‘शांतपणे गुपचूप बैस,’ एक जण दुसºयाला समजावत होता, पण त्याचे समाधान होत नव्हते. तो म्हणत होता की, ‘पण मला भीती वाटतेय रे’. ‘टेन्शन घेऊ नकोस, मी सांभाळतो सगळे’, पहिल्याचे दुसºयाला धीर देणे चालूच होते, पण तिसरा अधिकच घाबरत होता, किंबहुना पहिल्याच्या समजावण्याने तो अधिकच टेन्शनमध्ये येत होता. शेवटी अखेरचे समजावत त्याला पहिला म्हणाला की, ‘अरे, काय होईल फार फार तर? जरा सर्व्हायव्ह करायला शिक. मुंबई आहे ही. जास्तीत जास्त काय, तर पकडले जाऊ. फासावर तर देणार नाही ना तो? दंड भरू.’ ‘पण कुणी पाहिले तर? बाकीचे कसे बघतील आपल्याकडे?’ त्याने शंका विचारली, तसा पहिला म्हणाला की, ‘ही मुंबई आहे, इथे कुणालाही कुणाकडे बघायला वेळ नाही आणि अशी वेळ प्रत्येकावर कधी ना कधी आलेली असतेच.’
आता त्याला थोडा धीर आला. लोकल धावत होती. एकेक स्टेशन पुढे जात होती. लोकलची धडधड आणि त्याच्या छातीतील धडधड वाढतच होती. शेवटी पहिला पुन्हा एकदा म्हणाला की, ‘लहानपणी चोर-पोलीस हा खेळ कधी खेळला नाहीस का?’ खिन्न हसत तो म्हणाला, ‘खेळायचो ना, पण मी लगेच पकडला जायचो.’ त्यावर हसत पहिला म्हणाला, ‘सामान्य पापभिरू माणसाचे असेच असते. किरकोळ चूकही त्याला खूप मोठे पाप वाटते आणि तो त्यातच पकडला जातो, पण आपण दंड भरू आणि मोकळे होऊ.’
लोकलमधला हा संवाद लक्ष वेधून घेणारा होता. गर्दीच्या वेळी तिकीट काढायचे राहून गेले आणि ते दोघे पटकन गाडीत चढले होते. त्यानंतर त्याच्या लक्षात आले की, अरेच्चा! तिकीट काढायचे राहूनच गेले. त्यापैकी एकाचा पास होता. त्यामुळे तो भराभरा गाडीत चढला, त्याच्यापाठोपाठ दुसराही चढला. त्याच्या लक्षात आले नाही की, तिकीट काढायचे आहे. अनवधानाने झालेली चूक, पण त्याचे टेन्शन त्याने घेतले होते, पण त्याला समजावताना लहानपणीच्या चोर-पोलीस खेळाची आठवण करून दिली होती त्याच्या मित्राने.
खरेच मुंबईतील लोकल आणि त्यातील फुकटे प्रवासी हा चोर-पोलिसाचाच खेळ असतो. या खेळात बहुतेक सर्वांनीच कधी ना कधी भाग घेतलेला असतो. अगदी भल्याभल्यांनीही. त्यात कुठे चोरी करण्याचा वाईट हेतू असतो असे नाही, पण कळत-नकळत विदाऊट तिकीट जाणे भाग पडते आणि नेमके पकडले जाण्याची भीती असते. त्यामुळे आपण पकडले जाणार नाही यासाठी घेतली जाणारी खबरदारी म्हणजेच हा चोर-पोलीस खेळ. मी एकदाही विदाऊट तिकीट प्रवास केला नाही, असे कोणीही छातीठोकपणे सांगू शकणार नाही, पण पकडला तर चोर, नाही तर राजाहून थोर अशी अवस्था असते. रेल्वेचे टीसी नेमक्या माणसांना कसे पकडतात हे न उलगडणारे कोडे आहे. त्यातून आजकाल टीसी वेगळेच दिसतात. पूर्वी टीसी लोकलमधूनही हिंडायचे, पण आता गर्दीत चेकिंग करणे सोपे नसल्याने शक्यतो ते प्लॅटफॉर्मवरच सापळा लावून बसलेले असतात. पूर्वी काळ्या कोटामुळे पटकन टीसी कुठून येतोय हे कळायचे आणि दुसºया दाराने कलटी देणे सोपे जायचे, पण आजकाल पांढºया शर्टमुळे टीसी चटकन ओळखूच येत नाही. एकदम पकडल्यावरच समजते, पण ते अचूकपणे विदाऊट तिकीट प्रवाशांना पकडतात हे नक्की. ते ज्यांना अडवतात, त्यापैकी बहुतेक जणांकडे तिकीट नसते, कुणी जुने तिकीट दाखवतो, कुणाचा पास संपलेला असतो, कुणी तिकीटच काढलेले नसते, कुणी अलीकडच्या चार स्टेशनचे तिकीट काढलेले असते, म्हणजे सीएसएमटीला उतरणाºयाकडे दादरपर्यंतचेच तिकीट असते. असे अनेक प्रकारचे विदाऊट तिकीट पकडले जातात. मग त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो, म्हणजे चोर-पोलीस हा खेळ इथे सतत चालूच असतो.
प्रत्येकाने त्यात कधी ना कधी भाग घेतलेला असतो. त्यामुळे कधी कधी वाटते की, जर दीवार हा चित्रपट पुन्हा काढला, तर त्या अमिताभच्या-विजयच्या हातावर ‘मेरा बाप चोर हैं’ असे न लिहिता ‘हम सब चोर हैं’ असे गोंदवले जाईल. विदाऊट तिकीट प्रवाशांची एक मानसिकता असते. टीसीला चुकवल्यानंतर फार मोठा विजयी आनंद त्यांच्या चेहºयावर असतो. सुटलो बुवा म्हणून स्टेशनमधून बाहेर पडतात. काही जण अत्यंत हिशोबी असतात. नेहमी विदाऊट तिकीट प्रवास केल्यावर एखादेवेळी पकडलो गेलो आणि दंड भरला, तर काही फरक पडत नाही, असे त्यांचे मत असते. हे निर्ढावलेले प्रवासी असतात, पण कधी तरी अनवधानाने विदाऊट तिकीट प्रवास करणाºयांचे छातीचे ठोके रेल्वे इंजिनसारखे धडधडत असतात, हे नक्की. पकडल्यावर काय अपमान होतो याची त्यांना भीती असते, म्हणजे पकडून दंड भरण्यापेक्षा आपण विदाऊट तिकीट पकडले गेलो आणि आसपासचे लोक आपल्याला पाहत आहेत, यानेच त्यांना मेल्याहून मेल्यासारखे होते, म्हणजे आपण जेव्हा घसरून पडतो, तेव्हा पडल्याचे दु:ख किंवा लागल्याचे दु:ख नसते, तर कोणी पडल्यावर हसले की त्याचे दु:ख असते. तसेच इथे होते. आपली चूक आहे, आपण दंड भरायचा, पण त्याने अडवून दंड भरा म्हणताना बाकीचे ज्या नजरेने बघतात त्याचे टेन्शन असते. काय सुशिक्षित माणूस आहे, पण विदाऊट तिकीट जातो? काय बाई आहे, चांगल्या घरची दिसते, पण तिकीट नाही काढले? या तरुणांना तिकीट काढायचेही भान नाही का? अशा असंख्य प्रतिक्रिया येणार. तशीच आपल्याबाबत असणार याची भीती असते. कधी कधी अनवधानाने आपण विदाऊट तिकीट प्रवास करतो. पास काल रात्री बारा वाजता संपला, ते लक्षातच नाही आणि थेट रोजच्याप्रमाणे गाडीत बसलो. गाडीत सहज कोणी तरी आज अमूक एक तारीख आहे म्हणतो आणि आपल्या लक्षात येते, अरे बापरे, पास संपलाय... आता पकडले गेलो तर? कधी शेवटची गाडी असते, त्यानंतर लवकर गाडी नसते, कधी नेहमीची गाडी पकडली नाही आणि लेटमार्क लागला तर? या काळजीने रांगेत उभे न राहता थेट गाडीत घुसले जाते. अनेक कारणांनी केव्हा ना केव्हा तरी प्रत्येकाचा विदाऊट तिकीट प्रवास झालेला असतोच. अशाच प्रकारचा तो आज चिंतेत होता.
सीएसएमटीला गाडी थांबली, तसा तो निश्चयानेच पुढे गेला. समोर टीसी होताच. टीसीच्या दिशेनेच तो जात होता. निर्धार एकच केला होता, त्याला आपण होऊन सांगायचे की, दंड भरतोय, तिकीट नाहीये. टीसीच्या दिशेने तो जात असतानाच टीसी त्याच्याकडेच पाहत होता, पण तो ठाम होता. मग टीसीच वेगाने पुढे आला आणि त्याने झेपावून मागच्या माणसाला पकडले. अरेच्चा, आपण सुटलो? आता तो पाहत राहिला काय होते पुढे ते? टीसीने त्याला नेहमीचा पासधारक आहे म्हणून दुर्लक्षिले होते, पण त्याच्या मागून येणाºया विदाऊट तिकीट प्रवाशाला पकडले होते. आता तो पकडला गेलेला तरुण गयावया करू लागला. ‘साहेब, मी गरीब आहे. मला महत्त्वाच्या कामाला जायचे होते.’ ‘दंड भरा प्रथम...’ टीसीने सांगताच तो काकुळतीला येत म्हणाला, ‘ एवढे पैसे नाहीत हो माझ्याकडे.’ हे पाहून सुटलेल्या विदाऊट तिकीट प्रवाशाला वाईट वाटले. आपण सुटलो, पण हा पकडला गेला आहे. तो तसाच मागे वळला आणि म्हणाला, ‘साहेब, नेहमीचा सभ्य तरुण आहे तो. त्याला मी ओळखतो. त्याचा दंड मी भरतो. हे घ्या पैसे, त्याला सोडा. त्याच्या नोकरीचा प्रश्न आहे. नसतील त्याच्याकडे. मदतीसाठी धावलेल्या त्या विदाऊट तिकीट प्रवाशाच्या पाठीवर हात ठेवत टीसी म्हणाला,’ ‘ठीक आहे, सोडतो त्याला. तुम्हाला कशाला दंड?’ ‘नाही, रेल्वेचे नुकसान नको, हवे तर किमान तिकिटाचे पैसे तरी घ्या,’ असे म्हणत पन्नासची नोट टीसीच्या हातात टेकवून त्या तरुणाला घेऊन तो विदाऊट तिकीट माणूस निघूनही गेला. आपल्याला दंड पडला नाही, म्हणून त्याने वेगळ्या मार्गाने दंड भरला होता!
प्रफुल्ल फडके/अन्वय
९१५२४४८०५५