मंगळवार, ३ एप्रिल, २०१८

नारायण राणेंचे पुढचे पाऊल

महाराष्टÑाचे माजी मुख्यमंत्री आणि अभ्यासू नेते नारायण राणे यांची दिल्लीच्या राजकारणात एन्ट्री झाली आहे. आजवरच्या सर्व पदांचा यशस्वी कारभार करुन त्यांनी दिल्लीत ठेवलेले पाऊल हेअत्यंत महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळेच महाराष्टÑाच्या राणेंकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. ज्यांच्याकडून काही घडू शकते त्यांच्याकडूनच अपेक्षा ठेवल्या जातात. म्हणूनच राज्यसभेवर नारायण राणे यांची झालेली निवड, त्यांचा दिल्लीच्या राजकारणात झालेला शिरकाव याची जोरदार चर्चा माध्यमांमधून झाली. विशेषत: राणे विरोधक शिवसेना गटाने त्यांच्या दिल्लीतील आगमनाची धास्तीच घेतली. कारण दिल्लीत नारायण राणे यांचा प्रवेश होणे म्हणजे विकासाची गंगा महाराष्टÑात वळवण्यात त्यांचे भगिरत प्रयत्न सुरु होणार. जे महाराष्टÑातून अनेकवेळा जाऊन कोणालाही जमले नाही ते राणे करुन दाखवणार. त्यामुळे वर्षानुवर्षे दिल्लीत ठाण मांडून बोलबचनगिरी करणाºया शिवसेनेच्या अनेक खासदारांना काळजी वाटणे साहजिक आहे. कारण त्यामुळे त्यांचे नाकर्तेपण उघड होण्याची शक्यता आहे. पण नारायण राणे हे महाराष्टÑाच्या भल्यासाठी, महाराष्टÑाच्या विकासाला एक नवी दिशा देण्यासाठी ते दिल्लीत गेले आहेत. नारायण राणे हे दिल्लीत राजकारणासाठी नाही तर विकासकारणासाठी, समाजकारणासाठी गेलेले आहेत. त्यामुळे महाराष्टÑाच्या अपेक्षा त्यांच्याकडून वाढलेल्या आहेत. नारायण राणे यांनी आजपर्यंत जी कोणती जबाबदारी स्विकारली ती त्यांनी अत्यंत कार्यक्षमपणे यशस्वी केलेली आहे. त्याय पदावर, जबाबदारीवर त्यांनी स्वत:ची छाप सोडून त्या पदाची शान वाढवलेली पहायला मिळते. म्हणूनच दिल्लीच्या दिशेने टाकलेले पाऊल हे नारायण राणे यांच्या आयुष्यातील नव्हे तर महाराष्टÑाच्या विकासातील महत्वाचे पाऊल म्हणावे लागेल. आजवर महाराष्टÑाने या देशाला खूप काही दिले. मुंबईने या देशाला खूप काही दिले. पण त्या प्रमाणात मुंबई आणि महाराष्टÑाला दिल्लीकडून फारसे काही मिळत नाही. ही तमाम मराठी माणसांची खंत आहे. पण दिल्लीतून महाराष्टÑाला जे काही मिळवायचे आहे ते आणण्यासाठी खंबीर नेतृत्व असावे लागते, अभ्यासू नेतृत्व असावे लागते. त्याचा अभाव असल्यामुळेच हा बॅकलॉग कायम महाराष्टÑाला सहन करावा लागला. सरकारी योजनांचा फायदा बाकीची राज्य ज्या प्रमाणात घेतात त्या प्रमाणात महाराष्टÑ घेत नाही असे अनेकवेळा निरिक्षणातून दिसून आले आहे. पण त्यासाठी सक्षम महाराष्टÑाचे प्रतिनिधी तिथे असायला पाहिजेत, त्याचा अभाव होता. ही कमतरता नारायण राणे यांच्या रुपाने भरुन निघणार आहे. याचाच महाराष्ट्राला आनंद झाला आहे. म्हणूनच नारायण राणे यांचे राज्यसभेत जाणे हे चर्चेत राहिले. नाहीतर राज्यसभेचे अनेक नेते आहेत की ज्यांनी महाराष्टÑाला काय दिले असे विचारले तर सांगताही येणार नाही. कारण कामे कशी करायची असतात हेच त्यांना माहिती नसते. नारायण राणे यांची हीच जमेची बाजू महाराष्टÑाच्या फायद्याची ठरणार आहे. महाराष्टÑाच्या विकासाच्या राजकारणाचे स्वप्न ज्यांनी पाहिले त्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचे नाव घ्यावे लागते. त्यानंतर फार मोठी पोकळी दिसून येते. यशवंतराव चव्हाणांचे धोरण होते की कोणत्याही कार्यकर्त्याने जिल्हा परिषदेच्या दोनपेक्षा जास्त टर्म थांबू नये. त्यानंतर राज्याच्या राजकारणात येऊन विधीमंडळाचे सदस्य होता येते का हे पहावे. आमदारकीच्या दोन टर्म झाल्यानंतर मंत्रिपदाचा अनुभव मिळाल्यानंतर त्यांनी दिल्लीच्या राजकारणात शिरले पाहिजे. दिल्लीतून विकासाची गंगा आणण्यासाठी आणि आपल्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी असे टप्प्याटप्प्याने काम करणारे नेते देशाला भरभरून देऊ शकतात. नारायण राणे यांचे नेमके तसेच झालेले आहे. प्रत्येक पदावर आपली मजबूत अढळ अशी छाप पाडून महाराष्टÑाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते दिल्लीत दाखल होत आहेत, याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांचे अभिनंदन करायला हवे. मुंबई महापालिका ते राज्यसभा हा झालेला नारायण राणेंचा झालेला प्रवास म्हणजे विकासाचा राजमार्ग आहे. युती सरकारच्या काळात महसूल, दुग्ध विकास, पशुपालन, मत्स्य आणि खारभूमी, पुनर्वसन या मंत्रिपदाचा जो कार्यकाळ होता तो अत्यंत अभ्यासपूर्ण आणि राज्याला गतीमानता देणारा होता. त्या अभ्यासूपणामुळेच त्यांची निवड मुख्यमंत्रीपदासाठी झाली. त्यांना मुख्यमंत्रीपदाचा कालावधी फार कमी मिळाला असला तरी आजही त्यांच्या कारकिर्दीचे नाव सर्वत्र घेतले जाते. याचे कारण पेंडिंग हा शब्द त्यांनी आपल्या शब्दकोशातूनच काढून टाकला होता. प्रशासनाला पळवायला लावून लोकांची कामे कशी पटापटा करता येतील याकडे लक्ष दिले होते. खोटी आश्वासने आणि गुळगुळीत बोलून वेळ मारून नेण्याचा खोटेपणा त्यांनी कधी केला नाही. त्यामुळे त्यांची प्रशासनावर मजबूत पकड होती. त्या काळात प्रचंड विकासकामांचा धडाका त्यांनी लावला. महाराष्टÑाला तेच राणे हवे आहेत. युतीची सत्ता गेल्यानंतर आघाडीचे सरकार आले त्यात विरोधीपक्ष नेते म्हणून त्यांनी काम केले. विरोधी पक्ष नेता कसा असावा याचा उत्तम आदर्श परिपाठ त्यांनी घालून दिला. मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या तोडीस तोड काम त्या आसनावर बसून करता येते आणि सरकाराला कामे करायला भाग पाडता येते हे त्यांनी दाखवून दिले. सभागृहात केलेल्या चर्चा दीर्घ भाषणांनी सरकारला त्यांनी अक्षरश: घाम फोडला होता. हे करण्यासाठी अभ्यास, इच्छाशक्ती असावी लागते. ती नारायण राणे यांच्याकडे भरपूर असल्यामुळे त्यांनी ते करुन दाखवले. म्हणूनच नारायण राणे काँग्रेसमध्ये आल्यानंतर विरोधीपक्षनेतेपदाची शान गेली. ती आजही कोणत्याही विरोधीपक्ष नेत्याला जमलेली नाही. विरोधीपक्ष नेतेपद हे गोंधळ घालण्यासाठी नाही तर चर्चेतून सरकारला कामे करण्यास भाग पाडण्यासाठी असते, त्यासाठी अभ्यास असावा लागतो हे नारायण राणे यांनी दाखवून दिले. आघाडी सरकारमध्ये त्यांनी उद्योग, महसूलपदावर काम केले. या मंत्रिपदाच्या कारकीर्दीत त्यांनी आणलेली गुंतवणूक, विकास, घेतलेले निर्णय, राबवलेली धोरणे ही राज्याच्या विकासाला दिशा देणारी ठरलेली आहेत. म्हणूनच नारायण राणे यांचे दिल्लीत झालेले आगमन हा महाराष्टÑाच्या विकासाच्या टप्प्यातील महत्वाचा दिवस आहे. कारण महाराष्टÑ मोठ्या अपेक्षेने त्यांच्याकडे पाहतो आहे. त्या अपेक्षा नारायण राणे पूर्ण करतील यात तीळमात्र शंका नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: