपण पाप करत आहोत हेही माहीत नसते. त्यामुळे कळत नकळत आपल्या हातून पापकर्म घडत असते. या पापापासून आपल्याला मुक्ती देण्याचे काम या वारीत होते. कारण पाप म्हणजे मनाची मलिनता असते. ही मनाची मलिनता धुवून टाकण्याचे काम नामस्मरणातून होत असते. हे नामस्मरण वारीत घडत असते. लाखो भाविक प्रत्येक सेकंदाला पांडुरंगाचे नाव घेत असतात. विठ्ठलाचे नाव घेत असतात. हरिनाम घेत असतात. यातून केवळ वारीतील वारक‍ºयांचीच नाही तर तो आवाज जेथेपर्यंत पोहोचतो तेथील पापांचा नाश होत असतो. म्हणूनच आमची पंढरीची वारी ही पापविनाशी अशी वारी आहे. ही वारी म्हणजे वाहती निर्मळ गंगा आहे. ही गंगा पंधरा दिवसांच्या प्रवासात चंद्रभागेत येऊन मिळते आणि सर्वांना पावन करते.


पाप म्हणजे नेमके काय? ते अगोदर समजून घेतले पाहिजे, म्हणजे माणूस पापापासून दूर राहील. पाप, उपपाप आणि महापाप हे पापाचे तीन प्रकार आहेत. तर कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप हे पुन्हा पापाचे आणखी उपप्रकार आहेत. खोटे बोलणे, लोकांची निंदा करणे, चहाडी करणे, दुसºयांबद्दल अपशब्द उच्चारणे, अयोग्य पदार्थ खाणे या सर्व गोष्टींचा समावेश पापामध्येच होतो. हे अवगुण टाळण्यासाठी मुखी असावे हरिनाम. हरिनामात व्यस्त झाल्यावर या गोष्टी हातून घडणारच नाहीत.

हरी उच्चारणी अनंत पापराशी। जातील लयाशी क्षणमात्रे॥


तृण अग्निमेळे समरस झाले। तैसे नामे केले जपता हरी॥

हरी उच्चारण मंत्र पै अगाध। पळे भूतबाधा भय तेणे॥


ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ। न करवे अर्थ उपनिषदा॥

अत्यंत सोप्या भाषेत ज्ञानोबांनी पापापासून दूर राहण्याचे तंत्र सांगितले आहे. भगवंतांच्या नामाशी जो विन्मुख असेल तोच खरा पापी आहे, असे हरिपाठाच्या अभंगात ज्ञानेश्वरांनी ठामपणे सांगितले आहे. या अभंगात मात्र ते अशी कोणतीही पाप झालेली असतील तर ती पाप जळून जाण्याचा उपाय सांगितलेला आहे.


आपल्याला सर्वांना सर्वात जास्त भीती कशाची वाटत असेल तर ती पापाची. आपल्या जीवनामध्ये येणा‍ºया दु:खाचे कारण हे पाप आहे, असे अनेक पिढ्यांपासून आपल्या मनावर बिंबवलेले आहे. पाप पळवण्यासाठी अनेक कर्मकांडाची वर्णने इतर शास्त्रात आलेली आहेत. मात्र वारकरी संतांनी पाप पळवण्याचा मार्ग दाखवला नाही, तर पाप जाळण्याचा मार्ग दाखवला आहे. कारण पळालेले पाप पुन्हा येऊ शकते. ते जळल्यास मात्र पुन्हा येण्याची सुतराम शक्यता नसते. म्हणून ज्ञानदेवांनी म्हटले आहे की,

हरी उच्चारणी अनंत पाप राशी। जातील लयाशी क्षणमात्रे॥


या ठिकाणी हरिनामाच्या उच्चाराने एक पाप जळेल असे म्हटलेले नाही, तर पापाच्या अनंत राशी जळून जातील, असा उल्लेख केलेला आहे. ज्या अर्थी ‘अनंत’असा उच्चार करतात त्या अर्थी पापाचे अनेक प्रकार असले पाहिजेत. तसे ते आहेतही. अभक्ष भक्षण, सुरापान, परदारागमन अशा पापाचा यात समावेश आहे. तसेच दुस‍ºयाची निंदा, चहाडी, वाईट उच्चारण याला वाचिक पाप म्हटलेले आहे. सर्वात महत्त्वाचे आणि धोक्याचे आहे ते मानसिक पाप.

मानसिक पापाचे उदाहरण म्हणजे, एका वेश्यांच्या वस्तीत भगवान शिवाचे मंदिर असते. या मंदिराचा पुजारी सोवळ्याने शिवाची पूजा करत असे. तेव्हाच मंदिरासमोरच्या बंगल्यात राहणारी वेश्या अंघोळ करून केस सुकवत असे. तिचे लक्ष मंदिरातील शिवपिंडीकडे असे. कालांतराने दोघांचेही देहावसान होते. तेव्हा पुजा‍ºयाला घेऊन जाण्यासाठी यमदूत, तर वेश्येला घेऊन जाण्यासाठी शिवदूत येतात. यमदूत पुजा‍ºयाला मारत-झोडत तर शिवदूत वेश्येला सन्मानाने घेऊन जातात. ज्याने जन्मभर पूजा केली, त्याला घेऊन जायला यमदूत आणि जिने वेश्येसारखे निंद्य समजले जाणारे कर्म केले, तिला घेऊन जायला शिवदूत आले. याचे कारण पुजारी सकाळी अंघोळ करून मंदिरामध्ये पूजेला बसायचा. पण त्याचे चित्त वेश्येकडे असायचे. तिच्याविषयीच्या वाईट भावना त्याच्या मनात यायच्या. वेश्येच्या मनात मंदिरातील पूजेविषयी चिंतन सुरू असायचे. ती विचार करायची, किती हा पुजारी भाग्यवान आहे? त्याला सतत शिवाची पूजा करता येते. बिल्वदल वाहता येतात. मी जर त्या ठिकाणी असते तर अशी पूजा केली असती! तसेच बिल्वपत्र वाहिली असती. म्हणजे उभी वेश्यालयात आणि मनात मात्र भगवंत म्हणून तिला घेऊन जायला शिवदूत आले. तर अशा प्रकारे मानसिक पाप जरी घडलेले असेल त्याची दाहकता हरिनाम उच्चारण्याने कमी होते. ज्याप्रमाणे गवताची गंजी एका अगीच्या काडीने जळून खाक होते, त्याचप्रमाणे कायीक, मानसिक पाप हरिनाम स्मरणाने जळून जाते. ही पापे नष्ट करण्याची ताकद या वारीच्या मार्गावर आहे. म्हणून पंढरीची वारी ही पापविनाशी गंगाच आहे. गंगेत मारलेली डुबकी आणि हरीनामाच्या या वारीत घेतलेला मानसिक आनंद हा आपल्याला सन्मार्ग दाखवून पवित्र करतो.


प्रफुल्ल फडके/पाऊले चालती


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: