मंगळवारी वसंत पंचमीनिमित्ताने पंढरपुरात विठ्ठल-रुख्मिणी विवाहाचा समारंभ संपन्न झाला. हा विवाह दरवर्षीच होतो. काही दैवतांची लग्नं दरवर्षी लावून तो उत्सव साजरा करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. यामध्ये खंडोबाचे लग्न लावले जाते. तुळशीचे लग्नही आपल्याकडे दरवर्षी साजरे केले जाते. तुळशी विवाहानंतर माणसांच्या विवाहाची लाइन क्लिअर होते. अर्थात आजकाल केव्हाही लग्न होतात, पण सर्वसामान्यपणे तुळशीच्या लग्नानंतर लग्न लावायची आपल्याकडे प्रथा आहे. अर्थात लग्न, विवाह आणि त्याचा सोहळा पाहणे हे आनंदाचे असते. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे मर्यादित लोकांत लग्न करण्याची प्रथा रूढ झालेली असली, तरी लग्नं ही आनंद देणारी असतात.
१९९४ साली सूरज बडजात्या यांचा सुपरहिट चित्रपट ‘हम आपके हैं कौन’ किंवा त्यानंतर आलेला ‘विवाह’ आणि ‘प्रेम रतन धन पायो’ हे चित्रपट म्हणजे लग्नाचा आनंद देणारे, खर्चिक लग्नांचे नमूने दाखवणारे चित्रपट. देशभरातील सगळ्या रितींमधील आकर्षक विधी उचलून केलेले लग्न म्हणजे सूरज बडजात्यांच्या चित्रपटातील लग्न. त्यानंतर अनेक मराठी चित्रपटांतही लग्नविधी दाखवले जाऊ लागले. मराठी वाहन्यांवरील मालिकांमध्ये लग्न अगदी सगळे विधी करून केले जातात. सात-आठ वर्षांपूर्वी ‘होणार सून मी या घरची’मधील श्री-जान्हवीच्या लग्नानंतर तर झी मराठीने लग्नोत्सवाचा आनंद देण्यास सुरुवात केली. राणा-अंजलीचे लग्न दाखवले गेले, ‘माझ्या नवºयाची बायको’मध्ये तर काय राधिकाचे दुसरे आणि सौमित्रचे पहिले लग्न, शनाया आणि तिचा बॉयफ्रेंड, आनंद आणि जेनी या सगळ्यांची लग्नं लावून झाली. लग्नातले विधी आणि उत्सव पहायला लोकांना आवडतो म्हटल्यावर काय त्यावरच कथानक चालवायचे हा ट्रेंड सुरू झाला, पण याचे प्रणेते म्हणून सूरज बडजात्या यांच्याकडे बोट दाखवावे लागेल.
सूरज बडजात्या यांच्या राजश्री प्रॉडक्शनचे हे सारे चित्रपट भारतीय लग्नसोहळे चित्रीत करणारे होते. अडीच-तीन तास फक्त लग्न दाखवणाºया सिनेमाने लोकांना आकर्षित केले. म्हणजे भारतीय संस्कृतीतील कलात्मकता, भव्यता हे सगळे या चित्रपटांमधून बघायला मिळालेच, पण भरजरी कपडे, भव्यदिव्य सेट, तीन-चार दिवस चालणारा सोहळा, गाणी, संगीत, मस्ती-मजा आणि बरेच काही, पण यातून लग्नोत्सवाचा उद्योग आकाराला आला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. एकाच थीमवर आधारित असूनही हे सिनेमे दणाणून चालले. याचे कारण कोणाही माणसाला आनंदी वातावरण बघायला आवडते.
दररोज येणाºया हिंसात्मक बातम्या, जगातील दु:खदायी, वेदनादायी घटना यांमध्ये आनंद देणारे क्षण माणसाला हवे असतात. म्हणूनच लग्न ही थीम पुन्हा पुन्हा चालली. विशेष म्हणजे यामधून आणखी एक गोष्ट आता दिसून आली आहे ती ही की, लग्न नावाची एक प्रचंड अशी इंडस्ट्री-एक उद्योग-इव्हेंट मॅनेजमेंट गेल्या काही वर्षांत या देशात उभी राहिली आहे. म्हणजे लग्न जमवण्यापासून ते हनिमून पॅकेजपर्यंत या इंडस्ट्रीमध्ये व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत. याकडे एक करिअर म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन वाढीस लागला आहे.
आपल्याकडे तुळशीचे लग्न झाल्यानंतर विवाहाचा हंगाम सुरू होतो. तेव्हापासून किती उद्योग कार्यान्वित होतात हे लक्षात घेण्यासारखे आहे. एकट्या महाराष्ट्रात विवाह सोहळ्यांवर होणारा वार्षिक खर्च कागदावरील उपलब्ध आकडेवारीनुसार ६० हजार कोटींच्या घरात पोहोचल्याचे दिसून आले आहे. लग्नात लेखी नोंद नसलेले खर्च खूप असतात. यामुळे प्रत्यक्षात ६० हजार कोटींचा आकडा आणखी मोठा असू शकतो.
देशात सध्या लग्नांवर वर्षाला सव्वालाख कोटी खर्च होतात. म्हणजे एक माणूस आपल्या आयुष्यातील एक पंचमाश कमाई ही लग्नासाठी खर्च करतो. भारत हा तरुणांचा देश आहे. २५ ते ३० वयोगटातील मुला-मुलींची संख्या लक्षात घेता सध्या पुढील ५ वर्षांत मोठ्या संख्येने लग्ने होणार आहेत. लग्न खर्चाची वार्षिक उलाढाल पुढील पाच वर्षांत प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष खर्च लक्षात घेता १५ लाख कोटींच्या वर जाऊ शकते.
काही दिवसांपूर्वी मुंबईत एक विवाह महोत्सव झाला होता. म्हणजे ज्याप्रमाणे प्रॉपर्टी एक्झिबिशन भरतात त्याप्रमाणे विवाह महोत्सव केला गेला. या विवाह महोत्सवात साड्या, कपडे, दागदागिने, फोटो, व्हिडीओ, डेकोरेशन, हनिमून पॅकेज असे स्टॉल उभारण्यात आले होते. याशिवाय वधू-वर मेळावाही आयोजित केला होता. यासाठी विविध वधू-वर सूचक केंद्रांची मदत घेतली होती.
इव्हेंट मॅनेजमेंट आणि हा उद्योग नवनव्या कल्पना प्रत्यक्षात उतरवतात. म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांच्याकडून भरपूर खर्च करून हा उत्सव आनंदोत्सव करण्याचा नवा फंडा प्रचलित झाला आहे. याप्रमाणे गर्भश्रीमंतांची लग्ने मॉरिशस तसेच राजस्थानमधील जोधपूर, उदयपूर येथे आयोजित केली जातात. मॉरिशसमधील एका लग्नाचा साधारण खर्च आहे तो २० ते ३० कोटी. त्याचवेळी जोधपूर, उदयपूरमधील किल्ला परिसरातील लग्नांचा खर्च ३ कोटींपासून सुरू होतो. ही लग्ने म्हणजे एकप्रकारे वेडिंग टुरिझमच आहे. कोकणातील सुंदर प्रशस्त किनाºयांवर अशी लग्ने भविष्यात आयोजित करता येऊ शकतात. याशिवाय विविध रिसॉर्टबरोबर टायअप करूनही लग्ने लावली जातील.
लग्नावर होणारा खर्च हा नेहमीच चर्चेचा आणि टीकेचा भाग असला, तरीही रोजगार आणि उद्योग वाढीस हा फार मोठा आकर्षक सोहळा होत आहे. त्यामुळे अनेक उद्योगांना चालना मिळते आहे. याकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे. सर्वांना अशी धुमधडाक्यात लग्नं करता आली नाहीत, तरी जे अशी लग्नं करत आहेत त्याचा आनंद घेण्यास काहीच हरकत नाही, पण आजकाल कोरोनामुळे कमी माणसांत हे लग्नसोहळे साजरे करावे लागत असतील. तरी पुढे सर्व व्यवस्थित होईल या दृष्टीने हा लग्नोत्सवाचा आनंद लोकांना देण्याचा उद्योग आपल्या देशात उभा राहू शकतो. अर्थव्यवस्थेलाही चालना देणारा आणि पैसा संक्रमित करणारा, व्यवहारात आणणारा हा उत्सव आहे. सोने, कापड, खाद्यपदार्थ, अन्नधान्य याशिवाय कितीतरी उद्योगांची उलाढाल होणारा हा उद्योग आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा