बुडत्याचा पाय खोलात म्हणतात त्याप्रमाणे काँग्रेसची अवस्था झाली आहे. एकीकडे पक्षाध्यक्ष पदाचा निर्णय होणे दूर, तर दुसरीकडे पक्षातून बाहेर पडणाºयांची संख्या वाढत आहे. काँग्रेसचा दक्षिण भारतातील एक बालेकिल्ला नुकताच ढासळला आहे. त्यामुळे आणखी खोलात काँग्रेसचे पाय चालले आहेत. पुद्दुचेरीमधील काँग्रेस-द्रमुक आघाडीचे सरकार अल्पमतात गेले. काही दिवसांपूर्वी सरकार पक्षातील दोघा आमदारांनी राजीनामे दिले होते आणि त्यानंतर आणखी एकाने व लागोपाठ मंगळवारी दुसºयाने राजीनामा दिल्याने चार जण साथ सोडून गेल्याने मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांचे सरकार जवळजवळ कोसळल्यात जमा आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी बुधवारीच पुद्दुचेरीच्या दौºयावर त्यासाठी आले आहेत, पण ही परिस्थिती सावरणे त्यांच्या हातात नाही. त्यांच्या भेटीच्या आदल्या दिवशीच तिथले त्यांचे सरकार अल्पमतात येणे हे नामुष्कीजनक आहे, परंतु राजीनामा देणाºयांपैकी दोघे जण भारतीय जनता पक्षात सामील झाले आहेत. त्यामुळे या सगळ्या राजीनामानाट्याचे सूत्रधार कोण आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपला एकीकडे दक्षिणेत शिरकाव करायचा आहे. लवकरच तामिळनाडूच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे तशी वातावरण निर्मिती करायला ही परिस्थिती चांगली आहे. दक्षिणेत खरं तर तिथल्या पक्षांशिवाय कोणाला फारशी संधी नसते. काँग्रेसलाही तिथे पाय रुजवायला खूप काळ लागला होता, पण त्यातल्या त्यात पुद्दुचेरीत पाय ठेवणे जमले होते, पण ते पायही उखडून टाकण्याचे काम सध्या होत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत इथे काय होणार हे स्पष्ट दिसत आहे.
भारतीय जनता पक्षाने आपले विस्तारवादी धोरण काही लपवून ठेवलेले नाही. जास्तीत जास्त राज्ये आपल्या पक्षाच्या सत्तेखाली आणण्यासाठी भाजपचा आटापिटा चालला आहे. सध्या पश्िचम बंगालवर त्या पक्षाने लक्ष केंद्रित केलेले आहेच, दक्षिण भारतामध्ये आपले अस्तित्व निर्माण करण्याचाही जोरदार प्रयत्न भाजपने गेल्या काही काळापासून चालवलेला आहे. पुद्दुचेरी हा छोटासा संघ प्रदेश, परंतु तामिळनाडूला जोडून तो असल्याने त्या राज्यातील निवडणुकांबरोबरच पुद्दुचेरीतही निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भाजपने छोट्याशा पुद्दुचेरीमध्येही चंचुप्रवेश करण्यावर लक्ष केंद्रित केलेले दिसते. अशाच प्रकारे ईशान्येतील विरोधकांची सर्व सरकारे भारतीय जनता पक्षाने बंडखोरी घडवून आणून आपल्या अंमलाखाली आणली आहेत. परिणामी मेघालयात एनपीपीसोबत, नागालँडमध्ये एनडीपीपीसोबत, सिक्कीममध्ये एसकेएमसोबत, त्रिपुरामध्ये आयपीएफटीसोबत अशा प्रकारच्या आघाड्या करून तेथे भाजप सत्तेत सामील आहे. आसाम, अरुणाचल आणि मणिपूरमध्ये तर पक्षाची सरकारे आहेतच. त्यामुळे पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत शिरकाव करणे हे भाजपचे धोरण आहे. त्या धोरणाचा हा एक भाग आहे, पण यामध्ये तेथील मुख्य पक्ष मागे जाण्याऐवजी काँग्रेसला फटका बसत आहे. प. बंगालमध्ये तृणमूलपेक्षा काँग्रेस संपणार आहे तोच प्रकार पुद्दुचेरी आणि तामिळनाडूत होणार हे दिसते आहे. त्यामुळे भाजप हा काँग्रेसला गिळंकृत करून मोठा होणारा पक्ष आहे.
छोट्या छोट्या राज्यांमध्ये, संघ प्रदेशांमध्ये आधी तिथल्या प्रादेशिक पक्षाशी हातमिळवणी करायची आणि नंतर तो पक्ष संपवून स्वत:चा विस्तार करायचा ही भाजपची चाल फार जुनी आहे. गोव्यामध्ये मगो पक्षाला संपवून भाजपने असाच चंचुप्रवेश केला होता हेही सर्वज्ञात आहेच. त्यामुळे हीच नीती सर्वत्र अवलंबिण्याचे सत्र आजही सुरू दिसते. सध्या लक्ष केंद्रित केलेल्या पश्िचम बंगालमध्येदेखील भाजपने तृणमूल काँग्रेसमधील एकेका रथी-महारथीला आपल्याकडे वळवून घ्यायला, राजीनामे द्यायला लावायला सुरुवात केलेली आहे. भाजपचे मिशन बंगाल यावेळी जोरात आहे. यंदाच निवडणूक होणार असलेल्या तामिळनाडूमध्येदेखील भाजपने आक्रमक पावले टाकायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे शेजारच्या छोट्याशा पुद्दुचेरीतही निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी झाल्याने भाजपच्या ते पथ्थ्यावरच पडणार आहे. तितकाच तो काँग्रेसला आणखी गाळात घालणारा ठरणार आहे.
राहुल यांच्या भेटीच्या आदल्या दिवशीच त्यांचे तेथील सरकार अल्पमतात गेल्याने त्यांच्यासाठी अनवस्था प्रसंग तेथे ओढवला आहे. पुद्दुचेरीच्या राज्यपालपदी असलेल्या किरण बेदी तर भाजपच्या हस्तक असल्यागतच वावरत आल्या आहेत. त्यांनी मध्यंतरी तेथे भाजपच्या तीन आमदारांना नियुक्त करून मताधिकारही दिले आहेत. त्यामुळे त्यांची उचलबांगडी होताना दिसत आहे. भाजपचे नेते जे राज्यपाल म्हणून जातात ते पक्षप्रसार करतात काय, असा प्रश्न पडतो.
भाजपची विस्तारवादी पावले देशभरामध्ये पडत असताना महाराष्ट्र, पंजाब, केरळ, पश्िचम बंगाल, दिल्ली, उडिशा, राजस्थान, छत्तीसगढ अशी काही राज्ये अजूनही विरोधी पक्षांचे झेंडे फडकावीत उभी आहेत. त्यातील काही राज्यांतही सत्तांतरे घडवून आणण्याचे प्रयत्न झाले, परंतु ती सरकारने पुरून उरली आहेत. अर्थात आज भाजपची केंद्रात स्वबळावरची भक्कम सत्ता आहे. काँग्रेस जेव्हा केंद्रात सत्तेवर होती, तेव्हाही आपल्या एकाधिकारशाहीच्या बळावर सर्व राज्यांमध्ये बंडाळ्या, लाथाळ्या घडवून आणून तेथे आपली सरकारे प्रस्थापित करण्यात काँग्रेसची मंडळीही वाकबगार होती. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे दिसते. एकमेकांना गिळंकृत करून संपवायचे आणि मोठे व्हायचे हे धोरण या दोन्ही पक्षांचे आहे, पण आज तरी काँग्रेसपुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होताना दिसतो आहे. त्यात पुद्दुचेरीमुळे ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी अवस्था झालेली दिसते. छोटी छोटी राज्ये मिळवण्यात भाजपने जी जागरूकता दाखवली ती त्यांना महाराष्ट्रात दाखवता आलेली नाही हेही न उलगडणारे कोडे आहे, पण भाजपची पक्षवाढ ही फोडाफोडीतून होताना दिसते आहे. नवे कार्यकर्ते घडवण्यापेक्षा रेडिमेड नेतृत्व आयात करणे हाच त्यांचा अजेंडा पुन्हा पुन्हा दिसत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा