जन्माचा वाद कशासाठी?

संपूर्ण देशभरात श्रद्धेचे स्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा जन्मस्थळाच्या वादातून रविवारपासून बेमुदत शिर्डी बंद पुकारण्यात आला आहे. शनिवारी झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. बंद काळात साईबाबांचे मंदिर सुरू राहणार आहे. त्यामुळे भाविकांनी, पर्यटकांना शिर्डी संस्थानच्या सुविधांवर अवलंबून राहावे लागणार आहे. काही दिवसांपूर्वी परभणीतील पाथरी येथे साईबाबांचा जन्म झाला, असा दावा स्थानिकांनी केला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौºयावर असताना काही लोकांनी साईबाबांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी केल्यानंतर साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीच्या विकासासाठी राज्य सरकारने विकास आराखडा तयार केला असून, त्याचे भूमिपूजन लवकरच केले जाईल, अशी घोषणा केली. त्यानंतर शिर्डी ग्रामस्थही आक्रमक झाले. यावर भरपूर चर्चा झाल्या, वाहिन्यांवर काथ्याकुट झाला, पण यामध्ये प्रतिक्रिया देणाºया ग्रामस्थांची वक्तव्ये पाहिली तर हा वाद जन्मस्थानाचा नसून सेना आणि भाजपचा वाद आहे काय, असा प्रश्न पडतो.साईबाबांचा जन्म, धर्म याबाबत साईचरित्रात स्पष्ट लिहिलेले असतानाही अनेक ठिकाणी साईबाबांच्या जन्मस्थानाचे दावे केले जात असून, त्यातून साईबाबांच्या सर्वधर्म समभावाच्या विचारालाच नख लावण्याचा प्रयत्न होत आहे. काही लोकांनी तर साईबाबांना विशिष्ट धर्मात अडकवण्याचा प्रयत्न केला असून, तो निंदनीय असल्याची भावना शिर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केली. आता इथे धर्माचा संबंध काय आला? पण ग्रामस्थ अशा तºहेच्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे त्यांना राजकीय प्रभावाने कोणीतरी भडकवले असेल, चुकीची माहिती दिली असेल असेच दिसते. केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौºयावर असताना परभणीत अशी घोषणा केल्यामुळे शिर्डीकर आक्रमक झाले आहेत. परभणीत शिवसेनेची ताकद आहे, तर नगर जिल्ह्यात विखे-पाटील, सुजय पाटील यांच्यामुळे भाजपची ताकद आहे. त्यामुळे साईबाबा शिर्डीत जन्माला आले की पाथरीत हा वाद रंगवला जात असावा, असेच दिसते. या वादाला जन्मस्थानाचा वाद न म्हणता राजकीय वादच म्हणावे लागेल. पाथरी ग्रामस्थांच्या दाव्याचा निषेध करण्यासाठी संतप्त शिर्डीकरांनी रविवारीपासून शिर्डी बंदची हाक दिली आणि हा बंद सुरू झाला. आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी ग्रामस्थांनी शनिवारी तातडीची ग्रामसभा बोलावली होती. यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिर्डी ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत. सोमवारी मुख्यमंत्र्यांनी याबाबत एका बैठकीचे आयोजन केले आहे. हा बंद करू नये, असे आवाहनही त्यांनी केले होते. परंतु तरीही हा केलेला बंद चुकीचा आहे. देव मानणाºयांनी देवाला आणि भक्ताला वेठीस धरले आहे असेच म्हणावे लागेल.
अर्थात हा बंद असला तरीही साईबाबा समाधी मंदिरातील दर्शन, मंदिरातील सर्व आरती व सर्व धार्मिक विधी, संस्थानचे साईप्रसादालय, सर्व भक्त निवासस्थाने, रुग्णालये या सुविधाही नियमितप्रमाणेच सुरू राहणार असल्याची माहिती शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. त्यामुळे भक्तांची कुचंबणा होणार नाही हे जरी निश्चित असले, तरी दुकाने आणि अन्य सेवा बंद असल्यामुळे पर्यटक, भक्त तिकडे जाण्याचे टाळत आहेत हे नक्की.वास्तविक पाहता जन्म कुठे झाला हे फारसे महत्त्वाचे नाहीच. जन्म पाथरीत झाला असला, तरी शिर्डीचे महत्त्व कमी होईल, अशी भीती का वाटते हा खरा प्रश्न आहे. ही भीती शिर्डीचे महत्त्व कमी होईल ही आहे, की राजकीय महत्त्व कमी होईल याची आहे हे समजले पाहिजे. प्रत्येकाचे जन्मस्थळ वेगळे आणि कर्मस्थळ वेगळे असते. त्यामुळे कोणाचे महत्त्व कमी होण्याचे काहीच कारण नाही. संत रामदास स्वामी यांचा जन्म मराठवाड्यातील जांब या गावी झाला होता, तर त्यांची कर्मभूमी सातारा जिल्ह्यातील सज्जनगड, चाफळ, रायगडमधील शिवथरघळ ही राहिली आहेत. जांब गावी जन्म झाल्याचे बोलल्याने सज्जनगडचे महत्त्व कमी झाले नाही की शिवथरघळीचे. देव, संत हे आपली स्थाने बदलत असतात. दत्ताची अनेक स्थाने आहेत, गांडगापूर, करंज, नृसिंहवाडी, औदुंबर अशी स्थाने आहेत, पण नृसिंह सरस्वती, श्रीपाद सरस्वती यांची जन्मस्थाने वेगळी होती. त्याचा काही परिणाम देवस्थानावर झालेला नाही. अगदी द्वापारयुगात श्रीकृष्णाचे जन्मस्थान कालकोठडी असले, तरी त्याचे महत्त्व गोकुळात, त्यानंतर मथुरेत आणि मग द्वारकेत पसरत गेले. ती स्थाने मोठी झाली. त्यामुळेच शिर्डीच्या साईबाबांचा जन्म हा पाथरीला झाल्याचे सिद्ध झाल्याने काही कोणाच्या झोळीत धोंडा पडेल असे नाही. शिर्डीचे साईबाबाऐवजी पाथरीचे साईबाबा असा उल्लेख कुठेही केला जाणार नाही. मनोजकुमारने १९७५ साली काढलेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटाचा सिक्वल मनोजकुमार ‘पाथरी के साईबाबा’ म्हणून काढणार नाही. मनमोहन देसाई अमर अकबर अँथनीमध्ये असलेल्या ऋषी कपूरच्या गाण्याचे ‘शिर्डीवाले साईबाबा...’ या गाण्यात बदल करून ‘पाथरीवाले साईबाबा..’ असे गाणे बदलले जाणार नाही. त्यामुळे जन्मस्थानाचा वाद हा अकारण आहे. ते केवळ आणि केवळ राजकारण आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
शिर्डीचे नागरिक ही फार मोठी चूक करत आहेत. आपली व्यापारी बाजारपेठ बंद ठेवून ते आपले नुकसान करत आहेत. ज्या बाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिलेला आहे तो सबुरीचा सल्ला मानत नाहीत असेच दिसते आहे, कारण त्यांना भडकावणारे कोणी राजकीय असावेत. त्यामध्ये सेना आणि भाजप असाच संघर्ष दिसतो आहे. सेनेची पाथरी आणि भाजपची शिर्डी असे त्याला स्वरूप आलेले आहे, म्हणून हा बनाव असल्याचे दिसते आहे. देव आणि श्रद्धास्थानाचे राजकारण करणे आता थांबवावे हे नक्की. पाथरीत जन्म झाला असला, तर साई हे स्वरूप आओ साई या संबोधनाने शिर्डीतच झालेले आहे. त्यामुळे जन्माचा वाद न घालता हे राजकारण थांबवावे हेच योग्य.कधी कोणाची जन्मभूमी म्हणून कधी कोणाच्या जन्मतारखेवरून, तर कधी जन्मस्थानावरून वाद निर्माण करण्याची आणि राजकारण करण्याची सवय सर्वच राजकीय पक्षांनी बंद केली पाहिजे. अयोध्येतील जन्मभूमीचा वाद दशकानुदशके आहे. छत्रपती शिवरायांच्या जन्मतारखेचा वादही असाच घालून तीन तीन वेळा शिवजयंती साजरी केली जाते. आता हा नवा साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद घातला जात आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. राजकीय नेत्यांनी आणि पक्षांनी असे वाद थांबवले पाहिजेत. यावरून कोणी राजकारण करत असेल आणि त्याला वेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते तातडीने थांबवले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा