गुरुवार, ६ मे, २०२१

पाच राज्यांतील निकाल आणि भाजपचे राजकारण


भारतीय जनता पक्ष हा अतिशय लवचिक पक्ष असून, त्यांचे राजकारण समजून घेणे हे तितकेसे सोपे नसते. याचे कारण भाजपचा पराभव हा त्यांचा विजय असतो आणि भाजपचे यश हे त्यांचे अपयश असते. भारतीय जनता पक्ष आज जो उभा आहे तो दुसरा पर्याय नाही म्हणून. म्हणूनच दुसरा पर्याय निर्माण होऊ नये यासाठी काही वेळा पराभव पत्करायचा आणि कधी प्यादं मागं घ्यायचं, कधी पुढं करायचं आणि आपले वजीर आणि राजे शाबूत कसे ठेवायचे हे त्यांचे राजकारण आहे. पूर्वी देशात काँग्रेसला पर्याय नव्हता. काँग्रेसमध्ये गांधी नावा व्यतिरिक्त नेतृत्व नव्हते. भाजपात व्यक्तीस्तोम नसले, तरी पक्ष महत्त्वाचा असतो. आज भाजपला पर्याय देणारे नेतृत्व आणि पक्ष कुठेही देशात नसल्यामुळे भाजप आपल्याला पाहिजे तसे निकाल लावू शकतो. या पाच राज्यांतील निकालांकडे तशाच दृष्टीने पहावे लागेल.


सुरुवात करायची, तर पश्चिम बंगालपासून सुरुवात करावी लागेल, कारण संपूर्ण देशाचे लक्ष प. बंगालच्या निवडणुकांकडे लागले होते. भारतीय जनता पक्षाने वर्षभर अगोदर तिथे ताकद लावली होती. वातावरण असे निर्माण केले होते की, आता ममता बॅनर्जींना पूर्णपणे घालवण्यासाठी भाजप तिथे घुसते आहे. तृणमूल काँग्रेसची सत्ता भाजप काढून घेणारच, असे वातावरण निर्माण केले गेले. प्रत्यक्षात भाजपला इथे मतांचा टक्का वाढवायचा होता. जेमतेम तीन आमदार असलेल्या भाजपला सत्ता मिळणे कदापि शक्य नव्हते. तीन पेक्षा कितीही जास्त जागांवर भाजपने यश मिळवले, तरी ते त्यांचे यशच होते. त्यामुळे दोन अंकी आकडा गाठला हे फार मोठे यशच आहे; पण मोठे स्वप्न पाहून काहीतरी हासील करायचा हा डाव होता. भाजपला स्थानिक प्रादेशिक राजकारणात बिलकुल रस नाही. त्यांना केंद्रातील सत्ता महत्त्वाची आहे. स्थानिक सत्ता प्रादेशिक पक्षांकडे गेली तरी चालेल. फक्त त्या ठिकाणी आपले चिन्ह राहिले पाहिजे. त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत झाला पाहिजे हे त्यांचे लवचीक, असे धोरण आहे. केंद्रातील नेतृत्वाला अडचणीचे ठरतील किंवा ज्यांचे उपद्रवमूल्य फार आहे, अशा नेत्यांना राज्याच्या राजकारणात अडकवून ठेवणे हेच भाजपचे फार मोठे धोरण आहे. याची सुरुवात २०१३पासून झाली.

दिल्लीच्या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष होता. हर्षवर्धन हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होते, तर आम आदमी पार्टी दुसºया क्रमांकावर होती, काँग्रेसच्या शीला दीक्षीत यांना फार मोठा पराभवाचा सामना करावा लागला आणि भाजपला थांबवण्यासाठी काँग्रेसने केजरीवालना मदत केली; पण केजरीवाल यांचे उपद्रवमूल्य काँग्रेसपेक्षा जास्त असल्याचे भाजपने ओळखले, कारण केजरीवाल यांनी थेट मोदींच्या विरोधात वाराणसीतून निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांच्याकडे दिल्लीसारखे छोटे राज्य दिले, तर ते तिथे खेळत बसतील, देश आपल्यासाठी मोकळा होईल. एखादी आई आपल्या बाळाला स्वयंपाक करताना त्रास देत असेल, आईच्या हातातील लाटणं, पोळपाट ओढून घेत असेल, तर एक कणकेचा गोळा देते आणि लाट पोळी म्हणते. ते बाळ दोन तास तिथे गुंतून पडते तोपर्यंत आईचा सगळा स्वयंपाक होतो, मग तो गोळा, पोळाची खेळणी सगळी आवरून टाकते. तोच प्रकार केजरीवालांच्या बाबतीत भाजपने केला. हाच फॉर्म्युला प्रत्येक राज्यासाठी त्यांनी राबवण्यास सुरुवात झाली.


आज जर पश्चिम बंगालची सत्ता भाजपने मिळवली असती, तर ममता बॅनर्जी मोकाट सुटल्या असत्या. केंद्रीय राजकारणाकडे वळल्या असत्या. अनेकवेळा छोटे पक्ष त्यांना भेटून तिसरी आघाडी करायचा प्रयत्न करत होते. अगदी शरद पवारांपासून शिवसेनेच्या नेत्यांपर्यंत सगळे भेटले होते; पण त्यांनी बंगालकडे लक्ष देण्याचे ठरवले. आघाडीला फारसे महत्त्व दिले नाही; पण हाच धोका ओळखून या वाघिणीला जर बंगालच्या जंगलातून हुसकावून लावले आणि तिचे जंगल, गुहा आपण घेतली तर ती दिल्लीत येऊन धुमाकूळ घालेल, कारण जखमी वाघीण नेहमीच धोकादायक असते. आघाडीच्या माध्यमातून ममतांच्या नेतृत्वाखाली पर्याय तयार झाला, तर काय होईल याची जाणीव असल्याने भाजपने मर्यादित यश मिळवायचे; पण गप्पा सत्तेच्या करायच्या हे धोरण आखले होते. फोडाफोडी करून जो पक्ष ९०च्या घरात संख्याबळ मिळवतो त्याला दिडशे जागा मिळवणे अवघड नव्हते; पण बंगालमधला टक्का वाढवायचा होता, २०२४च्या लोकसभेसाठी तो महत्त्वाचा होता, कारण २०२४ला महाराष्ट्रातून संख्याबळ कमी झाले, शिवसेनेची साथ नसल्याने ती कसर भरून काढण्यासाठी प. बंगाल महत्त्वाचे होते. भाजप ही विधानसभेची निवडणूक लढवत नव्हता, तर लोकसभेची तयारी करत आहे, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.

बिहारमध्ये नितीश कुमारांपेक्षा जास्त जागा असूनही भाजपने मुख्यमंत्रीपदावर दावा केला नाही, कारण जर सत्ता स्थापन झाली नसती आणि नितीश कुमार मुख्यमंत्री झाले नसते, तर ते केंद्रीय राजकारणाकडे वळले असते. मोदींना एनडीएत विरोध करणारे पहिले नेते नितीश कुमार आहेत. त्यामुळे त्यांचे उपद्रवमूल्य ओळखून लोकसभेत बिहारची मदत महत्त्वाची असल्याने नितीश कुमार यांना तिथे पेरून ठेवले आहे.


महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळवूनही भाजपने शिवसेनेची साथ सोडली आणि सरकार स्थापन केले नाही. यातही असेच राजकारण होते. २०१९च्या लोकसभा निवडणुकीनंतर यूपीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा झाली. यूपीएला योग्य नेतृत्व नसल्याने भाजपला पर्याय नव्हता. शरद पवारांचे उपद्रव मूल्य माहिती असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात किंग मेकर आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेत त्यांना अडकवून ठेवले आहे. त्यामुळेच प. बंगालमध्ये ते प्रचारालाही बाहेर पडले नाहीत. भाजपने त्यांना पूर्ण विश्वास दिला होता की, तिथे ममताच सत्तेवर येतील, तुम्ही प्रचाराला जाण्याची गरज नाही. अगदी रुग्णालयात राहून शांत उपचार घ्या. हे भाजपचे राजकारण समजून घेणे आवश्यक आहे. आज आम्ही जिंकू शकतो आणि पाहिजे तेव्हा हरूही शकतो हे भाजप दाखवत आहे. पंढरपूरच्या निकालात ते भाजपने दाखवून दिले आहे. बेळगावांतही त्यांनी ते नजरेस आणून दिले आहे.

तामिळनाडूत जयललिता आणि करुणानिधी या दोघांच्याही अनुपस्थितीत निवडणुका होत आहेत. तिथे सत्तांतर झाले आहे, तर दर पाच वर्षांनी सत्तांतर होणाºया केरळमध्ये परिवर्तन झाले नाही. या सगळ्यांत भाजपने दाखवून दिले आहे की, जे काँग्रेसबरोबर गेले ते गाळात गेले. केरळमध्ये काँग्रेसला अपयश आले. प. बंगालमध्ये काँग्रेस डाव्यांना घेऊन बुडाली आहे. भारतीय जनता पक्षाने आपली आसाममधली सत्ता आबाधीत राखली आहे. तर पुद्दुचेरीतही आघाडी कायम ठेवली आहे. भाजपच्या यश अपयशाच्या व्याख्या वेगळ्या आहेत. केव्हा हरायचं आणि केव्हा जिंकायचं हे दोन्हीही त्यांच्या हातात आहे. कारण समोर कोणताच पर्याय नाही. पंचवीस वर्षांपूर्वी आपण म्हणत होतो की, काँग्रेसला कोणी हरवू शकत नाही, काँग्रेसचा पराभव फक्त काँग्रेसच करू शकते. गब्बरसिंगच्या स्टाईलमध्ये काँग्रेस नेते फक्त काँग्रेसच काँग्रेसला हरवू शकते हे सांगत होते. आज तोच प्रकार भाजप करते आहे. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, असे ओरडून सांगणाºया फडणवीसांना त्यांच्याच नेत्यांनी आम्हाला पुन्हा यायचंय यासाठी तुम्ही थांबा, असं म्हटलं आहे. याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.


प्रादेशिक, विधानसभा निवडणुकांमधील आणि लोकसभा निवडणुकीतील भाजपचे राजकारण वेगळे असते; पण जे काही राजकारण केले जाते, ते केंद्रातील स्थिरता कायम राखण्यासाठी चालले आहे. त्या दृष्टीने या निकालांकडे पाहिले तर कोण हरले, कसे हरले हे लक्षात येईल.

- प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स

2 may


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: