बुधवार, ३० जुलै, २०२५

पाकिस्तानची भाषा


बैसरान दहशतवादी हल्ल्यात सामील असलेले तिन्ही पाकिस्तानी दहशतवादी सुलेमान शाह उर्फ हाशीम मुसा, हमझा अफगाणी आणि जिब्रान यांचा आॅपरेशन महादेवमध्ये खात्मा झाल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत मंगळवारी आॅपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान जाहीर केले. काश्मीर खोºयातील दाचिगामच्या घनदाट जंगलात मारले गेलेले हे तिन्ही दहशतवादीच पहलगामच्या बैसरानमधील दहशतवादी हल्ल्यात सामील होते, असा निर्वाळाही शहांनी दिला आहे. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी दोन प्रमाणे दिली. पहिली बाब म्हणजे आॅपरेशन महादेवमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपाशी सापडलेल्या एके ४७ आणि एम ९ रायफलींच्या गोळ्या आणि बैसरानमधील दहशतवादी हल्ल्यानंतर आढळलेल्या गोळ्या एकमेकांशी तंतोतंत जुळत असल्याचे चंडीगडच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेने सांगितल्याचे आणि सहा तज्ज्ञांनी त्याची खातरजमा केल्याचे शाह यांनी सांगितले. त्यांनी दुसरे प्रमाण दिले ते या तिघा दहशतवाद्यांना बैसरानमध्ये ज्यांनी आश्रय दिला आणि अन्न पुरवले, त्या सध्या एनआयएच्या अटकेत असलेल्या बशीर अहमद जोठर आणि परवेझ अहमद जोठर या दोघांनीही या मृतदेहांची ओळख पटवून तेच हल्लेखोर असल्याचे सांगितले. ज्या अर्थी केंद्रीय गृहमंत्री प्रत्यक्ष लोकसभेमध्ये हा निर्वाळा या दोन सबळ पुराव्यांच्या आधारे देत आहेत, त्या अर्थी मारले गेलेले दहशतवादी हेच बैसरान हल्ल्यात सामील असलेले हाशीम मुसा आणि साथीदार असल्याचे मान्य करायला हरकत नसावी. अर्थात, बेछूट आरोप करणारे ढिसाळ विरोधक केवळ सत्तेपासून दीर्घकाळ दूर राहिल्यामुळे वेडेपिसे झालेले आहेत, ते याचा अखेरपर्यंत इन्कार करत राहतील, पण जनता मात्र सुजाण आहे.


अर्थात, दहशतवाद्यांनी बैसरानमध्ये पत्नी आणि मुलांसमक्ष पर्यटकांच्या हत्या केल्या असल्याने या सर्व कुटुंबीयांनी या दहशतवाद्यांचे चेहरे पाहिलेच असतील, जे ते कदापि विसरूच शकणार नाहीत. त्यामुळे आॅपरेशन महादेवमध्ये खात्मा झालेले दहशतवादी हेच ते बैसरानमध्ये रक्ताचा सडा पाडणारे सैतान होते याची त्यांची खात्री पटल्यास निश्चितच त्यांच्या वेदनेवर ती थोडीफार मलमपट्टी ठरेल. मारले गेलेले दहशतवादी हे पाकिस्तानी नागरिक होते आणि ते सिद्ध करण्यासाठी त्यांचे पाकिस्तानी मतदार ओळखपत्र क्रमांकही मिळवले असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. यापेक्षा सरकारने, भारतीय सैन्याने काय करायला हवे होते? तरीही पाकिस्तानचे अतिरेकी मारले गेले याच्या दु:खातून सावरले न गेलेले विरोधक बरळत राहात आहेत यासारखे दुर्दैव काय म्हणायचे? देशाबाहेरचे शत्रू परवडले, पण हे अंतर्गत शत्रू घातक असतात. पोटातल्या जंताप्रमाणे माणसाला पोखरणारे हे शत्रू आहेत.

खरे तर बैसरान हल्ल्याचे तिघे हल्लेखोर उशिरा का होईना, परंतु मारले जाणे ही नि:संशय सुरक्षा दलांची फार मोठी कामगिरी आहे आणि त्या आॅपरेशन महादेवमध्ये सामील असलेले सर्व जवान कौतुकास पात्र आहेत. दाचिगामच्या घनदाट जंगलात या दहशतवाद्यांनी आश्रय घेतल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर त्यांना तेथून पाकिस्तानात पळून जाता येऊ नये याचा पक्का बंदोबस्त सुरक्षा दलांनी केला होता. या दहशतवाद्यांचा जंगलातील नेमका ठावठिकाणा कसून शोधला जात होता. एका दहशतवाद्याजवळील चिनी बनावटीचा उपग्रहाधारित फोन त्याने काही काळ चालू केला, त्या संदेशावरून त्यांचा नेमका ठावठिकाणा सुरक्षा दलांना कळून चुकला आणि लष्कर आणि निमलष्करी दले तसेच पोलीस यांनी तिन्ही हल्लेखोरांचा माग काढला आणि ते तंबूत झोपलेले असताना त्यांचा खात्मा केला गेला, असे गृहमंत्र्यांनी मंगळवारी सभागृहात जाहीर केले आहे. वास्तविक या गोष्टीचे विरोधकांनी कौतुक करायला पाहिजे होते. पण दुष्ट प्रवृत्तीच्या आणि पाकिस्तानवर अधिक प्रेम असणाºया विचाराने विरोधकांनी यावर प्रतिक्रिया दिली नाही. यातूनच विरोधकांचा खरा चेहरा जगासमोर आला आहे.


मात्र, बैसरान हल्ल्यातील दहशतवादी हे पाकिस्तानीच होते याचा पुरावा काय, ते स्थानिक दहशतवादी नसतील कशावरून? असे अत्यंत बेजबाबदार सवाल बैसरान हल्ल्याचे पक्षीय राजकारण करण्याच्या नादात माजी गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी नुकतेच द क्विंटला दिलेल्या मुलाखतीत केले. पी चिदंबरम हा अत्यंत बेजबादार आणि मूर्ख माणूस म्हणावा लागेल. सध्या काँग्रेसमध्ये सर्वात मूर्ख कोण याचीच स्पर्धा लागलेली दिसून येते, हे यावरून दिसून येते. शशी थरुर यांना आॅपरेशन सिंदूरवर बोलू न देण्याच्या कृतीने काँग्रेसने आपली लाज आणखी काढली आहे. इतकी मोठी चूक करून भारतीय जनतेसमोर आपली पाकिस्नानशी असलेली लाचारी दाखवून दिली आहे. आपण काय बोलतो आहोत आणि नकळत पाकिस्तानला क्लीन चिट देतो आहोत याचे भानही चिदंबरम यांना उरले नाही. आपल्या म्हणण्याचा विपर्यास झाल्याची सारवासारव त्यांनी आता चालवली असली, तरी बैसरान हल्ल्यापासून हात झटकण्यासाठी भविष्यात चिदंबरम यांच्या या बेजबाबदार विधानांची साक्ष पाकिस्तान दिल्यावाचून राहणार नाही. ही अशा प्रकारची वक्तव्येच आपली बाजू अकारण कमकुवत करीत असतात. आॅपरेशन सिंदूरवरील संसदेतील चर्चेत अशा अनेक शंका घेतल्या गेल्या. सरकारला घेरण्याच्या नादात आपण पाकिस्तानच्या भूमिकेचे समर्थन तर करीत नाही ना याचा विचार होताना दिसला नाही. एकीकडे संसदेत आॅपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असताना त्याच वेळी दहशतवाद्यांशी ही चकमक कशी झाली असा सवाल काही जण आता करतील यात शंकाच नाही. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी हा प्रश्न विचारलासुद्धा! बैसरानच्या सैतानांचा खात्मा झाला यासाठी सैन्य दलांच्या त्या पराक्रमाबद्दल त्यांची पाठ थोपटण्याऐवजी राष्ट्रीय सुरक्षेच्या गंभीर विषयावर केवळ निवडणुकीतील मतांचे हिशेब समोर ठेवून अशा सवंग भूमिका घेतल्या जातात तेव्हा त्यातून देश कमकुवत होत असतो याचे भान विरोधकांना कधी येणार? विरोधक यातून आपल्या पायावर धोंडा पाडून घेत आहेतच, पण भारतीय सैन्य दलाचे मनोदय खचवण्याचे काम करत आहेत. जे काम पाकिस्तान करत आहे ते काम काँग्रेस करत आहे. काँग्रेसच्या तोंडी पाकिस्तानची भाषा दिसत आहे यासारखे दुर्दैव कोणते?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: