आज महाराष्ट्रातला विशेषत: मुंबईतील नागरिक सरकारच्या कामगिरीवर प्रचंड नाराज आहेत. कामगिरी म्हणायला काही केलीच नाही, निष्क्रियतेवर नाराज आहेत असे म्हटले तर जास्त योग्य ठरेल. सामान्य जनताच नाही तर ज्येष्ठ शिवसैनिकही नाराज आहेत. विधानभवनावर भगवा फडकला पाहिजे हे सर्वांचे स्वप्न होते आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला पण भगवा फडकलाच नाही, अशी अवस्था निर्माण झाली. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, पण मराठी माणसांना त्याचा काहीच फायदा झाला नाही. गेल्या दीड वर्षात या सरकारने मराठी माणसांचे हाल केले तेवढे ब्रिटिशांच्या काळातही झालेले नव्हते, असे ज्येष्ठ शिवसैनिक वैतागून म्हणतात, आपल्या भावना व्यक्त करतात.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे मैत्रीचे संबंध होते, पण सरकार स्थापनेबाबत, निवडणुका लढवण्याबाबत आणि राजकीय समीकरणात शिवसेनाप्रमुखांनी शरद पवारांना चारहात लांबच ठेवले होते. कारण शरद पवारांना जवळ करणे म्हणजे शिवसेनेचा घात करण्यासारखे आहे. ते आपल्या घरात शिरतील आणि शिवसेना संपवतील, तुकडे पाडतील. त्यामुळे त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली, युती केली, रिपाइंबरोबर एकत्र आले आणि शिवसेना, भीमसेना हे समीकरण जुळवले, पण शरद पवारांना लांब ठेवले होते. पण शिवसेनाप्रमुखांच्या रक्ताच्या वारसदारांनी आपल्याच वडिलांच्या विचारांना तिलांजली दिली आणि शरद पवारांना जवळ केले. उद्या हेच शरद पवार अनिल देशमुख, परमबीर सिंह प्रकरणात आमच्या सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत होते. असे सांगून त्यांच्या नावावर पावती फाडली तर काय होईल? केवढा मोठा धोका आज पत्करला आहे? शरद पवार बोलणी करण्यासाठी दोन तास वर्षावर जातात आणि त्या चर्चा गुप्त आहेत, त्यातील तपशील बाहेर पडू देत नाहीत, पण तो तपशील बाहेर आधीच पसरवला आहे. शरद पवारांचा डोळा मुंबई महापालिकेवर आहे. राज्यात मुख्यमंत्रीपद त्यांच्या पक्षाला मिळणे अवघड आहे. वीस वर्षांत फक्त उपमुख्यमंत्रीपदापर्यंतच राष्ट्रवादीला मजल मारता आलेली आहे. त्यामुळे त्यांनी आता मुख्यमंत्रीपदाचा नाद सोडला असला, तरी मुंबई महापालिकेवर पूर्णपणे नजर त्यांची आहे. संजय राऊत यांनी शिवसेना, राष्ट्रवादी एकत्रित निवडणुका लढवणार असे जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री तुमचा असला, तर मुंबईचा महापौर राष्ट्रवादीचाच असेल, ही मागणी नाही तर आदेश पवारांचा असणार आहे. त्यामुळे मुंबईची सत्ता आपल्या हाताने राष्ट्रवादीच्या, शरद पवारांच्या हातात सोपवण्याचे काम उद्धव ठाकरे करणार का, असा प्रश्न आता पडला आहे.
आज शिवसेनेचा वैचारिक वारसा जपणाºया शिवसैनिकांची मुंबईला गरज आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा जपणाºयांची आज गरज आहे. आज मराठी माणसांना या सरकारने देशोधडीला लावले आहे. लॉकडाऊन आणि निर्बंधांबाबत सगळे अधिकार प्रशासनाला दिलेले आहेत. प्रशासन अत्यंत मग्रुरीने वागून सामान्यांची छळवणूक करते आहे. राजकीय नेत्यांचे मेळावे, कार्यक्रम हजारोंच्या संख्येने होतात, पण सामान्य माणसांना नोकरी, कामधंद्यासाठीही बाहेर पडून दिले जात नाही. मराठी माणसांचे सगळे उद्योगधंदे बंद केले आहेत. येवले चहा, अमृततुल्य चहा, सद्गुरू चहा असे मराठी माणसांनी उभे केलेले चहाचे स्टॉल बंद पाडले आणि भय्ये लोकांच्या टपºया फक्त चालू ठेवल्या आहेत. अशा परिस्थितीत नावापुरते मुख्यमंत्रीपद असलेले शिवसेनेचे मुख्यमंत्री काहीच निर्णय घेत नाहीत. माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणून तुम्ही हात झटकले आहेत, तर लोकांना कामासाठी बाहेर पडू देत ना. ३१ जुलैच्या आत दहावी-बारावीचे निकाल लावायचे आहेत. त्यासाठी मूल्यांकनासाठी शिक्षकांना कामावर जाणे आवश्यक आहे, पण शिक्षकांना लोकलने प्रवासास बंदी आहे. त्यांनी जर कसेही निकाल लावले तर ३५ टक्केवाला पुढे जाईल आणि हुशार मागे पडेल, असे काही होईल. हा सगळा छळवाद या सरकारने मांडला आहे.
मराठी तरुणांच्या नोकºया गेल्या, त्यांना कामावर जाण्यासाठी वाहनाची सोय नाही, बस सर्वांना सोयीची नाही. लोकल प्रवासाला परवानगी नाही. तिकीट दिले जात नाही, पास दिला जात नाही. नेत्यांची घरात बसून पोटं भरली आहेत म्हणून सामान्यांना उपाशी ठेवायची दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यात जागृत झालेली आहे. त्यामुळे आता मराठी माणसानं, मराठी तरुणांनी घरातून बाहेर पडले पाहिजे. अत्यंत आक्रमकपणे लोकलने प्रवास केला पाहिजे आणि कामधंदा केला पाहिजे. हे सरकार एक दमडी तुम्हाला देणार नाही. दारूचे गुत्ते, बार चालवले जातील, पण सामान्य माणसाला कामाला अडवले जाईल अशी परिस्थिती या शासनाने केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी वेळीच प्रशासनाला आवर घालून जनतेची छळवणूक थांबवली पाहिजे. प्रशासनावर नियंत्रण नसलेले कधी सरकार असते का?
हे सरकार मराठी तरुणांना, माणसांना जगू देणार नाही. आपल्या जगण्यासाठी आपल्याला हातपाय हलवले पाहिजेत. बिनधास्त सगळ्यांनी लोकलने प्रवास करा. तिकीट दिले नाही तर विदाऊट तिकीट प्रवास करा. शेतकºयांप्रमाणे मराठी तरुणांनी आत्महत्या करावी, असे या सरकारला वाटत असले तरी तसे न करता बाहेर पडा, कामावर जाण्यासाठी लोकल प्रवास करा. भय्येलोक बिनधास्त विदाऊट तिकीट प्रवास करतात. लोकलमध्ये सामानाची विक्री करणारे, तृतीयपंथी सगळे प्रवास करतात. मग आपण का मागे राहायचे? बिनधास्त या सरकारच्या नाकावर टिच्चून बाहेर पडा. अजून जेमतेम सहा महिने यांच्या हातात आहेत. सहा महिन्यांनी मुंबई महापालिका शरद पवार हातातून काढून घेणार आहेत. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद, काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद आणि राष्ट्रवादीला मुंबईचे महापौरपद, असा डाव टाकला आहे. त्यात अडकल्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून काहीच अपेक्षा करता येणार नाही. त्यामुळे मराठी तरुणांनी आता आक्रमकपणे लोकल प्रवास करावा. पकडले तर तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी. घरात बसून नजरकैदेत असल्याप्रमाणे राहण्यापेक्षा पकडले गेलात तर तुरुंगात बसा, पण आपल्या न्यायहक्कासाठी हे जुलमी कायदे मोडा.
1 july
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा