पंढरीची वारी म्हणजे संतांची मांदियाळी असते. आपण संत आहे असे कोणी म्हणत नाही, पण जे खरे संत असतात ते या मार्गावर भेटतात. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. इथला पालखीचा मार्ग ही संतांच्या पावनस्पर्शाने पवित्र झालेला आहे. म्हणूनच या मार्गाचा दिवसेंदिवस महामार्ग होत गेला. ज्ञानदेवांनी किंवा त्यांच्या अगोदरही असलेली पायवाट आज महाराष्ट्राची महावाट झालेली आहे. या पालखीच्या मार्गावरून जाताना तो जो सोहळा बघायला मिळतो त्याचा आनंदच काही और असतो.या वारीतून जाताना भजन, कीर्तन, नामस्मरण हेच महत्वाचे असते. या वारीच्या इतिहासात अनेक नावे घ्यावी लागतील. त्यामध्ये हैबतबाबा हे एक नाव महत्वाचे आहे. हैबतबाबा हे सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे देशमुख होते . हैबतबाबा यांच्या प्रेरणेने या पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आधुनिक संगणक युगातही वारीची ही परंपरा समाजातील सर्व स्तरांतील लोकांचा आस्थेचा विषय असल्याचे दिसून येते. या वारीमध्ये असलेल्या मानाच्या पालख्यांचे दर्शन घेणे महत्वाचे ठरते. त्यामध्ये पहिला मान आहे तो ज्ञानोबांचा.ज्ञानदेवांची पालखी :- हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी-समारंभांसह, थाटाने ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली. तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आहे. श्री ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती, घोडे वगैरे लवाजमा श्रीमंत राजेसाहेब (औंध) यांच्याकडून येत असे. या खर्चास साहाय्य त्या त्या वेळचे राजे व श्रीमंत पेशवे सरकार करीत असे. पुढे कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होत असे. सरकारने 1852 मध्ये पंचकमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली. म्हणजे किती जुनी ही परंपरा आहे हे सांगण्यासाठी हे उदाहरण यासाठी सांगितले आहे.तुकोबांची पालखी :- तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे ज्ञानदेव-नामदेवांच्या समकालीन होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी होती. स्वतः तुकोबा चौदाशे टाळकरी घेवून प्रत्येक शुद्ध एकादशीस पंढरपुराला जात असत. तुकोबांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले. वारीची परंपरा त्यांनी चालू ठेवलीच पण देहू देवस्थानची सर्वांगीण वाढही केली. ज्ञानोबा माउली तुकाराम तुकाराम या गजराशिवाय वारी पूर्ण होत नाही. या वारीत या दोन महान संतांची नावे ही विठोबा माउलींच्या बरोबरीने घेतली जातात. हे काम संतांनी निरपेक्षपणे केलेले आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ज्ञानोबा-तुकाराम या दोघांच्या पालख्या निघत असत. त्यानंतर निवृत्तीनाथ,सोपानदेव, मुक्ताबाई, जनार्दन स्वामी, एकनाथ, सावता माळी, रामदास स्वामी या संतांच्या पालख्याही दर्शनासाठी पंढरीस येतात. आज महाराष्ट्राच्या विविध भागांतून पालख्या येतात व यात लाखो भाविक सहभागी होतात.ज्ञानोबा -तुकाराम च्या जयघोषात, अभंग म्हणत, पारंपरिक खेळ खेळत या पालख्या पंढरपूरला जातात. असंख्य संतांच्या असंख्य पालख्यांनी ही वारी मोठी होत गेली आहे.दरवर्षी लाखो भाविक या वारीतून पंढरपूरला जात असतात. पण या वारीत कधी कोणी चुकत नाही. कारण ही चुकणरांची वारीच नव्हे. इथे आल्यावर सगळे बरोबर होतात. आपल्या चुका सुधारतात. चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर येणारा हा पंथ आहे. साधे उत्सव असतात, लग्न कार्यातही माणसे चुकली, हरवली अशी तक्रार येते. पण इथे माणूस न चुकता बरोबर जात असतो. कारण या वारीचे रक्षण करण्यासाठी वारीबरोबर साक्षात पंढरपूरचा विठोबा येत असतो. जो तारणहार आहे, जो सर्वांचे रक्षण करणारा बरोबर आहे, तो असल्यावर काळजी कसली आहे? हा भाव प्रत्येकाच्या मनात असतो म्हणूनच ही वारी अत्यंत पवित्रणपणे, आनंदाने, समाधानाने पंढरपुरात पोहोचते. सर्वांना माउलीचे दर्शन घडते. आजकाला कोणत्याही गोष्टीकडे इव्हेंट म्हणून पाहिले जाते. त्याची मॅनेजमेंट केली जाते. तो इव्हेंट चांगला होण्यासाठी विशेष तज्ज्ञ अशा इव्हेंट मॅनेजरची नेमणूक केली जाते. त्याच्या देखरेखीखाली ही कामे केली जातात. अगदी यंत्रवत कार्यक्रम होतात. त्यामध्ये लग्नापासून ते आजच्या राजकीय लोकांच्या सभा समारंभापर्यत इव्हेंट मॅनेजमेंटच्या कंपन्यांकडे कामगिरी सोपवली जाते. तरी त्यात खंडीभर चुका, अडचणी, कमतरता राहते. उणिवा निघतात. रूसवे फुगवे, भांडण निर्माण होतात. पण कसलीही तांत्रिक यंत्रणा नसताना, कोणीही इव्हेंट मॅनेजर नसताना केवळ विठोब्बाचे दर्शन या उद्देशाने एक आलेले वारकरी कसल्याही अडथळ्यांशिवाय ही शर्यत ही वारी पूर्ण करतात. आज या वारीला जाण्यासाठी केवळ महाराष्ट्रातून नाही तर संपूर्ण भारतातून वारकरी; पालखी सोहळ्यात सहभागी होतात हे याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. वारीला जाणा-या वारकरी भक्तांच्या सोयीसाठी दिंडी संकल्पनेची योजना असते. प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख असतो. प्रमुख व्यक्ती स्त्री किंवा पुरुष कुणीही असते. काही धार्मिक संस्थाने, मंदिरे यांच्या दिंड्याही वारीत सामील होतात. वारकरी मंडळींची निवास-भोजन तसेच अन्य सुविधा यांची व्यवस्था प्रत्येक दिंडीमार्फत केले जाते. मुक्कामाच्या ठिकाणी दिंडीचे संबंधित सदस्य पुढे जाऊन अशा सर्व व्यवस्था करीत असतात. या नोंदणीकृत दिंड्याना क्रमांक दिलेले असतात. वारीत रथाच्या पुढे व पाठी अशा क्रमांकानेच या दिंड्या मार्गस्थ होत राहतात. हा एक शिस्तीचा भाग आहे असे मानले जाते. हे दिंडीला क्रमांक असले तरी यात मान पानाला स्थान नसते. म्हणजे आपल्याकडे गणेशोत्सव मंडळात पहिला मान कोणाचा, रांगेत मिरवणुकीत कितव्या क्रमांकावर आमचा गणपती, आमचे मंडळ असणार यावरून वाद होतात. पण इथे फक्त क्रमां असतात ते सोयीचे. पहिला क्रमांक हा माउलींचाच असतो. इथे प्रत्येजण माउली असतो. प्रत्येकामध्ये प्रत्येकाला माउलीच दिसत असते. त्यामुळेच पहिला कोण आणि शेवटचा कोण असले किरकोळ विचार कोणाच्या मनालाही शिवत नाहीत. इथे ना कुणी पुढे असतो ना कुणी मागे असतो. इथे फक्त सगळे एकमेकांच्या बरोबर असतात. कारण सगळेजण बरोबर असतात. बरोबर असणारांचा हा पंथ आहे. म्हणूनच या कोरोनाला बरोबर करायलाही आमचा भक्तीभाव पुरेसा आहे. ही वारी यावर्षी हाच संदेश देत आहे की आज कोणीही आम्हाला रोखले असेल, निवडक पन्नासजण जरी पंढरपूरला गेलेले असतील तरी आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. ते आमच्या बरोबर आहेत. आम्ही बरोबर पोहोचलो आहोत.आमची ही दिंडी आज 50 जणांची असेल, गाडीने किंवा अगदी सोयीसाठी हेलीकॉप्टने नेली जाणार असेल, फक्त कोरोनाच्या संकटामुळे चार लोकांनाच पंढरपुरात एकादशीला दर्शनासाठी नेले जाणार असेल तरीही आमचे पाय जमिनीवर आहेत. आमच्या हृदयातील विठ्ठलाचे दर्शन घेण्यापासुन आम्हाला कोणीच रोखलेले नाही. हृदयातील मंदीरातील विठ्ठलाला पाहूनच आम्ही म्हणू की पंढरीनाथ महाराज की जय।प्रफुल्ल फडके/ 9152448055
रविवार, २१ जून, २०२०
संतांची मांदियाळी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा