गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

आपली जबाबदारी


गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील कोरोनाचे संकट वाढताना दिसत आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांनीही तिसरी लाट सुरू झाल्याचे म्हटले होते. त्यामुळे ही गोष्ट पुन्हा सामान्यांची चिंता वाढवणारी अशीच आहे.

मुंबई महापालिकेच्या प्रयत्नाने कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट यशस्वीपणे थोपवली गेली होती. मात्र आता वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता हीच कोरोनाची तिसरी लाट तर नाही ना, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीत एकट्या मुंबईत ७ हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद दिसून आली. त्यामुळे हा आकडा येत्या काही दिवसांत किती वाढेल आणि कोठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही.


पहिल्या आणि दुस‍ºया लाटेनंतर मुंबई महापालिकेने रुग्णसंख्या नियंत्रणात आणली होती, मात्र आता अखेर कोरोनाचा स्फोट झाला आहे. मुंबईतील दैनंदिन आकडेवारी ७ हजारांच्यावर गेलेली आहे. सर्वसामान्यांमध्ये यामुळे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवीन वर्षाचा पहिलाच दिवस असलेल्या शनिवारी समोर आलेल्या आकडेवारीने पुन्हा मुंबई हादरली. जी कोरोना रुग्णांची संख्या १०० आणि २००च्या आसपास होती; ती पुन्हा आता ५ हजार आणि ६ हजारांच्या घरात गेली आहे. शनिवारी कोरोना रुग्णांची आकडेवारी ही ६३४७ एवढी होती. एकूणच काय तर तिसरी लाट येऊच नये म्हणून पालिका खूप प्रयत्न करत आहे. १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्टे पालिका पूर्ण करू पाहत असतानाच कोरोनाच्या तिस‍ºया लाटेने पुन्हा आक्रमण केले की काय, अशी भीती वाटू लागली आहे. त्यातच ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे पालिका, राज्य सरकार आणि जनतेच्या मनात चिंता दिसत आहे आणि म्हणूनच जनतेने आता गाफील राहून चालणार नाही.


मुंबई महापालिकेने पुन्हा कोरोना चाचण्यांवर भर दिला आहे. दिवसाला ५० हजारांहून अधिक चाचण्या करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे लसीकरणावरही पालिकेने भर दिला आहे. ज्यांनी केवळ कोरोना प्रतिबंधक लसीचा एकच डोस घेतला आहे, त्यांना लसीचा दुसरा डोस देण्यासाठी पालिकेने लसीकरण केंद्र सुरू ठेवले असून, डोस न घेतलेल्यांशी पालिकेकडून संपर्क साधण्यात येत आहे. एकूणच काय, तर ही कोरोनाची तिसरी लाट असेल, तर या लाटेचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होऊ नये यासाठी पालिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार लहान मुलांसाठी देखील लसीकरण सुरू केले आहे. सोमवारपासून मुंबईतील १५ ते १८ वर्षे वयोगटांतील मुलांसाठी लसीकरण सुरू केले आहे. सध्या ओमिक्रॉनचा प्रसार वेगाने होत असून, लहान मुलांना त्याची बाधा होऊ नये, यासाठी लसीकरण सुरू केले आहे, तरीही प्रत्येकाच्या मनात कुठे ना कुठेतरी असुरक्षिततेची भावना ही आहेच.

विशेष म्हणजे, मुंबईतील कोरोना रोखण्यासाठी पालिका आयुक्तांनी आणि राज्य सरकारने नियमावली तयार केलेली आहे. मुंबईतील निर्बंध कडक करण्यात आले असून, मुंबईकरांना मात्र आता स्वत: या नियमांचे पालन करणे गरजेच आहे, मात्र काही ठिकाणी तर लोकांकडून या नियमांचे पालन होत नसल्याचे पाहायला मिळत आहे.


नियमांचे पालन न करणाºयांवर, नियम तोडणाºयांवर दंडात्मक कारवाई होत असली, तरी त्यांच्यात जागृती होऊन त्यांनी सहकार्य करणे हाच उपाय आहे. सतत दंड भरून काही उपयोग नाही. दंड पाचशे रुपये वसूल केला, पण त्यामुळे दहा जणांना फैलाव झाला, तर त्यांचे हजारो, लाखो रुपयांचे नुकसान होते, साथीचा प्रसार होतो. त्याचे काय? पाचशे रुपयांत ते भरून येत नाही.

गेल्यावर्षी पालिकेने मास्क न लावणा‍ºयांकडून ८३ कोटी १८ लाख १८ हजार ५४५ इतका दंड वसूल केला आहे. पालिकेने तब्बल ४१ लाख ८५ हजार १९८ इतक्या लोकांकडून ही वसुली केली आहे. म्हणजे, विनामास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणा‍ºयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहून लोकांनी स्वत: भानावर असणे गरजेचे आहे. मुंबईत होणारी कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी पालिका मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेच, मात्र त्यासाठी जनतेनेही तितकेच सहकार्य करणे गरजेचे आहे. मुंबईतील रोग प्रसार हा फक्त मुंबईपुरता मर्यादीत राहात नाही. देशाची आर्थिक राजधानी आहे. आंतरराष्ट्रीय दृष्ट्या मुंबईचे महत्त्व पाहता येथे सातत्याने जगभरातून लोक येत असतात. त्यामुळे मुंबई महापालिकेंतर्गत कोणताही प्रश्न मुंबईचा नसतो तर तो देशाचा असतो.


महापालिकेकडून दिलेल्या नियमावलीनुसार बंदिस्त सभागृहांमध्ये आयोजित केल्या जाणा‍ºया कोणत्याही कार्यक्रमासाठी सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के व्यक्तींनाच उपस्थितीची परवानगी आहे. तर मोकळ्या जागेत होणा‍ºया कार्यक्रमासाठी जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के एवढ्याच संख्येने उपस्थितीला परवानगी असेल. त्याचबरोबर एखाद्या जागेतील कोणत्याही आयोजनात एक हजारापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणार असतील, तर त्यासंदर्भात स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आगाऊ सूचना देऊन त्याबाबतची पूर्वमंजुरी प्राप्त करणे अत्यावश्यक आहे. हॉटेल, उपहारगृहे, सिनेमागृहे व खासगी आस्थापनांसाठी कोविड नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, पण त्याचसोबत शाळा, सिनेमागृहे, उपाहारगृहे सुरू ठेवण्यावर देखील बंधने येण्याची शक्यता आहे. शाळा सुरू केल्यावर महिनाभरातच त्यावर बंदी घालायची वेळ आली असेल, तर शिक्षणाचे किती नुकसान होईल याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि खबरदारी घेतली पाहिजे. प्रत्येक गोष्ट सरकारने, प्रशासनाने केली पाहिजे असा आग्रह न धरता माझी काही जबाबदारी आहे याचे भान ठेवले पाहिजे. ही जबाबदारी म्हणजे नियमांचे पालन.

कोरोनाला आळा बसण्यासाठी पालिकेसोबतच जनतेनेही सतर्क राहणे गरजेचे आहे, म्हणजे लवकरच कोरोनाला रोखण्यात मुंबई यशस्वी होईल. पर्यायाने देशहिताचे काम होईल.

4/4/2022

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: