इथं शंकेला वाव आहे
मुंबईतील क्राईम रिपोर्टर म्हणून विख्यात असलेल्या ज्योतीर्मय डे यांचे मारेकरी पकडले गेल्यामुळे पत्रविश्वात समाधानाचे वातावरण पसरले असले तरी त्यामुळे एक वेगळे आणि नको ते सत्य समोर आले आहे. यामध्ये पत्रकारांचे आणि गुन्हेगारी जगताचे संबंध दृढ होत आहेत का असा प्रश्न यामुळे निर्माण होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये विविध वृत्तवाहिन्यांवर दाखवलेल्या बातम्यांचा रोख हा छोटा राजन, छोटा शकील, दाउद इब्राहीम यांच्यासंबंधी होता. या बातम्यांमध्ये छोटा राजनच्या टोळीनेच जे डे यांचा कसा खून केला याचे सविस्तर वर्णन चित्रफीतीसह दाखवले गेले. कुठून कसा कुठपर्यंत पाठलाग केला गेला आणि कसा गोळीबार केला याचे साग्रसंगीत वर्णन आणि दृष्य या वाहिन्यांनी दाखवली. जे डे यांची धावणारी मोटरसायकल. तिच्या पाठोपाठ छोटा राजनचे शार्प शूटर सतीश काल्या आणि त्याची गँग कशी पाठलाग करीत होती हे सगळे सविस्तर दाखवले गेले. त्यानंतर जे चर्चाचर्वण सर्वच वाहिन्यांवर झाले त्यामध्ये जे डे हे छोटा राजनला सोडून दाउदकडे झुकल्यामुळे राजनने जे डेंच्या हत्येची सुपारी दिली असे म्हटले आहे. मनाल अतीशय वेदना करणारी गोष्ट ही आहे. छोटा राजनची, छोटा शकीलची आणि डी गँगची इत्थंभूत माहिती जे डेंकडे होती. पोलिसांनी त्यांचे सर्व मेल चेक केल्यावर जे डे त्यांच्या संपर्कात असल्याचे तपासात दिसून येत आहे. याचा नक्की काय अर्थ होतो? पत्रकार, रिपोर्टर तपास करताना सहजपणे या गुन्हेगारी जगापर्यंत पोहोचू शकतात. पण आमचे पोलिस खाते का पोहोचू शकत नाही? पोलिसांकडे दोन हात करण्याची ताकद आहे. पत्रकारांना फक्त लेखणीच्या जोरावरच लढायचे आहे. तरीही ते अशा धोक्याच्या ठिकाणांपर्यंत पोहोचू शकतात मग पोलिसांना हे का शक्य होत नाही हा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. आपल्याकडे चित्रपटसृष्टी म्हणजे बॉलीवूड आणि गुन्हेगारी जगताचे जवळचे संबंध असल्याबाबत नेहमीच चर्चा होताना दिसते. दाउदच्या वाढदिवसाला किंवा त्याचा मुलाचा वाढदिवसाला अनेक तारे तारका आखाती देशात भारताबाहेर गेल्याची वृत्तही प्रसारीत झालेली आहेत. यामध्ये अगदी जॉनी लिव्हरपासून संजय दत्तपर्यंत सगळ्यांनी हजेरी लावलेली दिसून येते. म्हणजे दाउद हा मोस्ट वाँटेडच्या यादीत असल्यापासून हे प्रकार घडताना दिसत आहेत. चित्रपट तारे तारका दाउद पर्यंत पोहोचू शकतात, पत्रकार पोहोचू शकतात मग पोलिसच का पोहोचू शकत नाहीत हा खरा प्रश्न आहे. तीच चिंतेची गोष्ट आहे. यामध्ये पोलिसांचा हलगर्जीपणा आहे की सरकारचा हस्तक्षेप असल्यामुळे या गुन्हेगारी जगतापयर्र्त पोलिस पोहोचू शकत नाहीत हे सत्य आता समोर येणे गरजेचे आहे. जे डे च्या हत्येच्या निमित्ताने हे जळजळीत सत्य, सरकारी, राजकीय आणि पोलिसांचा चेहरा समोर येणे आता गरजेचे आहे. हे काही आजच घडते आहे असे नाही. कर्नाटकातील चंदन तस्कर विरप्पन याने अभिनेता राजकुमारचे अपहरण केले होते. राजकुमार हा जवळपास दोन महिने विरप्पनच्या ताब्यात होता. त्यावेळीसुद्धा असेच प्रकार घडलेले दिसून येतात. विविध चॅनेल आणि पत्रकारांच्या माध्यमातून, कॅसेट पाठवून हा विरप्पन गृह मंत्रालयाकडे एकेक मागण्या करीत होता. पत्रकारांपर्यंत विरप्पन पोहोचत असताना विरप्पन नक्की कोठे आहे याचा ठावठिकाणा नसल्याचे सरकार जाहीर करत होते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या तीन सरकारांनी यासाठी प्रयत्न केले पण अनेक दशके विरप्पन आपल्या कारवाया करीत राहिला. ज्या पत्रकारांचे, सिनेतारकांचे, कलाकारांचे कोणत्याही कारणाने का होईना गुन्हेगारी जगताशी संबंध येतात आणि त्याबाबत बातम्या प्रसिद्ध होतात तेव्हा सरकार, गृहखाते, पोलिस यंत्रणा सक्रीय का होउ शकत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी छोटा राजनच्या कारवाया थंड झाल्याचे बोलले जात होते. भरत नेपाळीसारख्या नव्या गँग सक्रीय झाल्याचे बोलले जात असतानाच छोटा राजनने पुन्हा डोके वर काढले कसे? जे डे यांच्याकडे छोटा राजनबाबत बरीच माहिती होती. एकाच वेळी ते छोटा राजन, छोटा शकील, दाउद इब्राहीम यांच्या संपर्कात असल्याचे दिसून येते. छोटा राजन आणि दाउद हे एकमेकांना पाण्यात पाहणारे दुष्मन. या दोघांशीही जे डे यांची ओळख होती, संपर्क होता. त्यामुळे आपली माहिती दाउदकडे जाईल या भितीने छोटा राजनने जे डे यांचा गेम केला असे बातम्यांमध्ये म्हटले जात आहे. पोलिसही हा गेम ज्याप्रकारे झाला होता त्याप्रकारावरून हा गेम प्रोफेशनल शार्प शूटरने केला असल्याचे जाहीर करत होते, त्यांची संशयाची सुईही छोटा राजनच्याबाजूला वळत होती. त्यामुळेच हा सगळा प्रकार संशयास्पद वाटण्यासारखा आहे. हत्या झाल्यानंतर लगेच छोटा राजनचे नाव पुढे येणे आणि पोलिसांनी तसे बोलून दाखवणेही आश्चर्याचे आहे. जो तर्क पोलिसांनी व्यक्त केला त्याच गँगकडून जे डे यांची हत्या झाल्याचे काही दिवसांनी निष्पन्न होणे, ज्या विशेष पथकांनी तीन गट करून तीन ठिकाणी जाउन या सात जणांना ताब्यात घेतले ते पकडणेही वादग्रस्त आहे. जे डे गेल्यानंतर ते दाउद आणि राजनच्या संपर्कात असल्याचे जाहीर केले जात असले तरी जे डे यांचे क्राईम रिपोर्टर असल्यामुळे पोलिस अधिकार्यांशीही संबंध येत असणारच. चर्चेमध्ये गुन्हेगारी जगतावर बोलले जात असणारच. गुन्हा काय घडला आहे हे छापणे म्हणजे क्राईम रिपोर्टींग आहे काय? या गुन्ह्याच्या बातम्यांमुळे गुन्हे तपासाला प्रोत्साहन मिळणे हे महत्त्वाचे असते. जे डे यांनी दाउद, शकील, राजन या टोळ्यांसंबंधी चर्चा पोलिसांशी केली नसेल असे कसे म्हणता येईल? मनात आणले असते जे डे यांच्याकडून माहिती घेउन दाउदपर्यंत, शकील, राजनपर्यंत पोलिस सहज पोहोचू शकले असते. अमेरिकेने ओसामा बिन लादेनला ठार केल्यानंतर आम्हीही आता दाउदला पकडणार अशा पोकळ घोषणा आमच्या राज्यकर्त्यांनी केल्या. दाउदला पाकीस्तानातून पळून जाण्याची संधीही दिली. या दरम्यान ज्या मोस्ट वाँटेड लोकांची यादी भारत सरकारने सोपवली होती त्यातील तिघे तुरूंगातच असल्याचे उघड झाले. यावरून पोलिस खात्याचे अंदाधुंद कारभाराचे संपूर्ण जगाने दर्शन घेतले. दाउपर्यंत पोहोचणे सहज शक्य असताना जो दाउदच्या संपर्कात होता, ज्याच्याकडे त्याची माहिती होती त्या पत्रकार जे डे यांच्या सहकार्याने दाउदपर्यंत चूपचाप पोहोचणे आणि नंतर जाहीर करणे पोलिसांना सहज शक्य झाले असते. पण हे घडू शकले नाही. जे डे यांची हत्या झाली. त्यामुळे या प्रकरणाकडे एक राजकीय हस्तक्षेप तपासकार्यात होत असल्याची शंका येण्यास वाव आहे.जून २०११
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा